STORYMIRROR

Madhuri Vidhate

Comedy

3  

Madhuri Vidhate

Comedy

सेकंड होम

सेकंड होम

8 mins
242

         मस्त थंडी पडली होती .मी गुडुप झोपलो होतो‌. सातचा अलार्म झाला पण तो बंद करून मी पुन्हा झोपलो. तेवढ्यात रेखा आली आणि खसकन अंगावरचे ब्लॅंकेट ओढत म्हणाली, 

"अहो , काय हे , खुशाल अलार्म बंद करून परत झोपताय , उठा की आता. "

 ब्लॅंकेट पुन्हा अंगावर ओढून घेत मी म्हणालो,

 " काय गं तू , एवढी वर्षं धावलो ना नोकरीमागे , आता रिटायर झालोय तर झोपू दे की सुखानं ."

यावर समजुतीच्या सुरात रेखा म्हणाली, 

"अहो, पण आज पिंपळगावला जायचंय ना आपल्याला ? तुम्हीच एवढे दिवस जमीन घ्यायची म्हणून नाचतानाय ना ! एकदाचं करूयात सगळं फायनल. एवढे फंडाचे पैसे नीट गुंतवले की झोपा हवं तेवढं . "

      शेतातलं माझं सेकंड होम डोळ्यासमोर आलं , तसा मी पटकन उठलो. भराभर आवरुन पार्किंगमधून मोटरसायकल बाहेर काढली. ते बघून रेखानं आश्चर्याने विचारले,

" अहो , एवढ्या थंडीत मोटरसायकल कशाला? एवढं लांब जायचंय तर कारने जाऊयात की."

यावर मी म्हणालो,

" अगं, शेतापर्यंत कार नाही जाणार . जास्त चालायला लागलं तर पाय दुखतील तुझे. तसंही अशा थंडीत जोडीनं गाडीवरून जाण्यातली मजा काही आगळीच. मस्त मला बिलगून बस म्हणजे थंडी जवळ सुद्धा फिरकायची नाही . "

असं म्हणत मी बायकोकडे बघत डोळे मिचकावले. तशी पन्नाशी पार केलेली माझी बायको झक्क लाजली आणि म्हणाली,

" अहो, तुमच्या जिभेला काही हाड, सूनबाई आहे घरात ‌. तिने ऐकलं तर काय म्हणेल? तुम्हाला पण या वयात काय भलतंच सुचतंय ! " 

यावर हसून मी म्हणालो,

" अगं रेखाराणी , पण म्हणेल का कुणी तुला सून आली म्हणून . अजूनही विशीतली तरुणी दिसतेस. "

यावर लटक्या रागानं मान वेळावत रेखा माझ्या पाठीमागे गाडीवर बसली आणि आम्ही निघालो .

          सकाळचं कोवळं ऊन पडलं होतं. हमरस्ता सोडून गाडी कच्च्या रस्त्याला लागली. दुतर्फा हिरवीगार पिके डोलत होती. हवेत गारवा होता. वाऱ्याच्या झुळकीसरशी माझं मन काही वर्षं मागे गेलं.


       पिंपळगाव, माझा मित्राचं, संजयचं गाव . आम्ही दोघे कॉलेजमधले जिगरी दोस्त . होस्टेलचे रुममेट असल्याने सतत बरोबरच असायचो. एकमेकांवाचून पान हलायचं नाही आमचं . मात्र पुढे नोकरीच्या निमित्ताने वाटा वेगळ्या झाल्या. तो औरंगाबादला आणि मी मुंबईला सेटल झालो. भेटीगाठी विरळ होत गेल्या. अशीच वर्षामागून वर्षं गेली .आता रिटायरमेंटला एकच वर्ष राहिलं होतं.


      वर्षभरापूर्वी संजय गावी आल्याचे समजताच त्याला भेटायला मी पिंपळगावला आलो .पिंपळगावला संजयचं शेतातच कौलारू घर होतं. एकमेकांना बघताच आम्ही कडकडून मिठी मारली. किती वर्षांनी भेटत होतो आम्ही! दोघांच्याही डोक्यावरचं दाट काळंभोर जंगल नाहीसं होऊन तिथं मस्तपैकी हेलिपॅड तयार झालं होतं. हाताला धरून त्यानं मला झोपाळ्यावर बसवलं. दोघांनाही किती बोलू आणि किती नाही असं झालं होतं. समोरच्या शेतातली ज्वारीची ताटं वाऱ्यावर डोलत होती. पाटाचं पाणी झुळझुळत होतं. बांधावरची नारळीची आणि पपईची झाडं फळांच्या भारानं झुकली होती . गोठ्यात गोजिरवाणं वासरू आईला लुचत होतं. तसं माझं सगळं आयुष्य शहरात गेलेलं . असा निवांतपणा अनुभवून मन कसं पिसासारखं हलकं झालं.


       संजयच्या धाकट्या भावानं ,रमेशने काढून दिलेलं शहाळ्याचं अमृतासारखं गोड पाणी पिऊन मी संजयला म्हणालो,

"संज्या लेका, भाग्यवान आहेस बाबा ! निवृत्ती रिटायरमेंट नंतर इथं निवांत राहायला येशील तू. माझं मात्र तसं नाही. अरे, मला ना शेती ना वाडी. माझं सगळं आयुष्य गेलं मुंबईला. गडबडगोंगाट, लोकलची धकधक, प्रदूषण , जीव अगदी उबून गेलाय रे. रिटायरमेंट नंतर तुझ्यासारखं असं मस्त शेतात निवांत राहायला येऊशी वाटतंय मला "


       तसा संजय हसत म्हणाला, "अरे , पण आपल्या तालुक्याच्या गावी चांगलं मोठं घर बांधलंस ना तू. निवांत रहा तिथं मुलासुने सोबत. "

यावर मी म्हणालो,

"अरे ते घर आहेच की. पण शेजारी भाजीमंडई आहे तिथे. दिवसभर नुसता गडबड गोंगाट चालू असतो . असं वाटतं , तुझ्या या घरासारखंच मस्त एक सेकंड होम बांधावं शेतात. मनाला येईल 

तेव्हा चार दिवस येऊन निवांत रहावं. थोडं चिखलमातीत राबून बघावं. नातवंडांना मस्त हुंदडता येईल शेतात. "

यावर संजय उत्साहाने म्हणाला,

" खरंच येच तू इथं . दोघं मित्र शेजारीशेजारी राहून मस्त धमाल करूयात. "

 आमचं हे बोलणे ऐकून रमेश म्हणाला,

 " रवीदादा, काही काळजी करू नका. लवकरच मनाजोगती जमीन शोधतो मी तुमच्यासाठी "

यावर संजयला मस्तपैकी टाळी दिली मी. पोटभर गप्पा मारून, गावचा पाहुणचार घेऊन मी मुंबईला परत आलो. नोकरीचे रुटीन सुरू झाले. 


      त्यानंतर रमेशने मला बऱ्याच जमिनी दाखवल्या. मुंबईवरून सुट्टीत आल्यावर त्यानिमित्ताने पिंपळगावला सातआठ फेऱ्या झाल्या . पण अजून तरी मनासारखी जमीन काही मिळाली नव्हती. महिन्याभरापूर्वीच रिटायर होऊन आम्ही मुलासुनेसोबत तालुक्याच्या गावी राहायला आलो . तेवढ्यात रमेशचा फोन आला ,

," रवीदादा, आपल्या वावराशेजारीच वावर आहे चुलत भावाचं. पोरीचं लग्न करायचंय म्हणून विकतोय तो . चांगली काळीभोर जमीन आहे. बांधावर चार-पाच आंब्याची झाडे आहेत. मस्त टुमदार घर होईल तुमचं .उद्या सकाळीच या बघायला "


    उद्या सकाळी लवकर येतो असे रमेशला सांगून मी घरात ही बातमी दिली. निवृत्तीनंतर हातात आलेले माझ्या फंडाचे पैसे यानिमित्ताने नीट गुंतवले जातील . आणि निवांत राहायला घर पण होईल, या विचाराने सर्वांनी जमीन खरेदीला संमती दिली. ‌मुलाला रजा नव्हती म्हणून आधी आम्ही दोघांनी जमीन पाहून यायचं असं ठरवलं.त्यानुसार आज आम्ही निघालो होतो. शेतातल्या सेकंड होमचं स्वप्न पूर्ण होणार या आनंदात आम्ही पिंपळगावला कधी येऊन पोहोचलो ते कळलेपण नाही. 


     रमेशचा मुलगा शाळेत निघाला होता . बाबा गावातल्या डेअरीत दूध घालायला गेलेत , येतील तासाभरात . असं त्याने आम्हाला सांगितलं. आणि आई ग, काका आलेत बघ. असं आईला ओरडून सांगून तो शाळेत गेला. आम्ही दोघं तुळशीवृंदावनाच्या कट्ट्यावर टेकलो . प्रवासातून दमून आलो होतो. मोटरसायकलवर वाऱ्याने बायकोचे केस विस्कटले होते. अंगावरचा चुडीदार पार चुरगळला होता . दोघेही धुळीने गच्च माखले होतो. ओढणीनं चेहरा पुसत वैतागून रेखा म्हणाली,

