STORYMIRROR

Bharati Raibagkar

Inspirational

3  

Bharati Raibagkar

Inspirational

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

5 mins
164

अवघे पाऊणशे वयमान | लग्ना अजुनी लहान


पूर्वी होणाऱ्या जरठ-बाला विवाहाला अनुलक्षुन ही प्रसिद्ध उपरोधिक काव्य पंक्ती…


पंच्याहत्तरीच्या आसपासचं म्हणजे प्रौढत्वाच्याही पलीकडचं...जाणतेपणाचे कित्येक उन्हाळे-पावसाळे पाहिलेलं, अनेक संकटांच्या परीक्षेतुन तावुन सुलाखुन निघालेलं प्रगल्भ, अनुभव संपन्न, यशस्वी असं वय…


एखाद्या व्यक्तीबद्दल हा निष्कर्ष कसोटीवर जितका खरा उतरायला हवा तितकाच तो एखाद्या देशाच्या स्वातंत्र्याच्या कालावधीबद्दलही म्हणताच यायला हवा... नाही का?


पण...


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी जर सिंहावलोकन करायचं म्हटलं तर…


कशी होती स्वातंत्र्यपूर्व भारताची परिस्थिती? वैभवशाली सुवर्णयुगातील अनेकविध कला, क्रिडा, भाषा, शास्त्रं इत्यादींच्या ज्ञानाचा वापर करून ते इतरांना शिकवणारे, अनेक देशांशी व्यापार करणारे सुसंपन्न, शांतताप्रिय भारतीय...आणि म्हणुनच मोगल, पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्रज इ. परकियांनी सर्वस्वी विपरीत परिस्थितीत आपल्यावर केलेलं राज्य...हा सर्वविदित इतिहास…

पण राज्य केलं ते काय फक्त स्व-बळावर? अशक्यच!


नाण्याला दोन बाजु असतात. ते जमिनीला समांतर असतांना त्याची एकच बाजु वर दिसत असते. पण तेच नाणे जर उभे धरले तर त्याच्या दोन्ही बाजु आपण एकाच वेळी पाहु शकतो. आपल्या देशाच्या नाण्याच्याही दिसतात विरोधाभासाच्या अशाच दोन बाजु...पूर्वीही आणि आताही...


त्यामुळेच पारतंत्र्याचं एक मुख्य कारण म्हणजे फंदफितुरी…घरचं खाऊन घरचेच वासे मोजणाऱ्यांची जशी एक जमात होती, तशीच सुरुवातीच्या मोगल शासकांपासुन ते शेवटी आलेल्या इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सैनिकांचीही एक कडवी जमात आपल्याकडे होतीच. त्यामुळेच असंख्य हुतात्म्यांच्या प्राणांची आहुती घेऊन आणि झोडा आणि फोडा ही नीती वापरत, अखंड भारताची दोन शकलं केल्यावर आपल्याला स्वातंत्र्य देऊन इंग्रज स्वदेशी परतले.


त्यांनी स्वातंत्र्य देऊन आपली गुलामगिरीच्या जोखडातुन सुटका केली...पण ती फक्त आपल्या शरीराची, आपल्या भूमीची! गुलामीच्या मानसिकतेतुन आपण अजुनही मुक्त झालोय? अज्जिबात नाही...आपली अनुकरणप्रियता एवढी आहे की आपल्या देशाच्या हवामानाचा, इथल्या साधन-संपत्तीचा काहीही विचार न करता विकासाच्या आणि आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्यांचं राहणीमान, वेशभुषा, खानपान तर आपण स्वीकारलंच, पण त्यांच्या भाषेला अवास्तव महत्त्व देऊन आपण आपल्या मातृभाषेलाही विसरतो आहोत.


भारताचा स्वातंत्र्यसंग्रामात ज्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग होता त्यांना त्या स्वातंत्र्यासाठी मोजलेल्या किंमतीची जाणीव असल्यामुळेच स्वतंत्र भारताला ऊर्जितावस्थेकडे नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची त्यांची तयारी होती.  


त्यानंतरच्या पिढीला मात्र स्वातंत्र्याची ही गोड फळे आयतीच चाखायला मिळाली. आणि आयतं किंवा फुकट मिळाल्याची जाणीव नसते. त्यामुळेच लोकांनी लोकांसाठीच चालवलेले राज्य असा लोकशाहीचा सरळ अर्थ असतांना सत्ता ही लोकांच्याच भल्याकरता वापरण्याचे एक हत्यार आहे हे विसरून ती आपल्याच संपत्तीत भर घालण्याचे एक साधन आहे ही विचार प्रवृत्ती बळावत गेली. त्यामुळेच येनकेन प्रकारे निवडुन येणे आणि नंतर निवडणुकीत झालेला खर्च भरून काढण्याबरोबर आपल्या सात पिढ्यांची तरतुदही करून ठेवणे असा सोयीस्कर समज रूढ झाला…आणि भ्रष्टाचाराच्या किडीचे बीज पेरल्या गेले


आपल्या भारतात असलेल्या असंख्य जाती, पंथ, भाषा...भिन्नभिन्न भौगोलिक प्रदेशांप्रमाणेच तेथील भिन्न संस्कृती... तरीही अनेकतामध्ये एकता असल्याप्रमाणे एकसंध असलेला भारत...आपण प्रथम भारतीय आहोत हीच मनामध्ये असलेली जाणीव...पण परदेशी शत्रुंबरोबर झालेल्या युद्धांसोबतच कांही विघ्नसंतोषी लोकांनी टाकलेले जातीभेदाचे, विद्वेषाचे विष... त्यामुळे कांही असंतुष्टांच्या मनात पेटलेली अन्यायाची ठिणगी...आणि त्याचे संपूर्ण देशाला भोगावे लागणारे परिणाम... 


भारतातुन सोन्याचा धूर वगैरे निघायच्या वेळी वैभवात लोळणारे राजे-रजवाडे, संस्थानिक...आणि चातुर्वर्ण्यावर आधारित सामाजिक परिस्थिती असल्यामुळे दारिद्र्यात खितपत असलेली, पशुतुल्य परिस्थितीतील शुद्र, तळागळातील जनता...


स्वातंत्र्यानंतरही कित्येक दशके कायम असलेली हीच परिस्थिती…


राज्यघटनेने सर्वांना दिलेले समान अधिकार आणि आपण स्वीकारलेले सर्वधर्मसमभावाचे धोरण तरीही...शहरात परिस्थिती काही अंशी बरी असली तरी खेडोपाडी मात्र अजुनही कायम असलेली जात संस्कृती...जातीवर आधारित नोकरीच्या संधी...भिन्न धर्मीयांमधील असहिष्णुता…


माहिती आणि तंत्रज्ञानामुळे सुशिक्षितांना मिळणाऱ्या लाखालाखांच्या पॅकेजमुळे झालेले नवश्रीमंत...तरीही खेड्यापाड्यातील शिक्षणाची अतिशय दुरवस्था…कौशल्याधारीत शिक्षणाच्या अभावामुळे पदव्यांचे भेंडोळे 

घेऊन नोकरीसाठी हिंडत असणारी युवापिढी...आणि त्यातूनच निर्माण होणारी असंतोषाची दरी...भरमसाठ फी देऊन इंग्रजी माध्यमाच्या शाळेत/क्लासला

जाणारी बालकं...त्याच वेळी त्यांच्याच वयाची भीक मागणारी, अनवाणी, फाटक्या कपड्यांनी कचऱ्यामध्ये स्वतःचे आयुष्य शोधणारी मुलं...कायद्याला बगल देऊन राबवुन घेतलेले बालमजुर...


खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या जाहिरातींना, भपकेबाजीला भुलुन तिकडे वळणारा ग्राहक...त्यामुळे छोट्या छोट्या दुकानदारांचा ठप्प होणारा व्यापार….


समाजाच्या आर्थिक, वैद्यकीय, प्रशासकीय, राजकीय, संशोधन इत्यादी सर्वच क्षेत्रांत महिलांचा लक्षणीय सहभाग, महत्त्वाच्या पदांवरील त्यांच्या नेमणुका...तरीही ग्रामीण विभागातील मुलींना अजुनही दुरापास्त असलेले, नाकारल्या जाणारे शिक्षण…


   फक्त मुलींना नसोत बंधनं

   मुलांनाही द्यावे संस्कार

   मायभगिनी सम मानावे

   परनारीस द्यावा आदर


ह्या शिकवणी अभावी निर्जीव स्त्री-रूपाला जागृत देवता मानुन तिचं थाटामाटात पूजन आणि जिवंत स्त्रीला मात्र भोगवस्तु मानुन तिची विटंबना करून तिच्यावर निर्मम अत्याचार, हत्या हे वास्तव…

शिवाय 'मुलगी शिकली, प्रगती झाली' या घोषवाक्याचा प्रत्यय येत असतांनाही 


    कन्या, जननी उदरात

    प्रकाशाची वाट पाही

    लावु ज्योत तिच्यासाठी

    खुल्या असो दिशा दाही


याकडे डोळेझाक करून तथाकथित शहरी, सुशिक्षित समाजातसुध्दा होणाऱ्या मुलींच्या भ्रूणहत्या…


शिक्षण आणि करिअरच्या संधीमुळे, अपेक्षापूर्ती न झाल्यामुळे शहरी मुला-मुलींचे पुढे पुढे सरकत जाणारे लग्नाचे वय...आणि ग्रामीण भागातील शेतकरी मुलांशी लग्न करण्यास मुली तयार होत नाहीत म्हणुन वाढणारी अविवाहित तरुणांची संख्या...उशिरा विवाह झाल्यामुळे मूल न होणे किंवा करियर मध्ये अडसर नको म्हणुन होऊच न देण्याची वाढती प्रवृत्ती...त्याच वेळी रस्त्यावरील, बेघर कुटुंबियांच्या सदस्यांत मात्र देवाचं देणं म्हणुन दिवसेंदिवस पडणारी भर...


वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे शहरांत, अनेक सुसज्ज, अत्याधुनिक, महागडी इस्पितळं...तरीही खेड्यापाड्यात आणि दुर्गम भागात असणाऱ्या आरोग्याच्या अतिशय बिकट प्रश्नांमुळे कुपोषण आणि मृत्यूचे लक्षणीय प्रमाण...पाण्याची टंचाई, अशुध्दता...


खगोलशास्त्र, अंतराळशास्त्रात अभिमानास्पद संशोधन...'चांद्रयान २' ही मोहीम...अनेक अवघड, उंच ठिकाणी अत्याधुनिक पुल, रेल्वे, रस्ते...

तरीही कांही ग्रामीण भागातील खडतर दळणवळण...एकीकडे विज्ञानाच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी...दुसरीकडे मात्र देवावर सर्व भार टाकण्यासाठी नवीन, विस्तीर्ण मंदिरांची निर्मिती...


जगाला शांततेचा, अहिंसेचा संदेश देणाऱ्या भ. महावीर, गौतम बुद्धाच्या भारतात दुसऱ्याच्या विस्तवावर स्वतःची पोळी भाजुन घेण्यासाठी अनेक ठिकाणी धर्माच्या नावावर घडवल्या जाणाऱ्या दंगली...ठिकठिकाणी होणारा हिंसाचार आणि त्यात होरपळणारा सामान्य माणुस…


परिस्थितीच्या रेट्यामुळे लयाला जाणारी संयुक्त कुटुंब पद्धती...वाढते वृद्धाश्रम... निर्माण होणारी संस्कारशुन्य नवीन पिढी आणि समाज माध्यमांवरील विपरीत दृश्यांचा परिणाम म्हणुन गुन्हे करण्यास प्रवृत्त होणारी अल्पवयीन मुलं...मातृत्व प्राप्त व्हावं म्हणुन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि दुसरीकडे अनाथाश्रमातील बालकांची वाढती संख्या... 


दोघेही कमावते असल्याने वेळ नसलेल्या छोट्याशा कुटुंबासाठी एका घराबरोबरच आणखी सेकंड होम, फार्म हाऊस, गाड्या...आणि राहायला एक खोलीही नसलेली बेकार, बेरोजगार मोठ्ठी कुटुंबं…


विजेच्या लखलखाटाने झगमगणारी शहरं

आणि शेतात पाणी देण्यासाठीही वीज नसलेले ग्रामीण शेतकरी…


चंगळवादामुळे ओसंडून वाहत असलेली सोन्याचांदीची, कपड्यांची, खाद्यपदार्थांची मोठमोठी दुकानं आणि शेतमालाला भाव नाही म्हणुन कर्जाच्या ओझ्याखाली दबुन होणाऱ्या आत्महत्या…आंधळ्या मार्गदर्शनामुळे झालेली शेतीची दुरवस्था...


मजबुत, यशस्वी परराष्ट्र धोरण…तरी राज्य पातळीपासुन ते गावपातळीपर्यंत मात्र सत्तेसाठी कुरघोडीचे राजकारण सुरू असल्यामुळे कागदोपत्रीच राहणारा विकास...


द्रष्ट्या स्त्री-पुरुषांनी केलेला आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास आणि स्वार्थीपणामुळे विकासाच्या गोंडस नावाखाली पर्यावरणाची पुरती वाट लावणारे महाभाग...निवडणुकीत जिंकुन यावे म्हणून केवळ एकगठ्ठा मतांसाठी देशाच्या विकासात खीळ घालणारे राजकारणी...


त्यातुनच फितुरीच्या जोडीने भ्रष्टाचाराच्या भस्मासुराने सर्वच क्षेत्राला घातलेला घट्ट विळखा...त्यामुळे आतुन पोखरल्या जाणारा स्वातंत्र्याचा हा वटवृक्ष...


नुकत्याच आलेल्या ताज्या संकटात मृत्यूचे एवढे जवळून दर्शन झाल्यावरही मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांचा अनुभव…तसाच माणसातील दैवत्वाचाही आलेला प्रत्यय…


देशाला भारतमाता असं आदरानं संबोधुन तिला मातेचा दर्जा देण्याचं जगातील एकमेव उदाहरण आणि त्याच वेळी स्वतःच्या स्वार्थासाठी तिचा अविचाराने ऱ्हास करण्यासाठीही कारणीभूत ठरणं... किती उदाहरणं द्यावीत...तरीही मेरा भारत महान? 


एकंदरीत काय...तर ह्या देशाच्या खणखणीत नाण्याची 'इंडिया' नावाची एक बाजु सुवर्णाप्रमाणे झळझळीत आहे, तर तर दुसरी 'भारत' नावाची बाजु मात्र गंजलेल्या लोखंडाप्रमाणे काळवंडलेली आहे असे खेदाने म्हणावे लागते.


अमृतमहोत्सवी वर्ष तरीही 

बाल्यावस्थेतच रांगतोय

सतत अनेक प्रयोगांसाठी

अजुनही गिनीपिग होतोय?


असं म्हणावं लागु नये म्हणुन...


फक्त स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच आपल्या देशभक्तीचे

प्रदर्शन न करता देशातील लोकसंख्येला इष्टापत्ती मानुन युवकांना अल्लाउद्दीनच्या दिव्यातील

राक्षसाप्रमाणे विधायक विकासकार्यात सतत सहभागी करून घेतले तर भारत हा आत्मनिर्भर तर होईलच, पण जगात सक्षम, संपन्न, शक्तिशाली असा महासत्ता म्हणुन नक्कीच गणल्या जाईल. स्वातंत्र्यसंग्रामरूपी समुद्रमंथनात स्वातंत्र्याचा अमृतकलश हाती आला आहे, त्या अमृताचा पूरेपूर उपयोग करून घेऊन या भारतभूला स्वर्ग बनवूया. 'मी माझा' ऐवजी करूया...


    देश माझा, मी देशाचा

  संकल्प अमृतमहोत्सवी वर्षाचा



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational