ती आणि "तो"....
ती आणि "तो"....


कोकण म्हटलं की निसर्ग सौंदर्य आलं आणि त्यात पावसाळ्यात कोकणात जाणं म्हणजे स्वर्गात जाण्यासारखं. सगळीकडे हिरवागार गालीचा पसरलेला असतो. आमचं घर पण असंच निसर्गाच्या कुशीत वसलेलं. गावाकडची घरं कशी एकमेकांपासून दूर असतात.
त्यादिवशी संध्याकाळी मी कॉलेजवरुन घरी आले. बघितलं तर घरी कोणी नाही एरवी बाबा असतात घरी पण आता कुठे गेले होते काय माहीत ? मी दरवाजा उघडला तर 'कर्रर्रर्रर्रर्र' नेहमीप्रमाणे दरवाजाचा आवाज झाला आणि नेहमीप्रमाणे मी दचकले, किती वेळा बाबांना सांगितलयं, दरवाजात तेल टाका, नाहीतर बिजागरं बदला. पण नाही. माझं कोण ऐकतंय आणि ह्यांना माहित आहे मला एकटीला घरात भीती वाटते तरी मला एकटीला घरी ठेवून गेले. आई आणि ताईसुद्धा मावशीकडे गेले होते, ते पण आले नव्हते अजून आणि तेवढ्यात लाईट गेले, वीज कडाडली आणि मी जोरात किंचाळून धावत बाहेर पळाले. खूप वेळ झाला, नंतर मी बोटांच्या फटीतून बघितलं तर लाईट आले .पाऊससुद्धा सुरु झालेला. आता आपण कुठे बाहेरही जाऊ शकत नाही. मुंबईत मस्त सगळी घर बाजूबाजूला असतात इथे तसं नाही. आता काय करू? हा विचार करत असताना मला आठवलं, महेश दोन दिवस कॉलेजला आला नव्हता. त्याला घरी बोलवू, त्याला नोट्स पण देता येतील आणि घरचे येईपर्यंत एकटेपणा आणि भीती दोन्ही दूर होईल. महेश म्हणजे माझा लहानपणापासूनचा मित्र. इथे आमच्या वाडीतच राहतो.
फोन केल्यावर काही वेळाने महेश आला."नशीब तू आलास. नाहीतर अशा ह्या विजांच्या आवाजात मला राहवलं नसतं" त्याने माझ्याकडे बघितलं आणि हसत म्हणाला, " किती घाबरतेस यार तू??" आणि अजून जोरजोराने हसू लागला. मी रागाने बोलली, "जसं काय तू घाबरतच नाहीस?" "हो घाबरतो, पण तुझ्याएवढा नाही" आणि तो पुन्हा हसू लागला. त्याचं ते हसणं बघून मला खूप राग आला आणि तेवढ्यात पुन्हा वीज कडाडली आणि त्याने घाबरून मला मिठी मारली. त्याचा तो चेहरा बघून मला खूप हसायला आलं. मी त्याला मिठीतून सोडवलं, "आता कळलं ? आला मोठा शहाणा आणि तू तर माझ्यापेक्षा जास्त डरपोक निघालास" मी हसत हसत नोट्स आणायला निघून गेले. तो लाजतच नेहमी बसतो त्या आराम खुर्चीत जाऊन डुलत बसला. मी नोट्स आणि त्याच्यासाठी चहा घेऊन आले. " हे घे, गरमागरम चहा. पण बाकी काहीही म्हण, तू पण ति
तकाच घाबरतोस" आणि मी पुन्हा हसायला लागले. त्याने माझ्याकडे रागाने बघितलं. चहाचा कप उचलला आणि चहा पिऊ लागला. तो शांत झालेला पाहून मीपण शांत झाले. बहुतेक त्याला राग आला असावा. खूप वेळ झाला आम्ही दोघे शांतच होतो. मग त्यानेच विषय काढला," काय मग काय शिकवलं कॉलेजमध्ये?"
" काही नाही नेहमीचचं" मी लगेच बोलले.
" अच्छा. मी काय म्हणतो ही खुर्ची तुझ्या आजोबा-पणजोबांच्या काळातली असेल ना ? "
" दरवेळी तू त्या खुर्चीत येऊन बसतोस. आज मुद्दाम मला चिडवायला बोलतोयस की क्युरिऑसिटी म्हणून ? " मी एक भुवई वर करून त्याला विचारलं.
" क्युरिऑसिटी म्हणून " चहाचा कप खाली ठेवत त्याने उत्तर दिलं.
" हो "
" वाटलेलंच "
" का काय झालं ? "
" काही नाही असच "
" बाकी चहा कसा झालाय ते नाही सांगितलंस " मी थोडी अकडं दाखवत विचारलं.
" माझ्या आयुष्यासारखा " त्याने थोडा विचार करून उत्तर दिलं.
" म्हणजे ? " मला प्रश्न पडला.
" फालतू " आणि तो जोरजोरात हसायला लागला. त्याचं ते हसणं बघून मला खूप राग आला आणि मी बाजूला असलेली उशी त्याच्यावर फेकून मारली. त्याने ती चुकवली आणि पुन्हा जोर जोरात हसायला लागला. मग मी रागाने उठले आणि जवळ असलेला पाण्याचा ग्लास त्याच्यावर ओतला आणि तिथून पळाली तो ही माझ्यामागून पळत आला. तेवढ्यात पुन्हा वीज कडाडली. पण ह्यावेळी एकदम भयंकरच आणि दरवाजाचा जोरात 'कर्रर्रर्रर्रर्र' आवाज आला. मी घाबरून किंचाळून धावत मागच्या दरवाजाकडे पळाले. बाबा ,ताई आणि आई घरी आलेले. माझे किंचाळणे ऐकून ते मागच्या दरवाजाकडे धावत आले.
" सायली, सायली काय झालं ? "
बाबांचा आवाज ऐकून मी धावत जाऊन त्यांना मिठी मारली " काय बाबा माहित आहे ना मला एकटीला भीती वाटते तरी तुम्ही मला एकटीला सोडून गेलात."
बाबांनी मला मिठीतून सोडवलं आणि म्हणाले " अगं त्या जोशीकाकांनी बोलवलेलं. तिकडे..."
" तरी नशीब महेश आला म्हणून तेवढा धीर आला "
" काय ? पण महेश तर.... अपघातात वारला तिकडेच गेलो होतो मी" बाबा दचकून म्हणाले.
"काय?" मी जोरात किंचाळले तेवढ्यात पुन्हा वीज कडाडली आणि धावत घरात गेले तर तिथे ती आरामखुर्ची तशीच हलत होती.....