Ashvini Kapale Goley

Tragedy

3  

Ashvini Kapale Goley

Tragedy

संघर्ष - सत्यकथा

संघर्ष - सत्यकथा

12 mins
1.2K


     प्रिती दिसायला अतिशय सुंदर, हुशार, मनमिळाऊ स्वभावाची मुलगी. शाळेत असल्यापासून सगळ्याच सगळ्या मित्रमैत्रिणींची, शिक्षकांची आवडती. तिला सुरवातीपासूनच विज्ञान विषयात फार रस होता. वैज्ञानिक विषयांवर वाचन, त्यातील नवनविन गोष्टी शिकण्याची जिद्द, उत्सुकता यामुळे तिचं याच क्षेत्रात करिअर करायचं शाळेपासूनच ठरलेलं. 


     विज्ञान शाखेत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तिचं कॉलेज सुरू झालं. कॉलेजमध्ये गेली तसंच तिचं सौंदर्य बघून बरेच जण तिच्या अगदी प्रेमात पडलेले पण ही मात्र आपल्याच विश्वात मग्न असायची. कॉलेजमध्ये तिचे बरेच नविन मित्र मैत्रिणी बनलेले. अशातच रोहन सोबत तिची मैत्री झाली, त्याला प्रिती खूप आवडायची, तिच्या प्रेमात तो अगदी वेडा झाला होता पण तिला सांगण्याची हिंमत मात्र त्याने अजून केली नव्हती. लवकरच प्रितीला आपल्या भावना‌ सांगून टाकू असं त्याने ठरवलं. तिला प्रपोज करायचं एकदा मनात अगदी पक्कं ठरवून रोहन कॉलेजमध्ये आला पण त्या दिवशी प्रिती कॉलेजलाच आलेली नव्हती. तिला फोन केला तर तो बंद होता. ती आज कॉलेजमध्ये का आली नाही हे कुणालाच माहीत नव्हते. दोन तीन दिवसांनी ती परत आली तेव्हा ती नेहमीप्रमाणे प्रसन्न दिसत नव्हती, कुणाशी फार काही बोलतही नव्हती. तिला असं निराश बघून रोहनला रहावले नाही आणि त्याने तिला विचारले असता कळालं की तिच्या वडिलांनी तिचं लग्न ठरवलं आहे. परिक्षा झाली की लगेच लग्न होणार आणि कॉलेज सोडावं लागणार कारण मुलगा नोकरीला दुसऱ्या शहरात आहे. हे ऐकताच गृप मध्ये सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. रोहनचे प्रेम तर अव्यक्तच राहीले. 


एका मैत्रिणीने तिला प्रश्न केला, "प्रिती , तुझं स्वप्न आहे सायंटिस्ट होण्याचं, त्याच काय? तू इतकी हुशार, मेहनतीने स्वप्न पूर्ण करण्याच्या वाटेवर अशी मधूनच कशी काय माघार घेत आहेस? प्लीज प्रिती, विचार कर..सांग ना घरी आताच लग्न नाही करायचं म्हणून..एक वर्षाचा प्रश्न आहे फक्त.."


प्रिती पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली, "नाही गं..आता‌ ते शक्य नाही. माझं स्वप्न तर पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहेच. कॉलेज करता नाही आलं तरी परीक्षेला येऊन पदवी पूर्ण करायची आहे मला. पण लग्नासाठी नाही म्हणता नाही येणार आता. माझ्यासाठी मागच्या वर्षीपासून स्थळ यायला लागलेत, बाबांना वाटतं आपली मुलगी इतकी सुंदर आहे, उगाच कुणाच्या प्रेमात नको पडायला, आपलं नावं खराब नको व्हायला. त्यांचा स्वभाव खूप कडक आहे. नाही म्हंटले तर उगाच घरात वाद होतील,मग आईलाही मनस्ताप आणि मलाही सतत ते जाब विचारणार त्यापेक्षा लग्नाला तयार झालेलं बरं म्हणून मी हो म्हणाले. कुणाल नाव आहे मुलाचं. बघायला आला तेव्हा त्याला सांगितलं मी माझ्या शिक्षण पूर्ण करण्याविषयी. त्याला काही प्रोब्लेम नाही." इतकं बोलून प्रिती लॅबोरेटरी कडे निघून गेली. 


झालं, कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच प्रितीचं कुणाल सोबत लग्न झालं. लग्नानंतर तिचा मित्र मैत्रिणींसोबत कामापुरता संपर्क व्हायचा. 


कुणाल दिसायला देखणा, मोठ्या शहरात नोकरीला, स्वतःच्या गोड बोलण्यातून कुणालाही आपल्या जाळ्यात अडकवेल असा चतुर. प्रितीचे सौंदर्य बघून त्याने तिला पहिल्यांदा बघताच पसंत केलेले. त्याचं तिला समजून घेणं, प्रेमाने बोलून आपलसं करून घेणं यामुळे ती सुद्धा त्याच्यावर भाळली. लग्न ठरल्यानंतर हळूहळू ती सुद्धा त्याच्या प्रेमात पडली. लवकर लग्न झालं असलं तरी आपल्या वडिलांनी अगदी योग्य मुलगा शोधला या विचाराने ती आनंदून गेली. 

लग्नानंतर दोघेही अगदी गुण्यागोविंदाने नांदत होते. प्रितीने दोघांचा नवा संसार सांभाळत शेवटच्या वर्षाचा सगळा अभ्यास घरीच केला. शेवटच्या वर्षाची परीक्षा, प्रॅक्टिकल साठी कॉलेजमध्ये जाऊन तिने आपला पदवी अभ्यासक्रम जिद्दीने पूर्ण केला. कुणालही तिला या सगळ्यात पाठिंबा देत होता त्यामुळे त्याच्या आयुष्यात येण्याने ती अगदी आनंदात होती. आता तिला तिच्या स्वप्नाची एक पायरी गाठायची होती त्यासाठी कुणाल ऑफिस मध्ये गेला की ती तिच्या आवडत्या क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायची. तिने स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात केली. 


  भराभर वेळ जात होता, आता अशातच दोघांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाले. दोघांनी छान लग्नाचा वाढदिवस साजरा केला. दोघांच्या या आनंदी संसाराला जणू कुणाची दृष्ट लागावी असंच काहीसं झालं. एक दिवस अचानक काही इसम घरी आले आणि कुणालने दार उघडले तसंच आज उधारी चुकती केल्याशिवाय जाणार नाही म्हणत त्याला पैशाची मागणी करू लागले. कुणालने प्रितीला बेडरूममध्ये जा म्हणत मोठ्याने आदेश दिला. काय होतंय तिला काही कळत नव्हतं पण कुणाल आणि त्या आलेल्या माणसांचं बोलणं ऐकून ती घाबरली होती. काही वेळाने ते लोकं परत गेले. प्रिती घाबरतच बेडरूम मधून बाहेर आली. कुणालला काही विचारणार तितक्यात तो म्हणाला, "तू लक्ष देऊ नकोस. काही उधारी वगैरे नाहीये, उगाचच दादागिरी करतात हे लोकं..पण मी घरी नसताना दार नाही उघडायचं.." 


प्रितीला यावर काय बोलावं कळेना. ती‌ भीतभीतच म्हणाली, "कुणाल, पण ते असं अचानक घरी का आलेत..जर काहीच उधारी वगैरे नसताना त्यांचा आपल्याला त्रास होतोय तर आपण पोलिस कम्प्लेंट करुया..अरे धमकी देत होते ते तुला..मला भिती वाटते रे.."


त्यावर कुणाल आवाज चढवून म्हणाला, "एकदा सांगितलं ना ह्यात लक्ष देऊ नकोस म्हणून..कळत नाहीये का तुला...परत याविषयी काही बोलायचं नाही..माझं मी बघतो काय करायचं ते.."


पहिल्यांदाच कुणाल अशाप्रकारे प्रितीला ओरडत होता. त्याचं असं विचित्र वागणं बघून ती रडतच खोलीत निघून गेली. 


त्या दिवसानंतर कुणालचे वागणे जरा बदलले होते. हा काही लपवत तर नाहीये ना अशी शंका प्रितीला यायला‌ लागली पण तिच्या हाती काही धागे दोरे लागत नव्हते. कुणाल वरवर चांगुलपणाचा आव आणत असला तरी काही तरी गडबड आहे अशी शंका प्रितीला येत होती.


काही महिने असेच निघून गेले. 


ज्या दिवसासाठी प्रिती वर्षभर मेहनत घेत होती तो दिवस आज उजाडला, स्पर्धा परिक्षेचा निकाल लागला आणि प्रिती त्यात उत्तीर्ण झाली. आनंदाच्या भरात तिने कुणालला फोन केला, सायंकाळी कुणाल पेढ्याचा बॉक्स हातात घेऊन घरी आला, प्रितीला मिठी मारत तिचे अभिनंदन केले. त्याचं कौतुक बघून क्षणभर ती त्याच्यावरचा राग, मनातल्या त्याच्याविषयी असलेल्या शंका विसरून गेली. लवकरच तिला एका रिसर्च सेंटर मध्ये सरकारी नोकरी मिळाली. तिच्या स्वप्नांना यश आल्याने ती खूप आनंदात होती. तिची नोकरी सुरू झाली. कुणालसुद्धा आता जरा नीट वागायचा. अशातच लग्नाच्या तीन वर्षांनी कुणाल आणि प्रिती यांच्या संसारात बाळाच्या येण्याची चाहूल लागली. 

दोघेही आनंदात होते. भराभर दिवस भरत चालले होते. याच दिवसात एकदा जरा बरं वाटत नाही म्हणून ती लवकर घरी आली आणि खोलीत जाऊन झोपली. काही वेळाने घराची बेल वाजली. प्रिती जाऊन बघते तर बॅंकेतून कुणी तरी आलेले ज्यांनी तिला कुणालविषयी विचारले आणि हेही सांगितले की, त्याने मागच्या काही महिन्यांपासून कर्जाचे हफ्ते भरले नाहीये, बॅंकेतून लेटर पाठवले त्याला उत्तर दिले नाहीये. 


हे सगळं ऐकून प्रितीला परत एक धक्का बसला. ती‌ विचार करत राहीली, "कर्ज? कशासाठी घेतलेलं ह्याने? काही बोलला कसा नाही मग? त्या क्षणी तिला आठवलं काही महिन्यांपूर्वी आलेले ते इसम जे उधारी विषयी बोलत होते. कुणाल नक्की काय लपवितो आहे आपल्यापासून..आज खरं काय ते विचारायला पाहिजे.."


सायंकाळी कुणाल घरी आला तेव्हा प्रितीने त्याला कर्जा विषयी विचारले, हेही सांगितले की बॅंक मधून एक व्यक्ती घरी आलेला. ते ऐकून तो‌ जरा दचकला आणि उगाच मनात स्टोरी बनवून तिला सांगायला लागला, "प्रिती अगं मी शिक्षणासाठी कर्ज घेतले होते. आता संपत आलंय पण गेल्या काही महिन्यांत प्रेग्नंसी मुळे वाढलेला दवाखान्याचा खर्च, घरखर्च यामुळे ना‌ हफ्ते भरायचे राहीले पण तू काळजी नको करू. मी करतो सगळं मॅनेज.."


ते ऐकून प्रितीला फार विचित्र वाटले. ती चिडून म्हणाली, "अरे पण कुणाल, आपल्या लग्नाला आता चार वर्षे होतील पण शिक्षणासाठी तू कर्ज घेतले याविषयी कधी बोलला नाहीस..मागेही ते उधारी वसूल करायला लोकं आलेले..काय चाललंय तुझं नक्की..आणि आता तर माझी नोकरी आहे, मी सुद्धा खर्चाला हातभार लावत आहे तरी तू म्हणतोस प्रेग्नंसी मुळे खर्च वाढला..मला काय ते खरं खरं सांग आता.."


तिचं बोलणं ऐकून तो चिडला पण तिची अवस्था बघून राग आवरत तो म्हणाला, "तुला सांगितलं ना माझं मी बघतो..उगाच डोक खाऊ नको माझं.."


कुणालचे वागणे आता परत बदलले होते. तो तिच्याशी बोलायला, तिच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला टाळू लागला. प्रितीला नववा महिना लागणार होता तेव्हा स्वतः कडे लक्ष देणे प्रिती साठी जास्त महत्त्वाचे होते. नोकरीत रजा घेऊन ती लवकरच बाळंतपणासाठी माहेरी निघून गेली.‌ लवकरच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. कुणाल बाळाला बघायला आला, बाळाला अलगद उचलून घेत त्याचा लाड केला. कुणालच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून प्रितीला वाटलं आता आपण एका बाळाचे बाबा आहोत याची जाणीव ठेवून कुणाल आता जरा जबाबदारीने वागेल. कुणाल विषयी एक खोटी आशा मनात ठेवून प्रिती आता बाळाच्या संगोपनात गुंतली. 


सहा महिन्यांत तो अधून मधून तिला भेटायला आला पण जेव्हाही आला तेव्हा गोड बोलून तिच्याकडे पैशाची मागणी करत होता. त्याला पैशाची सतत इतकी काय गरज पडते आहे याविषयी नक्की माहीत नसताना उगाच माहेरी भांडण नको म्हणून तिने एक दोन वेळा त्याला पैसे ट्रान्स्फर केले सुद्धा पण तो कितीही वेळा विचारून काहीही सांगत नाही म्हंटल्यावर तिने नंतर त्याला पैसे द्यायचे टाळले. 

आता तिला त्याच्याविषयी बर्‍याच शंकाकुशंका मनात यायला लागल्या. प्रितीला कधी वाटायचं ह्याच कुणाशी अफेअर तर नसेल , तर कधी वाटायचं हा खरंच काही अडचणीत असेल पण नक्की काय काही कळत नव्हते. अशातच सहा महिन्यांची सुट्टी संपली आणि ती कुणाल कडे परत आली. आईच्या मदतीने बाळाला सांभाळून ती रजेनंतर परत नोकरीत रुजू झाली. सुरवातीला काही दिवस आई , काही दिवस सासूबाई बाळाला सांभाळायला प्रिती आणि कुणाल जवळ राहील्या. त्या काळात कुणाल जरा नीट वागायचा पण त्याच वागणं पूर्वीसारखं राहीलं नव्हतं. 


बघता बघता बाळ एक वर्षाचं झालं. आता ऑफिस जवळच्या डे केअर मध्ये बाळाला ठेवून ती नोकरी करत होती. बर्‍याच दिवसांनी आज इवलासा पार्थ, कुणाल आणि प्रिती तिघेच घरी होते. दोघांमधील संवाद खूप कमी झालेला होता. नोकरी आणि बाळ सांभाळत प्रिती खूप दमून जायची पण कुणाल मात्र तिला जराही मदत करत नव्हता. काही म्हंटलं की नुसती भांडणे, चिडणे इतकेच काय ते सुरू होते. आता बाळाच्या येण्याने घरखर्च वाढलेला होता पण कुणाल मात्र या सगळ्यात एक रुपयाचा ही हातभार लावत नव्हता. त्याला खर्चा विषयी, पैशा विषयी काही म्हंटलं की म्हणायचा मी शिक्षणासाठी, लग्नासाठी कर्ज घेतले, त्याचे हप्ते आहेत. आई बाबांना आजारपणात मदत करावी लागते, त्यात माझा पगार संपतो. आता त्याची कारणे, त्याच्या खोट्या स्टोरी ऐकून प्रितीला वैताग आला होता, सतत मनस्ताप होत होता. अशातच एक दिवस कुणाल दारूच्या नशेत घरी आला, मोठ्याने बडबड करत सोफ्यावर आडवा झाला. प्रितीने पहिल्यांदाच त्याला अशा अवस्थेत बघितलं होतं. कधी तरी ड्रिंक्स करणारा कुणाल आज इतका पिऊन आलाय की स्वतःला तो सांभाळू शकत नाहीये हे बघून ती म्हणाली, "कुणाल, असं मोठ्याने बोलू नकोस,पार्थ झोपला आहे. उठेल तो."


तिच्या त्या एका वाक्याने तो‌ भयंकर चिडला, तिला नको ते बोलला. त्याचं आता असं वागणं रोजचंच झालं होतं. आता तर दारुच्या नशेत तिच्यावर हात उचलायला सुद्धा तो मागेपुढे बघत नव्हता. कुणालच्या अशा वागण्याचे कारण शोधण्याचा प्रितीने खूप प्रयत्न केला पण हाती काहीच लागले नाही. 


दिवसेंदिवस कुणालचे दारू पिण्याचे प्रमाण वाढतच गेले. दारू पिऊन घरी यायचं मग भांडण, मारझोड असले प्रकार सुरू झाले. असाच नशेत बडबड करत असताना तिला कळाले की कुणाल जुगार, सट्टा हुक्का अशा बर्‍याच व्यसनांच्या आहारी गेलाय. नशा उतरली की जरा नीट वागायचा पण दारूच्या नशेत मात्र तो अगदी सैतान रुप धारण करायचा. प्रितीच्या चारित्र्यावर सुद्धा शिंतोडे उडवायचा, उगाच तिच्यावर संशय घेत नको ते बोलायचा.


प्रिती त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होती पण तो नेहमी चिडून इतकंच म्हणायचा, "मी काय करायचं, काय नाही करायचं हे मला तू सांगू नकोस." 


या सगळ्यात पार्थ कडे सुद्धा त्याचे लक्ष नव्हते. नोकरी करत पार्थचा सांभाळ त्यात कुणालच्या वागण्याचा मनस्ताप शिवाय घरात एक पैशाची सुद्धा आर्थिक मदत कुणाल करत नव्हता, घरभाडे सुद्धा तो भरत नव्हता त्यामुळे प्रिती वैतागून गेलेली होती. प्रितीने तिच्या परीने कुणालला समजावण्याचा, नाते सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला पण कुणाल मात्र समजून घेण्यासाठी तयारच नव्हता. आता तिची सहनशीलता संपली आणि तिने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली आणि यादरम्यान दोघांचे समुपदेशन करून त्यांना सहा महिने एकत्र राहण्याचे सांगून नातं टिकवण्यासाठी कोर्टाने दोघांना एक संधी दिली. 


प्रितीने घटस्फोट घेण्याचा निर्णय ऐकून या सहा महिन्यात कुणाल अचानक परत चांगला राहायला लागला. पार्थ कडे नीट लक्ष देऊ लागला. त्याच्यातला हा चांगुलपणा खरा आहे की खोटा हे प्रितीला कळत नव्हते पण पार्थ साठी आपल्या नात्याला एक संधी द्यायला काय हरकत आहे असा विचार करून तिने या संसाराची नवी सुरुवात केली. कुणालचे व्यसन जरा कमी होत आहे हे बघून प्रितीला आनंद झाला. दोघांचं नातं नव्याने फुलवून पार्थ चे भविष्य उज्वल व्हावे यासाठी परत ती प्रयत्नशील झाली. 


एक दिवस कुणाल प्रिती ला म्हणाला, "माझ्यावर ना आधीच कर्ज आहे त्यामुळे मला परत कर्ज मिळणार नाही. आपण असं भाड्याचं घरात किती दिवस राहायचं, खूप घरभाडे जाते आहे त्यापेक्षा एक काम करूया. तू तुझ्या पगारावर कर्ज घे, आपण आपलं घर घेऊया. घरखर्च मी सांभाळतो."


कुणालमध्ये जरा चांगला बदल होत आहे, तो नीट वागतोय हे बघून प्रितीने त्याच्यावर विश्वास ठेवला. घरासाठी कर्ज घेतले. नविन घरात त्यांनी आपला संसार नव्याने सुरू केला पण हे सुख मात्र प्रितीच्या आयुष्यात फार काळ टिकले नाही. घटस्फोटाची केस केल्यावरचे दोन वर्षे कुणाल नीट राहीला पण आता प्रिती आपल्या जाळ्यात अडकली याची खात्री होताच त्याच्यातला सैतान परत जागा झाला. 


आता मुलाला शाळेत घालायची वेळ आली होती पण कुणाल म्हणायला लागला फी भरायला माझ्याकडे पैसे नाही तेव्हा एखाद्या साध्या शाळेत घालू पार्थ ला. प्रितीला परत एकदा कुणाल मध्ये विचित्र बदल जाणवला. या सगळ्यात पार्थ चे भविष्य खराब व्हायला नको म्हणून तिने स्वतः शाळा शोधून पार्थ ला शाळेत घातले.


हळूहळू कुणालचे वागणे पूर्वी सारखे झाले. कर्ज नक्की कशाच करून ठेवलंय हे काही तिला अजूनही कळत नव्हतं पण त्याच्या हातात पैसा काही टिकत नव्हता. आता तर घर कर्जाचा हप्ता, मुलाच्या शाळेची फी, घरखर्च सगळा आर्थिक व्यवहार प्रितीच्या पगारातून सुरू होता. सगळं मॅनेज करताना तिची फार तारांबळ उडत होती पण कुणाल मात्र ही परिस्थिती जराही समजून घेत नव्हता उलट तिलाच पैसे मागायचा आणि दिले नाही की मारझोड करायचा. 


परत त्याचे व्यसन सुरू झाले. दारू, सट्टा, जुगार आणि आता तर ड्रग्ज सुद्धा. ड्रग्ज च्या नशेत तो ऑफिसला जायला सुद्धा टाळाटाळ करायचा, दिवसरात्र झोपून राहायचा. त्याला जरा काही म्हंटलं की लगेच हात उचलायला. पार्थ बाबा बाबा म्हणत जवळ गेला तरी त्याला जराही पाझर फुटेना, त्याच्यावर हात उचलायला सुद्धा कुणाल मागेपुढे पाहत नव्हता. आता तर परिस्थिती पूर्वीपेक्षा अजूनच वाईट झाली होती. दिवसभर प्रिती नोकरी करायची, पार्थ शाळेनंतर डे केअर ला असायचा आणि कुणाल दारू, ड्रग्ज याच्या नशेत. सुट्टीच्या दिवशी नुसतेच भांडणे, चिडचिड, अबोला. घरच्यांना सांगूनही काही फरक पडला नाही उलट कुणाल प्रितीला अजून जास्त त्रास द्यायला लागला. सगळ्यांनी त्याची समजूत काढली पण सगळे प्रयत्न व्यर्थ. पार्थ साठी अशाच परिस्थितीत प्रितीने काही वर्ष कुणाल सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न केला पण शेवटी ती थकली. तिची सहनशक्ती आता परत एकदा संपली.


आता प्रिती ने निर्णय घेतला कायमचे वेगळे होण्याचा. लग्नाला आता बारा वर्षे होणार होते. पार्थ मोठा झाला होता, त्याला सगळं कळत होतं. वडील असे वागत असेल, व्यसनांच्या आहारी जाऊन सतत नशेत राहत असेल तर मुलाने तरी त्यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा असा विचार करून प्रिती ने परत एकदा घटस्फोटाची मागणी केली. लवकरच प्रक्रिया सुरू झाली.


आता कुणालने चांगुलपणाचा आव आणून माफी मागितली तरी त्याला संधी देण्याची इच्छा प्रितीला नव्हती. बारा वर्षे तडजोड करत, पार्थ चा विचार करत तिने बरंच काही सहन केलं पण आता मात्र यातून बाहेर पडणे योग्य असं तिचं ठरलं. 


प्रिती आणि कुणालचा बारा वर्षांचा संसार आज शेवटी संपला. कायद्यानुसार आज दोघेही घटस्फोट घेऊन वेगळे झाले. प्रिती तिच्या मुलासोबत ऑफिसच्या कॉर्टरवर शिफ्ट झाली. ज्या घरासाठी कर्ज घेतले त्या घराला घरपण कधी आलंच नाही, त्यात आनंदाने कधी वावरता आलं नाही. तिने घर विकून कर्ज संपविले आणि ऑफिसच्या कॉर्टर मध्ये आपल्या मुला सोबत राहू लागली. आता पार्थ तिच्यासाठी सगळं काही होता. नोकरी होती म्हणून इतकी हिंमत करता आली, एकटीने पार्थ ची जबाबदारी उचलायला ती तत्पर झाली. 


कुणी प्रितीची परिस्थिती समजून घेतली तर कधी कुणी तिला दोष देत परिस्थितीसाठी जबाबदार ठरवत अनेक आरोप केले. पण ती जो मनस्ताप बारा वर्षे सहन करत होती, वडील घरात असूनही वडिलांचे प्रेम न मिळालेल्या पार्थ ला आई बाबा दोघांचंही प्रेम देत हा संसाराचा गाडा एकटी ओढत होती, या सगळ्यात तिला किती त्रास झाला हे तिचं तिलाच माहीत होते.


व्यसन कधी व्यसनी मित्रांच्या सहवासात राहून लागते तर कधी इतर कुठल्या कारणाने पण यामुळे अख्खं आयुष्य उध्वस्त होते. कधी या सगळ्याची चुकून जाणिव झालीच तरी पश्चात्ताप करण्याशिवाय मग हाती काहीच उरत नाही.


व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला ना पोटच्या मुलाचा लळा राहत ना नात्यांची जाणिव, प्रेम तर दूरची गोष्ट आणि याचा जिवंत अनुभव प्रितीला आलेला. 


बारा वर्षांपूर्वी शिक्षण घेतानाच संसाराच्या जबाबदारीत अडकलेली प्रिती, या संसारात अनेक चढ-उतार झेलत आपलं शिक्षण, स्वप्न पूर्ण करत राहीली. तिच्या जिद्दीने, हुशारीने नोकरीत तिला बढती मिळाली. रिसर्च सेंटर मध्ये तिने मेहनतीने आपलं एक स्थान निर्माण केलं. 


या बारा वर्षात तिला सुखाचे मोजकेच क्षण जगता आले पण ती हरली नाही. परिस्थितीशी संघर्ष करत आत्मविश्वासाने सगळ्या गोष्टींचा सामना केला. 


पार्थच्या नावापुढे तिने आता अभिमानाने स्वतः चे नाव लावले आणि त्याला सांगितले, "पार्थ, आता मीच तुझी आई आणि मीच तुझा बाबा."


अशी ही प्रितीची संघर्षमय जीवनाची कथा, तिच्या मोडलेल्या संसाराची व्यथा ज्याला कारणीभूत आहे व्यसन. प्रितीच्या या संघर्षाला सलाम. अशा परिस्थितीत बारा वर्षे काढणे काही सोपे नाही. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy