माझ्या बालपणीच्या आठवणी जैतिरच्या - भाग १
माझ्या बालपणीच्या आठवणी जैतिरच्या - भाग १
आजूबाजूच्या माळरानावर ज्याला आम्ही "पैलाड" म्हणायचो.ही पैलाड भूताटकीने पछाडलेली आहे.अस मला माझी आजी सांगायची त्यामुळे इतर मुलांप्रमाणे तिथे मला जाण्यास मज्जाव होता.शिवाय त्यावेळी वडीलधाऱ्या व्यक्ती देखील या जागेविषयी वेगवेगळे हॉरर अनुभव सांगायचे. त्यामुळे घरच्यांच्या नजरा चूकवून सदर पायरी उद्योगाबद्दल नियोजन आखण्यासाठी " पैलाडी" सभा भरवली गेली.सभेत ठरल्याप्रमाणे एका गटात २ किंवा ३ याप्रमाणे सर्व गटांनी वेगवेगळा एरिया पूर्णपणे पिंजून काढायचा एकही पिकलेले आंब्याचे झाड कुणाच्या ही नजरेतून सुटता कामा नये .याची तसदी घेण्याची सक्त ताकिद होती.सकाळपासून संध्याकाळ पर्यंत रखरखत्या ऊन्हांत अनवाणी पाऊलांनी सर्व मुले न थकता, न थांबता पायऱ्या शोधण्यासाठी मेहनत घेऊ लागली. पायऱ्या मिळविण्याचा साधा व सोपा पर्याय म्हणजे तिथल्या तिथे आंबा खायचा आणि पायरी सोबताच्या गोणपाटात टाकायची.आंबे खाऊन खाऊन खाणार तरी किती फार फार तर ५-६ .यातच पोट भरायच मग दुपारच्या जेवणाची काही खैर नसायची.
दुसरा पर्याय म्हणजे " चाणखाजरा आंबा " ज्यातून सहज पायरी मिळवता यायची."चाणखाजरा आंबा " म्हणजे खारुताईने झाडावरच अर्धवट खाऊन सोडलेला आंबा .जो मोठा वारा आला की , इतर पिकलेल्या आंब्यासह खाली पडायचा. पालापाचोळ्यात पडलेला तो आंबा शर्ट किंवा पँटला पुसून तिथेच फस्त केला जायचा .परंतु हे दोन्ही पर्याय कुचकामी होते.त्यात वेळ आणि मेहनत वाया जायची. त्यामुळे मोठ्या संतोषच्या सल्ल्यानुसार
पिकलेल्या आंब्याची फांदी जोर-जोराने हालवून आंबे खाली पाडायचे आणि सर्व मुलांनी ते पडलेल्या आंब्याना पायाने तुडवून त्यातून पायरी बाहेर काढली जायची.ही युक्ती फार प्रभावी ठरत होती.ही झाडे काही आमच्या मालकिची नव्हती व यांचे मालक देखील कधी इकडे फिरकत नसायचे कारण , इतर ठिकाणच्या त्यांच्या बागा फांद्या मोडेपर्यंत लागायच्या त्यामुळे इकडे येणे त्यांना कदापि शक्य नव्हते .त्यामुळे कित्येक वर्षे ही झाडे आम्हा मुलांच्या स्वाधीन होती.भराभर पायऱ्याच्या गोण्या भरत होत्या .दिवशी ५ शेकडा भरण्याचे टार्गेट पूर्ण होऊ लागले.
जमलेल्या पायऱ्याच्या गोण्या आरोलकर नर्सरी पर्यंत नेण्यासाठी खटपट चालायची .त्यावेळी दुचाकी क्वचितच एका वाडीत एखाद दुसरी असायची तर सायकल जरी बहुतेकांच्या घरी असली तरीही ती लहान मुलांच्या हाती देण्यास सक्त मनाई असे.जणू " आॕडी " असल्यासारखी ! गावात आनंद शेणई यांचा " सायकल स्टोअर्स " होता.ताशी ५० पैसे दराने ही सायकल आम्ही भाड्याने आणली.मग काय , सायकलच्या मधल्या दांडीवर पायऱ्यांच्या दोन गोण्या आणि मागच्या सीटस् वर एक याप्रमाणे सहजच तीन गोण्या नर्सरीपर्यंत नेणे शक्य झाले पण यासाठी २-३ मुल लागायची.
एकाने हातात सायकलचा हँडल पकडून सायकल सरळ चालवायची व इतर मुलांनी सायकल चढतीला असताना मागून हळूवार धक्का द्यायचा. नर्सरीला पोचल्यावर तेथील कामगार विक्षिप्तपणे आमच्याकडे पाहायचा आणि मोठ्या आवाजात बोलायचा, ये पोरांनो तुमच्या पायऱ्या या पाण्याच्या टफात ओता " मग गोण्या टफात ओतल्यावर पाण्यावर तरंगणाऱ्या पायऱ्या आमच्याकडे बघत हसत हसत तो बाहेर फेकून द्यायचा .जसे आम्ही त्याचे सातजन्माचे वैरी असल्यासारखा . पाण्यात बुडालेल्या पायऱ्या तेवढयाच मोजणीला घ्यायचा .अशाप्रकारे आम्ही फार परिश्रमाने जमविलेल्या हजार ते बाराशे पायऱ्यांपैकी आठशे ते नऊशे पायऱ्या एवढ्याच हिशेबाला पकडून ४०-४५ रुपये मिळायचे .हे पैसे आम्हा ७-८ मुलांमध्ये समप्रमाणात मोठी मुल वाटून द्यायची .प्रत्येकाला ५-६ रुपये मिळत असत.
फार परिश्रमाने आणि मेहनतीने आम्ही जमविलेल्या पायऱ्या हिशेबाला कमी पडतात हे पाहून वाईट वाटायचं .म्हणून यावर मोठ्या कृष्णाने एक जालिम तोडगा काढला.तो म्हणजे आंबोलीची झाड पाडून त्यातून पायऱ्या जमवायच्या. या आंबोली च वैशिष्ट्य म्हणजे एकतर याचे आंबे गोड किंवा फारच आंबट असतात . हापूस , पायरी , मालडेस , मांडकूळ , गोवा मांडकूळ व नारळी आंबा यासारखे गोडधोड आंबे एखाद्या मंदिराला सणवारानिमित्त ज्याप्रमाणे लाईटच तोरण बांधतात अगदी त्याचप्रमाणे पिवळ्या , केशरी , नारिंगी व लाल रंगाने सर्वांनाच आकर्षित करत असायची तिथे आंबोलीची काय मिजास ? त्यामुळे या आंबोली वृक्षांवर परतून बघण्यास कुणालाही स्वारस्य नसणे अगदी स्वाभाविकच होते. आमच्या घरापासून सुमारे अर्धा किमी वर सातेरी मंदिर आहे.या मंदिराच्या बाजूला देवराई आहे.ती आमराई म्हणून प्रसिध्द आहे.इथे एक गोड्या आंबोलीच झाड आहे.आंबोली म्हणजे आंब्याची मादी असा एक समज.
याच्या आंब्याना " घोटा " असे म्हणतात .कारण हे आंबे कापता येत नाही तर यांना डायरेक्ट चोखून खाव लागत.घोटा खाण्याचा आनंद फार वेगळाच असतो.तो उपभोगण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त कोकणच ! तर आम्ही मूल या आमराईतील वेलींना जोर-जोराने हुलकावण्या देऊन निम्म्याहून अधिक घोटा खाली पाडायचो व त्यातून पायऱ्या जमवायला पुन्हा सुरुवात व्हायची .आमच्या सोबत पडलेली घोटा जमवायला मनिषा , माधुरी , बाया व विद्या वैगेरे मुली पण असायच्या.पण त्यांचा थेट संबंध घोटा घरी नेण्यापूरता असायचा.( या देवराईची शोभा वाढवून आपल्या सर्व लेकरांना रखरखत्या ऊन्हात हिरवीगार छाया आणि भूकेलेल्यांना गोड गोड घोटा देणारी ही वृक्षमाऊली जसजसे आम्ही मोठे होत आहोत तसतशी ती वृद्ध होऊन आज इतिहास जमा होण्याचा मार्गावर आहे.सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉक् जाताना माझ्याकडे फार दुःखी आणि कष्टी नजरेनं पाहतोय .एकेकाळी वर्षभरात ह्या माऊलीला भेटल्याशिवाय चैन पडत नसायचे .आज ही माऊली अंदाजे १५०-२०० वर्षे जगून पंचतत्त्वात विलीन होताना दिसतेय .राहीली ती तिची आठवण म्हणजे तिचा उत्त्युच्च काळाभोर सांगाडा .) तसेच माळरानावरील सडा म्हणजे धवडकी आणि घाड्याचे पाणी या नावाने हे ठिकाण ओळखले जाते. या धवडकी बद्दल देखील हॉरर कथा प्रसिद्ध होत्या .इथे लहान मुलांप्रमाणे स्त्रियांना देखील जाण्यास बंदी होती.कारण दु.१२.०० ,संध्या.४.०० आणि ६.०० ही वेळ भूताची फेरकटका मारण्याची वेळ असते व यावेळी जो कुणी एकटा सापडेल त्याला झपाटल्याशिवाय भूत सोडत नाही अशी वदंता होती.
साहजिकच या ठिकाणी घनदाट जंगल होत.त्यामुळे सुर्यप्रकाश थेट जमीनीवर पडत नसायचा .त्यामुळे सर्वत्र वृक्षांची काळीभोर साऊली आणि किर् शांतता. जांभूळ , पटकुळीन , हसोळी , शिणळ व करवंदासह इतर अनेक झाडांच्या फळांवर पशु-पक्ष्यांसह आम्ही पण ताव मारीत होतो. सर्वत्र
पक्षांचा किलबिलाट आणि जंगली श्वापदांच देखील इथे वास्तव्य होत. तरीही येथील आंबोलींना " टार्गेट " करुन दिवशी हजार भर म्हणजे १० शेकडा पायऱ्या जमविणे सहज शक्य होत असे. कारण ,इथे चूकून कुणीतरी फिरकायचे.ते देखील इंधनासाठी जंगली लाकडे गोळा करण्यासाठी . यासाठी आमच्यापेक्षा वयाने लहान असणारी मूले छोटा कृष्णा , उमेश , भिवा , दामू व संजय वैगेरे मुले देखील आम्ही याकामी निवडली होती.ही मूले आमच्याप्रमाणेच घरच्यांच्या नजरा चूकवूनच यायची.जर पकडली गेली तर सुरुच्या बारीक छड्यांची रांगोळी पायापासून मांडीवर उमटवली जायची. याची खबरदारी घेऊनच हे काम फार लिलया केल जायच. या मुलांच काम एवढच असायच की , वारा आला की आंबोली खाली पडलेली घोटा , आंबाडी जमा करायची दुसऱ्यांनी यातून पायऱ्या काढायच्या व गोणीत टाकायच्या .यामोबदल्यास या मुलांना ५० पैशाची बोवलेकर आईस फॕक्टरीतील " पेप्सी " द्यायचो.ही मुल देखील यात खूप धन्यता मानायची आणि पुन्हा बोलवल की यायची.
मग पुन्हा स्वारी आरोलकर नर्सरीकडे निघायची.मागच्या वेळी तब्बल हजार पायऱ्यांतून दोनशे ते तीनशे खराब पायऱ्या फेकल्यामुळे झालेल नुकसान आंबोलीच्या पायऱ्यांतून आता भरुन निघत होत.चार पैसे जास्त हाती येत होते.सर्वांच्या मुखपटलावर एकच हर्ष आणि समाधान दिसत होत.सर्वांचे लक्ष्य जरी एकच असले तरी प्रत्येकाचा आनंद मात्र वेगवेगळ्या स्वरुपाचा होता. मोठ्या मुलांना "जैतिर उत्त्सव"साठी येणारी आर्थिक टंचाई यशस्वी नेतृत्वाने पूर्ण केल्याचे समाधान ! विलासला नर्सरीच्या कामगाराला हापूस पायऱ्यांऐवजी आंबोलीच्या पायऱ्यां देऊन गंडविल्याचे समाधान ! तर आमच्या फार कष्टाने जमविलेल्या पायऱ्यांतून खराब पायऱ्यां फेकून आमचा निर्धारित निधी संकल्प ढासळणाऱ्यां त्या कामगाराचा बदला घेतल्याचे संतोषला समाधान ! म्हणजेच जवळजवळ सर्वजण मनापासून समाधानी व आनंदी होते.आता "जैतिर उत्त्सव" ला जाण्यासाठी आमचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला होता व आम्ही आत्मनिर्भर.! सर्वांच्या कॉलर ताठ झाल्या होत्या जणू आता कुणाचाही बाप आम्हांला जैतिरला आमच्या पद्धतीने साजरा करण्यासाठी रोखू शकत नव्हता....
(क्रमशः)