 "तरी तुम्हाला म्हणत होते, कारने येऊ म्हणून ,पण तुम्ही महाहट्टी, ऐकाल तर शपथ, पाहिलंत ना काय अवतार झालाय तो ? " 


      मी काही बोलणार तेवढ्यात रमेशची बायको वंदना पाण्याचा तांब्या आणि चहा घेऊन आली. चहाचा कप देता-देता तिने रेखाकडे एकदा निरखून पाहिले. तिच्या चेहऱ्यावर गोंधळल्यासारखे भाव उमटले होते. चहा घेत आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली खरी . पण वंदना पुन्हा पुन्हा रेखाकडे टक लावून बघत होती .वंदना गावाकडे वाढलेली मोकळंढाकळं बोलणारी , शेतात राबणारी बाई . रेखाकडे पुन्हा एकदा निरखून बघत अचानक ती मला म्हणाली, 

" काय हो भाऊजी, मागच्या वेळेला तुमच्यासंगं वेगळ्याच बाई आल्या होत्या. पण ह्या बाई तर वेगळयाच दिसतात की ! "

 हे ऐकून रेखाच्या हातातला चहाचा कप एकदम हिंदकळलाच. ड्रेसवर चहा सांडला. तो पुसायचं देखील भान तिला राहिले नाही. अवाक होऊन ती माझ्याकडे बघायला लागली. या अनपेक्षित प्रश्नानं मी गडबडून म्हणालो,

" अहो वहिनी, काहीतरीच काय बोलताय, हिलाच घेऊन आलो होतो की मी मागच्या वेळी."

माझ्या या उत्तरावर वंदनाचं काही समाधान झालेलं दिसलं नाही. माझ्या बायकोला आपादमस्तक न्याहाळत ती म्हणाली,

" नाही हो भाऊजी , त्या बाई लई देखण्या होत्या. गोऱ्यापान ,निस्त्या नटीवानी दिसत होत्या .या नव्हत्या काही ."

 आता रेखा माझ्याकडे खाऊ कि गिळू अशा नजरेने पाहू लागली. आणि आवाज वाढवून म्हणाली ,

 " अहो , काय म्हणतायत वहिनी ? कोण होतं तुमच्या सोबत ? कोणत्या सटवीला घेऊन आला होता इथं ? "

 त्यावर मी सटपटून म्हणालो ,

" अगं नाही गं बाई, मी कुणाला घेऊन येणार ? आता साताठ वेळा जमीन पाहायला इथं येऊन गेलो खरा. पण तूच असशील ना सोबत . "

यावर आपलंच म्हणणं पुढे रेटत वंदना म्हणाली,

 " अहो, नाही हो ,या नव्हत्या त्या. किती छान भारीतली साडी नेसल्या होत्या त्या बाई. अंगावरले दागिने तर नुसते चमकत होते. त्या टीव्ही सिरीयल मधल्या बायका असतात ना तशा दिसत होत्या ."

 रेखा हे ऐकून रागाने दातओठ खायला लागली. तिचे डोळे नुसते आग ओकत होते . त्या आगीत ती मला जाळून भस्म करते की काय अशी भीती मला वाटायला लागली . मी खाली मान घालून बसलो होतो. माझ्या समोर कमरेवर दोन्ही हात ठेवून उभं रहात ती म्हणाली,

" तरी मला वाटतंच होतं, तुम्हाला अचानक एवढा गावचा आणि शेताचा पुळका कसा आला? सगळं आयुष्य मुंबईत गेलं आपलं आणि आत्ताच शेतात घर बांधून रहावसं का वाटतंय तुम्हाला ? तुमचं नक्कीच बाहेर काहीतरी चालू आहे. बऱ्या बोलानं सांगा मला, कोण होती ती बया? एकदा नाव तर कळू दे , नाही तिच्या झिंज्या उपटून हातात दिल्या , तर नावाची रेखा नाही मी. "


        आता मात्र थंडीतही मला घाम फुटला होता. डोक्यावरची कॅप काढून हातात घेत मी टकलावरचा घाम पुसत म्हणालो,

" मला खरंच नाही ग आठवत .‌ कदाचित आपल्या सूनबाईला निशाला घेऊन आलो असेल.आता इतक्या वेळा येऊन गेलो इथे. नाही येत लक्षात माझ्या. तुला तर माहीतच आहे ना माझा विसरभोळा स्वभाव! "

यावर दोन्ही हातांनी माझ्या समोर आरती ओवाळत रेखा म्हणाली,

"तर.... तर..., आव तर असा भोळ्या सांबसदाशिवाचा आणताय. जसा काही मी त्या गावचाच नाही . खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. पण मी पण चांगली ओळखून आहे बरं तुम्हाला . उगाच नाही एवढी वर्षें संसार केला तुमच्या सोबत. आता घरी तर चला मग तुम्ही आहे आणि मी आहे. "


       आमचा चढलेला आवाज ऐकून शेतात खुरपणी करणाऱ्या बायका हातातलं काम सोडून मजा बघायला आल्या. तोंडावर पदर घेऊन कुजबुजत एक बाई दुसरीला म्हणत होती,

" बया, दिसायला कसला साधाभोळा दिसतोय ह्यो गडी. तोंडावरली माशी बी उडायची न्हाय. पन करतूत बग की .पर म्या म्हंते, यवढी सोन्यासारकी बायकू आसताना कशापायी बाह्येर शेण खायाला जायचं? "

तशी डोक्यावरचा पदर सावरत दुसरी म्हणाली,

" आगं, आसंच असतया बाप्यामानसाचं. यांचं खायचं दात येक आन दाकवायचं दुसरंच. " 

तसं तिसरीने दुजोरा दिला,


" खरं हाय ग, माजा दादला बी आसलाच. घरचं सोडून बाहेरलंच ग्वाड लागतंय त्येला."

हे सगळं ऐकून तर मला धरती दुभंगून पोटात घेईल तर बरे असे झालं होते. मी खाली मान घालून देवाचा धावा करत होतो.

आता सगळा रागरंग बघून तरी या वंदनावहिनीने गप्प बसावे ना? पण नाही. तिचं आपलं तेच पालुपद चालू होतं. कुठून मला दुर्बुद्धी सुचली आणि नाचक्की करून घ्यायला इथे आलो असं मला झालं. पण आता माझ्या जगदंबेच्या तावडीतून काही सुटका नव्हती. सगळा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय आज काय ती गप्प बसायचं लक्षण दिसत नव्हतं. 

       संतापून बायकोने पुन्हा तिचा मोहरा वंदनाकडे वळवला आणि विचारलं ,

" का हो, कशी होती ती सटवी दिसायला? " 

वंदना ही तिखट-मीठ लावून सांगत म्हणाली, "अहो, चांगली गोरीपान होती. छान काठा पदराची साडी नेसली होती. नाकात टपोऱ्या मोत्यांची नथ होती ."

फणकारुन मानेला झटका देत रेखा म्हणाली ,

" बरं,बरं, पुरे झालं त्या महामायेचे कौतुक, एक सांगा मला वहिनी, नेमके कधी घेऊन आले होते हे तिला , कि दरवेळीच असायची ती सटवी यांच्यासोबत ? "

यावर वंदना वहिनी काय सांगते ते ऐकायला माझा सगळा जीव कानात गोळा झाला. हे सेकंड होमचे स्वप्न पहायच्या नादात आता माझं घरकुल मोडतंय की काय अशी भीती मला वाटू लागली. 

मोठं गुपीत सांगितल्यासारखं वंदना म्हणाली,

" तशी काही नेहमी नसायची ती बाई भाऊजींसोबत, पण या दिवाळीला घेऊन आले होते भाऊजी तिला. अहो, डबा भरून फराळाचं आणलं होतं. आणि पोरांना फटाके , तर केवढे आणले होते. त्यादिवशी वसुबारस होती म्हणून आमच्या गोठ्यातल्या या गायवासराची पूजा पण केली होती दोघांनी जोडीनं ."

       आता मात्र बायकोने डोक्यावर हात मारून घेतला, मटकन खाली बसत ती म्हणाली,

" अहो वहिनी, कमाल करताय तुम्ही! मागच्या वसुबारसेला यांच्यासोबत मीच आले होते की तुमच्याकडे. तेव्हा दिवाळीचा सण होता म्हणून छान काठापदराची साडी नेसली होती, दागदागिने घातले होते . कार मधून आलो होतो म्हणून छान दिसत होते मी . आम्ही दोघांनी जोडीने या गाय वासराला ओवाळले होतं. मीच होते की ती. "


         यावर वंदनाचा चेहरा एकदम हवा गेलेल्या फुग्यासारखा झाला .चहाचे कप उचलून तिने जी आत धूम ठोकली ते काही पुन्हा तोंड दाखवले नाही. खुरपणीच्या बायकांनी पण पाय काढता घेतला. 

       " झाली एवढी शोभा पुष्कळ झाली, चला आता घरी " असं म्हणत मी रेखाकडे संतापाने एक जळजळीत कटाक्ष टाकला. तशी खाली मान घालून ती मुकाट्याने गाडीवर बसली. सेकंड होमचे माझं स्वप्न तिथल्याच मातीत मी सोडून दिलं . आणि माझ्या फर्स्ट होमकडे सुसाट निघालो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy