शिव छत्रपतींचे योगदान.....भारतीय संविधान....!!
शिव छत्रपतींचे योगदान.....भारतीय संविधान....!!
भारताच्या इतिहासात पुष्कळ राजा -महाराजा,राजपूत सुलतान होऊन गेले पण छत्रपती शिवरायांसारखे स्थान व सन्मान कोणालाही मिळाला नाही.आज शिवजयंती मोठ्या प्रमाणात आणि ज्या उत्साह आणि उमेदीने साजरी केली जाते, तसे इतर कुणाही राजाच्या बाबतीत घडताना आढळत नाही. असे होण्यास नेमकी काय कारणे असतील? ,इतर राजांपेक्षा शिवरायांमध्ये कोणते वेगळेपण होते? शिवा ते शिवबा आणि महाराजा ते बहुजन प्रतिपालक हा त्यांचा आदर्शवत इतिहास जो आजही प्रसंगिक आणि आजच्या राजनीती व समाजनीती ला मार्गदर्शक कशा प्रकारे आहेत.हे समजून घेणे भावी पिढी साठी नक्कीच हितावह ठरेलं.
आज साजरी होणाऱ्या *395* व्या शिवजयंतीच्या निम्मिताने व *मूळ संविधानाच्या 395 कलमांच्या निम्मिताने आम्हा सर्व भारतीयांसाठी हा आगळा वेगळा योगायोग यासाठी आहे कीं, 26 नोव्हेंबर 2025 रोजी आपल्या राजघटनेला 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. नेमकी शिवरायांची 395 वी जयंती आणि संविधानाचा अमृत महोत्सव एकत्रि आहे. त्यासाठी लिहिण्याचा प्रपंच!*
शिवरायांचे वेगळे पण स्पष्ट करणाऱ्या खूप बाबी आहेत त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे राजेशाहीत प्रजेचा राजा हा राणीच्या पोटी जन्माला येत होता.म्हणजे वंश परंपरा आणि वारसा हक्काने प्रजेला राजा मिळत होता. परंतु छ.शिवरायांच्या बाबतीत मात्र असे काहीच घडले नाही . त्यांना अगोदर तयार केलेली गादी वारसाहक्काने मिळाली नव्हती. तर त्यांनी छोट्या जहागिरीतून मोठे राज्य निर्माण केले. तयार गादीवर बसणे आणि स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण करणे यात पुष्कळ फरक आहे.
तथापि राज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज हे देखील काही एकमेव राजा नव्हते, तरी देखील इतरांना शिवाजी माहाराजांसारखे जनसामान्यांत स्थान मिळाले नाही.त्यामुळं निश्चित त्यांच्या राज्याचे वेगळेपण असायला हवे.,कारण त्यांचे राज्य सर्वसामान्य रयतेला आपले वाटत होते. शिवरायांचे कार्य हे आपलेच कार्य आहे, असे वाटत होते. त्यांची अनेक उदाहरणे इतिहासात ठळकपणे आढळतात.आगर्याहून सुटकेच्या वेळी आपण पकडले गेलो तर मारले जाणार याची *मदारी मेहतरला* अन *हिरोजी फर्जंदला* जाण होती. पण मृत्यूला कवटाळून आत्महुती द्यायला ते दोघे तयार झाले? शिवरायांनी आरंभलेले कार्य मोलाचे आहे ते पूर्ण व्हायला हवे. *लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे* .हीच त्यांच्या मनात भावना होती. सर्व सहकार्यांत, सर्व सैनिकात आणि सर्व रयतेत ही भावना महाराज निर्माण करू शकले यातच त्यांचे वेगळेपण सामावलेले आहे.
त्याकाळी सर्व सामान्य जनता राजा कोण आहे यासंबंधी फारशी काळजी करत नसे. कोणीही राजा आला किंवा गेला, कोणाचेही राज्य आले तरी सामान्य रयतेच्या जीवनात फरक पडत नव्हता. मात्र छ.शिवाजी महाराजांचे राज्य आले आणि एकदम अमूलाग्र बदल झाला. राजा आणि रयत यांचा थेट संबंध आला. राजा रयतेला दिसू लागला, भेटू लागला, त्यांची विचारपूस करू लागला, त्यांचा छळ होऊ नये म्हणून दक्ष राहू लागला, त्यांना मदत व्हावी म्हणून आर्थिक व्यवस्थापनातून राज्य चालवू लागला. *जहागिरदार-देशमुख, वतनदार, पाटील आणि कुलकर्णी* यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम लागू लागले. वतनदार हे मालक नाही, तर ते देखील रयतेचे नोकर आहेत असा फर्मान जारी झाला व त्यावर अमल होऊ लागला .
शिवचरीत्रांतील काही बाबी अगदी निर्विवाद आहे. स्त्रीयांच्या अब्रू संबंधींचा छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टीकोन ही अशीच एक इतरांपेक्षा वेगळी ठरवणारी बाब आहे.आणि ती म्हणजे *||पर स्त्री माते समानम ||* शिवाजी महाराजांच्या काही सरंजामशाही काळात स्त्रीयांच्या अब्रूला, विशेषत: गोरगरीब महिलांच्या अब्रूला किंमत नव्हती. त्यावेळी राजे रजवाडे व राजपूतच नव्हे तर सरदार, वतनदार, जमीनदार, देशमुख आणि पाटील त्यांना हव्या त्यावेळी स्त्रिया ह्या उपभोगण्याच्या वस्तू प्रमाणेच होत्या. दिवसा ढवळ्या त्यांची अब्रू लुटली जात होती.
या संदर्भात *रांझीच्या पाटलाची* गोष्ट प्रसिद्ध आहे. त्याने एका तरुण युवतीवर वर केलेल्या अत्याचाराची बाब शिवरायांच्या कानावर आली. पाटलांच्या मुसक्या बांधून पुण्याला आणले गेले आणि पाटलाला महाराजांकडून हात पाय तोडण्याची शिक्षा फर्मावण्यात आली.त्यामुळे रयतेच्या मनातील शिवरायांबद्दल आदर व दरारा वाढला. स्त्रियांबद्दल महाराजांना असणारा आदर म्हणून आपण महाराजांसमोर *कल्याणच्या मुस्लिम सुभेदाराची सून* जेव्हा शिव दरबारात हजर करण्यात आली तेव्हा तिची साडी चोळीने ओटी भरून तिला पालखीतून सन्मानाने तिच्या घरी सुखरूप पाठविण्यात आले. या घटनेतून शिवरायांची चरित्र संपन्नता स्पष्ट होते. यातून एका शिलवान राजाचे दर्शन झाल्या शिवाय राहत नाही.
लढाईत किंवा लुट करताना मुसलमान किंवा हिंदू कोणत्याही धर्माच्या स्त्रीया हाती आल्या तर त्यांच्या चरित्रास कोणताही कलंक लागता कामा नये व कोणताही नाहक त्रास होता कामा नये अशी सक्त ताकीद महाराजांनी आपल्या सैनिकांना दिली होती. अन्यथा काय होऊ शकते याचेच एक उदाहरणं म्हणून सांगायचे झाले तर..... *सावित्रीबाई देसाईवर* बलात्कार करणार्या आपल्याच *विजयी सेनापती सकुजी गायकवाडचे* डोळे महाराजांनी काढून त्यास जन्मभर तुरुंगात डांबले होते.
रयतेतील लेकी-सुनांच्या अब्रू संबंधी महाराजांच्या दृष्टीकोन त्या काळात इतरांपेक्षा जसा वेगळा होता तसाच रयतेचा संपत्ती संबंधीचा दृष्टीकोनही खूप वेगळा होता. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये अशी सक्त आज्ञा महाराजांनी दिली होती.अशा प्रकारे रयतेच्या कष्टाची अपूर्व कणव शिवरायांना रयतेची अपार निष्ठा देऊन गेली.यातून शिवरायांच्या अंगी असणारी करुणा लपवली जाऊ शकत नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्याही व्यक्तिगत लाभासाठी नव्हता, तर तो परिवर्तनासाठी होता. विषमतेला मजबूत बनविणाऱ्या वर्चस्ववादविरुद्ध, हुकूमशाही विरुद्ध आणि मानवतेच्या अस्मितेसाठी होता.सर्व जनतेला सन्मानाने जगता यावे. यासाठी स्वराज्याची गरज ओळखून रयतेची मानसिकता बदलायला लावली.त्यासाठी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र करून मावळ्यांचे सैन्य उभारले आणि राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक गुलामगिरी मोडित काढत समता आणि बंधुता प्रस्थापित केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य म्हणजे राजे शहाजी आणि माँ साहेब जिजाऊची स्वप्नपूर्ती होती. आजही शिवरायांच्या व्यक्तिमत्वाची उंची जागतिक इतिहासात पाहावयास मिळते. संपूर्ण भारतातून केवळ दोन भारतीयांच्या चरित्राचे धडे परदेशात शिकवले जातात. एक म्हणजे *डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र "वेटिंग फॉर ए विजा ". हे कोलंबीया युनिव्हर्सिटी मध्ये अभ्यासक्रमात शिकवले जाते. तर दुसरिकडे अमेरिकेच्या "बोस्टन" विद्यापीठात "शिवाजी द मॅनेजमेंट गुरु* हे तेथील अभ्यासक्रमात शिकवले जाते.
आजही एमबीए च्या विद्यार्थ्यांना , *सन त्झू यांचे "द आर्ट ऑफ वॉर"* हे पुस्तक वाचण्यास भाग पाडले जाते - हे रणनीतीवरील एक महान पुस्तक आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनातून काही निर्दोष धडे यात मांडलेले आहेत. जे आजच्या काळातही प्रासंगिक आहेत. फक्त एकच खंत आहे की हे धडे पाळले जातं नाहीत. अजूनही बिझनेस स्कूलमध्ये शिकवले जातं नाहीत.
जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताचचे संविधान विविध वैशिष्ट्यपूर्ण गुणांनी परिपूर्ण आहे हे सर्वाना माहित आहे..संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत अनेक वेळा वादविवादातून छत्रपती शिवरायांचा दाखला देण्यात आलेला आहे. जर का आपण *संविधान अभ्यासले तर संविधान निर्माते समोर शिवरायांचे चरित्र आणि प्रशासन नक्कीच आदर्शवत होते असे आपल्याला आढळून येते*.संविधानाच्या इंग्रजी हस्तलिखितामध्ये भारतीय उपखंडाची संस्कृती आणि इतिहास नजरेसमोर ठेवून 22 चित्रे रेखाटलेली आहेत यातील *141 व्या पानावर छत्रपती शिवरायांचे चित्र आपणास पाहावयास मिळत*
संविधान सभेत 31 डिसेंबर 1948 रोजी भावी संविधान मंत्रिमंडळात नियुक्त होण्यासाठी काही शैक्षणिक अहर्ता असावी का त्या अनुषंगाने *प्रा.के.टी.शहा* यांनी सुरुवातीला मंत्र्यांना दहा वर्षे इंग्रजी व पुढील दहा वर्ष हिंदी भाषा अवगत असावी अशी दुरुस्ती सुचवली. परंतु *महावीर त्यागी* यांनी या सूचनेला विरोध व नापसंती दर्शवली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रणजीत सिंग आणि अकबर यांच्या शिक्षण आणि प्रशासकीय कारभाराचा दाखला देत...., केवळ औपचारिक शिक्षणच नव्हे तर पुढाकार, प्रामाणिकपणा एकात्मता, आणि बुद्धिमत्ता हे देखील गुण भावी संविधान मंत्री मंडळातील मंत्र्यांना आवश्यक आहेत असे सभागृहाला स्पष्ट केले. शेवटी हा तिढा घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी फार हुशारीने संविधानात योग्य त्या तरतुदी करून सोडवला.
26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत डॉक्टर आंबेडकरांचे शेवटचे भाषण झाले यात त्यांनी भावी संविधान आणि स्वतंत्र भारता समोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय योजना यावर विस्तृत विचार मांडले. या देशाच्या स्वातंत्र्याचे काय होईल भविष्यात ते टिकेल की जाईल याबद्दल याबद्दल चिंता व्यक्त केली.यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या स्वजनांकडून झालेली दगाबाजी आणि अप्रमाणिकपणा संविधान सभेत गंभीरपणे मांडून देशाला संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली. यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर संविधान निर्मिती करीत असताना छत्रपती शिवरायांच्या जीवनातील घटनांचा किती मोठा पगडा होता हे यावरून स्पष्ट होते. *संविधानाच्या पंधराव्या प्रकरणात अनुच्छेद 324 नुसार निवडणूक आयोग आणि लोकप्रतिनिधींची निवड* याबद्दल उल्लेख आहे. छत्रपती शिवरायांनी जात-पात न पाहता केवळ गुणांच्या आधारे अनेक मावळे घडवले.याच मावळ्यांच्या मदतीने त्यांनी उत्तम प्रशासन राबवले. स्वराज्याचे सुराज्य केले.या संदर्भात मार्गदर्शक म्हणून संविधानातं छत्रपती शिवरायांचे
हातात तलवार घेऊन ते किल्ल्याच्या समोर उभे आहेत.त्यांची आपल्या प्रशासनावर असणारी मजबूत पकड अधोरेखित करणारे हे चित्र आहे.संविधान राबवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्यावा हेच अपेक्षित आहे. शिवरायांनी योग्य पदासाठी योग्य व्यक्ती निवडण्यासाठी गुणांचा निकष महत्तपूर्ण मानला होता.म्हणूनच याला सुसंगत असे संविधानाच्या 15 व्या भागात *निवडणुका* या प्रकरणावर छत्रपती शिवरायांचे चित्र पाहावयास मिळते. यावरून छत्रपती शिवरायांची लोकशाही प्रति असणारी दूरदृष्टी आपल्या भारतीय संविधानातून प्रतिबिंबित झालेली आहे. फक्त खंत ही आहे. कीं, शिवरायांची प्रशासन प्रणाली, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय व्यवस्था आपण संविधानाच्या माध्यमातून अजून समजून घेतलेली नाही.
26 नोव्हेंबर 2025 रोजी आपल्या राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण होत आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने 10 ऑक्टोबर 2024 रोजी *घर घर संविधान... अभियान* हा उपक्रम हाती घेतलेला आहे. तो संपूर्ण वर्षभर चालू च राहील. या शासन निर्णयाला कार्यान्वित करून *शिव जयंतीच्या 395 व्या जन्मोस्तवा निम्मिताने मूळ संविधानाची ती 395 कलमे जाणून घेऊन छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातला पुरोगामी महाराष्ट्र आणि सार्वभौम भारत घडविण्यासाठी संविधान घरा घरात पोहचवूया ....!!!
