गेट् टूगेदर स्नेहमेळावा काळाची गरज......
गेट् टूगेदर स्नेहमेळावा काळाची गरज......
*गेट् टूगेदर*
*स्नेहमेळावा काळाची गरज......*
वाढती महागाई , वाढती बेरोजगारी , वाढत्या गरजा आणि अपुरे उत्पन्न अशा विविध गोष्टींमुळे सर्वसामान्य कामगार त्रासलेला असतो.या त्रासांपासून सुटका म्हणून आपल्या गरजा आणि उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी तो ताबडतोब दुसरे एखादे रोजगार क्षेत्र निवडू शकत नाही.कारण अशा निर्णयाचा सकारात्मक परिणाम प्रतिबिंबित होण्याच्या शक्यतेचे प्रमाण नेमके किती आणि कसे असेल हे निश्चित होण्यासाठी त्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे परिणाम करणाऱ्या विविध घटकांवर अवलंबून असते.
त्यामुळे अशाप्रकारचे धाडस करण्याची रिस्क् पत्करणे प्रत्येकासाठी सहज आणि सुलभ नसते.मग आहे तेच रोजगार क्षेत्र माझ्या स्वप्नांच्या पूर्णाकृती साठी योग्य आहे आणि त्यासाठी मला नियमितपणे स्वतःला झोकून देणे गरजेचे आहे .वेळेचा पुरेपुर सदुपयोग करुन माझे इच्छित उद्दीष्ट गाठणे यावरच मी माझे लक्ष केंद्रित करुन त्याची अंमलबजावणी करणे हेच शहाणपण आहे.अशी सर्वसाधरण धारणा त्या त्या क्षेत्रात कित्येक वर्षे काम करणाऱ्याची असणे यात काहीच गैर नाही.हे सर्व करीत असताना घर आणि प्रपंच हे परस्परांवलंबी प्रमुख घटक आहेत.त्यामुळे यामध्ये समन्वय साधून प्रत्येकजण आपल्या ज्ञान , अनुभव व प्रतिभा वापरून आपली प्रतिमा बनविण्यात कार्यमग्न असतो.बरेच जण त्यात यशस्वी देखील होतात.आपल्या मेहनतीवर काही खुलेपणाने तर काही मनातल्या मनात समाधान व्यक्त करतात.परंतु खरोखरच आपण समाधानी असतो का ? हा प्रश्न नवीन आव्हानांना आमंत्रण देत स्वतःला ताजातवाना ठेवतो खरा.
रोजगार क्षेत्र खाजगी असो वा सरकारी कामाची व्याप्ती ही कधीच संपणारी नसते .तर याउलट काही नवीन संकल्पना , नवीन उद्दीष्टे किंवा नवीन समस्या घेऊन निरंतर प्रवास करीत असते.आपण कितीही थकलो तर ती विसावा कधीच घेत नाही.काळानुसार बदल होत राहतात .ही प्रकिया फार जलद गतीने चालू असते.वर्ष केव्हा सुरु झाले नि संपले केव्हा हे दिनदर्शिकेची पाने चाळताना अगदी वयाच्या ५८ व्या वर्षापर्यंत कळूच देत नाही .मात्र जेव्हा कळू लागत तेव्हा वेळ निघून गेलेली असते.मग वर्षभरातल्या *हाॕलीडे लिस्ट* मध्ये चालू वर्षातल्या सुट्या शोधीत असतो त्याप्रमाणे भूतकाळात जाऊन फक्त स्वानंदासाठी खर्च केलेले दिवस हुडकूनही सापडत नाहीत.जर सापडले तर ते आप्तेष्टांसाठी पत्करलेली *फाॕरमॕलिटिज*.
त्यासाठीच तुम्ही कोणत्याही रोजगार क्षेत्रात असाल आणि कितीही व्यस्त असाल तरी एक दिवस आपल्यासारखेच काम करणाऱ्या आपल्या बांधवांसोबत , सहकर्मचाऱ्यांसोबत घालविण्यासाठी सज्ज असायला हवे.त्यासाठी स्नेहमेळावा फार मोठी सकारात्मक भूमिका पार पाडणार दुवा आहे. या दुव्याला अलिंगन द्या.त्याला लाथाडू नका किंवा दुर्लक्षित करु नका. सर्वकाही बाजूला ठेवून स्वतःसाठी यात सहभाग घ्या.नाचा , खेळा, गाणी गा सर्वकाही जे योग्य आहे त्याचा पुरेपुर आनंद लुटा.एकमेकांशी असणारे कोणतेही वाद-प्रतिवाद बाजूला ठेवून संवाद साधा.बाहेरुन काटेरी दिसणारा फणस आतून गोड गऱ्यांनी भरलेला असतो.हा गोड गरा चाखण्यासाठी तो फणस पिकलेला असायला हवा.नाही का !
दुःख वाटल्याने कमी आणि आनंद वाटल्याने द्विगुणीत होतो असा निसर्ग नियम आहे. याचे वाटप देखील समविचारांशी होत असते.तिथे वय , शिक्षण , अनुभव , हुद्दा व सामाजिक प्रतिष्ठा यांचे मूल्य शून्यवत होऊन केवळ एकच नाते वृद्धिंगत होऊन ते फारकाळ अनमोल बनून राहते.त्याचे मूल्य जगातला कोणताही धनाढ्य व्यापारी अथवा उद्योजक ठरवू शकत नाही.कारण कितीही धन त्याने खर्च केले तरी दुसऱ्यांकडून ते विकत घेऊ शकत नाही.साहजिकच दुसऱ्यांना दुप्पट तिपट्ट दराने विकू देखील शकणार नाही.आणि ते म्हणजे समाधान.ते कोणत्याही बाजारपेठेत उपलब्ध नाही आणि भविष्यात कधीच उपलब्ध होणार देखील नाही.ते मिळवण्याचे एकमेव मार्ग म्हणजे स्नेह्यांचा मेळावा *स्नेहमेळावा*.
जिथे स्नेहमेळावा जमतो तिथे समविचारांचे नाते जुळते आणि त्यातूनच एक भक्कम संघटन तयार होत असते.एकंदरीत कोणतीही संघटना भक्कम बनविण्यासाठी उपयोगात येणाऱ्या सर्व आदाने प्रदाने पैकी स्नेहमेळावा एक प्रभावशाली साधन आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.थोडक्यात रोजगार क्षेत्रात संघटनेचा पाया मजबूत करण्यासाठी वर्षातून किमान एकदा तरी *गेट् टुगेदर* होणे आवश्यक आहे.समव्यावसायिकांच्या , सम रोजंदारीच्या आणि रोजगारांच्या समस्या काही समान तर काही वेगवेगळ्या असू शकतात. जर का त्या संघटनेच्या माध्यमातून एकत्रितपणे मांडल्या गेल्या तर, त्या जशास तशा नसल्या तरी काही प्रमाणात सोडविणे शक्य असते.त्यासाठी मिटिंग आयोजित केल्या जातात.त्यात विचारविनिमय होऊन तोडगा काढण्याचे बहुपर्याय उपस्थित केले जातात आणि जो पर्याय बहुमताने परिणामकारक ठरेल , त्यावर शिक्कामोर्तब केले जाते.
परंतु आनंदोत्सव साजरा करण्यासाठी कोणत्याही मिटिंग चे आयोजन केले जात नाही.जर का केले गेले असेल तर त्यामागील उद्दीष्टे देखील निश्चित असतात. मात्र आनंदोत्सव साजरा करण्यासाठी *स्नेहमेळावा* सर्वांची वाट पाहत असतो.आजच तुमच्या बीझी शेड्यूल्ड मध्ये त्याचेही स्थान निश्चित करण्यासाठी कटिबद्ध व्हा..आपापल्या क्लास् मेटस् , स्कूल मेटस् व बॕच मेटस् सोबत जसा आपण आनंद साजरा करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्या सारखेच काम करणाऱ्या आपल्या बांधवांसोबत एक दिवस साजरा करा.सर्व शारीरिक व मानसिक ताण तणाव गळून पडतील.आपल्या वैयक्तिक जीवनात यामुळे किती सकारात्मक बदल घडतात ? ते स्वतः अनुभवून बघा.
