शिंण्याबाबा...
शिंण्याबाबा...


“कमाल केली यार शिंण्याबाबा तुया. मानलं भाई तुला...!!”
त्या वर्तमानपत्रावरची बातमी पाहून आपसूकच माझ्या तोंडून हे वाक्य बाहेर आलं...
आज पुन्हा आठवला तो दिवस, मला हाच शिंण्याबाबा विमानकडं पाहून म्हणला होता, "वैग्या, कवा येईल बे असे दिवस आपले??"
त्याच्या या बोलण्यात तेव्हाच मला प्रचंड इच्छाशक्ती जाणवली होती पण हसू आलं. कारण त्याचं ते बोलणं मला सुरुवातीला बिनबुडाचं वाटलं....
त्याला मी हसतच म्हणालो, "शाळेत यायचं तुया ##वर येते. अभ्यास म्हणलं की तुय डोकं दुखते अन तुला विमानात बसायचं??? "
माझ्या हसण्याचा कदाचित त्याला राग आला असावा. नेहमीप्रमाणे तोंड फुगवंत, गालाला कुरवाळत मला पुढे बोलू लागला - "तुला ते गफूर काका माहीत आहे का?? त्याला काय मातोडा येते बे?? वाचता पण येत नाही त्याला. तरी पण फाय बर ते मागच्या महिन्यातच सुदी अरबियाला जाऊन आलं. अन ते पण इमानाणं!!!"
"त्याचं काम वेगळं आहे बोवा..." मी अडखळतच बोललो.
भवाळ्या उंचावत मला त्यानं पुन्हा प्रश्नात पाडलं, "काय एगळ हाय??"
"आबे त्याला सोनं सापडलं होतं म्हणते!!!!"
इतरांपासून जे ऐकलं होतं तेच मी त्याला सांगितलं.
"लोकायला काय हाय बे - ते त ## खाल्ल्यासारखं तोंडात येईल ते बोलतेत. रातनदिवस ते माणूस जवा ## घासायचा तवा ते कोणाला दिसलं नाही... अन आता त्याला फळ मिळायलं त, त्याला सोनं सापडलं म्हणे."
काय माहित?? कुठून शिकायचा तो अशा गोष्टी. कदाचित, जेव्हा आम्ही वर्गात बसून दिन दिन दिवाळी म्हणायचो तेव्हा हा गडी शाळेला दांड्या मारून गावभर फिरायचा. त्याचाच हा परिणाम असावा.
जेव्हा आम्ही पुस्तकं वाचायला शिकत होतो तेव्हाच तो माणसं वाचायला शिकला.
रावते सरची एक छडी बसली की आम्ही हंबरडा फोडायचो. पण या आबाच्या हातावर छड्याच्या छड्या तुटायच्या तरी पण तोच आम्हाला हसून आणखी रडवायचा...
आम्हाला समजायचं नाही याला छडी का लागत नाही.
अहो, वडराचा होता तो दगड. गोटे फोडू फोडू त्याचे हात लोखंडाचे झाले होते. त्याला काय वाटणार त्या लाकडी छडीचं..!!!
सगळे मास्तर कदरले होते त्याला. मारावं तर या दगडाला लागत नाही. शिव्या द्यावं तर हा पक्का बेसरम..!!
मग काय?? दिलं वाऱ्यावर सोडून याला.
सातव्या वर्गातली गोष्ट.
एक दिवस असाच रावते सरांचा तास रिकामा होता मग त्यांच्या जागेवर खरतडे सर आले...
वर्गात पाय ठेवताच - "अरे बापरे, आज कुणीडून निघला सूर्य नारायण" शिंण्याबाबाकडे पाहत सर बोलू लागले.
कारण शाळा सुरू झाल्यापासून तीन महिन्याच्या नंतर ही आमच्या भावाची पहिली हजेरी होती.
सरांनी असं बोलताच मुलीच्या एका घोळक्यातून आवाज आला... "सर, आज शाळेचे ड्रेस भेटणार आहेत म्हणून उगवला हा तुमचा सूर्य नारायण..."
पूर्ण वर्ग हसला होता त्या बिचाऱ्यावर.
पण आमच्या बाबाला दुःख वाटण्याचं कारण एकच होतं- त्याची पुनी आज पहिली वेळ त्याच्यावर हसली.
मला तेव्हा हसू आलं नाही.. कारण मला जाण होती त्याच्या त्या परिस्थितीची.
बाप एक नंबरचा पिदाडा. मायनं केलेली पूर्ण कमाई तीन बहिणीच्या लग्नात गेली.
अहो, कधी कधी तर एक वेळ खायचे वांदे व्हायचे त्याचे. नाईलाजाने बिचाऱ्याला शाळेत यायचं काम पडायचं, खिचडीसाठी.
त्याच्यासाठी शाळा होती ती फक्त, खिचडीसाठी आणि शाळेत भेटणाऱ्या त्या कपड्यासाठी....
"झालं का तुझं पेपर वाचन" बापूच्या या आवाजानं मी वर्तमानात आलो. आणि नाही, म्हणून पुढची बातमी वाचू लागलो-
एका अशिक्षित तरुणाची गगन भरारी....
फक्त शेळी पालन या साध्या व्यवसायाला कुणी इतक्या उंचीवर नेऊ शकतो का??
आशिष रमेश चव्हाण या तरुणाने महाराष्ट्रातील 32 प्रकारच्या जातींची निर्यात इराणमध्ये केली. नवीन 7 प्रजातींच्या शेळ्यांची भर आणखी महाराष्ट्रात वाढविण्याचे श्रेयसुद्धा जाते ते याच तरुणाला....
ती बातमी वाचून स्वतःलाच प्रश्न पडला, खरंच हा तोच शिंण्याबाबा आहे न जो - एकेकाळी मला पेपर दाखव म्हणून माझे चोचले पुरवायचा.
त्याच्याबद्दल अभिमान तर तेव्हा वाटला जेव्हा त्यानं त्याच्या या यशाचं सारं श्रेय आमच्या गावाला आणि गावाच्या त्या शाळेमधल्या कोपनर सरांना दिलं.
त्याला मुलाखतीत वार्ताहारानं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पाहून तर, आपण कुठं तरी चुकल्याची जाणीव झाली...
कारण - "आम्ही खेड्यातली मुलं म्हणून स्वतःच्या फाटक्याला लपवण्याचा प्रयत्न करणारे कुठे, आणि ज्या फाटक्याला आम्ही दोष देत होतो त्यालाच ठिगळ म्हणवून नकारात्मकतेला झुडकारुन लावणारा तो शिंण्याबाबा कुठे....
त्याला वार्ताहाराने प्रश्न विचारला होता-
तुमचं शिक्षण जेमतेम सातवीपर्यंतच झालं तुम्हाला या गोष्टीचा काही अडथळा वाटला नाही का???
-कदाचित, मी आणखी पुढे शिकलो असतो तर ते शिक्षणच माझ्या या यशात अडथळा ठरलं असतं. आणखी माझं शिक्षण चालू असतं -आणि मीसुद्धा माझ्या त्या मित्राबरोबर रात्री काम करून दिवसभर mpsc ची तयारी करत पुण्याला असतो. मला त्यांना काही कमी लेखायचं नाही शेवटी ते आपले भावी अधिकारी आहेत... परंतु, त्या सर्वांना एकच सांगावंसं वाटते पुस्तक वाचायच्या आधी तुम्ही माणसं वाचायला शिका... पुस्तकातली गरिबी वाचल्यानंतर कधी पुण्यातील एखादी झोपडपट्टी फिरून पाहा. तुम्हाला असलेल्या माहितीचा वापर लोकांना शहाणं बनविण्यासाठी करा, तुमचा शहाणपणा दाखवण्यासाठी नाही.….
व्यवस्थेला बद्दलविण्याच्या गोष्टी करणारे तुम्ही, त्या व्यवस्थेचा भाग बनल्यानंतर स्वतःच बदलू नका.
आणि ज्या मातीनं तुम्हाला घडविलं त्या मातीला कदाचित तुम्ही नाइलाजाने सोडून गेले तरी त्या मातीशी असलेली नाळ तोडू नका....
त्याच्या त्या बोलण्यावरून मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर सापडलं- इतके पैसे असून यानं आणखी शहरात एखादं घर का घेतलं नाही???
ज्या गावात गेल्यानंतर आम्हाला आता भकासपणा वाटतो त्याच गावात याला असं काय दिसतं??
आज समजलं हा परिणाम आहे त्याच्या त्या मातीबद्दल असलेल्या निष्ठेचा...
आज खरतडे सरांच्या थोबाडावर हे वर्तमानपत्र फेकून मारावंसं वाटलं- हेच होता तो मास्तर जो शिंण्याबाबावर फक्त याच कारणाने हसला होता जेव्हा त्याला सरांनी प्रश्न विचारला होता - सांग आशिष तुझं स्वप्न काय??
मोठ्या अभिमानाने आशिष उत्तरला होता- "सर, मला इमानात बसून पुरी दुनिया फिरायची."
कदाचित त्या सरांना असलेल्या त्या टेम्परवरी नोकरीचा (जी त्यांना 20 वर्ष पुस्तके घासून मिळाली) गर्व चेहऱ्यावर आणत सर बोलले, "बाबा, तुझ्या सारख्या आमावस्या पूर्णिमेला उगवणाऱ्या चंद्रांनी अशी स्वप्ने पाहू नयेत.”
.
.
.
.
.
.
.
खूप दिवसानंतर तो शिंण्याबाबा आज पुन्हा भेटला.
मी ज्या शहरात सध्या वास्तवास आहो त्याच शहरात कार्यक्रम होता त्याचा... व्यवसाय मार्गदर्शनाचा.
कार्यक्रम आटोपल्यावर मी त्याच्या समोर गेलो-
"ओळखलं की नाही आशिष सर मला???"
गळ्यात पडून तो मला म्हणाला, "काय वैग्या तू, आबे आशिष मी पुऱ्या दुनियेसाठी. तुयासाठी त फक्त शिंण्या बाबा....