प्रवास ! स्वतःचा.....स्वतःशी
प्रवास ! स्वतःचा.....स्वतःशी
गर्दीत माणसांच्या एकटाच फिरतो मी
हितगुज करण्याला माणूस शोधतो मी
दुख-या मनासमोर सांत्वनाच्या उभ्या राशी
आपलेच हात झेपावती आपल्या डोळ्यापाशी
व्याकूळ क्षणांना कधी मी कवटाळतो ऊराशी
आठवणींचे दीप मग पेटतात माझ्या ऊशाशी
अंधाऱ्या रात्रीलाच कधी आधार मागतो मी
आशेच्या दिव्याची भव्य आरास मांडतो मी
गेले घडून जे जे दडपतो मी हृदयाशी
माफीचा साक्षीदार मग असतो मी स्वतःशी
नश्वर हा देह अन् भावनांचे नाते दुःखाशी
सुख-दुःखाचा खेळ खेळतो मी प्रारब्धाशी
हरवलेली सुखे दुःखाच्या खाईत शोधतो मी
रोज नवे यातनांचे कडे पार करुन जातो मी
गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी
अन् डाव वेदनांचा नव्याने जिंकतो मी
