Anita Shinde

Drama

3  

Anita Shinde

Drama

सुंदर

सुंदर

3 mins
432


सुंदर हा सोलापूर जिल्ह्यातील दिंडेगावचा 'गावगडी' व 'गावकाम्या' म्हणून प्रसिद्ध होता. पन्नास- पंचावन्न वर्षाचा गडी कोणाच्याही शिळ्या-पाक्यावर जगायचा. कोणी छेड काढायचा, धोतरच ओढायचा. तर कोणी शिवीही हासडायचा. कौशल्याला हे बघून गावात राह्यला नको नको व्हायचं. पण बहिणीची वेडी माया कायम आडवी यायची. संभाला मेव्हण्याचं असलं वागणं पटायचं नाही. मेव्हण्यामुळे त्याचा गावात कोणीही आब राखायचा नाही. तो रोज कौशल्याला 'सुंदरकांड' वाचून दाखवायचा. गाव सोडून जाण्याच्या विणवन्या करायचा. बिचारीऽ डोळ्याला पदर लाऊन बसायची. इकडे सुंदर नशेत तर्रડડ असायचा. कुठेही पडायचा. तिथेच झोपायचा. गेली तीस- पस्तीस वर्ष असाच दिनक्रम होता. नशेतच दिवस उगवायचा आणि मावळायचाही.


एक दिवस राखी पौर्णिमेला सुंदर उजाडायलाच दत्त म्हणून वाड्यासमोर उभा राहिला. नेहमीच्याच फाटलेल्या अवस्थेत! संभाने पाहता क्षणी हकलवून लावलं. सुंदर लांब जाऊन उभा राहिला. कौशल्या सुंदरला पाहताच राखी घेऊन धावत आली. खूप रडली, सुंदरही रडत होता. मोठ्या प्रेमाने आज कित्येक वर्षाने तिने सुंदरच्या मनगटावर राखी बांधली. पेढ्याचा घास एकमेकांना भरवला. पेढ्याची चव सुंदरच्या जीभेवर कितीतरी वेळ रेंगाळली. कौशल्याने त्याला ओटीवरच उभं राहून आंघोळ करायला लावली. संभाचंच धोतर अन् कुर्ता घालायला दिला. इथून पुढे कधीच 'दारू पिणार नाही' असं वचनही त्या वेड्या बहिणीने सुंदरकडून घेतलं. दिवस छान आनंदात मावळला.


आज कौशल्याने सर्व जेवण सुंदरच्या आवडीचं बनवलं. पान वाढायला घेणार इतक्यात श्याम्यानं सुंदरला हळूच हाक मारली. कौशल्या नको नको म्हणत असताना सुंदर गेलाही. आणि काही तासाने झिंगूनच परतला. त्याच्या मागे मुलांचं टोळकं होतं. मुलं त्याला व तो मुलांना वाकूल्या दाखवत होते. कोणी तरी त्याचं धोतर ओढलं तसा तो मुलांच्या मागे दगड घेऊन धावला. अंधार आणि कल्लोळ वाढत होता. तशातच एका नटखट मुलाने अंधाराचा फायदा घेत त्याच्या अंगावर विंचू सोडला.


सुंदर किंचाळला वाकडा तिकडा पळत सुटला. शिव्यांची लाखोली वाहू लागला. कसाही नाचू लागला. मुलं टाळ्या पिटत जोर जोरात नाचू ओरडू लागली. विंचवाचा दंश झाल्याने सुंदर झपाटल्यासारखा करू लागला. अंगावरचा एक एक कपडा उतरवून फेकू लागला. तसतशी मुलं जोरजोरात गलका करू लागली. राखी पौर्णिमेची ही ओवाळणी कौशल्या खचून एकसारख्या गळणाऱ्या डोळ्यांनी गच्चीवरून पाहात होती. तर शरमेने संभाची मान खाली खाली जात होती. अख्खं गाव हा तमाशा पाहात होतं. पण कोणीही मुलांना पळवत नव्हतं की त्याला सावरत नव्हतं. जो तो हसत होता. तरीही सुंदरचा थयथयाट काही थांबत नव्हता. कशी बशी रात्र टळली.


उजाडण्याआधीच कौशल्या व संभाने गावची वेस कायमची ओलांडली, आणि सुंदर खरोखर पोरका झाला. त्याच्यासाठी झीजणारं आता कोणीच गावात उरलं नव्हतं. दिवस, महिने, वर्ष सरले. सुंदरने साठी ओलांडली परंतू त्याच्या वागण्यात, जगण्यात काहीच फरक पडला नाही. त्याच्या नशेत तीळमात्र बदल झाला नाही. रोगांचा अतिरेक मात्र बळावला. सर्वांगावर पुरळ उठले. माशा घोंघाऊ लागल्या. पडल्या जागी पडूनच रहायचा. खाणंपिणं नाही की बोलणं नाही. कोणीही लाथाडून जायचा, जाताना वास आला की आईचा किंवा बहिणीचा उद्धार व्हायचा. एखाद्याला दया आलीच तर भाकर तुकडा मिळायचा. पण तोही धड गिळता यायचा नाही.


ऐन थंडीच्या एका रात्री श्याम्याने त्याला पहिल्या धारेची भरपूर पाजली, अन् निघून गेला. इकडे सुंदरला हलताही येईना. तसाच तर्रડડડડડ नशेत, झिंगलेल्या अवस्थेत पाय लांब करून बसून राहीला. मानच तेवढी हलत होती, आणि सारखी लाळ गळत होती. एक उग्र वास त्याच्या भोवताली पसरला होता. अंगावर पांघरून नाही, डोक्यावर छप्पर नाही. तसाच उघड्यावर गार वारा अंगावर झेलत कुडकुडत पडून राहिला..... सूर्य डोक्यावर आला तरी सुंदर उठला नाही म्हणून मुलं ओरडतच त्याच्याकडे धावली. त्याचा कान ओढताच तो कोसळला......... अन् मात्र "सुंदर मेला सुंदर मेला" मुलांनी एकच गलका केला!!


Rate this content
Log in

More marathi story from Anita Shinde

Similar marathi story from Drama