Shashank Purandare

Comedy Romance

2  

Shashank Purandare

Comedy Romance

शिवनेरी

शिवनेरी

5 mins
145


सायलीच्या लग्नासाठी पुण्याला लवकरात लवकर पोहोचणे आवश्यक होते. शरदचे, माझ्या धाकट्या भावाचे, फोनवर फोन येत होते. पण ऑफिसची कामंच संपत नव्हती. त्यात माझी कार देखील याच मुहूर्तावर बंद पडायची होती. शेवटी वंदना डेपोतून निघणाऱ्या एक वाजताच्या शिवनेरीचे रिझर्वेशन करुन अस्मादिक गाडी सुटण्याच्या पाच मिनिटे आधी एसटी स्टॅंडवर पोचले. मला सात नंबरची सीट मिळाली होती. माझ्या बाजूची विंडो सीट अजून रिकामीच होती.

बस सुटायला एखादे मिनिट शिल्लक असताना ती जवळजवळ धावतच बसमधे शिरली. धावत आल्यामुळे कपाळावर घर्मबिंदुंची दाटी झाली होती. काळेभोर लांबसडक केस थोडेसे अस्ताव्यस्त झाले होते आणि उन्हातून आल्यामुळे मूळचा गोरापान चेहरा लालबुंद झाला होता.आकाशी रंगाची शिफॅानची साडी,वर त्याच रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज, कपाळावर मॅचिंग टिकली, ओठावर न्यूड कलरची हलकीशी लिपस्टिक, कानात गोल्डन रिंग्ज आणि गळ्यात चोवीस इंची लायसन्स अश्या पेहरावातील त्या पंचेचाळीसच्या आसपास वय असलेल्या युवतीने बसमधे शिरल्यावर एक सर्व्हे करून आपली सीट हेरली. माझ्या बाजूला येऊन एक स्वीट स्माईल देऊन मला म्हणाली

“एक्सक्यूज मी, माझी विंडो सीट आहे. विल यू प्लीज?”

माझ्या ट्रान्स मधून मी दचकून बाहेर आलो.

“येस,शुअर!” असे म्हणून मी माझ्या सीटवरून उठलो.

ज्या कोणी शिवनेरीने प्रवास केला आहे, त्यांना कल्पना असेलच की शिवनेरीत पुढच्या आणि मागच्या सीटमध्ये अतिशय कमी जागा असते. बाहेरच्या सीटवर जर कोणी बसलेले असेल तर एखाद्या माणसाला आत जाणे अशक्य असते. शिवाय या पुशबॅक सीट्स असतात. माझ्या पुढील गृहस्थ आपली सीट जेव्हढी करता येईल तेव्हढी मागे करून गाढ झोपी गेलेला होता. एकतर मला बसमध्ये झोप येत नाही. हा माणूस बस सुरु होण्याआधीच कसाकाय गाढ झोपू शकतो हे मला कोडंच होतं. त्यामुळे मला उठून बाजूला होण्याशिवाय गत्यंतर नव्हते. शिवाय एव्हढ्या सुंदर युवतीची विनंती कुठला पुरुष नाकारू शकला असता? आपली पुलमन बॅग सीटवरच्या कॅरिअरवर कोंबून ती युवती सीटवर बसण्यासाठी आत शिरणार एव्हढ्यात आमच्या चालकाने बसला गती दिली आणि ती युवतो तोल जाऊन माझ्या अंगावरच विराजली. मी एका हाताने सीट पकडली होती, त्यामुळे मी कसाबसा आम्हा दोघांचे वजन न पडता पेलवू शकलो एव्हढेच! अश्या अलैाकिक अवस्थेत काही काळ लोटल्यावर आम्ही दोघेही भानावर आलो. हा सारा प्रकार बसमधील सहप्रवासी चवीने पहात होते आणि त्यांची आपापसात कुजबूज चालू झाली होती.

“सॉरी”, असे म्हणून तिने आपली विंडोसीट ग्रहण केली आणि मी सात नंबरवर स्थानापन्न झालो. आपल्या पर्समधून वीतभर लांबीचा रुमाल काढून आपले घर्मबिंदू पुसण्याचा एक निष्फळ प्रयत्न तिने केला. मी हात वर करून तिच्या डोक्यावरचा एसीचा व्हेंट पूर्ण ओपन करून माझे स्त्रीदाक्षिण्य दाखविले. तिने पण कृतज्ञतापूर्वक नजरेने माझ्याकडे बघून आपले आधीचे स्वीट स्माईल परत रिपीट केले. माझ्याकडची पाण्याची बाटली मी तिला ऑफर केली. परत एकदा तिने पण कृतज्ञतापूर्वक नजरेने माझ्याकडे बघून आपले आधीचे स्वीट स्माईल तिसऱ्यांदा रिपीट केले आणि एका घोटात २५० एमएलची बॉटल रिकामी केली.एकंदर माझ्या दृष्टीने प्रवासाची सुरुवात तरी चांगली झाली होती. एव्हढा सुंदर सहप्रवासी असल्यावर अजून काय हवे असते एखाद्याला! मुंबई पुणे एक्स्प्रेसवे बांधल्यामुळे प्रवासाचा वेळ जरी कमी झाला असला तरी पूर्वीचे बाहेरचे सृष्टीसौन्दर्य निरखण्याचा आनंद नक्कीच कमी झाला होता त्यामुळे असा प्रेक्षणीय विरंगुळा नक्कीच हवाहवासा होता. आता खरतरं माझी पन्नाशी झाली आहे आणि लग्न होऊन पंचवीस वर्षे झाली आहेत. पण खरं सांगतो, एखाद्या पुरुषाला एखाद्या सुंदर स्त्रीचे आकर्षण वाटत नाही असा पुरुष मला दाखवा आणि तो खोटारडा आहे हे मी त्याच्या तोंडावर सांगेन. प्रवासात आपल्या बाजूला सुंदर स्त्री असेल तर कुठल्या पुरुषाला नको असते? पण यामध्ये एक प्रॉब्लेम असतो आणि सर्वच सभ्य माणसे याबद्धल माझ्याशी सहमत असतील. होतं काय, की आपण नव्वद अंशात मान वळवून तिच्याकडे पाहू शकत नाही आणि नजरेच्या कोपऱ्यातून किती वेळ पाहणार हो? आणि साधारणपणे अनोळखी स्त्रिया सहप्रवासी पुरुष असेल तर त्याच्याशी बोलणे पण टाळतात. असले सुंदर प्रसंग आपल्या आयुष्यात फार क्वचित येतात. बहुतेक वेळेला एखादा म्हातारा, किंवा एखादी अतिप्रचंड बाई किंवा एखादं कार्ट, अथवा विशीतला कॉलेज स्टुडंट असेच सहप्रवासी लाभतात.

“कुठे जाणार?” या तिच्या प्रश्नाने मी भानावर आलो. वास्तविक बस पुण्याला जाणार होती. पण मी पण उगाच कशाला फाटे फोडा म्हणून “चांदणी चौक” असे सरळ उत्तर दिले. त्यावर “अरे वा, मी पण तिथेच उतरणार आहे.” असा रिप्लाय आला. “छान, छान!” असे म्हणून मी परत माझ्या नाकासमोर बघण्याचा कार्यक्रम रुजू केला, अर्थात नजरेचा कोपरा बाजूला लक्ष ठेवून होताच. आता तिने पण सरळ बसून साडीचा पदर नीट केला, आपले अस्तव्यस्त झालेले केस क्लिप केले, पर्स मधून कॉम्पक्ट काढून आपला चेहरा निरखला, न्युड लिपस्टिकचा अजून एक थर ओठांवर लावला आणि टिकली परत एकदा दाबून कपाळावर नीट बसवली. या सर्व वेळेत माझी नजर (कोपरा सोडून) समोरचा रस्ता न्याहाळत होती.

