आई
आई
साद घालते मनाला माझ्या माहेरचे अंगण
जोजवते नित्य मला माझ्या मायचे गं प्रांगण...
हिऱ्यासम अनमोल तिच्या ममतेचे कोंदण
अमृतासम करते प्रेमवर्षावाचे शिंपण...
तळहाताच्या फोडासम जपलेसं बालपण
घेण्या गगनभरारी दिलीस योग्य शिकवण..
येता पंखात गं बळ केली सासरी बोळवण
पाजलेले बाळकडू करी माझी पाठराखण..
तुझी आठवण येते आई अन दाटतो कंठ
उरी फुटतो पाझर ओलावतो पापणकाठ..
घेईन जन्म तुझ्यापोटी बांधली मी खूणगाठ
जन्मोजन्मी हीच लाभो दे वरदान नीलकंठ..
