Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Ishwar Trimbak Agam

Fantasy Inspirational Children


4  

Ishwar Trimbak Agam

Fantasy Inspirational Children


उंदराची फजिती

उंदराची फजिती

4 mins 37 4 mins 37

    एक होती म्हातारी. गावापासून लांब, नदीच्या किनारी तिची एक झोपडी होती. तिच्या झोपडीमध्ये तिच्या बरोबर एक पांढरी शुभ्र मनी आणि एक मोत्या राहायचा. जवळच्या बिळात एक पिटुकला उंदीर पण राहायचा. दर रविवारी गावातला बाजार असायचा. तर म्हातारी काय करायची, बाजारात जाऊन बोरं विकायची. आणि तांदूळ, डाळ, मीठ, मिरची असं खायचं सामान घेऊन यायची. तिच्याबरोबर मनी आणि मोत्या पण जायचा. तेवढीच म्हतारीला सोबत व्हायची. म्हातारीकडे होती एक छोटी नांव. नदीच्या पलीकडे होती बोरांची झाडं. नावेत बसून म्हातारी बोराच्या बोरं गोळा करून आणायची. आणखी पुढे गेलं कि जंगल सुरु व्हायचं. त्यामुळे तिकडे कधी ती फिरकायची नाही. तिच्याबरोबर मोत्या आणि मनी असायची. उंदराला खूप जाऊ वाटायचं पण त्याला कोण नेतच नव्हतं. पण एकदा उंदीर सगळ्यांची नजर चुकवून एका टोपलीत जाऊन बसला. आणि गेला कि, नदीच्या पलीकडे. म्हातारी बोरं गोळा करायची. मोत्या भरलेल्या पिशव्या नावेत आणून ठेवायचा. आणि मनी लक्ष ठेवायची. सगळ्यांची नजर चुकवून उंदीर सटकला. आणि निघाला कि जंगलाच्या दिशेने!


     मग काय विचारता? जंगलातील हिरवी घनदाट झाडी, गवत, झुडपं, बाजूला खळखळत वाहणारा झरा. रंगीबेरंगी फुलपाखरे, पक्षी, आजूबाजूला फिरणारी हरणं, ससे, हत्ती... हे सगळं पाहून उंदीर तर अगदी भारावून गेला. काय करू नि काय नको? असं झालं होतं त्याला! जंगलाचं मनमोहक सौन्दर्य पाहत, तो एका वाटेने पुढे पुढे जाऊ लागला. आणखी आणखी आत मध्ये. तो अगदी आनंदून गेला होता.


    चालत चालत तो जंगलाच्या खूप आतमध्ये आला होता. इकडे घनदाट झाडी होती. अगदी सूर्यप्रकाशही तुरळक होता. पण सगळीकडे अगदी थंडगार वाटत होतं. आजूबाजूला पडलेली काही फळं, त्याने पोटभरून खाल्ली. झऱ्याचं पाणी पिला. थंडगार वारा वाहत होता. म्हातारी अजून बोरं गोळा करत असेल. अजून खूप वेळ आहे. एक झोप काढून आपण लगेच निघू म्हणून तो जागा शोधू लागला. त्याच्या डोळ्यांवर आता खूप झोप आली होती. एका झाडाखाली सावलीमध्ये त्याने अंग टाकलं. आणि तो गाढ झोपी गेला.


    तोपर्यंत इकडे म्हातारीची बोरं गोळा करून झाली होती. शेवटची पिशवी हळूहळू नावेत नेऊन ठेवली आणि निघाली कि घराकडे! इकडे उंदराला त्याचा काहीच पत्ता नव्हता. तो तर गाढ झोपी गेला होता. संध्याकाळ होत आली. सगळे प्राणी आपापल्या घरी निघाले होते. काही तलावावर पाणी प्यायला आले होते. पाणी पिऊन सगळे आपापल्या घरी निघून जाऊ लागले. अचानक पक्षांचा चिवचिवाट वाढू लागला. बरेचसे प्राणी चित्रविचित्र आवाज काढू लागले. काही दूर पळून जाऊ लागले. कुणीतरी पाणवठ्यावर पाणी प्यायला आलं होतं बहुतेक! त्याने मोठी डरकाळी फोडली. कोण आलं होतं? ओळखलं का? हम्म्म.... बरोबर! वाघ आला होता. सगळे प्राणी बाजूला झाले. मिटक्या मारत तो पाणी पिऊ लागला.


