शाळा अन् शाळेतलं पाहिलं प्रेम - भाग २
शाळा अन् शाळेतलं पाहिलं प्रेम - भाग २
मला पण माहित नव्हतं की नकळत कधीतरी मी पण तिच्या प्रेमात पडेन.... (भाग १ )
मुला-मुलींच्या बेंचची रांग वेगवेगळी होती. कधी मुलांमध्ये, तर कधी मुलींमध्ये बसण्यावरून वाद व्हायचा. मग एक दिवशी सरांनी तो वाद मिटवला. तो असा,एक एक दिवस पुढे सरकून बसायचे. मला बेंच मोजावे लागत असायचे, ती बाजूच्या बेंचवर कधी येईल. मी ते बेंच रोज मोजायचो. बघ माझी वहिनी आली आली म्हणता म्हणता बघ तुझी वहिनी आली मित्र बोलला हे कधी झालं समजलंच नाही. दोन खास मित्रांपैकी एक गावातलाच होता आणि एक दुसऱ्या गावाचा. अमर-अकबर- अँथनीसारखी जोडी झाली होती आमची. दोघेपण शाळेत आलेले नसले की थोडं एकटं वाटायचं. दुसरे मित्र होते पण त्यांच्यावर जेवढा जीव होता तेवढा नव्हता.
दुपारी जेवणाची वेळ झाला की पटकन घरी यायचो. पटापट जेवून बाहेरच्या खोलीत बसायचो. घराच्या बाजूलाच दुकान होतं. तिला दुकानाकडे जाताना पाहायचो. इतकंच नव्हे तर शाळा सुटल्यावर काही ना काही कारणानें ती जाते त्या रस्त्याच्या बाजूला थांबायचो. कधी सायकलीच्या गॅरेजमध्ये, कधी मित्राच्या घरामध्ये, तर कधी कधी शेताकडे जाण्याच्या कारणावरून तिला पाहायचो.
आठवीतला एक प्रसंग आठवतो... एका मित्रानं टाईमपास म्हणून एका मुलीला पत्र लिहलं. त्या मुलीने डायरेक्ट सरांना सांगितलं. सरांनी मस्करी करत करत त्याला मारले. एका मित्रानं नववीला असताना मला सांगितलं की तिने हाताची नस कापून घेतली. तो तर माझी मस्करी करत होता. मला ते खरंच वाटलं म्हणून घरी जाऊन जे काही मनात असेल ते वहीच्या पानावर लिहून काढलं पण ते लिहून त्याच वहीत ठेवलं. ती वही मस्करी केलेल्या मित्राचीच होती. खरंतर ते मित्रांनी फाडून टाकून दिलं होतं, पण तो मला दररोज चिडवायचा. शाळेमध्ये मित्रांमधे काही ना काही कारणांवरून भांडण, मारामारी व्हायच्या. मग अबोल. काही दिवस नंतर मित्रच सगळे सुरळीत करायचे.
आम्ही त्रिकुट कारणाशिवाय मुलींशी बोलत नसायचो. सरांशीसुद्धा संबंध चांगले होतें. एक सर तरुणच होते. ते रोज गाडी बदलत असायचे. एक दिवस मित्राच्या सायकलीवरून शाळेकडे जायला निघालो होतो. सर बाईकवर होते. आजूबाजूला आवाज होता. तेवढ्यात मी सरांना बोललो, दुसरी गाडी काय विकून खाल्ली का? त्यांनी ते ऐकलं नाही... माझं नशीब. पण मित्रानं ते ऐकलं होतं मग दोघे हसत हसतच शाळेला गेलो. आठवीला शाळेमध्ये गॅदरींग होतं. त्या दिवशी सरांनी " देवयानी " मालिकेतल्या संग्राम सारखा ड्रेस घातला होता. तेव्हा त्यांना बघून मी म्हणालो, संग्राम ड्रेस मस्त सर..सर हसत हसतच समोरून गेले.
बघता बघता आठवी, नववी निघुन गेली. तिच्याकडे बघायला, बोलायला कारणे शोधायला लागत असे. वर्गात गावामधील एक मैत्रीण होती. खूप हुशार काही अभ्यासामध्ये अडलंनडलं की तिच्याकडे जायचो. काही संकोच न करता समजून सांगायची. एका मित्राला फोनवर आवाज बदलुन बोलायला आवडत असे. त्याच्या कडे तिच्या मैत्रिणीचा नंबर होता. एक दिवस टाईमपास करत असता मला त्याने दिला. दोघे सोबतच होतो त्याने तिला फ़ोन लावला आणि आवाज बदलून तो बोलू लागला. तो दिवस आठवला कि अजुनपण हसायला येतं.तिचा नंबर मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केला पण कधी मिळाला नाही. वेड मन कधी कधी गुगलवर तर कधी फेसबुकवर शोधायचं. दहावीच्या परीक्षेचा फॉर्म भरताना तिचा नंबर पाठ होता होता राहिला, राहिला तो पण अर्धवट. दहावीच्या परीक्षेला ती माझ्या बाजूच्या लाईनमध्ये बसायची. दहावीचा शेवटचा पेपर होता. पेपरमधल्या जोड्या जुळवा तिनंच सांगितलं होतं. पण आयुष्याची जोडी कधी जुळवता आली नाही.
पेपर संपले. मग सुट्टी चालू झाली. शाळा बंद होती त्यामुळे तिचा संपर्क होत नव्हता. मी सुट्टीमध्ये बाहेरगावी गेलो. नंतर शिकायला पण बाहेरगावीच. त्यामुळे २ वर्ष तिची भेट नव्हती, फ़ोन नव्हता. दोन वर्षांनी जत्रेच्या निमित्ताने गावी गेलो होतो. तेव्हा तिची भेट झाली. ती मैत्रिणी सोबत जत्रा फिरत होती. मी काही कारणाने माझ्या घरी गेलेलो. नंतर जाऊन जत्रेमध्ये खुप शोधलं पण ती जत्रा फिरून निघुन गेली होती. जत्रा संपल्यावर पुन्हा बाहेर गावी. अधूनमधून गावी जातो, पण कधी तिची भेट झाली नाही. एप्रिल- मे म्हटलं की लग्नांचे महिने. एक दिवस मित्राने फोटो पाठवला. तो होता तिच्या लग्नाच्या पत्रिकेचा. तेव्हा थोडं मन कासावीस झालं होतं. मे मध्ये कॉलेजला सुट्टी पडली होती. गावी गेलो होतो.घरामध्ये आलेल्या जेवढ्या पत्रिका होत्या तेवढ्या पत्रिका शोधल्या. नंतर तिची पत्रिका सापडली. ती लग्न होऊन निघून गेली. पण मनातून, हृदयातून कधी निघून गेलीच नाही. पत्रिकेचा फोटो अजुनसुद्धा माझ्या फ़ोनमध्ये आहे. एवढंच नाही तर पासवर्डसुद्धा तिच्या नावाचा आहे.
एखाद्या मुलीकडे बघतो तेव्हा तिच्यामध्ये तीच दिसते. हे प्रेम एकतर्फी होतं. मनातलं तिच्याबद्दलच प्रेम, भावना सांगण्याची कधी वेळच आली नाही. मनातल्या भावना फक्त ओठापर्यंतच यायच्या. काही दिवसांपूर्वी एका मित्राने शाळेमध्ये असताना झालेल्या गॅदरींगचे काही व्हिडिओ पाठवले, त्यामध्ये ती होती. तिला पाहून या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.

