जोडी तुझी माझी
जोडी तुझी माझी
जोडी तुझी माझी अतूट अभेद्य
नाही तिला अंत नाही कुठे आद्य
आठवतंय? एकदा चंदनी चांदण्यात बसलीस
रातराणी होऊन मी ही होतो तिथे मंद मंद गन्ध घेऊन
भल्या पहाटे तू एकदम निघालीस नी जाऊन बसलीस
गुलाबाच्या फांदीवर कळी बनून
मग मला पहावी लागली तुझ्या उमलण्याची वाट
घेऊन गन्ध-रंगाचा थाट
एकदा तू इवलीशी कैरी झालीस
मग मी ही झालो थोडा तुरट थोडा आंबट
मग झालीस मस्त गोड
मग मी झालो लाल केशरी आंब्याची फोड
एकदा चक्क तू बनलीस फणसाचा गरा
केलीस कमाल मग मी ही होतो तिथे बनून खडबडीत काटेरी साल
एकदा तू धाडकन घेतलीस कड्या वरून उडी
नी नाचलीस थुई-थुई तुषार बनून
आठवतंय? मी ही होतो तिथे सप्तरंगी कमान धरून इंद्र-धनु बनून
जोडी तुझी माझी अतूट अभेद्य
नाही तिला कुठे अंत वा नाही कुठे आद्य
एकदा मात्र बसलीस रुसून फुरंगटून
मग मला ओघळावं लागलं तुझ्या गाला वरून अश्रू बनून
पण सांग ना कशाला असं रुसायचं रागवायचं
पेक्षा कायम का नाही सतत हसत सर्वांना हसवत रहायचं
अग जोडीच आपली अतूट अभेद्य
नाही तिला आद्य नी नसेल कधी अंत
नाही का?

