आठवणीतलं प्रेम
आठवणीतलं प्रेम
आठवतय का तुला की विसरलास
सर्वांसमोर मला घातलेली मागणी
रस्ता अडवून गुडघ्यावर वाकलास
विचारलेस होशील का माझी राणी
किती लाजून चूर झाले होते मी
प्रेमसमर्पणाचे दिलेस लाल गुलाब
किती बिनधास्त होते तुझे वागणे ही
फार ऐटीत होता तुझा रुबाब
टक लावून समोरासमोर बसायचास
मी मात्र तुझ्या नजरेने बावरून जायचे
भरगच्च वर्गात तुझ्या प्रेमपत्रांची विमानं
अलगद माझ्या वेणीवर येऊन बसायची
वाऱ्याच्या झुळकीसारखा यायचास
हळूच कानात सांगायचास गुपित
तुझी नेहमीच घाई यायची नि जायची
असाच कायमचा निघून गेलास अधांतरीत
प्रेमाच्या वाळूत कोरलेली आपली मने
लाटांच्या संगतीला विरून गेली
सागर किनाऱ्यावर घेतलेली वचने
आठवणीतल्या प्रेमात दडून राहिली

