STORYMIRROR

Krutika Kamble

Comedy Romance Fantasy

3  

Krutika Kamble

Comedy Romance Fantasy

वधूची परिक्षा २

वधूची परिक्षा २

6 mins
173

"आई, माझ्या लग्नाची गं

का तुलाचं पडली घाई?

बाबा, माझ्या लग्नाची हो

का तुम्हांस पडली घाई?

कुणी तरी अहो कुणीतरी

समजावा ना बाई

माझं वय काय झालचं नाही!!!"


"गाऊsssss....." किचन मधून मम्मी ओरडली.

"नको गाऊस..." पप्पा नी लगेच चान्स मारला.

मी आणि पप्पा हसतच होतो की अन्नपूर्णा देवी बाहेर आल्या साक्षात दुर्गा बनून.... एका हातात पळी आणि एक हात कमरेवरी.... बाहेर फुटू पाहणार हास्य ते पाहून घश्यातूनच माघारी परतून पोटात जाऊन कोपऱ्यात दडून बसलं!!!

" मम्मी मी काही नाही केलं.... टिव्हीला गाणं लागलं आहे. मी आणि पप्पा फक्त ते बघत होतो"

पुढचा धोका टाळायचा म्हणजे वेळीच मागे फिरलेले केव्हाही चांगलं....

" कळतं बरेsss.... जा तिन्ही सांज झाली देवाला बत्ती कर आणि शुभंकरोती म्हण..." मम्मीने हुकूम सोडला!!

" म्हणतो बरेsss...." माझ्या हि अंगात काय कमी किडे नाहीत ना!!

त्यावर मम्मी काय म्हणते ते ऐकायला मी थांबलीच कुठे... माझ्या गाडीने तिथून कधीच धुम जी ठोकली ती थेट देवघरात....

आमचं घर म्हणजे छोटा राजवाडा.... राजवाडेचा!!

मुंबईत छोटंसं घर पण महालाप्रमाणे असते त्या मानाने आमचं हे घर राजवाडाच समजला पाहिजे!!

मेन दरवाजाला हॉल... साधारण तीथेच असतो सगळ्यांच्या घराचा हॉल... त्यांच्या समोर किचन... किचनच्या बाजूला एक बेडरूम त्यालाच लागून दुसरा बेडरूम आणि त्या बेडरूममध्ये छोटीशी एक बाल्कनी.... आमचं देवघर म्हणजे किचन मधला एक कोपरा जो फक्त देवासाठी राखून असा ठेवलेला. एक छोटंसं पण सुंदर सुबक लाकडी मंदिर... ज्यात मध्यभागी गणपती..... अगदी समोर विराजमान... आणि त्यांच्या बाजूने सगळ्या छोट्या छोट्या मुर्त्या.... उजव्या बाजूने सुरूवात केली तर आधी येतो जेजुरीचा खंडोबा संगती म्हाळसाला घेऊन मग येतो दख्खनचा राजा ज्योतिबा संगे यमाई देवी नंतर येते ती करनिवासिनी अंबाबाई, विरारची जीवदानी, मुंबईची महालक्ष्मी, सातारचा भैरवनाथ, अष्टविनायक, शिर्डीचे साईबाबा, वणीची सप्तश्रृंगी असे आमचे सगळे देव दैवत..... पण मला आवडत तो..... फक्त आणि फक्त माझा लाडका बाप्पा!!! मंदिरासमोर आले... दिवा लावला... बाप्पा कडे पाहिले अन् इतका वेळ अडवून धरलेले दोन अश्रू नकळत गालावरून ओघाळले. माझ्या मनातलं मी दरवेळी फक्त बाप्पालाच सांगते... अडचणीत सापडल्यावर आधी त्याचंच नाव माझ्या मुखात येते... आनंद झाल्यावर सगळ्यात आधी मी त्यांच्याकडे धाव घेते... पण आज काय बोलू?? काय मागू ??समजतच नव्हते. 'नको बघण्याचा कार्यक्रम' असं मागितले आणि बाप्पाने एकदम सिरीयसली ते घेतलं तर काय मी आयुष्यभर बीन लग्नाची राहू... आणि 'होऊ दे कार्यक्रम' असं म्हणाले, आणि लगेच जुळालं लग्न तर????? नको रे नको बाबा!!! त्यापेक्षा शांतच बसावं... तसं हि बाप्पाला मी काय सांगणार.. न सांगताच कळतं त्याला सगळं मनातले माझ्या... माझा बेस्ट फ्रेंड, फिलॉसॉफर, माझा गाईड सगळं तोच तर आहे!!

