Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Inspirational Others

3.7  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Inspirational Others

वेडा

वेडा

6 mins
196


बाहेर वीज कडाडली. त्या आवाजाने सीमाने शहारून खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं. पावसाचा जोर वाढला होता. तिला काही समजत नव्हतं. 

" जावं का? दवाखान्यात आज. सकाळपासून हा असाच वेड्यासारखा कोसळतोय. सगळीकडे कसं हिरवंगार झालं आहे. पाण्याचे लोट बाहेर वाहत आहेत. मातीचा आल्हाददायक मोहून टाकणारा सुगंध चोहीकडे पसरला आहे." या सगळ्याचा आस्वाद ती घेतच होती की तिचं लक्ष रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या शंकराच्या देवळाकडे गेलं. देवळासमोर असणाऱ्या लिंबाच्या पारावर तो आजही तसाच बसला होता, एकदम निश्चल. फक्त पावसामुळे आज त्याची जागा बदलली होती. 


गेले चार महिने या गावात राहायला आल्यापासुन ती त्याला तिथेच बाजूला असणाऱ्या कचराकुंडीजवळच बसून राहिलेलं पहायची. ऊन असो वा वारा, दिवस असो वा रात्र. त्याच्या वागण्यात कोणताच फरक तिला जाणवत नव्हता. कचराकुंडीत मात्र तो हात घालून काहीतरी शोधायचा. काय शोधत असावा बरं? बहुतेक जेवण, कपडे... कधीतरी ती सहानुभूती पोटी त्याला काहीतरी उरलंसुरलं सुमतीच्या हातून पाठवायची.


त्याचे विचार तिच्या डोक्यात गर्दी करतच होते तोवर दारावर टकटक झाली. तिने दार उघडलं तर समोर सुमती!


" चला ताई, दवाखाण्यात जायचं आहे ना तुम्हाला आज. सकाळी साहेब ऑफिसला जाताना सांगून गेले." सुमतीने घरात पाऊल टाकताच नेहमीच्या सवयीनं बडबडायला सुरवात केली. 


सुमती सीमाकडे घरकामाला होती. रवी पी डब्लू डी मध्ये अधिकारी होता. त्याची चार महिन्यांपूर्वी या गावात बदली झाली आणि ते दोघे या गावात राहायला आले. तेंव्हापासून सुमती त्यांच्याकडे कामाला येत होती.


" रवी पण ना! किती काळजी करतात. त्यांना सांगितलं होतं, माझं मी जाऊन येईन दवाखण्यात पण ऐकतील तर खरं. आज महत्वाची मिटिंग नसती तर स्वतःच आले असते सोबत. जेंव्हा पासून गोड बातमी समजली आहे तेंव्हापासून किती काळजी घेत आहेत." सुमतीचं बोलणं ऐकून सीमाचं स्वगत सुरू झालं.


" आवरलं का ताई! पाऊस थोडा उघडला आहे तोवर जाऊन येऊ. एकदा सुरू झाला की परत तो काय थांबायचं नाव घेणार नाही." सुमती घाई करत होती.


" हो गं, आवरलं माझं चल." दोघींनी पायात चपला अडकवल्या आणि दवाखान्याच्या दिशेने चालू लागल्या. 


टेस्टचे रिपोर्ट आणि चेकअप झाल्यानंतर त्या दोघी दवाखान्यातून बाहेर पडल्या. सीमाला भरलं कारलं खायचं मन करत होतं म्हणून भाजी घेण्यासाठी दोघी पेठेकडे निघाल्याचं होत्या इतक्यात अचानक तो त्यांच्यासमोर उभा ठाकला. तोच तो... जो सकाळी तिला खिडकीतून लिंबाच्या पारावर बसलेला दिसला होता. त्याला पाहताच सीमा घाबरली आणि सुमतीच्या मागे जाऊन लपली.


" ये मन्या, दिसत नाही का तुला. चल हो इथंन बाजूला. येडा कुठला!" सुमती त्याच्यावर ओरडली पण तिच्या बोलण्याकडे त्याचं लक्ष होतंच कुठं? त्याची नजर सीमाच्या पोटावर खिळली होती. तो एकटक सीमाच्या पोटाकडे पाहत होता. त्याची ती नजर पाहून सीमाने पदर हळूच पोटावर ओढून घेतला. 


" सुमती चल घरी, मला भीती वाटतेय. चल लवकर." सीमा खूपच घाबरली होती. ती सुमतीचा हात पकडून तिला ओढू लागली. दोघी घरी परतल्या पण सीमाची भेदरलेली अवस्था पाहून सुमतीचा पाय तिथून निघत नव्हता. रवी येईपर्यंत ती तिथेच थांबली. रवी येताच सीमाने रडत झालेला सगळा प्रकार त्याला सांगितला. रवीने प्रेमाने जवळ घेत तिची समजूत काढली पण त्याची ती पोटावर खिळलेली नजर काही केल्या तिचा पिच्छा सोडत नव्हती.


दुसऱ्या दिवशी सकाळी रवी ऑफिसला गेल्यावर तिने घाबरतंच खिडकीतून बाहेर डोकावलं. तो आजही तिथेच बसला होता... कचराकुंडीजवळ. चेहऱ्यावर तेच निश्चल भाव पण आज त्याची नजर मात्र हिच्या घराकडे. ती मनात चरकली. काय करावं तिला काही कळेना. तिने दरवाजा आणि खिडकी बंद करून घेतली. तरीही ती मधून मधून खिडकीच्या बारीक फटीतून डोकावून पहायची पण दरवेळी त्याची नजर तिला तिच्या घरावर स्थिरावलेलीच जाणवली.


संध्याकाळी रवी ऑफिसमधून आल्यानंतर ती त्याच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागली. सकाळपासून थोपवून ठेवलेला बांध फुटला होता. 


" रवी प्लिज आपण इथे नाही राहायचं. मला इथून घेऊन चला. मला खूप भीती वाटतेय रवी... प्लिज." ती हुंदके देत बडबडत होती. रवीला समजत नव्हतं अचानक हिला काय झालं. 


" अगं हा तुझा भास असेल. तो वेडा आहे. त्याला काय घाबरायचं. इथे त्याच्या स्वतःच्या जीविताची प्रश्न आहे. तो आपल्याला काय इजा पोहचवणार. तू अजिबात घाबरू नकोस. काही नाही होणार." रवी तिची समजूत काढत होता .


" त्याची ती नजर... आपल्या बाळाला तो काही करणार तर नाही ना?" सीमा अजून रडतच होती.


" काही नाही होणार. विश्वास ठेव माझ्यावर. बाहेर बघ किती छान वातावरण आहे. चल जेवण आटोपून आपण वॉकला जाऊ. बाहेर गार वाऱ्यात तुला जरा बरं वाटेल." रवीने जेवणाची ताटं वाढून घेतली.


" नको बाहेर नको, तो आहे बाहेर... प्लिज!"


" मी आहे ना! काही नाही होणार." 


जेवणानंतर दोघे घराबाहेर शतपावली करायला बाहेर पडले. तिची नजर अजूनही अधूनमधून देवळाकडे जात होती पण आता तो तिथे नव्हता म्ह्णून ती थोडी रिलॅक्स होती. दोघे येणाऱ्या नवीन पाहुण्याच्या गप्पात रंगले होते इतक्यात गुडूप अंधारातून तो एकदम त्यांच्यासमोर उभा ठाकला. त्याला समोर पाहताच सीमा रवीला बिलगली. ती थरथर कापत होती. त्याला पाहून रवी देखील यावेळी घाबरला.


" मुलगी असेल तर तिला मारू नका हं! मला द्या, मी सांभाळेन तिला. पण मारू नका हं!" त्याच्या डोळ्यात आगतिकता होती. इतकं बोलून तो अंधारातून जसा प्रकट झाला तसा झटक्यात गायब झाला. सीमा आणि रवीला तो नक्की काय बोलला ते कळायला बराच वेळ गेला. त्या रात्री त्या दोघांनाही नीट झोप लागली नाही. 


दुसऱ्या दिवशी सकाळी सुमती घरी आली. सीमाची अवस्था पाहता आज रवी घरीच थांबला होता. त्याने सुमतीकडे त्याच्याविषयी चौकशी केली असता ती म्हणाली,


" तो वेडा मन्या! अहो, चार वर्षांपूर्वी त्याच्या बायकोनं मेलेल्या पोरीला जन्म दिला आणि ती देवाघरी गेली. तेंव्हापासून ह्याच्या डोक्यावर परिणाम झाला आणि तेंव्हापासून हा असाच कधी दिवसभर देवळासमोरच्या पारावर तर कधी कचराकुंडीजवळ दिवसभर बसून असतो." सुमतीकडून त्या वेड्याबद्दल ऐकून सीमाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याच्याबद्दलची भीती थोडी कमी होऊन त्याच्याबद्दल मनात कणव दाटून आली.


खरं पाहता त्याचं नाव मनोहर. डोक्यावर परिणाम झाला आणि तो मनोहरचा वेडा मन्या झाला. सुरवातीला तो दिवसभर गावात हुंडारायचा. इतकंच काय ते त्याला ठाऊक. चेहरा नेहमी कोऱ्या कागदासारखा, त्यावर कधी साधी रेघही उमटत नसायची. मनात कधी भावनांचे तरंग उमटत असावेत की नाही हा प्रश्न त्याला पाहणाऱ्याला पडे. नेहमी मौन धारण केलेलं. तोंडाला जणू कुलूप लावलं होतं. तो कधी कोणाकडे काही मागत नसे. देवळात येणाऱ्या आयाबाया त्याला काहीतरी देऊन जात त्यातच त्याची गुजराण होई.


