राधा-कृष्ण रास
राधा-कृष्ण रास
ब्रह्माण्ड जाणणं
हा ब्रह्मानन्द.
तो घेण्यासाठी,
आपला
मनुष्य जन्म.
कणा-गुणांचा
अनन्त अमाप,
अजन्मा अमर्त्य
संग्रह, ब्रह्माण्ड.
कणांमुळे गुण,
नी गुणांमुळे कण
प्रगटतात.पण
एकमेकांमुळे
सतत बदलतात.
कणांचं परमपण
म्हणजे
निर्गुण,निराकार,
बिंदुवत,
निव्वळ अस्तित्व,
रुद्र.
नी गुण,
अगणित-अमाप.
त्यांची विवीध मिश्रणं.
काही सुष्ट-संतुष्ट,
काही विशिष्ठअशिष्ट,
काही भद्र
काही अ-भद्र.
काही देव
काही दानव
मात्र,सुष्ट-दुष्ट,
भद्र-अभद्र,
विशिष्ठ अशिष्ट,
देव दानव सापेक्ष.
ब्रह्माण्ड
सदा निःपक्ष.
कृष्ण काळा नी
गोरी राधा.
हा प्रकार,
वर्ण-भेदाचा नाही,
छाया प्रकाशाचा
खेळ साधा.
राधा-कृष्ण
ब्रह्माण्डाचं रूपक
कृष्ण-विवर नी
आकाश-गंगेचं
वर्णन समर्पक.
कृष्ण-विवरात
सारे कण, सारे गुण,
जातात विसर्जून,
बनतात कृष्ण
आपणहून.
आकाश-गंगेत
सारे कण, गुणानुरूप,
प्रगटतात,आवर्जून.
रंग-वर्णाच्या
गुण-मिश्रणाच्या
कोणत्याही छटा
तिथे दिसतात उठून
कृष्ण सानिध्यात
भक्तांचं
होतं समर्पण.
भक्त सरतो,
जातो कृष्णच होऊन
राधा,
साऱ्या भक्तीचं मिश्रण.
साऱ्या भाव-भावनांचं,
असीम श्रद्धेचं,
गुण -समूहाचं
निखळ प्रगटन.
कृष्ण-विवर कृष्ण,
संकलन ,समर्पण.
राधा,आकाश-गंगा
साऱ्या कणा-गुणांचं,
प्रगटीकरण.
साऱ्या ब्रह्माण्डाचं
असणं,दिसणं,जाणवणं
कृष्ण-विवर कृष्ण,
ब्रह्माण्डाचा श्वास
आकाश-गंगा राधा,
ब्रह्माण्डाचा उत्श्वास
श्वासा वीना
उत्श्वास नाही
उत्श्वासा वीना
श्वास नाही
राधे वीना
कृष्ण नाही
कृष्णा वीना
राधा नाही
राधा-कृष्ण रास
ब्रह्माण्डाचं
सुलभ-सोपं
उदाहरण खास
आकाश-गंगा नी
कृष्ण-विवरात
सारं ब्रह्माण्ड
सामावलं आहे.
राधा-कृष्ण रास-क्रीडेत
आपल्याला ते घावलं आहे
आपलं विश्व आपल्याला
मनोमन भावलं आहे
