कर्तव्य
कर्तव्य
"अरे थांबा, मी येते आहे तुमच्या सोबत. डॉक्टर प्लीज सोडा मला," असे म्हणत जानकी गेटबाहेर जाणाऱ्या रुग्णवाहिकेमागून पळत होती. डॉक्टरांची ती गयावया करीत होती.
ते पाहून, डॉक्टर प्रज्ञाच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. पण ते लपवून, त्या जानकीला ओरडल्या, "तुला समजतंय का, तू काय बोलते आहेस? कोरोना असलेल्या त्या बॉडीसोबत तुला पाठविता येणार नाही."
जानकी अजून घडाघडा रडू लागली. आवंढ
ा गिळत बोलली, "चाळीस वर्षांचा माझा नवरा, काल दम लागायला लागला म्हणून भरती केले आणि आज तो सोडून, गेला कायमचा... पोटभर रडूसुद्धा दिले नाही. बॉडी अंतिम संस्काराला नेली. घरातल्या चार लेकरांना मी काय उत्तर देऊ, डॉक्टर?"
आज, दोन जिवांमध्ये, आपण आलो. आपल्यामुळे जानकीला, तिच्या नवराचे अंत्यसंस्कार करता आले नाहीत. याचे डॉ. प्रज्ञाला खूप वाईट वाटले. पण क्षणात त्या सावरल्या. कोरोना समाजात पसरू नये म्हणून, आपल्या अशा निष्ठुर वागण्याला पर्याय नाही. त्या लगेच आयाबाईला म्हणाल्या, "हिला आठव्या माळ्यावरच्या वॉर्डला घेऊन जा."