मोरपंख - शेवटचा निरोप
मोरपंख - शेवटचा निरोप
कृष्ण - बलराम आज मथुरेला निघाले होते. वाड्याबाहेर नंदबाबा, यशोदा, भाऊ, चुलते, सारे गोप गोपी झाडून सारा गोकुळ निरोप देण्यासाठी जमला होता. साऱ्यांचा निरोप घेऊन धूळ उडवत रथ यमुनेच्या तिराकडे दौडू लागला. नेहमीचा रस्ता हळूहळू मागे पडत होता. यमुनेचा किनारा दृष्टीपथात येऊ लागला. वेशीजवळ असलेला कदंब वृक्ष दिसू लागला. तोच कदंब वृक्ष! ज्याच्या सावलीत कृष्ण त्याच्या बासरीमधून अवीट ताण छेडायचा. त्यातून निघणारे मंजुळ, सुमधुर संगीत! सारे गोप गोपी, राधा, तल्लीन होऊन, भान हरपून, डोळे मिटून घट्कांघटका ऐकत राहायची. याच वृक्षाला बांधून राधेसोबत घेतलेलेज उंचच उंच झोके! त्याच्या गर्द छायेखाली बसून खाल्लेला भाकर तुकडा! दूध, दही, लोणी! किती किती म्हणून आठवणी निगडी होत्या. त्या भल्यामोठ्या कदंबाच्या झाडाखाली एक मानवी आकृती उभी होती. आपल्याचकडे पाहत होती. कृष्णाचं लक्ष गेलं. राधा!
रथ थांबला. डोळे अश्रूंनी डबडबलेले. हुंदका अनावर झालेला. ओठांतून एकही शब्द फुटत नव्हता. तिची पापणीही लवत नव्हती. भरल्या डोळ्यांनी ती किशोर कृष्णाला पाहत होती. प्रेम आणि विरह, दोन्हींचा किती घनिष्ट संबंध ना! जो पर्यंत प्रेमात विरह येत नाही, तोपर्यंत त्याची ओढ, हुरहूर, महत्व कळत नाही. हि शेवटचीच भेट कि काय? म्हणून त्याला एक क्षणही पापण्यांआड होऊ देत नव्हती.
रथातून उतरून जडावलेल्या पावलांनी आणि अश्रू भरल्या नयनांनी कृष्ण तिच्या दिशेने ओढला जात होता. त्याचेही डोळे प्रत्येक पावलागणीस एकेका थेंबाने भरत होते. आता काहीच पावलं उरली होती. समोर साश्रू नयनांनी राधा त्याच्याकडे पाहत उभी होती. तिच्या डोळ्यांना डोळे भिडवण्याचं बळही त्याच्यात नव्हतं.
किती वेड लावलंस रे कान्हा!
तुझ्या बासरीच्या मंजुळ आवाजाने, संगीताने मला मोहवून टाकलंस!
तुझं निखळ, निरागस हास्य !
मान झुकवून मिश्किल हसत डोळ्यांनी पाहणं!
तुझा खट्याळपणा!
तुझं सुमधुर बोलणं!
किती सवय लावलीस रे आम्हा सगळ्यांना!
आणि आता, असा अचानक कसा रे चाललास?
या गोकुळाला सोडून!
गोधनाला सोडून!
या यमुनेला सोडून!
या वेड्या राधेला सोडून!
पुन्हा येशील ना रे?
तिचे भरलेले डोळे खूप काही सांगुन जात होते. अगदी हाताच्या अंतरावर उभी असलेली राधा. त्याची नजर तिच्या पावलांवर खिळली होती. त्याने नजर वर करताच, त्याची दृष्टी तिच्या गहूवर्ण उभट चेहऱ्यावर गेली. किती करुणा! किती प्रेम! किती वात्सल्य ओथंबून आणि भरभरून वाहत होतं तिच्या चेहऱ्यावरून. तिच्या डोळ्यांत आगतिकता, विरह, दुःख कितीतरी भावभावनांचा संगम झाला होता. त्याने थरथरत तिचा स्निग्ध हात हातात घेतला.
तुझ्या डोळ्यांतील भावना समजत नसतील का गं मला!
पण मी तरी काय करू!
नियतीच्या पुढे मलाही काही करता येत नाही!
समोर आलेलं प्रत्येक कर्तव्य पूर्ण करत राहणं एवढंच तर आपल्या हातात असतं!
खूप काही बोलायचं होतं. शब्दच फुटत नव्हते. पण डोळ्यांना डोळ्यांची भाषा कळत होती. त्याच्या स्पर्शातच सर्वकाही तो मूकपणे तिच्याशी बोलत होता. जिथं आत्म्याशी आत्म्याचे बंध जुळलेले असतात, तिथं संवादासाठी शब्दांची गरजच उरत नाही. तिचे कोमल, नरम हात हातात घेत त्याने अलवार दाबले. तिच्या हातांना कंप सुटला होता. तिचे दोन्ही हात हातात घेत वर घेऊन त्याने त्यावर आपलं मस्तक झुकवलं. त्याच्या डोळ्यांतील दोन थेम्ब अश्रू तिच्यात हाताच्या तळव्यांवर खळकन ओघळले. त्याने हळुवार तिची मूठ बंद केली. तिच्या गालांवरून ओघळणारे अश्रू हाताने अलवार टिपले.
तिचा हात सोडून कृष्ण रथाकडे निघाला.पावलांनी वेग घेतला. आता मागे वळून पाहणं शक्य नव्हतं, नाहीतर तो स्वतःला रोखू शकला नसता. हा एकच असा क्षण होता! जर राधेने हाक मारली असती, तर कृष्ण जाऊ शकला नसता. तिचा आवाज ऐकण्यासाठी तो आतुर झाला होता. त्याचे प्राण कानांशी येऊन थांबले होते जणू! तिलाही माहिती होतं, कि जर आपण त्याला हाक मारली तर त्यालाही स्वतःला आवरणं कठीण होईल.
कृष्ण!
कन्हैया!
मुरलीधर!
किशोर!
मिलिंद!
मुकुंद!
कान्हा!
काय आणि किती नावं तिच्या ओठांवर येऊ लागली. डोळ्यांतून अविरत अश्रुधारा वाहत होत्या. दुथडी भरून वाहणाऱ्या यमुनाआईलाही आज तिच्या अश्रूंची सर आली नसती. हाक मारण्यासाठी तिचे ओठ अलग झाले. हात त्याच्या दिशेने उंचावला गेला. तोंडातून अस्फुट आवाज आला.
"कान्हा sss !"
पण तो ऐकण्यासाठी कान्हाचा रथ कधीच दूर निघून गेला होता. घोड्यांच्या टापांनी उंच उडणारे धुळीचे लोट फक्त दिसत होते. गोकुळचा कान्हा मथुरेला निघाला होता. पुन्हा कधी येईल कि नाही? नियतीलाच माहित!
प्रेमात कधीही वियोग नसतो. कारण प्रेमचं अंतिम योग आहे अंतिम मिलन आहे!
जडावलेल्या अंतःकरणाने राधेची पावलं घराकडे आपसूकच चालत होती. हृदयातील प्रत्येक स्पंदनात फक्त एकच नाव... कृष्ण! कृष्ण! कृष्ण!
देवघरात समयीतील ज्योत मंद तेवत होती. तिला नमस्कार करण्यासाठी हात जोडले जाणार; कृष्णाने दाबलेली मूठ उघडली. एक सुंदर मोरपंख! पाहताच तिचा हुंदका अनावर झाला. डोळ्यांतील दोन थेम्ब त्यावर पडून ज्योतीच्या प्रकाशात चमकू लागले. कृष्णरूपी ते चमकणारे दोन थेम्ब,डोळे बनून तिलाच तर पाहत नव्हते ना!
"राधा" - मोक्षासाठी धडपडणारा जीव! जिचं संपूर्ण जीवनच कृष्णमय झालंय.
"कृष्ण" - साऱ्या जगाला कर्माचं आणि धर्माचं ज्ञान, महत्व सांगणारा! ज्याचं जीवन राधे शिवाय पूर्ण न होऊ शकणारं!
"राधा - कृष्ण" - विश्वाच्या अंतापर्यंत कधीही अलग होऊ न शकणारे. विशुद्ध, वासनारहित, निकोप प्रेमभाव म्हणजेच "राधा - कृष्ण".
हा निरोप कृष्णाच्या आणि राधेच्या जीवनात पुन्हा कधीही न येणाऱा ठरणार होता. हे त्या नियतीने आधीच ठरवलं होतं कि काय, को जाणे? या नंतर त्यांची कधी भेट झाली की नाही! ते इतिहासालाच माहित!
(टीप - लेखातील काही वाक्यं, शिवाजी सावंत लिखित युगंधर कादंबरीतील आहेत.)