शुभ मंगल'सावधान'
शुभ मंगल'सावधान'


ऍडमिशन्स आणि डिस्चार्जची धावपळ संपवून एका निवांत असलेल्या संध्याकाळी, एक ॲम्बुलन्स आमच्या कोविड केअर सेंटर च्या गेट जवळ येऊन थांबली.
ड्रायव्हरने मध्ये असणाऱ्या व्यक्तींची संदर्भ चिठ्ठी (refer letter) आणून दिली, ती पाहून लक्षात आलं एका करोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना विलगीकरणा (quarantine) साठी व तपासणी साठी जवळच्याच एका आरोग्य केंद्रातून संदर्भित केलेलं आहे.
अशामध्ये रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत होती तशी वेगवेगळ्या आरोग्यकेंद्रातून अशा प्रकारचे रेफरल चे प्रमाण सुद्धा वाढले होते. संदर्भित केलेल्या व्यक्तींना प्रायमरी तपासणी करून विलगीकरणात ठेवायचे आणि त्यानंतर त्यांचा लाळेचा नमुना (Swab) तपासणीसाठी पाठवायचा, तो रिपोर्ट येईपर्यंत ती व्यक्ती ऍडमिट ठेवायची, निगेटिव्ह रिपोर्ट आल्यावर डिस्चार्ज मिळत असे पण पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यावर परत पुढे दहा दिवसांकरिता औषधी देऊन विलगीकरणात ठेवले जाई. अशा पॉझिटिव रुग्णांचे आणखी काही संपर्कातील व्यक्ती पुन्हा तपासणीसाठी येथे संदर्भित केले जायचे.
मी ड्रायव्हरला सांगून ॲम्बुलन्स मधील व्यक्तींना प्रायमरी तपासणी कक्षात घेऊन यायला सांगितले. आणि नवीनच लग्न झालेलं जोडपं कोवीडच्या तपासणीसाठी आलेलं पाहून माझ्यासोबत सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.
पांढरे शुभ्र कपडे घातलेला, एक सावळा तरुण 'प्रवीण' आणि अंगावर नवी कोरी साडी, हातावर गडद रंगलेली मेहंदी,त्यावर हातभर हिरव्या रंगाचा चुडा घातलेली सडपातळ मुलगी 'अंजली' समोर उभे होते. दोघांच्याही चेहऱ्यावर असणारी हळदीच्या रंगाची पिवळट छटा आणि हातात बांधलेलं विड्याच्या पानातील काकण पाहून कुणीही त्यांचं लग्न आज किंवा कालच झालंय याचा अंदाज लावू शकलं असतं.पण हळदी सोबतच ह्यांच्या चेहऱ्यावर काळजीची छटा सुद्धा स्पष्ट दिसत होती.
दोघांना विलगीकरणात का पाठवण्यात आलं याची पूर्ण माहिती घ्यायला आम्ही सुरुवात केली,
आमच्या शेजारच्या तालुक्यात असणाऱ्या एका गावातील प्रवीण हा राहणारा होता त्याचं लग्न सहा महिन्यापूर्वी या तालुक्यातील अंजली शी ठरलं होतं, लग्नाची तारीख देखील काढली होती सगळी तयारी जोरात सुरू असताना लौक डाऊन मुळे धुमधडाक्यात होणाऱ्या लग्नाचा बेत रद्द करावा लागला होता, काही दिवसांनी दोघांच्या घरच्यांनी साधेपणाने छोटेखानी विवाह सोहळा करण्याचे ठरवले. लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे काल प्रवीण त्याच्या तालुक्यातून फक्त घरची मंडळी घेऊन या विवाह करिता वधू मंडपी आला होता आणि अंजलीच्या घरच्या काही मंडळीच्या साक्षीने आज सकाळीच हळदीचा व नंतर लगेच लग्नाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला होता.
परंतु लग्नानंतर काही तासातच प्रवीण च्या गावातील एका घरातील काही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले होते, त्या व्यक्ती प्रवीणच्या व त्याच्या कुटुंबियांच्या नेहमी संपर्कात असणारे त्यांचे शेजारी होते. प्रविण चे पूर्ण गाव प्रशासनाने सील केले आणि जवळच्या व्यक्तींना लवकरात लवकर विलगीकरणात ठेवण्याचे आदेश दिले होते. प्रविण लग्नासाठी आलेल्या सासरी सुद्धा हा संदेश संबंधित प्रशासनाच्या व्यक्तींनी कळविला आणि त्यांच्या विलगीकरणाच्या हालचालींना वेग आला.गावातील लोकांनी प्रविण व त्याच्या कुटुंबियांसोबत काल पासून त्याच्या संपर्कात असणाऱ्या अंजलीच्या घरच्या व्यक्तिंनी सुध्दा तपासणीसाठी पाठविण्याचा हट्ट धरला. कोरोनाच्या ह्या संकटात कुणीही धोका पत्करण्यास तयार नव्हते. अशाप्रकारे त्या सगळ्यांना आमच्या येथे संदर्भित करण्यात आले होते.
नवरी नवरदेवा नंतर थोड्याच वेळात संपूर्ण व-हाडी मंडळींचे देखील आगमण झाले.सगळ्याची प्रायमरी तपासणी करून दाखल केले जाणार होते. एका एकाने सर्व जण आपले नाव नोंदवुन, तपासणी नंतर त्यांना दिलेल्या कक्षात दाखल होत होते. पुर्ण नाव सांगताना अंजली मात्र थोड्यावेळासाठी गोधळली.."अंजली..अं अं.........ह्यांच नाव सांगु का..?" तीने फारच निरागस पणे विचारलं. "आता नेहमीसाठी याच्या पुढे त्यांच च नाव सांगायचं." असं म्हणून आमच्या सिस्टर ने तिचा प्रश्न सरळ खोडून काढला. कुठल्याही नव्या नवरीने पहिल्यांदाच आपल्या नवऱ्याचं उखाण्यात नाव घ्यावा तो प्रसंग आणि अशाप्रकारे तिच्या नावासोबत पहिल्यांदाच जोडलं जाणार तिच्या नवऱ्याचं नाव ह्या दोन्ही प्रसंगातील विरोधाभास तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होता. थोड्याच वेळात सगळ्या औपचारिकता पूर्ण झाल्या.
आमच्या quarantine सेंटरला लग्न घराच रूप आलं होतं थोड्यावेळा करिता का होइना येथील वातावरणातील गंभीरता मावळल्यासारखं वाटली. वधु वर आणि दोघांच्या परिवारातील मंडळी काही तासांकरिता का होईना पहिल्यांदाच कुठल्याही औपचारिकते शिवाय, मानपान आणि सोपस्कारा शिवाय एकत्र राहणार होती.
सगळी पुरूष मंडळी फोन वरून परिस्थिती ची गंभीरता समजून घेण्याचा प्रयत्न करत होती तर महिला मंडळी आमच्या कर्मचा-यांना आता पुढे कसं होणार, कधी सुट्टी होणार, विचारून कोरोनाला मनापासून शिव्या घालत होती. सगळे अचानक उद्भवलेल्या अनपेक्षित अशा घटनेने काळजीत पडले होते.आमच्या कडील पाहुण्यांची बातमी कमी वेळात गावभर पसरली होती. आणि नेमकं काय प्रकरण आहे या साठी माझा फोन वाजायला सुरुवात झाली.
दुसऱ्या दिवशी लवकर लॅब टेक्निशन नी सर्व व-हाडी मंडळींचे स्वॅब घेतले. ह्या सगळ्यांच्या बोलण्या मधुन परिस्थिती विषयी काळजी तर जाणवत होतीच पण आमच्या देखील कठीण काळात करावयाच्या duty विषयी सहानुभूती होती. कुठल्याही फाजील मागण्या न करता हे सगळे लोक खुप सहकार्य करित होते त्यामुळे आम्हाला देखील त्यांच्या विषयी जास्तीची सहानुभूती होती. लवकरच स्वॅब तपासणीसाठी पाठवल्यामुळे सायंकाळीच report येण्याची शक्यता होती.
अपेक्षेप्रमाणे चार वाजता बारा पैकी नऊ लोकांचे रिपोर्ट नकारात्मक आल्याचे कळाले, प्रवीण, त्याची आई व भाऊ यांचे रिपोर्ट मात्र in process होते, ते येण्यास किती वेळ लागेल हे काही सांगू शकत नव्हतो, तसेच त्यांच्या रिपोर्ट विषयी सांशकता असल्याने निगेटिव्ह लोकांना आम्ही डिस्चार्ज देऊ शकणार होतो. अंजलीच्या भावाने गाडी बोलावली आणि नवरी कडील मंडळी घरी रवानगी साठी सज्ज झाली. ऐन वेळेला अंजलीने मात्र, "यांच्यासोबत मी थांबते." असं म्हणून माहेरच्या मंडळींना निरोपाची तयारी दाखवली.
लग्न घडींच्या त्या काही विधींमध्ये अशी काय शक्ती असावी ज्यामुळे एखाद्या मुलीमध्ये अचानक बदल होतो आणि ती एवढी जबाबदार होऊन जाते... तिच्या नावासोबतच तिच्या मनातील हा बदल स्विकारण्याची शक्ती कदाचित या मंत्रोच्चारात, फे-यात, किंवा एकमेकांना साथ देण्याच्या वचनात असावी.
कुणालाही वाटतं आपलं लग्न आपल्यासाठी व इतरांसाठी देखील नेहमीच लक्षात राहणारा समारंभ असावा, पण ह्या दोघांना कधीच वाटलं नसेल की अशा काही घटनांनी त्यांचे लग्न अविस्मरणीय बनून जाईल. अंजली प्रविणच्या अशाच अविस्मरणीय लग्नसोहळ्याची आता आम्हीदेखील साक्षीदार होऊन गेलो होतो.
काही तासातच तिघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि त्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले.
दीड दिवसाच्या ह्या लगीन घाईत ही मंडळी खुप जवळची झाल्यासारखी वाटली. उभयतांना लग्नाच्या शुभेच्छा देऊन आम्ही पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर नवदाम्पत्याचे खरे भाव पाहत होतो.
माहेरच्या जगातुन isolate होऊन अंजली आता कायमची तिच्या सासरच्या जिवनात quarantine होण्या साठी निघाली, आणि आम्ही पहिल्यांदाच च नवरी सोबत नवरदेवाची ही अशी अनोखी 'बिदाई' अनुभवत होतो.