STORYMIRROR

Bharati Raibagkar

Others

3  

Bharati Raibagkar

Others

घनव्याकुळ जीव झाला

घनव्याकुळ जीव झाला

2 mins
119

     अरे, अरे,‌ का रुसलात अशा माझ्यावर, का अशा दूर दूर पळत आहात माझ्यापासुन, का अशा अबोल झालात एकाएकी, नका नं असं करू, इतक्या वर्षांची साथ संगत…तुम्हीच अशा वागलात तर मी काय करावं बरं! तुमच्याच जवळ तर करत असते मी मन मोकळं !

तुमच्याच मदतीचा भक्कम पुल बांधत असते इतरांशी संवाद सांधताना…मग…


    'का हा दुरावा, का हा अबोला

   अपराध माझा असा काय झाला'


    जन्म झाल्यानंतर माझं चिमुकलं बोट ज्यांनी आपल्या खंबीर, मायाळु हातांनी पकडुन मला आश्वस्त स्वरात सांगितलं आम्ही सदैव तुझ्या बरोबरच आहोत, बरं का, त्या प्रेमळ जन्मदात्यांना उत्तरादाखल दिलेला माझा हुंकार! तुमचंच तर ते रूप होतं इवलसं...नंतर मित्र-मैत्रिणींच्या संगतीत कट्टी बट्टी, मनातली गुपितं आणि बरंच काही काही! प्रेमाचंच तर ते एक वेगळं रूप, तेव्हा ही साथ होती तुमचीच…


     आणि नंतर...आयुष्यातील नवं पर्व सुरू होतांना...हातात हात देऊन, शेल्याला गाठ बांधुन सप्तपदी चालतांना... जन्मोजन्मीच्या साथीची रूढार्थाने दिली-घेतलेली प्रेमदायी वचनं...तुझ्याच साक्षीने नव्हती का ती!


एवढंच काय…

निसर्गाच्या संगतीत रमतांना,

कुंचल्यातून रंगरेषा चितारतांना, 

सरगमचे सप्तसूर ऐकतांना, गातांना,

पुनवेच्या चांदण रात्रीची आभा आणि अवस्थेच्या काळोख्या रात्रीची चांदणनक्षी निरखतांना,

पक्ष्यांचा किलबिलाट, फुलपाखरांचे नर्तन,

फुलांचे मोहक रंग, ढगांचे बदलते विभ्रम 

त्यांच्यावरच्या प्रेमाने सगळं सगळं अनुभवतांना, तुमचंच नृत्य चालत असतं माझ्या मनात...जणू तुम्ही म्हणत असता, 'चल धर ठेका आमच्या लयीसोबत लवकर, नाहीतर निसटून जाऊ आम्ही'


मग आता…

हातातला हात हलकेच सोडवून, गाठ बांधलेला शेला इथेच ठेवुन, 


     'दिल्या घेतल्या वचनांची

      शपथ तुला आहे' 


या माझ्या आर्त विनवणीला नाईलाजाने अव्हेरून

ज्यांनी माझी साथ-सोबत सोडली अर्ध्यातच…

तुम्हीही तर नाही गेलात ना त्यांच्या पाठोपाठ?


मान्य आहे,आपली साथ संगत सुटली होती

काही दिवस, नाही तुम्हाला न्याय देऊ शकले, पण समजुन घ्या ना मला...


नाही तर…

कोणाच्या सोबतीने मात करावी या गर्दीतील असह्य एकटेपणावर?

कशी भरून काढायची ही शुन्यवत पोकळी


    अर्थशुन्य भासे मजला


'काळ हेच औषध आहे, जखम भरून काढतो तेच मलम' हे सार्वकालिक सत्य जेव्हा माझ्या कानाशी पोहोचतं, तेव्हा सैरभैर मन धावा करतंय तुमचाच...त्या काळाची मिती आक्रसण्यासाठी, त्याचा परिघ लहान, आणखी लहान करण्यासाठी…


कारण...

तुमच्याच तर सोबतीने वेचलेत आजवर आनंदाचे क्षण…

तुमच्याच संगतीने झेलले कौतुक सुमन

तुमच्याच पायवाटेवर चालत आले

सांत्वन घन

आणि अजुनही कधी कधी धीराच्या ओलाव्याची वाट पाहतंच वेडं मन…


म्हणुनच विनविते, नका, नका सोडुन जाऊ तुम्हीही, ऐका ही आर्त साद माझ्या मनाची, 


  'या शब्द सख्यांनो, परत फिरा गं,

  सखीकडे अपुल्या

  घनव्याकुळ जीव झाला'


या, पुन्हा एकदा कवेत घ्या माझ्या लेखणीला, कधी नव्हे इतकी गरज आहे मला आता तुमच्या सोबतीची, 

या, शब्दसख्यांनो या!


Rate this content
Log in