स्त्री साखळी
स्त्री साखळी


मी कधीच म्हणत नाही माझं कौतुक करा. मला इतरांचं कौतुक करण्यासाठी सहभागी तरी होऊ द्या. का नेहमी विचार असतो मला संपवण्याचा? मलाही तुमच्यासारखे जगू द्या. दुर्दैव माझं एकविसाव्या शतकातही सांगावे लागते मला जगू द्या. नको कोणाचे उपकार, मला स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहु द्या.
एखादी स्त्री शिखराच्या उंच टोकावर पोहोचते. जिथे विचारांचे स्वातंत्र्य असते तिथे नक्कीच स्त्रीला स्वातंत्र्य आहे. त्यातून ती वेगवेगळ्या रुपात बहरते, खुलते, स्वतःचे अस्तित्व निर्माण करते. आपल्या जवळच्या माणसांचा सपोर्ट नक्कीच बळ देतो. घरच्यांची, जोडीदाराची साथदेखील तितकीच महत्वाची असते. त्यातून तिला मिळणारा आनंद ती द्विगुणित करून इतरांना देते.
इच्छा असूनही अनेक स्त्रियांना यशाच्या शिखरावर पोहोचता येत नाही किंवा त्यांचा मार्ग बदलला जातो. प्राथमिकता बदलते आणि ध्येय तिथेच राहून जाते. अर्ध्या वाटेतच तिचा प्रवास संपून जातो
त्याला जबाबदार कोण? समाज...
माणसांनीच बनला आहे ना समाज!
जमाना बदलतोय तर मानसिकताही बदलायला हवी ना! याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केली पाहिजे.
विचारांवर कोणाचेही बंधन नसते. पण चांगले विचार आत्मसात करण्याची मानसिकता अवलंबण्यास मात्र वेळ लागतो. स्त्रीसाठी तर फारच वेळ लागतोय. स्त्रीच्या बाबतीत काही ठिकाणी नक्कीच स्वातंत्र्य आहे, समानता आहे म्हणूनच अनेक स्त्रिया समाजात प्रेरणादायी, आदर्श आहेत.
स्त्रीला मागे खेचण्यासाठी जितका पुरुष जबाबदार आहे तितकीच स्त्रीसुद्धा. ज्या दिवशी एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला पूर्णपणे समजून पुढे जाण्यासाठी उमेद दाखवेल, बळ देईल, त्या विचारांतून समाजात नक्कीच बदल घडेल.
फक्त पुरुषांनाच नावे ठेवायची! त्याची मजल वाढण्यास किंवा त्याला हवे ते करून देण्याचे स्वातंत्र्य कुठेतरी एका स्त्रीनेच दिले ना त्याला? 'आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कारटं!' स्त्रीने ठरवले तर ती जग बदलू शकते म्हणतो ना आपण मग त्याचे सुरुवात इथूनच का होऊ नये?
स्त्रीने जर ठरवले तर समाज नक्की बदलू शकतो. मग एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला साथ देण्यासाठी का मागे पडते? स्त्रीला शक्ती मानले जाते मग ही शक्ती अखंड स्त्री वर्गासाठी वरदान ठरली तर स्त्रीचे जगणे सोपे होईल नाही का? बिचारी, कमकुवत, नाजूक, दुर्दैवी या साऱ्या शब्दांतून तिची सुटका होईल.
चला आपण सगळ्या मिळून स्वतःला तसेच प्रत्येक दुसऱ्या स्त्रीला मदत करू, योग्य मार्ग दाखवू, सपोर्ट करू आणि ही साखळी अविरत चालू ठेवू.