एक दिवस कचराकुंडीत त्याला कापडात काहीतरी गुंडाळून टाकलेलं दिसलं. हात लावून पाहण्याची त्याची हिम्मत होत नव्हती. थोडा वेळ त्याने विचार केला. इकडे तिकडे पाहिलं आशेने आणि उत्सुकतेने त्याने ते उघडून पाहिलं. मांसाचा गोळा होता आत. त्याने गोंधळून, तुच्छतेने आणि द्वेषाने तो फेकून दिला आणि तिथून चालता झाला. तेंव्हापासून त्याने स्वतःला एका कोशात गुरफटून घेतलं.


त्या दिवसानंतर तो अशांत राहू लागला. एक हतबलता, आगतिकता नेहमी त्याच्या चेहऱ्यावर जाणवायची. तो गावात कमी जाऊ लागला. कधी मंदिरासमोरच्या पारावर तर कधी कचराकुंडीजवळ तो बसत होता. रात्रभर जागून कचराकुंडीवर पहारा देऊ लागला. रात्रीच्या अंधारात त्याचे डोळे नेहमीच कशाच्या तर शोधात असायचे. आधी मन्या कोणत्याही स्त्रीकडे डोळे वर करून पाहत नव्हता पण आजकाल तो त्यांना एकटक न्याहाळायचा. तो त्यांना पाहून बोटांवर काहीतरी आकडेमोड करायचा. बायका त्याला घाबरू लागल्या होत्या. त्यांना त्याच्या नजरेत वेडसरपणाची छाप जावणत होती. सगळे त्याला प्रश्नार्थक नजरेने पाहत होते.


एक दिवस तो काहीतरी ठरवून गावच्या सावकाराच्या घरी पोहचला. दुपारची वेळ होती. सावकाराची सून जेवण आटोपून वामकुक्षी घेण्याच्या तयारीत होती. त्याने खुणेनेच तिच्याकडे जेवणाची मागणी केली. हे मात्र विचित्र होतं. कधीच कोणाकडे काहीही न मागणारा मन्या आज स्वतःहून जेवण मागत होता. अवाक्षरही तोंडातून बाहेर न काढता तो जेवला. जेवण करून तो माघारी वळाला. एक क्षण जागीच थबकला. माघारी वळून त्याने सावकाराच्या सुने कडे पाहिलं आणि तडक तिच्याजवळ गेला आणि तिच्या पोटाकडे पाहत तिला म्हणला,


" तिला मारू नका हं. मी सांभाळेन तिला पण तिला मारू नका." तेंव्हापासून गप्प राहणाऱ्या मन्याला वाचा फुटली आणि गावातल्या आयाबायांची बोलती बंद झाली होती. त्यानंतर मन्याने एक दोन दिवसांच्या अर्भकांना कचराकुंडीतून काढून रात्रीच्या अंधारात पोलीस स्टेशनच्या पायरीवर नेऊन ठेवलं होतं. तेथून त्यांची रवानगी अनाथालयात केली गेली होती. मन्याच्या जीवनाचा एकच उद्देश होता, अवेळी खुडल्या जाणाऱ्या कळ्यांना नवजीवन देणं.


दुसऱ्या दिवशी सकाळी सीमाने खिडकी उघडली. तिने वर आकाशाकडे पाहिलं. दाटलेलं सारं मळभ दूर झालं होतं. सारं कसं स्वच्छ, शुभ्र, निरभ्र... तिची नजर देवळाकडे गेली. तो आताही तिथेच होता. रवी ऑफिसला गेल्यानंतर तिने एका डब्यात थोडं जेवण भरून घेतलं आणि सुमतीला सोबत घेऊन देवळाकडे निघाली. पाराजवळ जाताच तिने पिशवीतला डबा काढून त्याच्यासमोर धरला. त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं. तिने हलकेच त्याच्या हातावर थोपटलं. तो स्पर्श इतका आश्वासक होता की त्याचे डोळे भरून आले. त्याच्या डोळ्यात आत्मिक समाधान दिसत होतं.


समाप्त...


फोटो - साभार गुगल

तर माझ्या वाचक मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे सांगायला अजिबात विसरू नका. असेच आणखी ब्लॉग वाचायचे असल्यास माझ्या मधुनिता या फेसबुक पेजला नक्की follow करा. कथा आवडल्यास लाईक, कमेंट आणि लेखकाच्या नावासहित शेअर करा.

© copyright

© all rights reserved.

या कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सारे हक्क लेखिकेकडे राखीव. कथेत अथवा कथेच्या नावात किंवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो कॉपी राईट कायद्याचा भंग मानला जाईल. कथा जशीच्या तशी शेअर करण्यास काहीही हरकत नाही.

    



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy