ती, मी, आणि पाऊस...
ती, मी, आणि पाऊस...
आज गाडीत बसल्यावर त्याने स्वतःलाच एक प्रश्न विचारला... खरच का आपल्याकडे थोडा पण वेळ नाही तिला द्यायला ? तिने असं आज पर्यंत आपल्याला मागीतलय तरी काय ? फक्त थोडा वेळ... आणि तो ही माझ्याकडे नसावा , तिच्यासाठी...?
याच विचारात तो होता. बाहेर पाहिलं त्याने तर थंड हवा सुटली होती. वातावरण खूप छान झालं होत. बारीक पाऊसाची रिमझिम चालू होती.... त्याला अचानक आठवलं... अरे , हे सगळं तर तिला खूप आवडतं, आणि आपण आज तिच्यासाठीच तर घरी लवकर जातोय. खूप दिवसांनी आज कामातून वेळ काढलाय फक्त तिच्यासाठी...
त्याने आता खिडकीच्या काचा खाली घेतल्या आणि त्या थंड हवेचा अनुभव तो घेत होता. पाऊस येण्या आधीचा गारवा मनाला खूपच भारावून टाकतो. त्याला आता ती जवळ आहे की काय याचा भास होत होता.... त्याला वाटलं जणू या हवेतून तीच आपल्याला स्पर्श करू पाहतेय... तो खूप सुखावला... अगदी मनातून....
एका झाडाखाली त्याला एक गजरेवाली मुलगी दिसली, मुलगी लहान होती. पावसाचा थोडा ही विचार न करता गजरे विकण्यासाठी ती उभी होती तिथे , त्याने तिच्याकडे पाहिलं आणि त्याला आठवलं , ती नेहमी म्हणायची , " आपल्यामुळे कोणाला आनंद देता आला तर आपण कोणताही विचार न करता त्याला तो द्यावा , त्या नंतर जे सुख , समाधान मिळतं ते शब्दात सांगता येणं कठीणच. "
तो खाली उतरून तिच्याकडे गेला आणि तिच्याकडून सगळे गजरे विकत घेतले. ती मुलगी खुश झाली कारण तीचं पोट भरणार होत. ती कधी पासून तिथे उभी होती कोणास ठाऊक...? पण , तिचे गजरे विकले गेले म्हणून ती आनंदी होती आणि मी... आज जे काही तिने सांगितलं होतं , ते अनुभवलं होत म्हणून मी खुश होतो. ती मुलगी हसत उडया मारत- मारत गेली पण. मग,मीही निघालो....पुढचा आनंद मिळवण्यासाठी....
गाडी सुरू केली आणि गाणी लावली... गाणं ही तिच्याच आवडीचं लागलं... "तुम को देखा तो ये खयाल आया..." आज मी तिला जे सगळ्यात जास्त आवडतं ते तिच्यासाठी घेऊन चाललो होतो. आज खरच तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा आहे आणि मला मिळणारं समाधान किती तरी पटीने महत्त्वाच आहे...
या जगात ती खुप कमी गोष्टींवर पण , खूप मनापासून प्रेम करते....पाऊस ,गजरा आणि मी....
मग , सहजच त्या छोट्या मुलीचा विचार आला त्याच्या मनात , आणि तो म्हणाला , "रोज किती तरी गजरे ओवले असतील या हाताने... रोज किती तरी रुसवे काढले असतील या गजऱ्याने..."
आणि तो मनोमन सुखावला...