“पहिल्या टोल नंतर बस मॉलवर थांबते ना हो?” परत तिकडून प्रश्न आला. मी झोपल्याचे नाटक करावे का अश्या विचारात असताना या प्रश्नाने तो प्रश्न निकाली निघाला.

“हो थांबते ना!” मी लगेच उत्तरलो. त्यानिमित्ताने तिच्याकडे नीट बघण्याची संधी मिळाली होती.

“अहो, जरा एसीचा ब्लोअर कमी करता का प्लीज? माझा हात पोचत नाहीये वरती!” मी हात वर करून ब्लोअर कमी केला. गाडीच्या धक्यांनी मधून मधून तिच्या खांद्यांचा स्पर्श मला होत होता. तिने लावलेल्या अत्तराचा सुगंध माझ्या नाकात भिनला होता. मी हात वर करून माझ्याही एसीचा ब्लोअर कमी केला. हळूहळू तिचे डोळे मिटू लागले होते. मी मात्र जागाच होतो. झोप लागणे अशक्य होतं. पण काही वेळाने माझेही डोळे जड झाले व कधी डोळा लागला ते समजलेच नाही.

“गाडी फक्त पंधरा मिनिटे थांबेल”. ड्रायव्हरच्या आवाजाने मला जाग आली. ती माझ्या अंगावर पूर्णपणे रेलून माझ्या खांद्यावर डोके ठेवून शांतपणे झोपली होती. आता हिला उठवावे की नाही अश्या संभ्रमात मी असताना कशी कोण जाणे तिला जाग आली.

“कधी डोळा लागला कळलेच नाही मला!” परत एक स्मितहास्य करत, “खूप दमले होते ना मी!”, ती उद्गारली. जणू माझा खांदा वापरणे तिचा हक्कच होता असाच तिचा सूर होता. “मॉल आला का हो?”

“हो”, मी म्हणालो.

“तुम्ही खाली उतरणार असाल तर मला एक कोक आणालं का प्लीज? तहान लागली आहे आणि पाणीही संपलय.” खरंतर माझी पाण्याची बॉटल स्वत:चीच असल्या सारखी हिने संपवली होतीं आणि आता मलाच कोक आणायला सांगत होती. मी पण परत एकदा नको तेव्हढे स्त्रीदाक्षिण्य दाखवत तिची इच्छा पूर्ण केली. वर कोक बरोबर एकेक बटाटेवडा पण आम्ही दोघांनी फस्त केला.

दहा मिनिटांनी बस मॉल वरून सुटली. वडा खाल्याने आता मात्र मला खरोखरच झोप अनावर झाली होती. पण या वेळेला तिचा खांदा वापरण्याची पाळी माझी होती. चांदणी चौकात बस थांबल्यावर वरून मी माझी बॅग काढली. मग तिची बॅग काढायला मदत केली. खाली उतरल्यावर समोरच शरद गाडी घेऊन उभा होता.

“अभय दादा, मानसी वाहिनी, कसा काय झाला प्रवास? पण बरं झालं तुम्ही आज आलात ते! लग्नाची बरीच कामं बाकी आहेत आणि आमंत्रणे तर तुमच्या शिवाय होणे शक्यच नाही.” शरद म्हणाला.

मी आणि मानसीने एकमेकांकडे पाहिले आणि आम्ही खो खो हसायला लागलो. हे दोघे वेड्यासारखे का हसताहेत हे शरदला समजत नव्हते. तो बिचारा आ वासून आमच्याकडे पहात होता. 


तळटीप: ही फँटसी वाचकांनी आपल्या स्वत:च्या जबाबदारीवरच अनुभवावी. यामुळे होणाऱ्या कुठल्याही परिणामांना लेखक जबाबदार असणार नाही.


Rate this content
Log in

More marathi story from Shashank Purandare

Similar marathi story from Comedy