त्या रात्री खूप पाऊस होता
त्या रात्री खूप पाऊस होता
बेल वाजली आता संध्याकाळी कोण आलं म्हणून बघायला तो गेला तर दारात एक सेल्स गर्ल उभी होती हातात भल्या मोठ्या बॅगा होत्या,एकेक गृहोपयोगी वस्तू ती दाखवत होती. त्याला त्या वस्तू घेण्यात इंटरेस्ट नव्हता तरी मदत म्हणून त्याने एक वस्तू विकत घेतली. तशी ती उत्साहाने दुसऱ्या बॅगेतील वस्तू दाखवू लागली,आता त्याला कंटाळा यायला लागला.
“नको मॅडम मी एकच वस्तू घेतो आणखी नको”,तो
“घ्या न सर आज टार्गेट पूर्ण केलं नाही तर मला पैसे मिळणार नाही, किराणा ही आणायचा आहे आज, वस्तू विकता विकता संध्याकाळ ही झाली.”,सेल्सगर्ल काकुळतीने म्हणाली
“द्या मॅडम तुम्ही एवढं म्हणताच तर हे भांडे घासण्याचे साबण द्या आणि बाथरूम क्लिनर ही द्या”,असं त्याने म्हंटल व सगळ्या घेतलेल्या वस्तूंचे पैसे दिले.
“माफ करा सर,तुम्हाला वाटेल काय चेंगट बाई आहे पण हे एवढं फीनाईल जर तुम्ही घेऊ शकलात तर फारच बरं होईल”,सेल्सगर्ल नी तीच घोडं पुढे दामटलं.
“द्या मॅडम, पुढचे तीन महिने तरी मला आता काही सामान घ्यावे लागणार नाही”,तो म्हणाला.
बोलण्या बोलण्यात अंधार पडला आणि जोराचा मुसळधार पाऊस सुरू झाला तशी ती सेल्सगर्ल टेन्शन मध्ये आली आणि बाहेर उभं राहून पाऊस थांबण्याची वाट बघू लागली.
बराच वेळ झाला, पाऊस थांबण्याचे चिन्ह दिसेनात,त्याचं सहज दाराकडे लक्ष गेलं,सेल्सगर्ल अजूनही तिथेच होती पाऊस थांबण्याची वाट बघत.
“अरे! तुम्ही अजूनही इथेच,तुमच्या बॅगेतल्या सगळ्या वस्तू मलाच विकण्याचा विचार नाही न तुमचा”,तो हसत म्हणाला.
“नाही हो, खूप जोरात पाऊस पडतोय न खाली, एकही ऑटोरिक्षा नाहीये आणि माझं घरही लांब आहे,कसं जाणार याच विचारात पाऊस कमी होण्याची वाट बघतेय मी पण पाऊस तर आणखीनच जोर धरतोय.”,सेल्सगर्ल चिंतायुक्त आवाजात म्हणाली.
"पाऊस थांबेपर्यंत तुम्ही घरात बसू शकता खुर्चीवर”,तो
“नको, पाऊस थांबल्यावर जाता येईल लवकर बाहेरच्या बाहेर.”,सेल्सगर्ल
“ठीक आहे, घरी सांगितलं न ,घरचे वाट बघत असतील तुमचे”,तो म्हणाला
“घरचे गावी असतात इथे मी लेडीज हॉस्टेल मधें राहते”,सेल्सगर्ल
“अच्छा, बघा काही मदत लागली तर सांगा”,असं म्हणून तो घरात जाण्यासाठी वळला तेवढ्यात ती म्हणाली,”घरात दुसरं कोणी नाहीये का?”
“नाही मी एकटाच राहतो इथे,पाणी वगैरे हवं का तुम्हाला”,तो म्हणाला
“हो थोडं पाणी मिळेल तर बरं होईल , मी आणली होती पाण्याची बाटली पण आता त्यातलं पाणी संपलंय”,ती
“हरकत नाही मी देतो पाणी ,तुमच्या जवळची बाटली ही भरून घ्या”,असं म्हणून त्याने तिला एक लोटी भरून पाणी दिलं.
विजा कडकडायला लागल्या, पाऊस फारच वाढला, सेल्सगर्ल ची अस्वस्थता वाढली. बाहेर थंडी वाढू लागली.
“हे घ्या मॅडम हे थोडं खाऊन घ्या,रात्र बरीच झालीय,तुम्हाला भूक लागली असणारच, आणि ही शाल घ्या थंडी वाढतेय”, तो म्हणाला
“Thank you, तुमचे कसे आभार मानावे कळत नाही”,ती म्हणाली.
“आभार नका मानू त्याऐवजी ही sleeping bag घ्या कॅम्प ला मला छान उपयोगी पडते ही,तुम्हाला झोप येईल तेव्हा या स्लिपिंग बॅग मध्ये तुम्ही बिनधास्त झोपु शकता. आणि हो,मी एकटा जरी असलो तरी अगदी एकटा नाही बरं, माझ्या जवळ संस्काराची शिदोरी आहे तेव्हा तुम्ही निर्धास्त असा, तुम्हाला बाहेर सुरक्षित वाटते तर बाहेरच राहा,काही मदत लागली तर निःसंकोचपणे सांगा”,असं म्हणून तो आत घरात आरामखुर्चीत बसून खिडकीबाहेर पाऊस बघत राहिला.
पहाटे पहाटे कधी त्याचा डोळा लागला हे त्याला कळलंही नाही,मोलकरणीच्या कर्कश्श आवाजाने त्याला जाग आली. “ओ साहेब दार उघडं टाकून कशापायी झोपले तुमी?”
एकदम त्याला काल रात्रीची आठवण झाली,तो बाहेर सेल्सगर्ल ला बघायला आला तर ती तिथे नव्हती,स्लीपिंग बॅग जवळ एक चिठ्ठी होती,त्याने ती उघडून वाचली,
'सर,काल च्या रात्री तुम्ही मला देवासारखे भेटलात,म्हणून कालची कठीण रात्र निभावली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, माझ्या सारख्या अडचणीतल्या प्रत्येक बहिणीला तुमच्या सारखा भाऊ मिळो ही ईश्वर चरणी मी प्रार्थना करते.’
“काय बाई! साहेब काय खूळ लागल्यावानी कराय लागले दार सताड उघडं ठिउन झोपले आन एवड्या पावसाचं ह्या पोत्यात(स्लीपिंग बॅग कडे बघून) जाऊन भाइरच झोपले, कमाल हाय बाई!”,असं मनाशीच पुटपुटत मोलकरीण कामं करू लागली.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
