Ashvini Kapale Goley

Drama

1.6  

Ashvini Kapale Goley

Drama

स्वातंत्र्य दोघांचेही एकसमान

स्वातंत्र्य दोघांचेही एकसमान

5 mins
881


अनघा आणि अमन एक नवविवाहित जोडपे. दोघेही आयटी क्षेत्रात चांगल्या पदावर नोकरीला. दोघांचा नवा संसार अगदी आनंदाने बहरला होता. दोघेही एकाच क्षेत्रात असल्याने एकमेकांना खूप छान समजून घ्यायचे ते. दोघांचं प्रेम, समजूतदारपणा बघून घरच्यांनाही खूप आनंद वाटत होता. 


अनघाचे सासू-सासरेसुद्धा सुनेचे भरभरून कौतुक करायचे. एकदा अमनच्या आत्या शहरात अनघा आणि अमनकडे येणार होत्या, सोबतच अमनचे आई-बाबासुद्धा यायचं ठरलं. सगळे सायंकाळी येणार आहेत तेव्हा आज ऑफिसला जाऊन लवकर येता येईल म्हणून दोघेही ऑफिसला निघून गेले. 


अमन आपलं काम आटोपून घरी लवकर आला पण अनघा मात्र महत्वाच्या मीटिंगमध्ये अडकली. तिचं सगळं लक्ष घरी होतं, मनात विचार सुरू होते, "सगळे दमून येतील प्रवासातून. भूक लागेल त्यांना, मावशीकडून आई-बाबा आत्या यायच्या आधीच जेवण बनवून‌ घ्यायचं होतं. मला नेमका आज उशीर होणार आहे. काय करावं आता मीटिंगसुद्धा महत्त्वाची आहे."


काळजीच्या सुरात तिने अमनला फोन‌ केला आणि त्याला सगळं सांगितलं. तेव्हा तो म्हणाला, "अनू, तू काळजी करू नकोस. मी स्वयंपाकवाल्या मावशीकडून सगळं बनवून घेईन. काळजी करू नकोस तू." 


अमनसोबत बोलून अनघा जरा शांत झाली. आता पटकन काम, मीटिंग आटपून घेऊया म्हणत कामात गुंतली. 


इकडे ठरल्याप्रमाणे आई-बाबा, आत्या पोहोचले. अमन त्यांना घ्यायला स्टेशनवर गेला. घरी अमनने मावशीकडून सगळा स्वयंपाक करून घेतला‌ होता. घरी आल्यावर कुलूप बघताच आत्या अमनला म्हणाल्या, "अमन काय रे, घराला कुलूप. अनघा कुठे आहे."


अमन म्हणाला, "आत्या अगं अनूला एक महत्वाची मीटिंग आली त्यामुळे लवकर नाही निघता आलं तिला. तिचं काम आटोपले की येईल ती."


आत्या जरा रागाच्या सुरात म्हणाल्या, "काय बाई आजकालच्या सुना, काही मानपान नाही. पहिल्यांदा आत्येसासू येतेय म्हटल्यावर घरी थांबायचं ना. इकडे आम्ही दिवसभर प्रवास करून दमलो. म्हटलं घरी गेलं की नव्या सुनबाई छान खाऊपिऊ घालतील, मानपान करतील. हिला तर इथे पाहुण्यांची काही काळजीच नाही."


अमनचे बाबा त्यावर म्हणाले, "अगं येईल ती. महत्वाची मीटिंग आहे म्हणाला ना अमन."


अमन‌सुद्धा त्यावर म्हणाला, "हो. आणि आत्या अगं मावशीने सगळा स्वयंपाक केला आहे. काही काळजी नको करू तू. तुम्ही फ्रेश व्हा. मी वाढतो ना तुम्हाला."


बाप-लेकाचं बोलणं ऐकून आत्या म्हणाल्या, "तुम्ही तिला फार डोक्यावर घेतलंय हा. नोकरी करते म्हणून काय झालं. हे बघ अमन, नवर्‍याने नवर्‍यासारखं राहावं आणि सुनेने सुनेसारखं."


अमन - "आत्या अगं इतकं काय झालंय तुला. आम्ही दोघेही नोकरी करतो मग एकमेकांना इतकं तर समजून घ्यायला हवं ना. मीसुद्धा बरेचदा‌ असं अचानक कामात अडकतो, ठरवलं त्यावेळी निघता येईलच असं नाही ऑफिसमध्ये. बाहेरच्या देशातील क्लायंट असतात मग त्यांच्या वेळेनुसार काही कामे त्याचवेळी पूर्ण करावी लागतात."


आत्याच्या मनात मात्र आल्या आल्या अनघाविषयी राग निर्माण झाला होता. सगळे फ्रेश झाले तितक्यात अनघा आली. फॉर्मल शर्ट, ट्राउझर, मोकळे केस अशा रुपात अनघाला बघताच आत्या जरा विचित्र नजरेने तिला बघत राहिल्या. 


अनघा म्हणाली, "सॉरी, मला‌ जरा उशीर झाला‌ यायला. आमचा डिलीव्हरी हेड आलेला आहे ना जर्मनीवरून त्याने वेळेवर मीटिंग ठेवली. बरं तुम्ही कधी‌ पोहोचलात? काही त्रास नाही ना झाला प्रवासात."


आत्या त्यावर म्हणाल्या, "फार दमलो बाई दिवसभर प्रवास करून.."


अनघा म्हणाली, "आता जेवण झालं ना की छान‌ आराम करा. मी आलेच पटकन फ्रेश होऊन."


अनघा खोलीत जाताच आत्या आईला म्हणाल्या, "काय गं, अशी कशी तुझी सून. काय तिचे कपडे, कपाळाला टिकली नाही का पायात जोडवे नाही. मोठ्या दादाची सून बघ, लग्नाला पाच वर्षे होतील पण साडी नेसते रोज. कपाळाला टिकली, पायात जोडवे, गळ्यात मंगळसूत्र. आल्या आल्या सांगितलं तिला सासूने, इथे ड्रेस बीस चालणार नाही. बघ कशी आज्ञेत आहे सासूच्या. "


त्यावर आई म्हणाल्या, "अगं, ऑफिसमध्ये काय साडी नेसून जाईल का ती. तिथल्या वातावरणानुसार राहावं लागतं त्यांना. इतकं काय त्यात. आम्हाला नाही बाई काही वावगं वाटत त्यात. ती शिकलेली आहे, नोकरी करते, माझ्या मुलाच्या बरोबरीने कमावते‌. मग तितकं स्वातंत्र्य हवं ना तिला. आपली मीनू नाही का घालत मग असे कपडे. तिचं चालतं आपल्याला मग सुनेला कशाला उगाच बंधनं. टिकली-जोडवे म्हणशील तर साडी नेसली ना की घालते ती सगळं. आपली मीनू तर साधं मंगळसुत्रसुद्धा घालत नाही हो, अनू निदान‌ ते तरी घालते."


आत्या त्यावर म्हणाल्या, "तुमचा अती लाड चाललाय हा.. मीनू मीनू काय म्हणतेस वहिनीसारखं. ती मुलगी आहे, तिच्या सासरी चालतं तसं म्हणून तशी मॉडर्न राहते ती.. पण ही सून आहे ना तिने सुनेसारखं नको का राहायला."


त्यावर अमन‌ म्हणाला, "आत्या अगं सून असो की मुलगी शेवटी एकच ना. बरं माझं लग्न झालं मग मी कुठं काय घालतो, आधी राहायचो तसाच राहतो मग मुलींनी का बदलावे राहणीमान. मी तिला सांगितलं आहे, लग्नाआधी जशी राहायची, तसंच इथे रहा. उगाच लग्न झालं म्हणून बदलायची गरज नाही. दोघेही आम्ही सारखं शिकलोय, सारखाच पगार कमावतो मग तिलाच का बंधनं लादायची ना. तिला जसं कम्फर्टेबल वाटतं तशी‌ ती राहते आणि मला तेच आवडतं. तिचं स्वातंत्र्य आहे ते, आपण का हिरावून घ्यायचे."


अनघाने फ्रेश होताना सगळं बोलणं ऐकलं होतं, अमन आणि आई-बाबा किती समजूतदार आहेत याची तिला नव्याने जाणीव झाली. आपल्याला आपल्या आवडीनुसार राहण्याचा हा हक्क घरच्यांनी दिला याचा तिला खूप आनंद वाटला. 


मुलगा आणि सून दोघेही एकसमान असा विचार करणारे सासू-सासरे क्वचितच पाहायला मिळतात आणि नशीबाने आपल्याला ते लाभले याचा तिला अभिमान वाटला. 


इकडे आत्या सगळं ऐकून फार संतापल्या पण कुणीच आपली बाजू घेत नाहीये म्हणून अनघाचा रागराग करत मनातच चिडचिड झाल्या. 


अनघा कुर्ता-पायजमा घालून बाहेर आली, सगळ्यांच्या पाया पडायला गेली तितक्यात अमन‌ म्हणाला, "अरे हा, मी पण पाया पडायचो राहिलो."


आत्याने पटकन अमनकडे बघितले. 


अनूने जेवणाची सगळी तयारी केली. जेवणात आत्याच्या आवडीचा मेनू होता. आई आत्याला म्हणाल्या, "अनूने दोन‌ दिवसांपूर्वी मला विचारले होते बघा, आत्याला काय आवडतं वगैरे. तू पहिल्यांदाच येणार म्हणून सगळं तुझ्या आवडीचे जेवण बनवायला सांगितले तिने मावशीला."


आत्याला मनात राग असला तरी हे ऐकून अनूचे जरा कौतुक वाटले. 


सगळ्यांनी एकत्र बसून हसतखेळत जेवण केले.


अनू रात्री म्हणाली, "उद्या सुट्टी घेतली मी. नंतर शनिवार-रविवार सुट्टी असतेच. आपण छान फिरायला जाऊया. मी सगळं प्लॅनिंग केलंय. आत्याला फिरायला आवडतं हे सांगितलं होतं मला अमनने त्यामुळे आधीच सुट्टी टाकून ठेवली मी.."


अनूविषयी आपण किती गैरसमज केलेले. मागे मोठ्या दादाकडे गेले तर त्याची सून‌ साधं मोकळी बोललीसुद्धा नाही. नुसतं तापट वातावरण होतं घरात. इथे अनू आपला इतका विचार करूनसुद्धा आपण उगाच हिचा रागराग करतोय. तिच्या टिकली न लावण्यावरून, कपड्यांवरून तिचं व्यक्तीमत्व तपासतो आहे, असा विचार करून आत्या जरा नरमल्या. सगळे एकत्र बसून गप्पा मारत होते, हसतखेळत मोकळेपणाने बोलत होते. 


एकंदरीत परिस्थिती बघून आत्याच्या लक्षात आलं की मुलगा आणि सून असा भेद न करता, तिच्यावर उगाच सून आहे म्हणून तिने लग्नानंतर बदलावे हा विचार करत तिच्यावर बंधन न लादता तिला तिचं स्वातंत्र्य दिलं तर घराला घरपण लाभतं. घरात खेळीमेळीचं वातावरण राहतं. 

याची सुरुवात आपल्या दादाने केली याचा आत्याला आनंद झाला. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama