अग्निदिव्य ...!
अग्निदिव्य ...!
साल १६६६ ची सुरवात, आदिलशाहीच्या अखत्यारीतील मंगळवेढा किल्ला मराठी फौजेने काबीज केला होता. त्यावर मुघलशाहीचा चांदतारा फडकत होता. आजूबाजूला अजस्र मोगली सेनासागर डेरेदाखल झाला होता. तर मंगळवेढानजीक कृष्णा नदीकिनारी मराठ्यांची छावणी पडली होती. विजारपूरचा पराक्रमी सेनापती सर्जा खान याच्याकडून नामुष्कीचा पराभव झाल्यामुळे दिलेरखान संतापला होता. मोगलांना मानहानीकारक माघार घ्यावी लागली होती. त्यातच त्याला कुठूनतरी कुणकुण लागली कि, मराठ्यांची सर्जाखानाला अंतस्थ हातमिळवणी आहे. परिणीती, त्याचा शिवाजी राजांवरचा संशय बळावला. आणि त्याची घातपाती कारस्थानं शिजू लागली.
संध्याकाळची वेळ होती. किल्ल्याच्या बाहेर काही अंतरावर मिर्झाराजे जयसिंग आपल्या डेऱ्यात चिंतातुर बसले होते. पराभवाची कधीही सवय नसलेल्या मिर्झा राजेंना हा पराभव, ही माघार जिव्हारी लागली होती. सारी हयात रणांगणात आणि राजकारणात मुरलेला मातब्बर..! उतार वयात मात्र या पराभवाने पुरता खजील झाला होता. तोच दिलेरखान वर्दी न देता त्यांचा देऱ्यात ताडताड पावलं टाकत दाखल झाला. हाताच्या मुठी आवळलेल्या, डोळ्यांत अंगार. आधीच अफगाणी गुलाबी रंग, त्यात रागानं पूर्ण चेहरा लालबुंद झालेला. खानाचे छातवाण दुरून चालत आल्यामुळे आणि जोराच्या श्वासोच्छ्वासाने धपापत होत. कमरेवर हात ठेवून बेदरकार नजरेनं तो मिर्झाराजेंकडे पाहत म्हणाला,
"क्यूँ राजाजी? अब क्यों खामोश बैठे हो?"
"अभी भी आपको उस काफर सीवा पर विश्वास है। जो दुश्मन आदिलशाह से मिला हुआ है | अगर ऐसा ना होता तो, इतनी बडी मुघलोंकी फौज कैसे हार गयी? हमारे दस बारा हजारकी मुघली सेना आपके सामने काट दि गई ।"
"ताज्जूब कि बात है, कि उसके बावजुद भी आप चूप हो?"
"दिलेरखां, अपनी जबान को लगाम दो। किसके सामने खडे रहकर बात कर रहे हो? तमीज सिखाने की उमर नहीं है तुम्हारी?", मिर्झाराजे त्यांच्या घोगऱ्या आणि दमदार आवाजात गरजले.
"आप कुछ भी कहे, मगर हम अब चूप नहीं बैठेंगे। हमने आपसे पहले भी कहा था और आज भी कहते है की, उस काफर दगाबाज सीवा को हमारे हवाले कर दिजीए। आज ही हम उस काफर को ऐसी मौत..."
"खमोश ...", ताडकन आपल्या आसनावरून उठून राजाजी कडाडले.
"दिलेर खां, इसके आगे गर एक भी लब्ज कहा, तो हमारी तलवार को हम भी ना रोक सकेंगे।"
"दफा हो जाओ यहाँ से और सिवाजी राजे के बारे मे सोचना भी मत। गर उनका बाल भी बाका हुआ तो हमसे बुरा कोई ना होगा |"
"ये तो वक्त बतायेगा मिर्झाजी |"
आल्या पावलं फुत्कार सोडत दिलेरखान तडक निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव राजाजींनी नेमके हेरले होते. दिलेरखानाचा कपटी स्वभाव मिर्झाराजे पुरेपूर जाणून होते आणि त्यामुळेच ते आणखी चिंतीत झाले. दिलेरखान जातो न जातो तोच घटकाभरात एक हुजऱ्या, शिवाजी राजे भेटीसाठी आले आहेत म्हणून सांगून गेला. मिर्झाराजे आणि राजांची दिर्घ चर्चा चालू होती.
"राजाजी, हमे भी इस बात का अफसोस है। इसलीये, हम चाहते है, की आप हमपर कोई स्वतंत्र मूहिम की जिम्मेदारी दे |और सर्जाखान से हुई हार का बदला हम ले सके।"
"हम भी यही सोच विचार कर रहे है, की.."
मिर्झाराजेंच बोलणं अर्धवट तोडत राजे हिंदुस्तानी भाषेत म्हणाले,
"माफ किजीए राजाजी लेकीन, यही सही मौका है पन्हाळा जैसे बुलंद किले पर कूच करके फतेह हासिल करने का। एकबार किला हात मे आ गया, तो हम कभी भी आदिलशाह पर अपना धोंक जमा सकते है |"
शिवरायांची बिनतोड मसलत मिर्झाराजेंना पसंत पडली. दिलेर खनाच्या कपटी करस्थानापासून राजांना दूर ठेवण्यासाठी त्यांनी सहमती दिली आणि संधीचा फायदा उठवत राजांनी रातोरात छावणी सोडली. कारण, दिलेरखानाने शिजवलेला घातपाताचा कट राजांना आधीच कळला होता. राजांकडे पाच हजारांच्या आसपास सैन्य होतं. सोबत नेतोजी पालकर, येसाजी कंक, प्रतापराव गुजर अशी एकापेक्षा एक मातब्बर मंडळी होती. राजांचा पहिला मुक्काम अशा ठिकाणी आणि एवढ्या अंतरावर पडला होता, कि दिलेरखानाला जरी सुगावा लागला तरी मोगली फौज घेऊन या ठिकाणी पोहोचायला त्याला दोन प्रहर लागले असते.
मध्यरात्र उलटून गेली होती. कृष्णा नदीकिनारी मराठ्यांची छावणी थंडीने कुडकुडत होती. गस्तीवाले पथक ठिकठिकाणी शेकोट्या करून ऊब मिळवत होतं. राजांच्या डेऱ्यातील समया अजूनही तेवत होत्या. दोन घटकांच्या समयानंतर नेतोजीराव राजांच्या डेऱ्यातुन बाहेर पडले. पावलं जड झाली होती. तरीही झपझप पावलं टाकत नेतोजी आपल्या डेऱ्यात निघ गेले.
राजांनी सकाळच्या पहिल्या प्रहरात सर्व सरदारांशी चर्चा करून दोन आघाड्यांवर विजापुरकरांच्या प्रदेशात धुमाकूळ घालत पन्हाळ्याकडे कूच करायचं निश्चित केलं. नेतोजीराव चार पाच हजारांच्या आसपास सैन्य घेऊन एक दिशेने तर उर्वरित दोन हजार राजांच्या नेतृत्वाखाली घोडदौड करू लागले.
*****
"खण.. खण.. "
"धडाम.. धुडूम.. "
"हाना.. मारा... "
"काटो... मारो... "
"जय भवानी.. "
"हर हर महादेव... "
"छोडना नहीं आज इन मरहट्टों को ..."
मराठे पूर्ण ताकतीनिशी गडावरून येणाऱ्या आदिलशाही हशमांना तोंड देत होते. पण शत्रू सैन्य संख्येनं भारी होतं. शिवाय, गडावरून बंदुकींचा अविरत मारा चालू होता. तोफा धडाडत होत्या. बाणांचा वर्षाव चालू होता.
तरीही एक शिलेदार मावळ्यांना प्रोत्साहन देत होता. 'हर हर महादेव.. जय भवानी... ', म्हणत शत्रूंवर घणाघाती वार करत होता. भरदार शरीरयष्टी, पल्लेदार मिशा, कानावरचे जाडसर कल्ले, एकमेकांना जुळलेलेच जणू. लालेलाल झालेले मोठाले डोळे, डोक्यावर तांबड्या लाल रंगाचा फेटा, कानात सोनेरी रंगांची गोलाकार बाळी, डाव्या मनगटात सोन्याचा कडा अन हातात ही भली मोठी काळ्या रंगाची ढाल. अन तीन साडे तीन फूट लांब अशी तलवार. तलवार रक्तानं लालेलाल झाली होती. घामानं पूर्ण चेहरा भिजून गेला होता. समोर येणारा सपासप कापत, तो सरदार पुढे सरकत होता. गनिमांच्या रक्तानं अन जागोजागी झालेल्या जखमांनी त्याचा अंगरखा माखून गेला होता. पलीकडच्या बाजूला त्याच्या सारखाच एक उंचापुरा सरदार, त्याच्या मावळ्यांसह गनिमांवर तुटून पडला होता. दोन्ही हातात दोन तलवारी गरगर फिरवत तो एकेकाला धडाधड जमिनीवर लोळवत होता. शत्रू सैन्य मारले जात होते. पण त्यांची संख्या काही कमी होत नव्हती वा ते हटायलाही तयार नव्हते. गडावरून बंदुकीचे बार उडत होते, तोफ गोळे सुटत होते, मावळे धारातीर्थी पडत होते.
त्या धांदलीतही एक मावळा वाट काढत त्या सरदारापाशी येऊन मोठं मोठ्याने ओरडून लागला,
"सुभेदाssssर. सुभेदाssssर... राजांनी बलिवलंय ..."
सुभेदार त्याच्या अंगावर जात ओरडले, "काय रं??????? काय झालं?"
"राजांनी बलिवलंय... लगीच...", तो मावळा.
सुभेदारांनी घोडा फिरवला अन त्या मावळ्या पाठोपाठ दौडू लागले.
सूर्य माथ्यावरून ढळू लागला होता. उन्हं कलू लागली होती. थोड्याच अंतरावर घोड्यावर विराजम राजे अन त्यांच्या बरोबर असलेले दोन तीनशे मावळा दृष्टीपथात पडले. तांबूस काळ्या रंगाच्या घोड्यावर राजे विराजमान झालेले. डोक्यावर शिरस्त्राण, पूर्ण शरीर झाकून जाईल असे चिलखती छातवान, दोन्ही हातात दांडपट्टा, अशा परिपूर्ण लढाईच्या वेशात राजे घोड्यावर होते. पाणीदार बोलके डोळे, धारदार नाक, अन चेहऱ्याला साजेशा धनुष्याकृती मिशा राजांचा रुबाबदारपणा दाखवत होते.
सुभेदारांनी जवळ येताच घोड्यावरून उडी मारली अन राजांना लवून मुजरा केला. त्यांना बघताच राजांनी आपली उजवी भुवई किंचित वर उचलली.
अन आपल्या करारी आवाजात म्हणाले, "काय झालं तानाजीराव ?? गड सर होईल कि नाही आज?"
"राजं.. गनीम लय हाय. आपण फकस्त दिड दोन हजार. निभाव लागणं कठीण. काल रातीच डाव साधला असता तर आता पातूर गडाव अस्तु आपण. आता सरनौबत येस्तोवर अवघड हाय."
"एवढा वेळ नाहीये आपल्याकडे तानाजी... अन त्यांची आशा सोडा आता. यायचं असतं तर दिवस उगवायच्या आधीच आले असते. आणि येसाजी कुठे आहेत?"
"महादरवाजाच्या दिशेला.."
"लगोलग बोलावून घ्या त्यांना. आणि तुम्हीही तुमच्या तुकडीला घेऊन माघारी फिरा. हकनाक मावळ्यांचा जीव आम्ही धोक्यात नाही घालू शकत."
"जी राजं..."
तानाजीने पुन्हा घोड्यावर मांड ठोकली अन लढाईच्या दिशेने दौडू लागले. उरले सुरले मावळे अन राजे त्यांच्या पालखीसह विशाळगडाकडे दौडू लागले.
*****
सायंकाळचा समय, चुकार पांढऱ्या ढगांवर सूर्याची किरणं तांबूस रंग चढवल्या सारखी वाटत होती. अंधार दाटू लागला होता. सदरेवरील समया प्रज्वलित करण्यासाठी कामगारांची लगबग चालू होती. राजे सदरेवर बसले होते. मूठ कपाळावर टेकवून नजर जमिनीवर खिळली होती. सर्व सरदार मानकरी खाली माना घालून बसले होते. सदर शांत होती. घाईने एक हुजऱ्या दरबारात येऊन आल्याची वर्दी देऊन गेला. राजांचा पारा आधीच चढला होता. नेतोजींना सदरेवर येताना पाहून राजांनी आपली भेदक नजर त्यांच्यावर रोखली.
राजांच्या उग्र चेहऱ्याकडे बघताच नेतोजी थोडे गडबडले, "म.. मुजरा राजं... माफी असावी..."
ताडकन राजे बैठकीवरून उठले. हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. नेतोजींवर जळजळीत कटाक्ष टाकत राजे कडाडले.
"माफी ?? माफी कसली मागता सरनौबत. तुम्हाला तर पंचारती घेऊन ओवाळायला पाहिजे. तोफांच्या बत्ती द्यायला हव्यात ना !"
भट्टीतून लालबुंद झालेल्या तलवारीच्या पात्यावर हतोडीने ठोकल्यावर जश्या ठिणग्या उडतात तसे शब्द राजांच्या मुखातुन बाहेर पडू लागले.
"प्रतिशिवाजी म्हणून बिरुदावली मिळवता. शिवाजीच्या जागेवर येऊन एकदा तरी विचार केलाय का?"
राजांचा तो उग्र आवाज, तो आवेश पाहून आजूबाजूचे सरदार, शिलेदार क्षणभर चरकले.
नेतोजी कातर स्वरात, " माफी असावी राजं... पर एक डाव ऐकून घ्यावं..."
"काय ऐकून घ्यावं.. सरनौबत म्हणे. तुम्ही तर नुसते नावाचेच सरनौबत. समयास पावत नाही, ही कसली सरनौबती. ही तर सिपाईगिरी.", राजांचा राग अनावर झाला होता.
नेतोजींनी मान खाली घातली. काय बोलावं? कळत नव्हतं. डोळ्यांत पाणी साठलं होतं. बोलणं तर भाग होतं. धीर एकवटून नेतोजी त्यांच्या करारी आवाजात बोलले,
"कोण सरनौबत? हिथं सवराज्य कुटं ऱ्हायलंय आम्हास्नी सरनौबत म्हणाय."
अवाक होऊन सदरेवर असलेले कारभारी आणि सरदार नेतोजींकडे पाहू लागले.
"सरनौबत...! काय बोलतायसा..!", तानाजी धावले. तोच नेतोजी तानाजीला थांबवत म्हणाले,
"थांबा तानाजीराव... बोलू द्या आम्हास्नी...", नेतोजींच्या तोंडून शब्द बाण सुटू लागले.
"आता तुम्ही मुघलांचं सरदार. आन सरदाराला कुटं सेनापती अस्तु व्हय? तुमच्यासाठी आम्ही रक्त सांडायचं आणि मुघलांचं नौकर म्हणून राहायचं, नुसतं नावाला सेनापती म्हणाय काय जातंय..", उसनं हसं आणत नेतोजीराव बोलून गेले.
"नेतोजीराव ssss ", राजांचा संताप अनावर झाला. अशी उद्दाम भाषा..! तीही राजांसमोर..! नेहमी नेतोजी काका म्हणणारे राजे आज एकेरीवर आले होते.
नेतोजींनी कमरेची समशेर काढून समोर फेकत म्हणाले, "हि घ्या तुमची सरनौबती...! बस झालं राजं... आता न्हाई. आता तुम्ही आन आमी मुघलांच नौकर..."
भर सदरेवर नेतोजींचे हे कृत्य राजांना सहन होणारे नव्हते. राजांच्या संयम सुटला.
"खामोssssश....."
धगधगत्या आगीतून अंगार बरसावे तसे राजांच्या तोंडून शब्द बाहेर पडू लागले.
"एक अवाक्षरही बोलाल तर गर्दन कलम केली जाईल. आत्ता.... या क्षणापासून... तुम्हाला सरनौबत पदावरून बडतर्फ करण्यात येत आहे. चालते व्हा आमच्या समोरून..."
"निघा ssssssss ."
