शब्दांच्या पलिकडले
शब्दांच्या पलिकडले


निरव आरश्यासमोर उभा होता. स्वतःच बघत होता. आज जरा स्पेशल दिसत होता. छान ड्रेसिंग केली होती. तिला आवडते तशी तिला म्हणजेच मृणालला..
निरव स्वतःशी बोलू लागला, "आज काही होऊ दे तिला प्रपोज करायचंय... किती दिवस असं मनात ठेवायचं, हे सर्व तिला अनेकदा प्रयत्न पण केला पण ती कधीच सीरियस घेत नाही... पण आज नाही होणार असं काही...” असं बोलून त्यांनी डोळे उघडले स्वत:ला आरश्यात पाहिले आणि पुन्हा बोलला, "मृणाल तू मला प्रचंड आवडते आणि मला माझे पुढील आयुष्य फक्त तुझ्या सोबत आणि तुझ्या विचारात घालवायचे आहे... एक मिनिट तू ही गोष्ट अजिबात जोक किंवा मस्करी समजू नको मी खूपच सीरियस आहे..” तेवढ्यात त्याचा फोन वाजला त्याने मोबाईल पाहिला मृणालचा फोन होता,
"निरव कुठे राहिलास यार?"मृणाल बोलली.
"अगं आलोच निघालोय..." निरव बोलला.
"ये ना रे..." मृणाल बोलली आणि फोन ठेवला.
आणि निरव घाई घाई निघाला, बिल्डिंगच्या खाली येताच त्याला समु भेटली, त्याची बहीण... ती बोलली,
"दादा कुठे निघालास?"
"अगं एक काम आहे...” निरव बोलला.
"कसलं काम आणि एवढं आवरून खरं सांग काय भानगड आहे...” समू बोलली.
"ए बाई, जाऊ दे ना मला आधीच घाई आहे...” असं बोलून ती निघाला आणि समू आवाज देऊन बोलली, "बेस्ट ऑफ लक दादा..."आणि ती घरी निघून गेली, गडबडीत मध्ये निरव पोहचला, “हाय...”
"व्हॉट निरव किती वेळ लावलास यार माझे २ कॉफी संपले..” मृणाल बोलली.
"अरे सॉरी ना यार ट्रॅफिक होतं ना..” निरव बोलला.
ठीक आहे व पुन्हा वेटरला आवाज देऊन कॉफीची ऑर्डर देतो, तेव्हा निरव बोलतो.
"अगं तू घेतलीस ना कॉफी..”
"अरे यार मला भेटेल तेवढी कमीच आहे कॉफी..." मृणाल बोलते आणि वेटर कॉफी घेऊन येतो. निरव त्याला पुन्हा ऑर्डर देतो. केक आणायची,
"क्या बात है आज केक वगैरे क्या चक्कर हैं..." मृणाल बोलली.
"कुछ नहीं यार खूप दिवस झाले आपली भेट नाही काही नाही. केवळ फोन वरच कॉन्टॅक्ट सुरू होता. आज वेळ भेटला तर भेटावं आणि थोडं बोलायचं पण होतं... निरव बोलला.
"रोज नाही बोलत का? अरे पागल सकाळी आपण १ तास बोललो," मृणाल बोलली.
"अगं समोर बोलणं वेगळं आणि जरा स्पेशल बोलायचं आहे जे बोललो नाही...” निरव बोलला.
"ओह माय गॉड निरव अशी पण एक गोष्ट आहे तुझ्याबद्दल जी मला माहित नाही स्ट्रेंज यार...” मृणाल बोलली.
"काय यार तू मला एवढं ओळखते आणि ही साधी गोष्ट ओळखता नाही आली तुला?" निरव बोलला.
"कोणती गोष्ट?" मृणाल बोलते. तेवढ्यात वेटर केक घेऊन येतो आणि निरव केक घेतो.
मृणाल पुन्हा विचारते, "कोणती गोष्ट?"
"अगं काही नाही तू केक खा खूप मस्त आहे..." निरव बोलतो. मुळात त्याला टेन्शन आलेलं आहे की कसं बोलावं आणि काय बोलावं आणि तो तिला वेगळ्या बोलण्यात गुंतवून ठेवतो. दोघंही खूप वेळ बोलतात,
"निरव चल वॉक करूया बसून खूप बोर होतं रे.." आणि दोघं चालत निघतात आणि छान गार वारा सुटलेला असतो. आकाशात मस्त गोड चंद्र जसा हसत आपल्याकडे बघतोय असं वातावरण... रस्त्यावर कोणी नाही, फक्त हे दोघं बाजूला स्ट्रीट लाईट सुरू होते... निरवने चंद्राकडे पाहिले आणि गाणं गुणगुणू लागला...
”तोच चंद्रमा नभात तिच चैत्र यामिनी एकांती मज समीप...”
मृणाल एकटक त्याच्याकडे बघत होती अन् अचानक निरवने गाणं थांबवलं अन् तिच्याकडे बघू लागला आणि बोलला,
"हॅलो काय झालं...”
ती पण जागेवर आली आणि बोलली, “किती छान गातोस रे तू... गा ना अजून थोडं...”
आणि निरव थोडासा हसून पुन्हा गाऊ लागला... दोघे बरेच पुढे आले होते, आता त्या मंद वाऱ्यामधून तुषारही वाहू लागले होते. कदाचित पाऊस येणार याची ती चाहूल असावी आणि अचानक एक बारीक सर आली. निरव आजूबाजूला आडोसा शोधू लागला, तेवढ्यात मृणालने त्याचा हात पकडला आणि तो आणि ती न काही बोलता हात धरून त्या सरीत भिजत चालले होते.
दोघेही भिजत होते पण नि:शब्द होऊन हातात हात धरून चालत होते. दोघांना जराशी कल्पना नव्हती पावसाची, त्या सरींची. ते फक्त चालत होते आणि आता मृणाल गाऊ लागली, “भिजून गेला वारा हा बेभान झाली हवा हा घेऊन पाऊस ओला...” आणि तेवढ्यात निरव गातो, "ये ना जरा तू ये ना जरा मिठीत अलगद घे ना...” आणि दोघेही आता गाणे गात होते. मुळात दोघांना काय बोलायचे होते हे कळले होते एकमेकांना. तेवढ्यात मृणाल थांबली आणि निरवच्या समोर आली. त्याने तिच्याकडे पाहिले, तिनेही पाहिले. फक्त पावसाचा आवाज आणि मृणाल ने त्याला मिठी मारली त्यानीही घट्ट तिला धरले आणि गाऊ लागला, "शब्दावाचून कळले सारे... शब्दांच्या पलिकडले ते शब्दांच्या पलिकडले...”
तो थांबला गायचे त्याने घट्ट डोळे मिटले तिने ही घट्ट डोळे मिटले अन् ती बोलली, “एवढ्या गोष्टीसाठी निरव तू गेली १ वर्ष आणि आत्ताचे २ तास वेळ घेतला हॉटेलमध्ये बोलला असता, कदाचित मी नकार दिला असता...”
"पण मी कुठे काय बोललो...” निरव बोलला.
"तेच ना तू काहीच नाही बोलला त्या चंद्रमाला पुढाकार घ्यावा लागला एवढं सर्व वातावरण निर्मितीसाठी त्यालाही अन् मलाही ठाऊक होतं तू कधीच नाही बोलणार...” मृणाल बोलली.
"तुला ठाऊक होतं?" निरव बोलला.
"वेड्या, अशी कोणती गोष्ट आहे तुझ्याबद्दल जी मला माहित नाही सांग...” मृणाल बोलली.
"अरे यार कसं काय कळत गं तुला सर्व माझ्या मनातील डोक्यातील सर्व...” निरव बोलला.
"त्याला डोकं लागतं...” मृणाल बोलली.
"अच्छा...” अन् अचानक त्याला कळत ही आपल्याला काही बोलली. आणि मृणाल त्याला सोडून धावू लागते.
"थांब जरा थांब तू म्हणजे मला डोकं नाही का?"असं बोलून निरवही धावू लागतो.
मृणाल हसत हसत धावत बोलते, “अरे ते असतं तर माझ्या मनातील गोष्ट तुला केव्हाच कळली असती...” आणि ती धावते अचानक निरव तिचा हात धरतो आणि तिला जवळ ओढतो... अगदी जवळ...
पाऊस अजून सुरूच असतो. पावसाच्या धारा यांना एकमेकांमध्ये भिजवत होत्या. दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघत होते, सुन्न सर्व... पावसाचा आवाज... आता तर लाइट्स पण गेल्या होत्या. सर्व काही परफेक्ट घडत होतं... संपूर्ण अंधार आणि फक्त त्या चंद्राचा प्रकाश, त्यात पाऊस... दोघेही चिंब भिजलेले मृणालने नकळत डोळे बंद केले... नकळत एकमेकांचे ओठ जवळ आणि एकमेकात समरस झाले दोघेही एकमेकांमध्ये आकंठ बुडालेले आणि अचानक लाइट्स सुरू होतात दोघे एकमेकांकडे बघून हसतात अन् लाजत मृणाल त्याला मिठी मारते,
"मॅडम, किती भिजलीस तू आणि वेळ ही झालाय निघुया आता...” निरव बोलला.
"अरे यार ठीक आहे चल...” आणि दोघे हातात हात पकडुन बाईकपर्यंत पुन्हा जातात आणि बाईकवर बसून निघतात आणि मृणालला तो घरी ड्रॉप करतो आणि बोलतो."आता पुढील भेट?"
"गरज आहे भेटायची म्हणजे कॉल वगैरे आहेत की खूप झालं तर व्हिडिओ कॉल कर ना..." मृणाल असं बोलते आणि हसत हसत घरी निघते निरव पण हसतो आणि घरी जातो.
आई दार उघडते, “किती भिजलास रे...” निरवची आई बोलते.
"अगं आई अचानक पाऊस आला ना...” निरव बोलला... तेवढ्यात समू बोलते, “भिजू दे आई भिजू दे त्याला...” असं बोलून ती हसत निघून जाते आणि निरव पण फ्रेश होऊन रूममध्ये जातो आणि समू येते आणि निरवला बोलते, “दादा काय झालं सांग ना हो बोलली का?"
"अरे क्या बताऊ तुझे क्या?"निरव बोलतो.
"नको सांगू कळलं सर्व..." समु बोलते आणि निघते आणि दारात जाऊन बोलते, “म्हणजे चला मी आई अन् बाबाला सांगायला मोकळी की सून शोधू नका...” आणि जाते.
"अबे सांगू नको ही पण ना असू दे काही असो आज जे काही झालं खूप खूप गोड होतं..." आणि त्याच विचारात झोपून गेला.
आता सतत दोघांचे बोलणे - भेटणे सुरू होते. एकमेकांना वेळ देणे अगदी सर्व छान सुरू होतं... जवळ जवळ ६-७ महिने झाले होते. मुळात दोघांमध्ये कोणतेही भांडण नाही. एक दिवस मात्र संध्याकाळी ऑफिसवरून सुटी झाली होती आणि त्याच्या कलिगसोबत निरव बोलत होता तेवढ्यात त्याला घरून फोन आला बाबांचा,
"निरव असेल तिथून आता लगेच घरी ये काही कारण न देता...” अन् बाबांनी फोन ठेवला.
बाबांचा आवाजाचा रोख खूप होता, काय घडलं असेल. याला मात्र टेन्शन आलं, “कदाचित मृणाल आणि माझ्याबद्दल काही कळलं का?" त्याने मृणालला फोन केला मात्र ती पण फोन उचलायला तयार नाही. तो सर्वांची रजा घेऊन घराकडे निघाला. कदाचित मृणाल आणि माझ्याबद्दल कळले याची त्याला दाट शंका येऊ लागली.
तो घरी पोहचला, समूने दार उघडलं. तिचा चेहरा पण गंभीर होता आणि तिने दादाकडे पाहिले आणि नजर खाली केली. तो घरात गेला. बाबा घरात घिरट्या घालत होते आणि मृणालचे आई-वडील पण बसलेले होते. वातावरण अतिशय गंभीर होतं. आई यांच्याकडे बघत होती. बाबांनी याच्याकडे पाहिले. ते थांबले.
तेवढ्यात निरव घाबरत बोलला, "बाबा काय झालं?"
"हे तू मला विचारतो?" निरवचे बाबा बोलतात.
"तसं नाही बाबा?" निरव बोलला.
"मग कसं... थांब... तरी सांगतो... बोलाव गं त्या पोरीला?" बाबा बोलतात आणि निरवच्या पायाखालची जमीन हलते आणि आतील रूममधून मृणाल बाहेर येते. तिची नजर खाली असते. निरव कोणताही विचार न करता थेट तिच्यासमोर जाऊन उभा राहतो आणि बाबांना बोलतो, "बाबा मी सांगणार होतो... मृणालची काही चूक नाही मुळात माझं खूप प्रेम आहे तिच्यावर आणि तिचंही...” असं पटकन तो बोलून जातो. आता घाबरत उभा असलेला निरव मृणाल येताच अचानक वीज संचारावी असा बोलून बसतो. बाबा पुढे त्याच्या जवळ येतात. नक्कीच काही घडेल या विचाराने निरव आपले डोळे बंद करतो. १ मिनिट काही घडत नाही तो अलगद घाबरत आपले डोळे उघडतो, तर मृणाल, बाबा, आई, समू, मृणालचे आई-बाबा सर्व समोर उभं राहून हसू लागतात. मुळात निरवला कळत नाही नेमके काय घडले हे, “एक मिनिट हे काय होतं सर्व काय होतं?"निरव बोलतो.
बाबा पुढे येतात, "अरे तू मला बोलला नाही हिच्याबद्दल... मग काय आम्हाला प्रश्न पडू लागला की काय झालंय याला... सध्या लक्ष नाही, सतत आनंदी घरात कमी फोनवर जास्त असतो... तर समूकडून तुझी थोडी माहिती काढली आणि हे सर्व केलं... अरे वेड्या काय तू एवढ्या गोड पोरीला लवपून ठेवलं...” अलगद निरवचे डोळे ओलवतात आणि मृणालचे बाबा बोलतात, "आम्हाला मृणालच्या बाबतीत पण असंच काहीच वाटलं... मग आम्ही तिला विचारलं आणि तिने थेट सांगितलं... त्यानंतर संपर्क साधला व हे सर्व प्लॅन केलं... कसं होतं..”
"अहो काय कसं होतं जीवच गेला असता... आई मला पाणी देतेस का?" निरव बोलतो.
"मग मृणालचे बाबा साखरपुडा केव्हा करायचा...” निरवचे बाबा बोलतात.
"तुम्ही बोलाल तेव्हा...” मृणालचे बाबा बोलतात. तेवढ्यात मृणाल जवळ येते निरवच्या कानात बोलते, “बघ हे पण तुला जमलं नाही ते पण मीच केलं...” आणि दोघे बघून हसू लागतात एकमेकांकडे.......
समाप्त