    पण इकडे वाघाच्या डरकाळीने उंदराची तर चड्डीच पिवळी झाली होती. कुठे पळू नि कुठे लपून बसू? त्याची तर अगदी भंबेरी उडून गेली. जागेवरच टुणटुण उद्या मारायला लागला. कधी इकडं पळायचा तर कधी तिकडे पळायचा. काही कळेना काय करावं? असं करता करता उंदीर नेमका वाघाच्या माघारी जायच्या वाटेवर आला. वाघही त्याच्या दिशेने येत होता. उंदराची उडालेली धांदल पाहून वाघाला तर हसूच आलं.


'चला, आज आपण याची जरा गम्मत करूया...', असं म्हणून वाघ अगदी त्याच्या पुढेच जाऊन बसला. समोर वाघाला पाहताच उंदीर एकदम चिडीचुप झाला. पिवळे धम्म डोळे, मोठाल्या पांढऱ्या मिश्या, पिवळट सोनेरी रंग आणि त्यावर काळे पट्टे! वाघानं मुद्दामच त्याचा जबडा उघडला. त्याचे दोन सुळ्यांसारखे समोर आलेले मोठे दात! अबब! उंदीराची तर घाबरगुंडीच उडाली. गपगार झाला होता. त्याने वाघाबद्दल मनीकडून आणि मोत्याकडून ऐकलं होतं. तेआठवताच तो विचार करायला लागला.


'अरे... हा तर अगदी आपल्या मनी सारखाच दिसतोय. मनीचा मोठा भाऊ असेल बहुतेक.' हा वाघ नसेल अशी त्याची खात्रीच पटली.

त्याला तश्या अवस्थेत पाहून वाघ म्हणाला, "काय रे? कोण तू? आणि माझी वाट अडवायची हिम्मत कशी झाली तुझी?"

त्याच्या आवाजाने उंदीर घाबरलाच. म्हणाला, "म... म... म.... माफ करा. मी उंदीर."

'उंदीर.... अरे... केव्हढासा आहे हा... आणि असा कसा आला इकडे जंगलामध्ये?', वाघ विचार करत म्हणाला,

"ह्म्म्म... इकडे कसा काय आलास?"

"ह ह हो... वाट चुकून आलो. पण तू.. तू.. तुम्ही कोण?", जरा खोटं खोटंच आपण घाबरलेलो नाहीये असं दाखवत उंदीर म्हणाला.

"मी.? मला नाही ओळखलंस?", वाघाने पुन्हा एकदा डरकाळी फोडून सारं जंगल दणाणून सोडलं. इकडे उंदीर थडथड उडायला लागला होता.

"माफ करा... म... म... म... महाराज... चुक झाली..."

"हम्म्म... वाघ पाहिलास का कधी? वाघ?"

"नाही महाराज..."

"बघायचाय का?"

"नको महाराज... मी जाऊ का?"

"असं कस्स्स? आता जंगलामध्ये आला आहेस तर पाहूनच जा."

"बरं..."

"चल डोळे बंद कर...", पायावर पाय टाकत वाघ म्हणाला.

"हं..."

"वाघ बघायचाय?"

"हो..."

"आता उघड डोळे. हा बघ तुझ्या समोर...!", म्हणत वाघ मोठयाने हसायला लागला.

"हा हा हा हा हा हा.... हा हा हा हा हा हा......"


    उंदराने घाबरतच डोळे उघडले. त्याला कळालं कि, आपल्या समोर तर खरोखरचाच वाघ आहे. वाघ मोठ्याने हसतोय आणि त्याचं आपल्याकडे लक्ष नाहीये असं पाहून उंदराने टुणदिशी उडी मारली. पाठमोऱ्या उंदराला पळताना पाहत वाघाने पुन्हा एकदा मोठी डरकाळी फोडली. उंदराने जी धूम ठोकली, तो मागे पुढे न पाहता सुसाट धावत सुटला. थेट नदीवर. पाहतो तर काय? म्हातारी कुठंय? नांव कुठंय? जवळच एक लाकडाची फळी पडली होती. फळी नदीच्या पाण्यात सोडली. एक काठी घेतली आणि फळीवर बसला. झरझर काठीने वल्हवत त्याने नदी पार केली. आणि गपचूप आपल्या बिळात जाऊन बसला.


तर मग कशी वाटली गोष्ट बालमित्रांनो?

तर आता सांगा आपण काय शिकलो या गोष्टीतून?

- कधीही अनोळखी ठिकाणी जायचं नाही?

- बाहेर जाताना आई बाबांना किंवा आपल्या घरच्यांना सांगून जायचं.

- कितीही मोठं संकट आलं तरी घाबरायचं नाही. 

चला तर बालमित्रांनो झोपा आता. गुड नाईट!


Rate this content
Log in

More marathi story from Ishwar Trimbak Agam

Similar marathi story from Fantasy