तिला पत्र लिहिताना
तिला पत्र लिहिताना
(या कथेतील सर्व प्रसंग व्यक्ती व त्यांची वर्णने नाव यांचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
"कोणी whatsapp च्या जमान्यात पत्र लिहू शकतं का? ज्या वेळेत कोणतीही माहीती पोचायला काहीच सेकंद लागतात त्यावेळेत कोण पत्रासाठी पैसे खर्च करेल? आणि पत्र लिहायला वेळ आहे तरी कोणाला. जो तो आपापल्या जीवनातले सगळे क्षण स्टेटस मध्ये शेअर करण्यात बिझी आहे. अशा लोकांना खुप दिवसांनी भेटणाऱ्या मित्राला काय सांगायच हे सुचत तरी असेल का? पण मी लिहितोय पत्र तिला. कदाचीत वेळही चुकीची असेल आणि वयही चुकीच असेल. पण इतक्या दिवसात जे काही मनात आहे ते आज सांगवस वाटतय. एक वेगळीच भीती वाटतेय. सगळ संपायच्या आत तिला बोलून टाकण्यासाठी हा सगळा खटाटोप. आयुष्यात तिची जागा कोणीही मिळवली नाही आणि मिळवू शकणारही नाही.
रामा स्वतःच्या विचारांच्या तंद्रीतून जागा झाला. पण पत्राचा मथळा मात्र त्याला सुचत नव्हता. सुचणारही कसा जिला आयुष्यात सगळ काही मानल असेल तिला प्रिय शब्द पुरेसा ठरेल काय? हा शब्द कधीच तिची माझ्या आयुष्यातली जागा दर्शवू शकणार नाही. मग काय लिहू? हा अशी सुरूवात करतो.
" माझी जीवनसंगणी
तुला आठवतय मी असच तुला एकदा पत्र दिल होत शाळेमध्ये हे लिहिताना त्याचीच आठवण आली. आजही मला आठवत तुझ्या केसातील ती अर्धवट फुललेली गुलाबाची कळी, अर्धनारी नटेश्वरलाही भुरळ घालणारे काळया दाट भुवया, ज्यांना तू लक्ष्मणाच्या धनुष्याप्रमाणे आकार दिला होता. त्या भुवयांमध्ये तू जे चंद्रा- सारखे दोन छोट्या टीकल्या लावल्या होत्या त्याला मात्र तोड नव्हती. तुझ्या खालील ओठाच्या डाव्या बाजूला जे छोटस तीळ आहेना त्याने तर माझ्या काळजाचा ठोकाच चुकवला. आन् मी तुझ्या प्रेमातच पडलो. नचूकता शाळेत यायला लागलो फक्त तुला पाहण्यासाठी. आठवत तुला, मला एकदा खाडे मास्तरांनी मारल होत त्यावेळी मला फक्त तुझ्या डोळ्यात करुणा दिसली, बाकी सगळे तर हास्याच्या लाटेत मनसोक्त डुंबत होती. त्यावेळी माझा निर्धार पक्का झाला. आयुष्यात फक्त हिला मिळवल तर आपण सगळ मिळवल. तुझ्याशिवाय दुसर काहीही नको आणि आज त्याची परिपूर्णता झाली. समाधानी झाला माझा जीव, आता मनसोक्त मरु शकतो मी. कोणतीही इच्छा राहिली नाही माझी. "
हे बरोबर नाही, अस कोणी मरणाची भाषा करत का? जिच्यासोबत जगलो तिला अस मृत्यूच भय दाखवून कस चालेल. तिने तर जगल पाहिजे आपले शब्द वाचून. अस कुठ असतय का येड्या! . बर जाऊदे हे सगळ. पुन्हा सुरूवात करतो. आता तो पहिला दिवस नको लिहायला तिला ह्या सगळ्या गोष्टीतर माहितीच आहेत की.
" माझी जानु
जानु म्हटल ना की लगेच तू लगावलेली थप्पड़ मात्र लक्ष्यातून जात नाही. त्यावेळी आपण एका नात्यात गुंतलो पण नव्हतो. पण उगाच मनाला वाटल म्हणून जानु काय म्हणालो तू काहीच विचार न करता एक डाव्या हाताची दिली होतीस. तो वळ निघून गेला पण हाताचा स्पर्श मात्र मनातून नव्हता. वाटायच असच आयुष्यभर तुला जानू म्हणत राहाव आणि दररोज तुझ्या हाताच्या थापडा खात रहावीत. त्या थापडापेक्षा तू जो माझ्या आयुष्यात स्वतःच्या हाताने रंग भरलाय ना त्याने माझ आयुष्य रंगबेरंगी झाल. निस्वार्थ प्रेमाची परिभाषा तूच तर मला शिकवलीस. नाहितर मी मात्र प्रेमात पूर्ण स्वार्थी झालो होतो. अग तुला आठवतही नसेल, ज्यावेळी तू मला एक कॅडबरी दिली होती ना, ती मला माझ्या मित्रांनी खुप वेळा मागितली. मी त्यातला एक तुकडाही कोणाला दिला नाही. हे सोड तू मला गृहापाठाची वही द्यायचीस ना ती सुद्धा मी कधी कोणाशी शेअर केली नाही, का तर तुझ अक्षर बघून कोणी तुझ्या प्रेमात पडल तर अगदी माझ्यासारख. ह्याची काळजी वाटायची, काळजी नाही भीती वाटायची. तुझ प्रेम मिळवण्यासाठी मी स्वार्थी काय नालायक, बेअक्कल, बदमाश, बिनलाजा, सगळ काही बनायला तयार होतो. पण तू माझी काळजी घेतलीस आणि मी हे सगळ बनण्यापासून वाचलो. एकदा तुला बघ शौचालयाच्या इथे ठेच लागली होती त्यावेळी मी तूला उठवायला आलो होतो. त्यावेळी तुझ्या मैत्रिणींच्या नजरा कसल्या जालीम होत्या वाटल आता मृत्यूदंडाची शिक्षा येथेच ठोठावली जाईल. पण तू जे काही तिथे सांगितल त्यावेळी तुझी माझ्या मनातली जागा किलोमीटरने वाढली. काल परवाचीच गोष्ट बघ ना, एक नविन जोडप चालल होत अन् त्यांनी गाडी थोडया वेगाने चालवायला सुरू केली काय तो पाठीमागून 100 च्या स्पीड ने काही मुले आली आणि निघून पण गेली. त्यावेळेस तू जो माझा खांदा घट्ट पकडला त्या वेळी मला जाणावल तुझा माझ्यावरचा विश्वास किती आहे. त्या जोडप्यांच्या वयापासून ते आतापर्यंत तुझा माझ्यावरील विश्वास मला कधीच तोडावसा वाटला नाही, आणि तुटणारही नाही. मी मेलो तरी... "
'आलाच का पुन्हा मरणावर ' रामा स्वतःशीच पुटपुटत बोलला. ' तुला मरणाशिवाय दुसर काही सुचत नाही का? की गेली अक्कल गवत चरायला. आयला कधी नव्ह ते लिहीतोयस ना पत्र मग नीट लिही की. का उगाच कागद खराब करतुयास. ' रामा ने दुसरा कागद उचलला.
"सौ. मंगल राम परांजपे.
हे नावच कितीतरी गोष्टी सांगुन जाते. तुझ माझ्याशी जोडलेल नात. तुझ्यासाठी केलेला त्याग त्याच्यापुढे मला काहीही वाटत नाही. मी फक्त तुझी स्वप्न जगत राहिलो. हे मी आनंदाने आणि अभिमानाने सार्या जगाला सांगू शकतो तेही निसंकोचपणे. आणि यासाठी तू जो माझ्यावर डोळे झाकून विश्वास टाकलास ना त्याला कधी तडा जावून देणार नाही , याच वचन मी आत्ता देऊ शकत नाही. कारण ते वचन निभावण्यासाठी मला सात जन्म मिळालेना तरी त्याची पूर्तता होऊ शकणार नाही. मी देवाला अजून जन्म मागेन कारण मला तिचा विश्वास तिच्यावरच प्रेम निभावयचय ते पण कायम.
लग्नानंतर ज्यावेळी नववधु होऊन माझ्या घरात आलीस ना अगदी त्याचवेळी माझ्या घराची पुण्याई दुप्पट झाली. आई आणि सुन यांमध्ये सगळ ठीक होईल ना याची काळजी माझ्या मनाला कुतरत असताना, ' तू टेन्शन नको घेवू मी आहे ना मी सगळ ठीक करेन ' ही तुझी अमृतवाणी काळजीच्या कात्रीला बोथट करून गेली. त्यानंतर तू जो संसार फुलवलास ना त्याला तर ग्रँड सॅल्यूट तो बनता है! .
मधुचंद्रेची रात्र आणि आजची रात्र यामध्ये मला आजही काही फरक जाणवत नाही. आजच्या रात्रीमध्येही तुझा तो हलकासा होणारा श्वासोच्छ्वासाचा स्पर्श मला जगण्याची लालसा चढवून जातो. रोज नविन संजीवनी मिळत असताना माणसाला आयुष्यातून अजून काय हव असत. पण खर सांगू तू ज्यावेळी मला सकाळी उठवताना आपल्या ओल्या केसांचा स्पर्श माझ्या चेहऱ्याला करत होतीस ना ती धुंदी, ती नशा अजून ऊतरलीच नाही. याच धुंदीत आपल्याला दोन मुलेही झाली आणि ती मोठीही कधी झाली याच भानच राहिल नाही. हीच नशा मला तू रोज देत राहशील याच मात्र तुला मला वचन द्याव लागेल.
आपला अमोल एवढा मोठा होईल अस स्वप्नात सुद्धा आल नव्हत. या पाठीमागे फक्त तुझाच हात आहे. त्याला तू त्याची स्वप्न जगू दिलीस आणि ते पण संयमित आणि संस्कारी वृत्तीतून. मला लेखक होयच होत हे तुला कस कळल याचा मात्र शोध मला आतापर्यंत लागला नाही. तू माझी स्वप्न माझ्या मुलाला दाखवून ते पुर्ण करून घेतलीस. याक्षणी मला माझ जीवन पुरेस झाल अस वाटतय.
अमोल वाचायचा थांबला. पत्र मध्येच संपल होत. त्याच्या आईवडिलांचा मृत्यूदेह समोर पडले होते. त्याला काहीच सुचत नव्हत. तो निर्विकारपणे फक्त त्या दोन देहांकडे बघत होता. कालच्या महापुरात दोन्ही जीव गेले होते. ते बनलेच होते एकमेकांसाठी, मरतानाही त्यांच्या हाताची पकड मात्र सुटली नव्हती. ती तशीच अबाधीत राहिली. का कोणजाणे पण अमोलला त्याच्या आईला आपला बाप काय बोलणार होता हे ऐकावयाच होत म्हणून त्याने वडिलांच्या रूममध्ये मिळालेली पत्रे आईच्या आग्नीच्यावेळी वाचली. त्याच मन मात्र याच विचारात होत की, ' आताच्या वेळी माझ्या आईसारख आपल्या जोडीदारावर एवढ प्रेम करणारी मुलगी भेटेल काय? माझ्या वडिलांसारखा निस्वार्थ प्रेम करणारा कोण सापडेल का? आणि असेलच कोणी या दोघांसारख तर त्यांची नातीही अशीच टिकत असतील का? यासारख्या प्रशांची उत्तरे मिळवण्यासाठी अमोलला मात्र जगाव लागेल. आणि जर सापडलच कोणी राम आणि मंगल सारख तर त्याला त्याचे आई-वडील सापडतील याच आशेवर तो जगत राहिला व जगत राहिल. '