लोक काय म्हणतील ?
लोक काय म्हणतील ?


मालती आणि रजत यांचा संसार सुखाचा चालला होता. परिस्तिथी गरीब असली तरी दोघेही आपल्या संसारात सुखी होते. दोघांच्या घरची परिस्थिती गरिबीचीच त्यामुळे जुळवून घेताना दोघांनाही कसलाच त्रास झाला नाही. आपल्याकडे आहे त्यात समाधान मानून ते निवांत होते. पुढे त्यांना दोन मुले झाली. विनय आणि विकास हळूहळू खर्च वाढू लागला, जे आहे त्यात आता भागत नव्हत, शिवाय रजत चा पगार फारसा नव्हता, त्याला घरी आई वडिलांना सुद्धा पैसे द्यावे लागत होते.
कितीही काटकसर केली तरी महिना अखेरपर्यंत पैसे काही शिल्लक राहत नव्हते.
मुलांना पैसे अभावी दुकानातून काही आणायला सांगितलं तर तयार होत नाहीत.. कारण दुकानदारांची बोलणी खावी लागतात. पैसे असतीलच तर आहे तेवढ्याच घेऊन ये म्हंट्ल तरी लाज वाटते. आता परवाचीच गोष्ट, विनयला १५ रुपये दिले आणि म्हटल यापैशाची येते तेवढी डाळ घेऊन ये, तो गेलाही, पण तिकडे शेजारच्या काकू दिसल्या आणि त्यांनी डाळ घेताना विनयला पाहिलं आणि त्याची चेष्टा केली, काय रे एवढी डाळ पुरणार का रे तुम्हाला?, आणि काय रे सारख्या दुकानाच्या फेऱ्या मारत असतोस एकदाच सामान घ्यायला पैसे नाहीत का तुमच्याकडे?? विनय ला राग आला पण तो काहीच न बोलता तसाच घरी आला आणि म्हणाला मी पुन्हा दुकानात काही घ्यायला जाणार नाही तू विकासला पाठव. त्याचा फुगलेला चेहरा पाहून त्याला जवळ घेऊन विचारलं तेव्हा त्याने सांगितलं.
मी त्याला समजावण्याचा प्रयत्नदेखील केला, "लोक काय म्हणतात त्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही". पण त्याच्या मनाला लागल होत.
शेवटी मालती ने बाहेर जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला. तिला फारस काही जमत नसल्यामुळे तिने घरकाम करायचं ठरवलं. रजतची परवानगी मागितली पण त्याने नकार दिला. आपण करू काहीतरी पण तू बाहेर नाही पडायचं. अस त्याने स्पष्ट सांगितलं. मालती सुद्धा खूप हट्टी होती. तिने पूर्ण प्रयत्न केला रजातला समजावण्याचा. तुमच्या पगारातून खर्च भागत नाही आणि दिवसेंदिवस मुले मोठी होतील तसें खर्च वाढतच जाणार ,त्यांच्या भविष्याचा विचार नको का करायला??, मुलाचं शिक्षण तर सोडाच पण इतर गरजा सुद्धा नाही भागत.
मी जर थोडाफार हातभार लावू शकले घर खर्चाला तर ते आपल्या मुलांसाठी चांगल असेल. आपण आपल्या परिस्थिती मुळे नाही शिकू शकलो पण आपल्या मुलांचं शिक्षण कोणत्याही परिस्थितीत मला अजिबात थांबवायचं नाहीये.
रजत म्हणाला,पण तू लोकांच्या घरी जाऊन अस काम करणार मला नाही बरोबर वाटत. मालती ने रजतला समजावलं शेवटी तो तयार झाला.
मालती घरातलं काम आवरून रोज बाहेर पडायची घरोघरी फिरायची पण कुठेच काम मिळत नव्हत. असच फिरत फिरत एके दिवशी काम विचारण्यासाठी एका घरी गेली तेव्हा तिकडे कामवाली बाई ची गरज होती,कपडे आणि भांडी धुण्याच काम मिळालं . बरेच दिवस प्रयत्न करून तिला काम मिळालं,
मालतीला खूप बरं वाटलं,ती तीच काम व्यवस्थित करायची अगदी आपल्याच घरातलं आसल्यासारखं. मालकीणबाईला मालती च काम खूप आवडलं,ती खुश होती. ती इतरांच्यासमोर देखील मालतीच कौतुक करायची. तिच्या चांगल्या कामाच्या पद्धतीमुळे तिला आणखी काम मिळत गेली. आता तर तिचा दिवस कसा जायचा तीच तिलाच कळत नव्हत.
तिच्या बाहेर च्या वाढत्या कामामुळे घरातल्या कामांना फारसा हात लागत नव्हता. विनय आणि विकास अतिशय समजूतदार होती. ती नेहमी घरकामात आई ला मदत करायची. दोघांनी काम अगदी वाटून घेतली होती. मुलांच्या या गोष्टीचं मालतिला कौतुक वाटायचं आणि त्यामुळेच तिला काम करण्यासाठी आणखी उमेद मिळायची.
माझ्या मुलांना मला खूप मोठं झालेलं मला पहायचं आहे हे तीच स्वप्न होत ती नेहमी म्हणायची मी विनयला इंजिनिअर आणि विकास ला वकील बनवणार.
झेप खूप मोठी वाटत असली तरी एका आईने आपल्या मुलांसाठी पाहिलेलं गोड स्वप्न होत ते.
कामवाली बाई म्हंटल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर वेगळेच हावभाव येतात कारण लोकांना ते काम उच्च दर्जाचं नाही वाटत .
बऱ्याच वेळा मालतीला या गोष्टीचा सामना करावा लागत असे. लोकांच्या नजरेत कामवाली च काम करणे म्हणजे गावंडळ असेल, कशा काय या बायका लोकांच्या घरी जाऊन काम करतात?, काही बायका तर म्हणायच्या आम्हाला खायला एक वेळ नसल तरी चालेल पण आम्ही लोकांच्या घरी धुणी भांडीच काम नाही करणार कधीच.
अशी अनेक टोमणे मालती च्या कानावर सतत पडायचे,पण तिने ठरवल होत लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नाही द्यायचं कारण तिला तिच्या मुलांना खूप शिक्षण द्यायचं होत, मोठं झालेलं पहायचं होत.
विकास सुट्टी असली की आई बरोबर जायचा, आई ला थोडीफार मदत सुद्धा करायचा. पण त्याला आपली आई अस काम करते पाहून बरोबर नव्हत वाटत.
एकेदिवशी घरी जाताना तो आईला म्हणाला, आई तू अस लोकांची धुणी भांडी नको करत जाऊस मला कस तरी वाटत ते, मालती त्याला समजावत होती अरे बाळा त्याच्यामुळेच तर आपल्याला च
ार पैसे मिळतात. पण विकास काही ऐकायला तयार होईना. तू दुसर काही काम नाही का करू शकत? तुला नाही का कसतरी वाटत लोकांची धुणी भांडी करायला?
हे बघ बाळ कोणतंही काम छोट किंवा मोठं नसत, प्रामाणिकपणे मेहनतीने आपण काम करतो त्याची लाज का वाटावी? तुला कोणी काही बोललं का? विकास ने नाही म्हणून मान हलवली आणि म्हणाला मी खूप शिकून मोठा झालो ना... वकील झालो ना... मग तू हे काम नाही करायचं..
मालती हसत हसत म्हणाली ठिक आहे बघू . आता चल घरी. तिने रजत घरी आल्यावर त्याला सुद्धा सांगितलं, त्याला सुद्धा हसू आले. थोडावेळ थांबून तो म्हणाला, आपल्या मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी खूप मोठा पल्ला गाठायचा आहे , मी सुद्धा पूर्ण प्रयत्न करतोय त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी पैसे साठवण्याचा. होईल ना ग आपल्याला? मालती म्हणाली नक्की होईल त्यासाठीच तर आपण ही तारे वरची कसरत करतोय. आपण आपल ध्येय नक्की गाठू.
विनय सुद्धा हे सारं काही ऐकत होता. त्याला जाणीव होती आपले आई वडील आपल्यासाठी जे काही करत आहेत त्याच चीज झालं पाहिजे. आपण देखील मन लावून आभयास केला पाहिजे.
यांना प्रोत्साहन देण्याऐवजी काही नातेवाईक,शेजारी पाजारी मालती च स्वप्न काही खर होणार नाही हे ठरवून बसले होते. काही म्हणत होती अशी छोटी छोटी काम करून काही होणार नाही. काहीजण टपून बसली होती बघुया याचं कसं काय होत??...
मालती आणि रजत मात्र या सगळ्यांकडे दुर्लक्ष करायचे. त्याचं ध्येय त्यांनी मनाशी पक्क केल होत. लोकांना न जुमानता सकारात्मक दृष्टीने आपली वाटचाल चालू ठेवली.
पुढे विनय च शिक्षण पूर्ण झालं, तो एका चांगल्या कंपनी मधे नोकरीला लागला. विकास च शिक्षण अजुन चालू होत. विनय च्या नोकरीमुळे घरी आई वडिलांना हातभार लागला. आर्थिक परिस्तिथी पूर्वीपेक्षा आता चांगली होती. ते दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाले.
मालतीने मात्र अजून काम बंद केलं नव्हत,ती अजुनही धुणी भांडी च काम करत होती. एकेदिवशी विनय चे ऑफिस मधे काम करणारे मित्र घरी आले होते, मालती ने त्यांना चहा पाणी केले विनय ने आई वडिलांची ओळख सुद्धा करून दिली. तेवढ्यात मालतीच घड्याळाकडे लक्ष गेलं आणि ती त्यांचा निरोप घेऊन निघाली, त्या मित्रांपैकी एकाने विचारल काकू तुम्ही कामाला जाता का? काय काम करता तुम्ही? विनय ला थोडी लाज वाटली त्याने विषय टाळण्याचा प्रयत्न केला पण मालती म्हणाली होय मी धुणी भांडी च काम करते.
ऐकल्यावर त्यातल्या काही जणांचे चेहऱ्याचे हावभाव बदलले. विनयचा चेहरा पडला. थोडा वेळ घरात शांतता पसरली. मालती आपल्या कामाला निघून गेली.
विनय आणि रजत ने तिला काम सोडवण्यासाठी समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती ऐकत नव्हती.
विनय म्हणाला सुद्धा आई तू नको करुस काम. आपल्याला आता शोभत नाही मी एका चांगल्या पोस्ट वर आहे ,चार लोकांमध्ये बर दिसत नाही ते. (मालती त्याकडे पाहतच होती)
"लोकं काय म्हणतील"... मुलगा एवढं कमावतो तरी आई ला लोकांच्या घरची धुणी भांडी करावी लागतात. तूच सांग कसं वाटत ?
मालती ने सगळ ऐकून घेतल आणि म्हणाली लोकं काय म्हणतील याचा आम्ही तेव्हा विचार केला असता तर आज हा दिवस नसता.....
ज्यावेळी मी काम चालू केलं त्यावेळी लोक बोलतच होती पण आम्ही त्याकडे लक्ष दिलं नाही कारण आम्हाला आमच्या मुलांचं भविष्य घडवायचं होत जे आज समोर आहे.
आज सगळ सुरळीत चालू म्हणून या कामाची लाज वाटावी का? या कामाने माझी उमेद, माझ स्वप्न साकार केले ते काम मी कधीच सोडू शकत नाही.
ज्या लोकांबद्दल तू बोलतोयस ना?? तीच लोकं या छोट्या छोट्या कामातून मोठं ध्येय कसं गाठते याकडे डोळे लाऊन बसले होते,आपली मजा पाहत होते,आपली होणारी धावपळ फजिती पाहत होते. त्यांच्यामते या सगळ्या गोष्टी अशक्य होत्या, पण आपली एकजुटी,समजूतदारपणा आणि प्रामाणिकपणे केलेले कष्ट सारे काही साकार झाले. तू विसरलास का सार काही???
ते दिवस, ती परिस्तिथी आणि त्यावेळेला मिळालेली साथ 'माझ हे काम' मी कधीच विसरू शकत नाही.
विनय शांत झाला आपण काय बोलून चुकलो हे त्याला कळाले. आपल्याला आपल्या कामाची, आपल्या परिस्तिथी ची कधीच लाज वाटता कामा नये,याची नव्याने जाणीव झाली. त्याने आई ची माफी मागितली.
विकासला सुद्धा बालपणातला तो दिवस आठवला जेव्हा आई ने त्याला याच बाबतीत बघू अस म्हंट् ल होत. त्याच आज उत्तर मिळालं( त्याला मनातल्या मनात हसू आले). तो त्यावेळी लहान होता म्हणून थोडक्यात समजावल,नाहीतर विनयची खरडपट्टी झाली तशी त्याची सुधा झाली असती.
दोघांनाही एका गोष्टीची ठाम शिकवण मिळाली ,
"लोकं काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला जे योग्य वाटत ते आणि तेच करावं". त्यातच आपल भल असत.
तुम्हाला ही कथा कशी वाटली ?
तुमचं मत नक्की कळवा.