शाळेचा पहिला दिवस..!
शाळेचा पहिला दिवस..!
(रात्रीचे सुमारे नऊ-साडेनऊ वाजले होते)
आई... लवकर जेवुस वाढ... लवकर झोपायचं हाय, सकाळी लवकर उठायचं हाय...
आज काय झालंय तुला?? दिवस कुठे उगवलाय आज ?? (लॉकडाऊन मध्ये अकरा- बारा ठरलेली झोपेची वेळ)...
मला काय होवुस न्हाय गं... उद्यापासून शाळा चालु होणार हाय, शाळेस जाऊस पाहिजेत...
बरं... जेव आणि झोप...
( जेवून झाल्यावर दप्तर हुडकून, दप्तरात कंपास आणि एक वही भरता भरता...)
आई शाळेची पॅन्ट अन् शर्ट धुवून टाक जरा.. काल लेवलेलो...
दिवसभर कुठं गेल्ल्यास...?? उद्या शाळा चालू होणार हाय म्हंजे आठवण आली तुला...आतं सकाळी धुवून टाकतो शाळेस जाईपर्यंत वाळेल...
सकाळी वाळोस नसली तर नसती पंचायत व्हायची... आतंच धुवून टाक... सकाळपर्यंत वाळेल...
लई कामाचा तिया... टाकतो घे धुवून...
हा... आठवणीन धुवून टाक... अन् सकाळी लवकर उठीव... काय बी करून...
दोन-हाका मारल्या तरी तू उठत न्हाईस अन् आता तुला सवयचं झालेय दहा-अकरा वाजता उठायची...
ते काय बी असुदे... लवकर उठीव मला म्हंजे झालं...
चल झोपतो...
Gn...
(सकाळचे पावणे दहा वाजले होते...)
आई भांडी घासत होती... माझे जिवलग मित्र आक्या (आकाश) अन् भैया माझ्या घरी येऊन आईला विचारत होते... ( तू विचारतोस की मी विचारू म्हणतं म्हणतं आकाश न आईला विचारलं)
काकु... नारायण हाय काय ??? (सरांसमोर आणि घरच्यांसमोर आदराने पूर्ण नाव घेऊन बोलायचं... बाकीच्या वेळी " नाऱ्या " ठीक आहे 😂)
हाय बघ घरात...
आज शाळेस येन्हाय व्हयं..??
अजून हाथरूणातच हाय रे...!! आप्पा... अजून उठोस न्हाय ते...
बघ त्या पडवीत झोपलय...
(दोघेही मी झोपलेल्या ठिकाणी आले. आणि मला कसं उठवायचं त्याबद्दल दोघांमध्ये बोलणं चालू होतं आकाश माझ्या अंगावरची चादर ओढणार म्हणजे भैया बोलायला लागला..)
आक्या.. थांब.. तसं उठवू नको त्याला... दोन-चार लाथा घालूवा न्हायतर पाणी ओतुवा...
नको रे... उगाच गाळी खाऊस लागतील...
(आकाश माझ्या अंगावरची चादर ओढत ओढत बोलायला लागला...)
उठा शेट... आज शाळेस येत न्हाईसा काय ?? (डोळे चोळत चोळत )...
भैया... एवढ्या लवकर कशास जाऊल्याशीत??
लेका दहा वाजोस आले.. आणि लवकर म्हणे...
काय सांगूल्यासाय...
घड्याळात बघ की किती वाजले...
व्हय रे... तेच्या आयला ..लईच टाईम झाला नी...
(अंथरून घडी करून ठेवलं आणि टीव्ही चालू करून दिली)
आक्या.. टीव्ही बघा.. आलो पाच मिनटात...
लवकर ये...
(तयार होऊन चप्पल घालता घालता)
आई... सकाळी लवकर उठीव म्हटलो नव्हे... उठवुस का न्हाईस??
दोन वेळा उठीवलो तुला... परतोन परतोन झोपल्यास...
जाऊ दे ... येतो गं... ( येतो म्हणतं शाळेकडे जायला तिघेही निघालो)
(शाळेकडे जाताना बोलता बोलता मी
विचारलं...)
मी :- आक्या... आज दिवसभर शाळा घेतील काय ??
आक्या :- न्हाय रे... आज पहिला दिवस हाय लवकर सोडतील...
( क्षणाचाही विलंब न करता भैया बोलला)
भैय्या :- तुला लेका... जाऊच्या आधीच... घराकडे येतली घाई... शाळेस कशास येउल्यासाय झोपल्यास तसं बी झोप जा घरात जाऊन
मी :-फक्त विचारलो रे भैया...
आक्या:- कश्यास भांडोल्याशीत... लवकर लवकर चला...
भैय्या :- तुला लईच घाई शाळेस जाऊस... वयनी येणार हाय काय??
मी :- येत असेल म्हणून याला घाई लागले...
आक्या :- कोण वयनी?? कुणाबद्दल बोलोल्याशित...
मी :- कुणाबद्दल न्हाय घे...
(बोलत बोलत आम्ही शाळेत आणि वर्गातही पोहचलो नंतर परिपाठ, परिपाठानंतर फुलं देऊन सगळ्या मुलांचं स्वागत करण्यात आलं आणि नंतर पहिला तास सुरू झाला, भैय्या आणि मी एकाच बेंच वर बसलेलो आणि आकाश आमच्या पुढच्या बेंचवर बसलेला, आकाश सारखं मागे मागे बघत होता तेवढ्यात भैय्या बोलला)
भैय्या :- पुढे बघ की... सारखं मागे मागे काय आहे?? सर काय शिकवुल्यात ते बघ...
मी :- अरे मागे काय हाय म्हंजे... तिकडे बघ डाव्या बाजूस मागून तिसऱ्या बेंच वर वयनी बसले...
भैय्या :- व्हय रे... तरीच म्हटलो... सरांचा हुशार विद्यार्थी सारखं सारखं मागे का बघुलाय...😂...
मी :- गप्प बसा रे...सरांनी बघितल्यानी तर तिघांसनी बी वर्गाबाहेर जाऊस लागेल...
( एका मागोमाग सगळे तास संपले शाळा सुटली आणि आम्ही तिघेही एकत्र शाळेतुन निघालो)
भैय्या :- आक्या, नाऱ्या लवकर लवकर चला नंतर घरी पण लवकर जाऊस पाहिजेत...
मी :- जाऊवा घे रे... एक काम करू आक्यांच्या घरात दप्तर ठेऊन धरणाकडे जाऊ आणि येतान धबधबा बघून येऊवा...
( दुपारचे दोन वाजले होते)
आक्या :- चालतंय... तसंच करुवा...
( धरणाकडे जायचं तास चालू असतानाच आमचं ठरलेलं. ठरलेलं तसं धरणं बघितलं थोडस पोहून येताना धबधबा बघुन घरी जायला निघालो)
***
शाळेचा पहिला दिवस असो वा शेवटचा प्रत्येक दिवस खास असतो.
