Amruta Shukla-Dohole

Inspirational

3  

Amruta Shukla-Dohole

Inspirational

सदाचार.दैवी सम्पद्विमोक्षाय

सदाचार.दैवी सम्पद्विमोक्षाय

3 mins
135


गुरूचा निरोप घेण्याची वेळ आली आणि त्याचे डोळे पाणावले. तो म्हणाला, गुरुवर्य, आश्रमातून बाहेर पडताना माझे सगळे सहपाठी तुम्हाला काही ना काही भेटवस्तू, गुरुदक्षिणा देतायत. पण, माझ्यापाशी तुम्हाला देण्यासारखं काहीच नाही. मी अनाथ मुलगा. तुम्हीच मला या आश्रमात वाढवलंत. मातापित्यांची माया दिलीत. शिक्षण दिलंत. माझ्याकडे जे काही आहे, ते तुमचंच आहे. मी तुम्हाला आज काहीही देऊ शकत नाही. आज तुम्हीच मला एक वचन द्या. भविष्यात जेव्हा मी काही घेऊन येईन, तेव्हा त्या प्रेमभेटीचा तुम्ही अव्हेर करणार नाही.


गुरू म्हणाले, खरंतर प्रेमाच्या अश्रूंइतकी मोठी गुरुदक्षिणा दुसरी नसते. पण, तुझी इच्छाच असेल, तर मी नंतरही तुझी प्रेमभेट नाकारणार नाही.


मजल-दरमजल करत शिष्य दुसऱ्या राज्यात आला. तिथे त्याचा एक मित्र राहात होता. त्याला भेटून शिष्याने सांगितलं, मित्रा, मला माझ्या गुरूंना दक्षिणा द्यायची आहे. पाच मोहरा मिळाल्या, तर मी त्या लगेच त्यांना देऊन येईन आणि मग मोकळ्या मनाने पुढच्या मार्गाला लागेन.


मित्र म्हणाला, आज रात्र इथेच राहा. उद्या पहाटे जरा लौकर उठ आणि राजवाड्यात जा. रोज जो पहिला याचक येईल, त्याला भरघोस दान देण्याचा राजाचा परिपाठ आहे.


दुसऱ्या दिवशी शिष्य राजवाड्यात पोहोचला. राजा म्हणाला, तू पहिलाच याचक आहेस आजच्या दिवसातला. पहिल्या याचकाला तो मागेल ते देण्याचा माझा परिपाठ आहे. बोल तुला काय हवं आहे? काय हवं ते माग.


राजाच्या या उद्गारांनी शिष्याचं मन डहुळलं. राजा मागेल ते द्यायला तयार आहे आणि आपण फक्त पाच मोहरा मागणार? पाचाच्या जागी पाचशे मागू शकतो, पाच हजार मागू शकतो, पाच लाख, पाच कोटी, पाच अब्ज, खर्व, निखर्व... पाचावरची शून्यं वाढू लागली 

आणि मनात हळहळ दाटली की आपण आणखी गणित शिकलो असतो, तर आपल्याला यापुढचीही संख्या माहिती झाली असती, तेवढ्या मोहरा मागता आल्या असत्या.


शिष्य दुविधेत पडलेला पाहून राजा म्हणाला, तुझी अडचण मी समजू शकतो. नीट विचार करायला अवधी घे. मी बागेची एक चक्कर मारून येतो.


राजा परत येईपर्यंत शिष्याने विचार केला की आपल्याला कशाला हवी आहेत ही रकमांची झंझटं. राजा मागू ते द्यायला तयार आहे, तर त्याच्यापाशी आहे ते सगळंच मागून घेण्यास हरकत काय? त्याच्या अंगावरचे दोन कपडे आहेत, तेवढे ठेवावेत. तसे तेही फार मौल्यवान आहेत, पण राजाला नग्नावस्थेत तर राजवाड्याबाहेर काढता येणार नाही, ते बरं दिसणार नाही. त्यामुळे तेवढं ठेवावं.


राजा परत आल्यावर शिष्य म्हणाला, राजा, अंगावरच्या दोन कपड्यांनिशी आता तू राजवाड्याच्या बाहेर जा. हे दोन कपडे सोडून जे जे तुझं होतं, ते माझं झालं.


राजा म्हणाला, तुझा जीव या दोन कपड्यांमध्ये अडकलेला आहे, याची मला कल्पना आहे. त्यामुळे मी तेही तुला देतो आणि दिगंबर अवस्थेतच निघतो.


राजा घाबरेल, व्याकुळ होईल, आपल्याशी वितंडवाद घालेल, असं त्या शिष्याला वाटलं होतं. प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. उलट राजाच्या चेहऱ्यावर सुटकेचा आनंद दाटून आला आणि आकाशाकडे पाहात हात जोडून तो म्हणाला, आजवर ज्या याचकाची मी प्राणपणाने प्रतीक्षा करत होतो, तो आता आला आहे, परमेश्वरा! तुझी कृपा थोर आहे.


हे पाहिल्यावर शिष्यच घाबरला, म्हणाला, थांबा महाराज, मी गोंधळात पडलो आहे. मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे. हे राज्य, ही संपदा ही तुमची आयुष्यभराची कमाई आहे. ती तुम्ही इतक्या सहजतेने सोडायला कसे तयार झालात? तुम्ही माझ्यापेक्षा कितीतरी जास्त आयुष्य पाहिलंय. माझं आयुष्य तर आता कुठे सुरू होतंय. सगळं इतकं व्यर्थच असेल तर मी तुमचा बोजा आपल्या डोक्यावर कसा घेऊ? तुमचं सर्वस्व स्वीकारण्याआधी मला विचार करायला वेळ हवाय थोडा.


राजा म्हणाला, ठीक आहे. मी बागेची आणखी एक फेरी मारून येतो. तोवर नक्की काय करायचं ते ठरवून ठेव.


राजा परत आला तेव्हा त्याला जे अपेक्षित होतं, तेच दिसलं. तो युवक पाच मोहराही न घेता राजा पोहोचायच्या आधीच तिथून निघून गेला होता.


नैतिकतेने वागणे हे लौकिक जीवनातही आवश्यक असते. त्यावरच सुख समाधान शांती अवलंबून असते. तेच गुण परमार्थातही आवश्यक आहेत. सदाचरण हाच परमार्थाचा पाया आहे. त्यावरच परमार्थाची इमारत उभी आहे. म्हणून समर्थ म्हणतात, *सदाचार हा थोर सांडू नये तो (२). पण केवळ एवढेच सांगून ते थांबले नाहीत तर सदाचरणात कोणत्या गोष्टी येतात, कसे वागावे, कसे वागू नये याची सविस्तर चर्चा त्यांनी मनाचे श्लोक या छोटेखानी ग्रंथात केली आहे. जणु काही गीतेतील दैवी संपत्ती व आसुरी संपत्तीवर समर्थांनी केलेले हे भाष्यच आहे.


*अनाचारस्तु मालिन्यं अत्याचारस्तु मूर्खता ।*

*विचाराचारसंयोग: सदाचार: स उच्यते ॥*


विवेकाने वागणे याला सदाचार म्हणतात. विचार व आचार यांच्यात समन्वय असेल तर त्याला सदाचार असे म्हणतात. विचार अर्थातच चांगले विचार. पण ते नुसते मनात असून उपयोगाचे नाहीत. तर ते आचरणात आणायला हवेत. म्हणजेच सदाचाराने वागतांना सद्गुणांचा स्वीकार करून दुर्गुणांचा त्याग करावा लागतो. असा मनुष्यच जीवनात धन्य होतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational