मनामनातील रावण
मनामनातील रावण
नवरात्राची सांगता झाली. आज विजयादशमी…शत्रूवर विजय मिळवल्याचा दिवसाचे, विविध कथा, आख्यायिका यांचे स्मरण करून देणारा दिवस…
आज सर्वजण एकमेकांना भेटतील, दसऱ्याच्या शुभेच्छांसोबत आपट्याची पानं, ती न भेटली तर कांचनाची पानं सोनं म्हणून एकमेकांना देतील…पर्यावरण वाचवायच्या नावाखाली कोणी कोणी विनोदाने सोन्याच्या पानाचीही मागणी करतील…झेंडूची फुलं, आंब्याच्या पानांचे तोरण आणि घटासमोर उगवलेलं धान्यांकुर यांचाही मान अबाधित आहे.
मोठमोठ्या शहरात बरेच जण आज गेट-टुगेदर करतात. त्यानिमित्ताने एरवी न होणाऱ्या एकमेकांच्या भेटीगाठी होतात…मनोरंजनाचे खेळ, स्पर्धा याचे आयोजन केले जाते. एकंदरीत दिवस मजेत जातो.
पूर्वीचे लोक कदाचित घोडे हेच त्यांचं वाहन असल्यामुळे दसऱ्याच्या दिवशी त्यांची पूजा करत असतील आता घोड्यां ऐवजी गाड्या आल्यात आणि त्यांनाही पूजा करून घेण्याचा सन्मान लाभलाय.
शिवाय वेगवेगळ्या प्रदेशात, वेगवेगळ्या प्रांतात आणखीही बऱ्याच काही प्रथांचे वैविध्य असेलच.
अशीच एक प्रथा मात्र अद्यापही अव्याहत सुरू आहे. रावणदहन…आबालवृद्धांना आवडणारी…शक्य तितक्या उंचीचा रावणाचा पुतळा तयार करायचा आणि मोठ्या जल्लोषात एखाद्या मैदानात त्याचे दहन करायचे…त्यावेळी गर्दीचा उत्साह पाहण्यासारखा असतो. हजारो वर्षांपूर्वी रावणाने सीतेला फक्त उचलून नेण्याचा एक गुन्हा केला, नंतर त्याने तिला तिची परवानगी नसतांना साधा स्पर्शही केला नाही…पण तरीही तो वर्षानुवर्षे जळतोच आहे आणि यापुढेही जळतच राहील. ठाऊक नाही किती युगापर्यंत…
आता अशा कितीतरी सीता कधी एकट्या दुकट्या तर कधी सामूहिकरित्या रावणांकडून उचलल्या जात आहेत आणि……..त्यांच्याचकडून जाळल्याही जात आहेत…रावण दहन साजरा करत असणाऱ्या गर्दीतल्या प्रत्येक पुरुषाने कधी स्वतःच्या मनात डोकावून पाहिलंय का? प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या त्याच्या मनात अगदी लहान बालिकेपासून ते वयोवृद्ध परस्त्रीबद्दल कधी वाईट विचार आलेच नसतील? इतकंच काय…पोटची पोर, पाठची बहीण आणि इतर नातेवाईक स्त्रिया ह्या सुध्दा ज्याच्या विखारी नजरेपासून सुरक्षित नसतील तो स्वतःच्या स्त्रीला तरी सन्मान देतच असेल? या मनामनात राहणाऱ्या रावणाचं कधी होणार दहन नेहमीसाठीच? लंका तर खूप दूर आहे, इथे तर पावलोपावली रावण भेटत असतात त्याचं काय! असं म्हणतात की *शीशे के घर मे रहनेवालोंने दुसरों के घरपर पत्थर नही मारने चाहिये.*
भारतात रावणाचीही मंदिरं आहेत म्हणे…
आपण त्याला देव नाही मानलं तरी चालेल, पण एका स्खलनशील व्यक्तीला मिळावी असे आपण मानतो तशी शिक्षा त्याला मिळालीही. इथे बळी जाणाऱ्या अगणित सीता आहेत, पण गुन्हा करून समाजात उजळ माथ्याने फिरणाऱ्या रावणांचं काय करावं. त्यांना कधी, कुठे भेटेल राम?
सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा.