" गाऊsss मनात नाही.... मोठ्याने म्हण शुभंकरोती.... पाठ आहे ना का विसरलीस???"

मम्मीची आरोळी ऐकली आणि मनातून चाललेला बाप्पा बरोबरचा माझा सुसंवाद मध्येच तुटला.... च्यामारी... मनात पण कोणी बोलून देत नाही... देवा बघतो ना रे तू!!! काय विचार करून असे नमुने तु धर्तीवर पाठवले!!!

"अगं बोल कि किती वेळ नुसतं बघणार आहेस... मुलींच्या जातीनं कसं पटापटा कामे करावी नाही तर सासरी लोक काय म्हणतील??"

" काय म्हणतील... आळसी म्हणतील जास्तीत जास्त!!!"

" गाऊ... जास्त आगाऊ बोलू नकोस त्यापेक्षा शुभंकरोती म्हण... आज तुझा नंबर आहे काल मनू म्हणाली होती!!"

देवाच्या आरतीला पण नंबर लागतो इथे.... कसे रे हे आमचं घरं!!!!

" अगं म्हण कि...."

" मम्मे... तुला घाई आहे तर तुच म्हण की... बोलून तर देत नाहीस आणि म्हणतेस सारखी सारखी.. अगं म्हण कि... अगं म्हण कि..."

" बरं मी आता काहीच नाही म्हणत... तु बोल पटकन"

"धन्यवाद मातोश्री..."


"शुभं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोsस्तुते

दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडले मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार....

दिवा लावला देवांपाशी,

उजेड पडला तुळशीपाशी

माझा नमस्कार सर्व देवांपाशी 

ये गे लक्ष्मी बैस गे बाजे,

आमुचे घर तुला सारे

तिळाचे तेल कापसाची वात,

दिवा जळो मध्यान्हात

घरातली इडापिडा बाहेर जावो

बाहेरची लक्ष्मी घरात येवो

घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो

दीपज्योति: परब्रह्म दीपज्योति: जनार्दन

दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोsस्तुते 

अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति

इष्टदर्शनं इष्टान्नं शत्रूणांच पराभवम्‌

मुले तो ब्रह्मरुपाय मध्ये तो विष्णुरुपिण:

अग्रत: शिवरुपाय अश्वत्थाय नमो नम:..."


" आता कसं छान वाटलं बघ... संध्याकाळी असे श्र्लोक म्हणावे गं आपले संस्कार दिसतात त्यांच्यातून... सासरची माणसे कशी खुश होतात मग बघ!!!"

मम्मीच प्रवचन ऐकून असं वाटलं मला.... च्या आयला... नांदायला जायाच आहे कि दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेला???? दहावीला आठवी पासूनच तयारी करावी बोर्डाची तशी अजून कशातच काय नाय तरी तयारी सुरू झाली माझ्या नांदायची!!!

मम्मी शी पुन्हा हुज्जत घालण्यापेक्षा आपणं आपलं टिव्ही बघत बसावं.... बाहेर आले आणि पप्पांच्या शेजारी जाऊन बसले. पप्पा टिव्ही ला मुव्ही बघत होते... "काला पत्थर".... अडीचशे वेळा तरी पप्पांनी हा मुव्ही पाहिला असेल तरी मन लावून असे काही बघतात जसं काय पहिल्यांदाच पाहात आहेत.

त्यांना तसं बघत बसलेलं पाहून माझ्या आतील किड्याला काही शांत बसवलं नाही!! मी हळूच पप्पांना म्हणाले....

" पप्पा..... आज तुमचं औषध नाही का घेत??"

" बाळा... रोज रोज दारू पिणं वाईट असतं. कधीतरी घेतलेलं ठिक आहे"

"कधीतरी म्हणजे आठवड्यातून चार वेळा... हो ना!!"

" हो ना मग.."

" पप्पा....त्यापेक्षा तुम्ही पूर्णच बंद का नाही करत"

" सवय झाली ना बाळा...तुझे आजोबा मिलिटरी मध्ये होते.... मी बारा वर्षाचा होतो त्यावेळी ते त्यांच्या सोबत मला काश्मीर ला घेऊन गेले. आधीच मी नाजूक होतो आणि त्यात तिथली थंडी मला झेपली नाही म्हणून त्यांच्या मित्रांनी मला थोडी रम दिली थंडी घालवण्यासाठी... मग काय.... लागली ना सवय. आता बारा वर्षाचा असल्यापासून घेतोय मग कशी सुटेल एकदा लागलेली सवय....."

" काही ही काय पप्पा... लहानपणापासून अभ्यास पण तर करत होता की त्याची बरी सवय झाली नाही तुम्हाला... दहावीला तीन वेळा नापास होऊन शाळा मध्येच सोडली की तुम्ही ??"

याला म्हणतात.... आ बैल मुझे मार!!!!

माझ्या बोलण्यावर पप्पा फक्त एवढंच म्हणाले...

" गाऊ.... उगाच मम्मीचा राग तु माझ्यावर असा काढू नकोस... मी तुझ्या लग्नाच्या बाबतीत तुझी काहीच मदत करू शकणार नाही आणि आता तर अजिबातच मी करणार नाही"

" पप्पा... मला काय येडं लागलंय का वड्याचं तेल वांग्यावर काढायला... तसं ही... मला कोणाच्याही मदतीची काहीच गरज नाही आणि आता मी मम्मीलाच काय कोणालाच घाबरत नाही... कधीच नाही...."

" गाऊsssss...." 

किचन मधून मम्मीचा आवाज ऐकला आणि एवढा वेळ दाखवत असलेला ॲटीट्युड क्षणात धाडकन कोसळला.... तीच्या हाकेसरशी मी धडपडून उभी राहिले.....

" अं.... हं...हा.... मम्मीssss"

पप्पा मात्र माझी झालेली फजिती पाहून गालात हसत होते....

" म्हणते कोणाला घाबरत नाही मी.... हाहाहाहाहाहा"

मी मात्र पप्पांच्या बोलण्याला साफ इग्नोर करत किचन मध्ये निघून गेली....

" बोल मम्मी.... काय काम आहे??"

" मनी- किनी कुठे आहेत?? बघ त्यांना... जेवायला बोलाव त्यांना..."

" मम्मी.... एक तर तु आधी नीट नाव घे त्यांची... मनी किनी काय गं ... मांजरीची पिल्लं असल्यासारखी वाटतात. भाऊ बहीण आहेत ते माझे... मनवा किरण असं नीट बोल की... आणि एवढी काय घाई आहे तुला जेवणाची... आताशी साडेसात झालेत‌ "

" बरं बाई... तुझ्या भावा बहिणीला बोलवं... लवकर जेवा... मला सिरीयल बघायच्या आहेत.... मग अकरा वाजल्याशिवाय मी काहीच करणार नाही "

आग लागो त्या एकता कपूरला आणि तीच्या त्या भंगार सिरीयलला.... बायकांना पार येडं खुळं करून ठेवलं आहे तीने!!

आयुष्याची कसौटी करून कहीं तो होगा म्हणतं कहानी घर घर की करता करता क्योंकी सांस ची बहू करून ठेवलं नुसतं.... हि एकता कपूर स्वतःतर बीन लग्नाची राहीली पण सिरीयल मधल्या हिरोईनला मात्र दुःखात तर असं दाखवलंय जसं काय तीचे दहा लग्न झालीत आणि सगळीकडे तीलाच फक्त सासुरवास काय तो भोगावा लागलाय!!! जाऊ दे आमच्या भगिनीबाई आणि बंधूराज कुठे करमडले ते बघायला पाहिजे.... त्यांना बोलवलं पाहिजे नाहीतर आज काय आम्हाला जेवायला नाही मिळणार!!!! चलो गाऊ बेटा.... लगो काम पे!!!! मनात म्हणत म्हणत मी मनवा आणि किरणला शोधायला घराबाहेर पडले!!!

----------------------------------------------


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy