तो आणि मी
तो आणि मी
तो माझ्या जीवनातील सर्वात आवडता भाग. जेंव्हापासुन मी स्वतःला ओळखते अगदी तेंव्हपासुन मी त्यालाही ओळखते आणि त्याच्या प्रेमातही आहे. बालपणापासून ते अगदी आजपर्यंत मनापासून फक्त त्याच्यावरच प्रेम केले मी. चांगल्या वाईट कुठल्याही क्षणी मी त्याची साथ सोडली नाही.आजवर असा एकही दिवस नाही जेंव्हा त्याला भेटली नसेल.दिवसातून 2/ 3 वेळेस आमची भेट ठरलेली मग काहीही होवो.मी कुठेही गेली तरी ह्याने कधीच मला एकटे साेडले नाही आणि मीही त्याच्याच शोधात असत. माझ्या आई वडिलांना माझे हे प्रेम कधीच आवडले नाही म्हणून त्याला त्यांचा नेहमीच विरोध होता. परंतु मी कोणाच्याही विरोधाची परवा ना करता त्याला साथ दिली. या जगात असे कोणीच नाही ज्यांना तो आवडत नसावा, तो आहेही आवडन्यासारखाच म्हणा.
पण दिवसेंदिवस माझे हे प्रेम माझ्या साठी घातक ठरू लागलेय असे मला जाणवले. कारण आजकाल त्याची खूपच आठवण येते मग दिवस असो वा रात्र. कितीदाही भेटले तरी समाधान नाही. ना झोप येत ना भूक लागत. या प्रेमाचा मलाही राग येत होता कारण आवडीचे रूपांतर मजबूरी मध्ये होत होते. त्याचे जणू मला व्यसनच लागले होते. त्याच्यानावाने बरेच जण मला रागवत, बोलत. शेवटी मनावर दगड ठेवून मी त्याला सोडण्याचा निर्णय घेतला फार कठीण होते पण मी मनाची तयारी केली होती कारण त्याने त्याची मर्यादा सोडली होती. त्याच्याविना राहणे अशक्यच होते पण मी तयारी केली. आज दुसरा दिवस आहे त्याला सोडून. खूप आठवण येते पण वेळ निघून गेली की ओढ शांत होते. ठरवले तर अशक्य काहीच नाही.मनाला, भावनांना योग्य Command दिली की त्याही साथ देतातच.
शेवटी अशक्य वाटनारा #चहा सोडण्याचा निर्णय यशस्वी झाला.
