STORYMIRROR

Bharati Raibagkar

Others

3  

Bharati Raibagkar

Others

ही आणि ती

ही आणि ती

2 mins
126

ही आणि ती 


आटपाट नगरात रहात होत्या दोघी मैत्रिणी…सर्वस्वी भिन्न परिस्थिती दोघींची…पण मैत्रीत कधी आड नाही आली…ते शाळेत जाण्याचं अल्लड वय…बाल्य आणि तारुण्याच्या सीमारेषेवरचं…खेळणं, डबा खाणं, घरी जाणं, अभ्यास करणं, सारं सारं काही एकत्रच…एवढंच काय एकमेकींच्या घरी मुक्कामाला रहाणं सुद्धा…सर्व शाळेत चर्चेचा विषय होता त्यांची मैत्री म्हणजे…


     अशी जगावेगळी

     मैत्री त्या दोघींची

     कौतुकास्पद आणि

     हेवा वाटण्याची


शाळा संपेपर्यंत हे असंच चालू राहणार हा हिचा गाढा विश्वास…त्यावर तर हिचे पुढचे बेत ठरायचे…फक्त हिचेच बरं…भावनांच्या आकाशात उडण्याचंच ते वय…वास्तवाचं भान तेव्हा कुठून असणार…पण बोलून दाखवलं नाही तरी तिला मात्र ते असावं…पण तिने विचार केला असेल,आत्ताच हिचं मन का दुखवावं…


     भावनांच्या जगात

     कुठे असतो व्यवहार

     नेहमीच वाटत असतं

    सर्व आलबेल असणार


कारण…जेमतेम वर्षभरातच तिच्या वडिलांची बदली झाली तेव्हा…ती स्थितप्रज्ञ, समतोल आणि ही…ही मात्र अश्रूंच्या महापुरात वाहत चाललेली…निराधार झाल्यासारखी…खरोखरच हिचा शाळेतील, वर्गातील आधारच नाहीसा होणार होता ना…वास्तव स्वीकारायला हिचं मन तयारच होत नव्हतं तेव्हा…


अखेर तो दिवस आलाच…तिला… एका अति हुशार, निगर्वी, हरहुन्नरी विद्यार्थिनीला निरोप देण्याचा…मग वर्गातील निरोप समारंभ…तिच्याविषयी स्तुतीपर भाषणं, सरांनी केलेलं कौतुक…सगळ्यांनी तिला दिलेल्या भेट वस्तू…आणि…आसवांच्या धूसर पडद्याआडुन हे सर्व बघत असलेली, एकदम मागे उभी राहिलेली ही…


    वियोगाचं स्वरूप

    निरनिराळं असतं

    कधी तात्कालिक

    कधी दीर्घकाळ टिकतं


समारंभ संपतांना ती जवळ येऊन हिला बिलगुन सर्वांना उद्देशून म्हणाली…"या माझ्या मैत्रिणीला सांभाळा हं सर्वांनी" बस्स् इतकंच…पुढचे शब्द वाहून गेलेत दोघींच्याही अश्रु सरितेच्या पुरात…


आणि ती निघून गेली…

आपला काहीही ठावठिकाणा न देता…तेव्हा कुठे होतं व्हॉट्सॲप, फोटो…पत्र हाच तर आधार होता एकमेकांच्या संपर्काचा…तोही हळूहळू कमकुवत होणारा…


आज अर्धशतकाहून अधिक काळ लोटलाय…सोशल मीडियाच्या आताच्या दुनियेत ती नक्की सापडेल कुठेतरी या आशेने ही तिला शोधण्याचा प्रयत्न करतेय, सतत…कारण त्यानंतर कितीतरीजणांशी हिचं मैत्र जमलं पण…कदाचित हास्यापद वाटेल, तरीही तिला अजूनही विसरूच शकली नाही ही…आणि विसरणारही नाही…


तिचं माहिती नाही हिला…

ही आहे की नाही तिच्या स्मरणात

पण तिच्या आठवांचं गोंदण मात्र उरलंय हिच्या मनात…

 उरलंय हिच्या मनात


ता.क.- ह्या सत्यावर आधारित लेखातील…

ही म्हणजे मी…भारती महाजन-रायबागकर,चेन्नई

आणि

ती म्हणजे –नलिनी बापट

शाळा –व्ही.जे.हायस्कुल, ता.नांदगाव,

जिल्हा - नासिक 

इयत्ता ७वी…साल साधारण–१९६५


Rate this content
Log in