वंचित!
वंचित!


दोन वर्षाच्या सुरजला केरबा सुताराच्या ओंजळीत टाकून कांता कायमची देवा घरी निघून गेली. दोघे बाप लेकं आणि कंब्रेत वाकलेली त्याची म्हातारी आई असे तीघेच त्या घरात उरले. म्हातारी आई तस दोघांच चांगल बघायची. पण तरीही केरबाने दुसर लग्न कराव म्हणून तीने केरबाची पाठच धरली. पण सुरजला सावत्र आई नको म्हणून तो नकार द्यायचा. शेजाऱ्या पाजाऱ्यांनीही समजावून बघितल पण गडी काही बधला नाही. आताशा तीन महिणे झाले होते कांताला जाऊन. आईची आठवण आली की सुरज भोकांड पसरायचा. त्याला शांत करताना दोघांचीही तारांबळ उडायची, पण तो काही ऐकायचा नाही. मग चार दिवस कुठे मामाकडे न्हे, कुठे मावशीकडेच सोडून ये अशा चकरा सुरू व्हायच्या. केरबा पेशाने सुतार होता. त्यामुळे मिळेल तस आणि कुठेही लांबच्या गावी तो कामानिमित्त जायचा. कधी कधी रात्री उशीरा घरी यायचा तर हे दोघे आजी- नातू त्याची वाट बघत बसलेले असायचे. मध्येच कधी म्हातारी आजारी पडली तर केरबाला काम थांबवाव लागायच. मग घरी राहून दोघांच कराव लागायच. बिचाऱ्याची दम छाक व्हायची. हे सर्व हानम्या बघत होता. मग त्यानेच पुढाकार घेतला आणि अस एक स्थळ सुचवल ज्याचा कोणालाच त्रास होनार नाही. म्हातारीलाही ते स्थळ आवडल. कारण तीला घर काम करणारी आणि घर सांभाळणारी सून हवी होती. तर केरबाला मुकाट्याने त्याच्या मुलाची व्यवस्थित काळजी घेणारी 'आई' आणि त्याच्या सोईसाठी 'बायको' हवी होती. पुन्हा एकदा केरबा बोहल्यावर चढायला सज्ज झाला. लागलीच हानम्या बरोबर जाऊन त्याने स्थळ बघितल आणि सुपारी फोडूनच गावी परतला.
पंधरा दिवसांनी तो लग्न करून त्याच्या नव्या बायकोला म्हणजेच नंदाला त्याच्या उजाडलेल्या घरी घेऊन आला. म्हातारीने भाकर तूकडा ओवाळून दूर भिरकावला. नंदाने आत पाय टाकताच केरबाच घर पुन्हा एकदा उजळून निघालं. सुरजने त्याच्या नव्या आईला हाक मारली एकदा, दोनदा, तीनदा पण......... तीने साद घातली नाही. मग केरबानेच मध्यस्थि करून नंदाच लक्ष सुरजकडे वळवल. तीनही त्या बछड्याला प्रेमाने जवळ घेतल. खूप लाड केले बोलली मात्र काहीच नाही. कारण दुर्दैवाने जन्मताच नंदा 'मुकी' आणि 'भैरी' होती. तीच्या या व्यंगामुळेच सुंदर असूनही पंचवीशी उलटून गेली तरी कोणीही तीच्याशी लग्न करेना. गरीबीत वाढलेली, गरीब स्वभाची नंदा पडेल ते काम करणारी. त्यात आणि शिक्षणाचा अभाव! मग आई वडीलांनीही मागचा पुढचा विचार न करता एका 'बिज्वराशी' तीच लग्न लावून दिल. तीच्या नशिबी हेच लिहीलय अस खूणेनेच तीच्या आईने तीला ठासून सांगीतल. तीनेही ते मुकाट्याने सहज मान्य केल.
केरबाचा संसार ती मुक्यानेच बहरत होती. सासू वैतागायची कारण दोघींनाही एकमेकींची भाषाच कळायची नाही. सुरज तर खूप वेळा कपाळावर हात मारून घ्यायचा. आणी फीदी फीदी हसायचा. तरीही नंदा खाली मान घालून मुकाट्याने सगळ काम करायची. कधी केरबा कडे कसलीच तक्रार तीने केली नाही कींवा कधि कुठला हट्टही तीने केला नाही. म्हातारीचे पाय चेपून द्यायची, सुरजच संगोपण व्यवस्थित करायची आणि केरबाचा थकवाही घालवायची. तो ही जमेल तस तीला खुश ठेवायचा. संसाराचा वेल गरीबीतच का होईना बहरत चाललेला. चौघेही एकमेकांच्या सहवासात आनंदाने नांदत होते. सुरज चार वर्षाचा झाला आणी इथे नंदाची पाळी चूकली. मनोमन नंदा सुखावली पण क्षणभरच! केरबा तीला घाईघाईतच दवाखान्यात घेऊन गेला. डॉक्टरने ती गरोदर असल्याच निदान करताच नंदा लाजली मात्र केरबाने नंदा सारखी आजारी पडत असल्याच कारण सांगून इतक्यात मुल नको अस डॉक्टरांना कळवल. तीला त्रास होईल, अजून लग्नाला वर्षही झाल नाही, घरात म्हातारी आई सतत आजारी असते तीचही नंदालाच कराव लागत. अशा अनेक सबबी पुढे करून केरबाने तो नुकताच येऊ घातलेला 'गर्भ' पाडायला लावला. एकतर मुकी आणि त्यातही भैरी तीला हे संभाषण समजलच नाही. परंतू काहीतरी भयंकर आपल्याबरोबर घडणार आहे अशी चाहूल तीला लागली. आणी घडलही तसच. नंदा ढासळली. तीच्या मनाचे आणि तनाचे हाल हाल झाले. आई होण्याच स्वप्न कापरा सारख उडून गेल. रात्री उशीरा दोघे घरी पोहोचले. नंदा न जेवता तशीच पोटात पाय घेऊन, हमसून हमसून रडून कधी झोपली हे तीच तीलाही कळलं नाही.
सकाळी ऊशीरा तीला जाग आली तेव्हा केरबा तीच्यासाठी चहा घेऊन आला. चहा देत तीला खुणेनेच कोणाला काहीच कळू देऊ नकोस म्हणाला आणि कामानिमित्त बाहेर निघून गेला. केरबा तीच्याशी अस का वागला हेच नंदाला कळत नव्हत. रस्त्यातही काहीच बोलला नाही. खूप प्रेम करत होता तीच्यावर पण अस का वागत होता हेच तीला उमजत नव्हत. असह्य वेदना तीला होत होत्या पण सांगणार कोणाला. तशीच कामाला लागली. तीन महिणे तरी डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगीतली होती म्हणून केरबा तीच्यापासून लांबच झोपत होता. पुर्वीसारखच सगळ सुरळीत झाल. नंदा सगळ्या यातना विसरून सुरजची देखभाल करू लागली. बघता बघता तीन महिने संपले. केरबाने तीला अलगद जवळ घेतल तीही तीतक्याच प्रेमाने त्याच्या मीठीत शिरली अगदी सगळ विसरून. दुसऱ्या दिवशी केरबाने तीला एक गोळी दिली जी तीने मुकाट्याने घेतली. त्याने तीला त्या गोळ्यांचे डोस व्यवस्थित खुणेनेच समजाऊन सांगीतले. तीनेही त्याच्यावर विश्वास ठेऊन त्या गोळ्या घ्यायला सुरूवात केली. मग हा क्रम वर्षानूवर्ष चालू राहीला. त्यात कधिच खंड पडला नाही. सुरज आताशा दहा वर्षाचा झाला. नंदा मात्र व्रत वैकल्य करतच राहीली परंतु तीची पाळी कधिच चूकली नाही. दोघांचेही केस पिकू लागले. सुरज सोळा वर्षाचा कॉलेज कुमार झाला. त्याच्या वाढत्या वयाबरोबर त्याचा हट्ट, त्याच्या मागण्या आणि त्याचा रागही वाढत गेला. सगळ काही वेळेवर आणि जागेवर त्याला हव असायच पण त्या मुक्या भैऱ्या आईला काही केल्या जमायच नाही. कारण म्हातारी जास्त वेळ अंतरूनावरच पडून रहायची तीच सगळ जागेवरच कराव लागायच नंदाला. मात्र वैतागलेला सुरज तीला 'ए मुके', 'ए भैरे' अशाच हाका मारायचा. तीचा खूप राग राग करायचा. तीच्या जेवनालाही नावं ठेवायचा. नंदा बिचारी चूलीपुढे आसवं गाळत बसायची. पोटी मुल होत नाही म्हणून स्व:ताला अभागी समजायची. गोळ्या खाणं मात्र चालूच होत.
यंदा पाऊस व्यवस्थित पडला नाही म्हणून गावात पाणी कपात चालू झाली होती. नंदा आणि काही शेजारण्या लांब विहिरीवरून पाणी आणायच्या. एक दिवस शेजारची रेखा तीच्या आठ महिण्याच्या बाळाला घेऊनच विहिरीवर पाणी भरायला आली. नंदाने त्या गुलामाचे खूप लाड केले व परत त्याला त्याच्या आईजवळ दिलं. ते मुलही खूप खेळकर होत, कुठे केस ओढ, पदरच ओढ अस त्याच चाललेल. रेखाचा बटवा दिसताच त्याने हिसक्याने तो बटवाच तीच्या चोळीतून ओढून काढला आणि खाली पाडला. काही पैसे आणि गोळ्याची पाकीट बटव्यातून बाहेर पडली. नंदानेच सगळ उचलून बटव्यात घातल आणि रेखाकडे देत त्या गोळ्यांच पाकीट नीट तपासत रेखाला खुणावल. कारण तीही ह्याच गोळ्या केरबाच्या सल्ल्याने घेत होती. रेखा मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच डोस पूर्ण करत होती. नंदाने रेखाला सविस्तर माहिती खुणेनेच विचारली. अन् तीच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण अशा गोळ्या खाल्याने गर्भ रहात नाही हे आज नव्यानेच नंदाला रेखाकडून कळाल. खूप मोठा विश्वासघात केला होता केरबाने तीचा. ज्या गोष्टीसाठी ती स्व:ताला कम नशिबी समजत होती त्याच गोष्टीपासून केरबाने तीला लांब ठेवल होत. आई होण्यापासून वंचित ठेवल होतं त्यानं तीला. पण का????? हाच प्रश्न विचारायला ती रिकामी घागर घेऊन तशीच माघारी रडत पळत सुटली. स्वयपाक घरातल्या फळिवर ठेवलेल्या पितळी डब्यातून ते गोळ्यांच पाकीट काढून ती बाहेर अंगणात लाकूड तासण्यात गुंग असणाऱ्या केरबाच्या नाकासमोर धरत मुक्यानेच त्याला जाब विचारला. तीच्या वैतागलेल्या मुक्या हाव, भावाला बघून तो गोंधळला. पण क्षणभरच! स्वत:ला सावरत तीच्या दंडाला पकडून जवळजवळ ओढतच तीला आत नेत तीच्यावर खेकसला. तीच्या शब्दात तीला समजेल अशा भाषेतच त्याने तीला सांगीतलं की, त्याला तीच्या पोटची 'मुकी भैरी' मुलं नको होती. त्याला असच वाटत होत की नंदाने मुल मुकी भैरी जन्माला घातली तर निभावन मुश्कील होईल. दुसर म्हणजे अतिशय महत्वाच सुरजवरच लक्ष तीच कमी झाल असत. त्याला सावत्र पणाची वागणूक मिळाली असती. नाहक सावत्र भावां-भहिणींचा त्रास त्याला सहण करावा लागला असता. जे केरबाला कधीच नको होत. तीसरं घरची गरीब परिस्थिती, जीथे चौघांचच अवघड होत तीथे आणखीन एक पोट नको होत केरबाला. एकेक शब्द फाटक्या कानांनी ऐकत होती नंदा. ह्या सर्व कारणांमुळेच गेली तेरा चौदा वर्ष केरबाने नंदाला आई होण्यापासून वंचित ठेवल होत व ठेवणार होता. इतकच नव्हे तर, जर तीने त्या गोळ्या खाणं बंद केल तर तीला कायमच माहेरी पाठवल जाईल जे तीला कधिच परवडणार नव्हतं. म्हणून ह्या घरात रहायच असेल तर केरबा सांगेल तस तीला मुकाट्याने मान्य करावच लागेल. असा करारच त्याने तीच्या कडून करून घेतला आणि आपल्या कामाला निघून गेला.
त्याच्या लेखी नंदाच्या भावना शुन्य होत्या. म्हणजेच तीच शोषणही होणार होत आणि तीला आईही होऊ द्यायच नाही असचं धोरण आजपर्यंत तीच्या विचाराने अधु असलेल्या नवऱ्याने अवलंबल होतं. किळस आली स्वत:च्या जगण्याची नंदाला आणि व्यंगांचा रागही आला. चूलीपुढे बसून ऊर बडवून ती जोर जोरात रडत होती. मात्र तीचा आवाज कोणालाच ऐकू जात नव्हता. अविचाराच व्यंग तीच्या नवऱ्याच्या डोक्यात भिनल होतं. तीला मात्र रोज त्याला सामोर जाव लागत होत कारण तीच्या व्यंगाने तीला हतबल केल होत. गोळ्या घेण मात्र चालूच होत.