मराठमोळी स्त्री...
मराठमोळी स्त्री...
ब्रह्ममुहूर्ताच्यावेळी देवाचे पूजन करणारी,
दारासमोर ठिपक्यांची रांगोळी काढणारी,
तुळशी वृंदावनला प्रदक्षिणा घालणारी,
अंगणात सडा शिंपडून, केर काढणारी ,
घरची खरी लक्ष्मी दिसते तू...
मराठमोळी स्त्री शोभते तू...
माथ्यावर गडद भाग्याचं कुंकू लावून,
साडीचा पदर कंबरेला खोचून,
दिवसभर स्वयंपाकघरात राबणारी,
आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करणारी,
खरी अन्नपूर्णा दिसते तू...
मराठमोळी स्त्री शोभते तू...
कपाळावर चंद्रकोर लावून,
भगवे वस्त्र परिधान करून,
तुझ्या हातात ढोल,
मनात राजेंचे बोल,
खरी शिवकन्या दिसते तू...
मराठमोळी स्त्री शोभते तू...
घरच्या जबाबदाऱ्या पार पाडून,
हाती कर्तव्याचा वसा घेऊन,
ज्ञानदायी माऊली तू घराबाहेर पडते,
सर्व क्षेत्रात आपले कर्तव्य गाजवते,
खरी सरस्वती दिसते तू...
मराठमोळी स्त्री शोभते तू...
सैन्यदलात देशसेवेसाठी भरती होतांना,
पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतांना,
अन्याया विरुद्ध आवाज उठवतांना,
हक्कांसाठी लढा देतांना,
खरी मर्दानी दिसते तू...
मराठमोळी स्त्री शोभते तू...
सणाला काठपदराची नऊवारी नेसते,
पारंपारिक साजशृंगार करते,
तुझ्या जोडीदाराची तू पाठराखीन,
त्याच्या आयुष्यातली प्रेमाची मालकीण,
खरी रुक्मिणी दिसते तू...
मराठमोळी स्त्री शोभते तू...
