बापूजी
बापूजी
बापूजी, तुम्ही एक बरं केलात
तीन माकडांची गोष्ट सांगून गेलात.!
वाईट पाहायचं नाही
वाईट ऐकायचं नाही
वाईट बोलायचं नाही...
पण खरं सांगू का बापूजी..?
या आधीही तीन माकडं होती!
गळ्यापर्यंत पाणी आल्यावर
पोटचं बाळ पायाखाली घेऊन
स्वताचा जीव वाचवणारं
स्वार्थी!,
सुतारानं मारलेली पाचर काढून
स्वतःची शेपूट अडकवून घेणारं
उठाठेवी!!
आणि काळीज खाऊ पाहणाऱ्या मगरीला
तेच काळीज झाडावर ठेवलेय सांगून
मृत्यूच्या जबड्यातून सुटका करून घेणारं
धूर्त सुद्धा!!!.
बापूजी, तुमच्या तीन माकडांपेक्षा
हीच तीन माकडे वावरतायेत आजकाल
आजूबाजूला
गर्दीत नि गर्दी नसलेल्याही स्थळी
कधी कधी माझीच सावली बनून देखील.
