तदेव लग्नं सुदिनं तदेव
तदेव लग्नं सुदिनं तदेव
"ऋचा तू ऋषीला, तुझ्या गतकळाविषयी, अंधारात का ठेवले आहेस? नवराबायकोच्या नात्याचा पाया सत्य आणि विश्वास असतो. नवीन नात्याची सुरुवात अशी अविश्वासाने करु नकोस. त्याला आजच्या आज, सगळं खरं सांगून टाक." ताईने ऋचाला निक्षून सांगितले.
ऋचा हॉलच्या गॅलरीत उदास बसून होती. "सगळं खरं सांगून टाक." हे ताईचे शब्द तिच्या कानात सारखे घुमत होते. तिची नजर शून्यात होती. डोळ्यांतून अश्रूंचे पाट वाहत होते. ऋषीशी ओळख होऊन तीन महिने उलटून गेले. तिच्या जगण्याचे तो एकमेव कारण झाला होता. लग्न आठवड्यावर येऊन ठेपले आहे. लग्नाची बरीच तयारी झाली होती आणि उरलीसुरली तयारी युद्धपातळीवर सुरू होती. उत्साहाचे असे वातावरण असताना ऋचा अश्रूंशी झगडत होती? ऋषीला सर्व खरं सांगितल्यावर त्याने लग्नाला नकार दिला तर? मी त्याच्याशिवाय कशी जगू? अशा अनेक प्रश्नांनी ती बेचैन झाली. पण तरीही आज ऋषीला सगळे सांगायचेच, असे तिने शेवटी ठरविले.
नेहमीप्रमाणे रात्री, ऋषीचा फोन आला तेव्हा, ऋचाने लगेच विषयालाच हात घातला. "हॅलो ऋषी, मला तुला काहीतरी खूप महत्त्वाचे सांगायचे आहे. लक्षपूर्वक ऐक. खरंतर पूर्वीच, मी तुला हे सांगायला हवे होते. पण हिंमत होत नव्हती... आज सांगतेय. ऐकल्यानंतर... तू जे ठरवशील ते मान्य."
"तीन वर्षांपूर्वीची गोष्ट… मी पदवीचे शिक्षण घेता घेता, एकीकडे सीएचासुद्धा अभ्यास करीत होते. शेवटच्या वर्षाची परीक्षा काही केल्या मी उत्तीर्ण होत नव्हते. बाबा यावरून मला सतत घालून पाडून बोलायचे. त्यांचे बोलणे टाळता यावे, म्हणून मग नोकरी स्वीकारली अन् हर्ष माझ्या जीवनात आला. तो माझ्या ऑफिसचा सहकारी होता. त्याच्यासोबत काम करता करता, मी कधी त्याच्या प्रेमात पडले, कळलं नाही. रोज सकाळी एकत्र ऑफिसला जाणं, एकत्र काम, एकत्र जेवण, संध्याकाळी एकत्र घरी परतणं हा दिनक्रम झाला. तो, माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा होता. त्याच्या पायांत थोडे व्यंग होते. पान खाणे, सिगारेट ओढणे ही व्यसने त्याला होती. पण हर्ष माझी खूप काळजी घ्यायचा, करायचा. त्यामुळे, त्याचे वैगुण्य मला दिसत नव्हते. प्रेम आंधळं असतं… तेव्हा अनुभवलं."
"मी हर्षमध्ये गुंतली आहे, हे जेव्हा ताईच्या लक्षात आले, तेव्हा ताईने मला परोपरीने समजावले, ऋचा तू दिसायला सुंदर, अभ्यासात हुशार... हर्ष तुझ्यासाठी योग्य मुलगा नाही आहे. त्याच्यापासून दूर राहा.
तेव्हा, मी ताईला, हो उत्तर दिले आणि तिला गाफील ठेवले.
आम्ही कोर्ट मॅरेज केलं. पण घरी कळू दिले नाही.. पंधरा दिवसांनी मी घरी कळवलं, मी हर्षशी लग्न केले आहे व आजपासून त्याच्या घरी राहायला जात आहे. हे ऐकुन त्यांची काय अवस्था झाली असेल, याचा, मी काडी
मात्र विचार केला नाही. त्यानंतर मी घरच्यांशी, व त्यांनी माझ्याशी संपर्क तोडून टाकला होता."
"लग्नानंतर महिनाभर हर्ष छान वागत होता. नंतर नंतर, त्याचं विचित्र वागणं सुरू झालं. कशावरूनही, पटकन रागवायचा, मला मारायला यायचा. त्याने माझ्यावर अनेक शारीरिक व लैंगिक अत्याचार केले... सिगारेटचे चटके देऊन, दारू पिऊन, रोज मारझोड केली, रानटी संभोग केला, मला जनावरासारखं वागवलं. मी निमुटपणे सगळं सहन करीत होते. घरच्यांचा विश्वासघात करून मी हे पाऊल उचलले होते. त्यामुळे मला ते भोगणे अपरिहार्य होते... हर्षच्या आईला ते पाहवत नव्हते. शेवटी, एकदा तो घरी नसताना, त्यांनीच इथे फोन करून सर्व सांगितले आणि मला तेथून तात्काळ बाहेर काढायला सांगितले.
ताईने पोलिसांच्या मदतीने माझी सुटका केली. सुरुवातीला हर्षने धिंगाणा घातला. पण घरचे माझ्या पाठीशी ठामपणे उभे असल्याने, त्याचे काही चालले नाही. वर्षभरात आमचा घटस्फोट झाला. ते दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातील कर्दनकाळ होता. त्यातून सावरायला बराच वेळ गेला."
"आता नव्याने जगण्याचा प्रयत्न करु पाहते आहे. ऋषी... तू बाबांमुळे माझ्या आयुष्यात आला आहेस. तुझ्याही बायकोबाबत अपेक्षा असतील. मुलगी नवविवाहित असावी, असे तुलाही वाटत असेल. घटस्फोटिता हा एक शाप असतो. मला, तो लागला आहे आणि त्याचे परिणाम मला भोगावे लागतील," असे म्हणून ऋचा गप्प झाली... समोरून, ऋषीदेखील अजिबात गप्प.
"ऋचा, तुला जे सांगायचं आहे ते, तुझं सांगून झालं का?" ऋषीने विचारले.
ऋचा, "हो."
ऋषी म्हणाला, "आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. तू मला तुझ्या भूतकाळाविषयी सर्व सांगितले त्याबद्दल थँक्यु. तो तुझा भूतकाळ होता आणि आता तो संपला आहे. त्याबद्दल पुढे कधीही विचार करायचा नाही आणि स्वतःला त्रास होऊ द्यायचा नाही. तू माझ्यावर जिवापाड प्रेम करतेस आणि आयुष्यभर माझ्यासोबत चालण्याचा निर्णय घेतला आहेस. मला, ही वर्तमानातील ऋचा हवी आहे. तिची साथ हवी आहे. देशील का?"
"हो रे राजा..." ऋचा आनंदाश्रुत उच्चारली.
प्रेमाविवाहात ठेच खाल्लेल्या ऋचाला तिच्या वर्तमानावर प्रेम करणारा ऋषी, पारंपरिकरितीने ठरविलेल्या लग्नामुळे मिळाला. अन् तिचे "तदेव लग्नं सुदिनं तदेव" आनंदाने पार पडले.