नेतोजीही म्हणाले, "जातु... पर एक ध्यानात ठिवा राजं. नेतोजी म्हणत्यात मला. कळल समद्यास्नी येक दिस, ह्यो नेतोजी काय चीज हाय त्ये."
राजांना मुजरा न करताच गर्र्कन नेतोजी मागे वळले अन ताडताड चालू लागले. सदरेवरच्या पायऱ्या उतरले अन मागे वळून राजांकडे पाहिलं. राजे अजूनही नेतोजींकडे पाहत होते. डोळ्यांत राग आणि आगतिकता एकत्रच दिसत होती. नेत्रकडा पाण्यानं ओलावल्या होत्या. पण नजर अजूनही तशीच होती. भेदक. यांनतर पुन्हा राजांची भेट होईल न होईल. नेतोजींनी राजांची मूर्ती हृदयात साठवून घेतली. नेतोजींच्या डोळ्यांत किंचित पाणी तरळले.
गहिवरल्या स्वरात नेतोजी म्हणाले,
"राजं... ह्यो शेवटचा मुजरा राजं... "
"आता नेतोजीच्या नावानं पुन्हा मुजरा न्हाई..."
"आता या सवराज्यात नेतोजी पालकर म्हणून पुन्हा पाऊल न्हाई ..."
आपल्या एका शब्दखातर, आपल्यावर असलेल्या विश्वासावर, स्वराज्याप्रति असलेल्या निस्सीम प्रेमाखातर आपले बलिदान द्यायला निघालेल्या नेतोजींकडे राजे अभिमानाने पाहत होते.
नेतोजी काका!
स्वराज्य स्थापने पासून बरोबर असलेले!
अफजल खान प्रसंगी गनिमांची पळताभुई थोडे करणारे!
सिद्दी जौहरचा वेढा फोडण्यासाठी रात्र रात्र जागून जीवाची बाजी लावणारे!
हरेक मोहिमेमध्ये प्रतिशिवाजी म्हणून वावरणारे!
काय काय म्हणून राजे आठवत होते. नेतोजींनी राजांना मुजरा केला. नकळत राजांचा हात हृदयापाशी आला. नेतोजीरावांनी राजांची मूर्ती आपल्या हृदयात साठवून घेतली. त्यांच्या डोळ्यांतून खळकन दोन थेम्ब खाली दगडी पायरीवर पडले.
एक राजांसाठी... अन एक स्वराज्यासाठी...
स्वराज्यासाठी अजून किती जणांना आहुती द्यावी लागणार आहे. याच विचारात राजे आसनावर बसले. डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. राजांनी मोठ्या कष्टाने अश्रू आवरले. नेतोजीरावांनी दोन तीनशे मावळ्यांसह गड सोडला. सदर रिकामी झाली. बराच वेळ राजे एकटेच आसनावर बसले होते. थाळ्यासाठी हुजऱ्या किती वेळा येऊन गेला, त्याकडेही राजांचं लक्ष नव्हतं. स्वराज्यासाठी खेळला जाणारा हा डाव नेतोजीरावांसाठी मात्र एक अग्निदिव्यच होते!
*****
इतिहासातील काही गोष्टी काळानुरूप गडप होत जातात. ज्याची उत्तरं फक्त इतिहासालाच माहिती असतात. आपण फक्त तर्क आणि अनुमान लावू शकतो.
नेतोजींना पन्हाळ्याच्या पायथ्याशी राजांना येऊन मिळायला उशीर का झाला?
एक तर नेतोजींनी यायला उशीर का केला? कि मुद्दाम केला?
राजांना याची कल्पना होती का?
आपल्याकडे खूपच कमी शिबंदी आहे. तरीही त्यांनी फक्त दिड दोन हजार मावळ्यांनिशी गडावर कशी काय चढाई केली?
शेवटी माघार घ्यावी तर लागली. शिवाय, पाच सातशे मावळा कामी आला.नक्की खरंच.. एवढे मावळे कामी आले का?
कि राजांनी फक्त मिर्जा राजांना हि बातमी कळण्यासाठी आवई उठवली?
नेताजींची खरंच स्वराज्यातून हकालपट्टी झाली का?
की मिर्झाराजेंच्या आक्रमणापासून स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी, शिवरायांनी काही वेगळीच खेळी खेळली?
