म्हातारपण
म्हातारपण
"मोहन बेटा ! मी तुझ्या काकांच्या घरी चाललो आहे."
"का हो बाबा ? आणि तुम्ही आजकाल काकांच्या घरी सारखं का जाता ...? तुम्हाला वाटतं तर जरुर जा बाबा... घ्या, हे पैसे राहू द्या,कामी येतील."
बाबांचे मन भरुन आले,त्यांना आज आपल्या मुलाला दिलेल्या संस्कारांचे फळ दिसत होते.
जेव्हा मोहन शाळेत जात असे,त्याला बाबांकडून खर्चायला पैसे घेण्यात कायम संकोच वाटत असे,कारण त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती.बाबा मजूरी करून मोठ्या कष्टाने घर चालवत होते पण कितीही नाही म्हटले तरी आई त्याच्या खिशात थोडेफार पैसे ठेवून देत असे.
मोहनच्या पत्नीचे त्याच्या बाबांशी वागणे काही चांगले नव्हते.ती रोज बाबांविषयी तक्रार करीत असे,त्याला हे सर्व आवडत नसे.मुलंही आजोबांच्या खोलीत कधीच जात नसत.मोहनलाही कामावरून येण्यास उशीर होत असे म्हणून वेळ मिळत नसे.
बाबांना दररोज काकांच्या घरी जाण्याची इतकी घाई कां असते ते बघण्यासाठी मोहन एके दिवशी सुट्टी घेऊन बाबांच्या मागेमागे गेला.त्याला हे बघून आश्चर्य वाटले की बाबा तर काकांच्या घरी जातच नव्हते. ते तर रेल्वे स्टेशनवर एकांतात एका झाडाला टेकून शून्यात नजर लावून तासन् तास बसलेले होते.
तेवढ्यात जवळ उभी असलेली एक वयस्क व्यक्ती,जी हे सर्व बघत होते,ते म्हणाले *"बेटा...! मी केव्हाचं बघतो,तू त्या माणसाकडे सारखं निरखून काय बघतो आहेस?
"मी....! ते..."
"अच्छा, तू त्या म्हाताऱ्या बाबांना बघत आहेस....? *ते येथे दररोज येतात आणि तासन् तास त्या झाडाखाली बसून सायंकाळ होताच त्यांच्या घरी निघून जातात.राहणीमानावरुन एखाद्या चांगल्या घरचे दिसतात.* बेटा ...! हे एकटेच नाही,असे अनेक वयस्क स्त्रिया व पुरुष तुला येथे आसपास दिसतील."
"हो, पण का ?
"बेटा ...! जेव्हा घरात या म्हाताऱ्यांना प्रेम मिळत नाही,त्यांना खूप एकाकीपणा जाणवतो,मग ते येथे बसून आपला वेळ घालवतात.
तुला माहीत आहे का.
उतारवयात माणसाचं मन अगदी लहान मुलासारखं होऊन जातं.त्यावेळी त्यांना अधिक प्रेम आणि जिव्हाळ्याची गरज भासते,पण कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात ही गोष्ट येत नाही.
त्यांना असंच वाटतं की,यांचं तर जगून झालं आहे,मग त्यांना एकटं सोडून देतात,कुठे सोबत घेऊन जाणे टाळतात,बोलणं तर लांबच... हमेशा त्यांचा चांगला सल्ला ही त्यांना बोचतो.पण तेच वयस्क आपल्या मुलांना आपल्या अनुभवांवरून येणारी संकटं आणि अडचणींपासून वाचण्यासाठी प्रेमापोटी नेमका सल्ला देतात."
घरी येऊन मोहन कुणाला काहीच बोलला नाही.जेव्हा बाबा परतले, मोहन घरातील सर्व सदस्यांकडे बघत राहिला.
कुणालाच बाबांची काळजी वाटत नव्हती.बाबांशी कुणीच बोलत नव्हतं,कुणीही हसतखेळत नव्हतं,जसं बाबांचं घरात काही अस्तित्वच नव्हतं. अशा परिवारात पत्नी व मुलं सर्व बाबांना टाळतांना दिसत होते.
शेवटी सर्वांचे डोळे उघडण्यासाठी मोहननेही आपली पत्नी व मुलांशी न सांगता बोलणं बंद केलं. तो कामावर जायचा व परत यायचा कुणाशी बोलणंचालणं नाही.मुलं,पत्नी बोलण्याचा प्रयत्न करायचे,पण तो दुर्लक्ष करीत कामात व्यस्त असल्याचं नाटक करीत राहिला. तीन दिवसांत सर्व वैतागले... पत्नी,मुलांना या नाराजीचं कारण जाणून घ्यायचं होतं.
मोहनने आपल्या परिवाराला जवळ बसवलं.त्यांना प्रेमाने समजावलं की,मी तुमच्याशी चार दिवस बोललो नाही,तर तुम्ही किती अस्वस्थ झालात?आता विचार करा,तुम्ही बाबांशी असं वागून त्यांना किती दुःख देत आहात? माझे बाबांवर जीवापाड प्रेम आहे,जसे तुमचे तुमच्या आईवर आहे आणि मग बाबांचं स्टेशनवर एकट्याने तासन् तास बसून रडण्याविषयी सांगितले. सर्वांना आपण वाईट वागल्याचं दुःख वाटत होतं.
त्यादिवशी सायंकाळी बाबा परत येताच तिन्ही मुलांनी त्यांना कवटाळले...! म्हणाले, "आजोबा!आज आम्ही तुमच्या जवळच बसणार...!आम्हाला एखादी गोष्ट सांगा ना..."
बाबांचे डोळे भरून आले.ते मुलांना कवटाळून त्यांचे मुके घेऊ लागले... आणि मग ज्या गप्पागोष्टी सुरु झाल्या त्या तासन् तास चालल्या.यादरम्यान मोहनची पत्नी त्यांच्यासाठी अधूनमधून फळं,चहा,चिवडा घेऊन येत राहिली.
बाबा,मुलं आणि मोहनसोबत स्वतःही खात होते आणि मुलांनाही खाऊ घालत होते. आता घरातील वातावरण पुर्णतः बदलून गेले होते. ! !!
एक दिवस मोहन म्हणाला, "बाबा...! काय झालं ! आजकाल तुम्ही काकांच्या घरी नाही जात...?"
नाही बेटा ! आता त्याची आवश्यकता नाही. आता तर मला आपलं घरच स्वर्गासारखं वाटतं ...!
आज सर्व तर नाहीं,पण जास्तीत जास्त परिवारांतील वयस्कांची हीच कथा आहे.बहूतेकजण आसपासच्या बगीचांमध्ये,बसस्टॅंडवर, जवळच्या रेल्वे स्टेशनवर भरल्या परिवारातून तिरस्काराने भरलेल्या वातावरणात एकांतात जीवन जगणारे असे कितीतरी वयस्क दिसून येतील.
आपणही कधी ना कधी नक्कीच म्हातारे होऊ.आज नाही तर काही वर्षांनंतर तरी नक्कीच. जीवनातील सर्वात मोठे संकट हे म्हातारपण आहे.
घरातील ज्येष्ठ हे असे जुने वृक्ष आहेत,जे कदाचित फळ नाही देऊ शकणार पण सावली तर नक्कीच देतील...
आपलं म्हातारपण आनंदी बनवण्यासाठी ज्येष्ठांना एकटेपणा जाणवू देऊ नका. त्यांना मान नाही दिला तरी चालेल पण त्यांचा तिरस्कार तरी करु नका.त्यांची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा,तुमची मुलंही तुमचे बघूनच शिकतात. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला त्यांना काय शिकवायचे आहे.
