परिवर्तनाची लाट
परिवर्तनाची लाट


समाजाच्या वर्णव्यवस्थेने
बंदिस्त होते जीवन
जीवनाच्या जगण्याचे
होते हाल भयाण
स्पर्शानं विटाळत होती
देव अन् पाणीसुद्धा
पशुपेक्षाही हीन होती
वागणूक अन् जगणंसुद्धा
क्रांतीचं वादळ उठलं
अन् समाज सारा जागला
प्रकाश तो प्रज्ञासूर्याचा
अंधार चिरत फाकला
वाचा आली
बंदिस्त पिंजऱ्यातील पोपटांना
संघर्षाच्या जाणीवेनं
चैतन्य आलं दीनांना
विचाराने तेज विचाराची
क्रांती घडत गेली
दशेच्या जीवनसागरात
परिवर्तनाची लाट आली