साद
साद
ज्योतीचे लग्न तिच्या आत्याचा मुलगा , दीपक याच्यासोबत पाच वर्षांपूर्वी झाले होते.पण, मूलबाळ नसल्याने सर्व उपाय करून शेवटी टेस्ट ट्यूब बेबी या पर्यायाजवळ येऊन थांबले. टेस्ट ट्यूब बेबीचा पहिला प्रयत्न असफल झाला होता.पण यावेळेस नक्की यशस्वी होईल हा विश्वास घेऊन ती डॉक्टरांच्या सल्ल्याने आदल्या रात्री दवाखान्यात दाखल झाली .
रात्री अकरा वाजता ज्योतीने दीपकला फोन केला तेव्हा तो मीटिंग संपवून घरी चालला होता . सकाळी लवकरच पुण्यातून निघून , दवाखान्यात येण्याचे आश्वासन त्याने दिले. तिने फोन ठेवला आणि ती कॉटवर झोपली. तिची आई लवकर झोप येत नसल्याने बाहेर नर्स बरोबर बोलत बसली होती.
जेमतेम दीड तास झाला असेल . जोराचे वारे सुटले.... खिडक्यांची दारे वाऱ्यामुळे आपटत होती......त्या आवाजाने ज्योतीला जाग आली आणि खिडकीचे दार लावणार इतक्यात तिची नजर बाहेर पडली.अचानकच , वारे ,वावटळ सुरू झाले त्यामुळे झाडांच्या माना इकडून तिकडे जोर जोरात डुलत होत्या ...झाडांच्या पानांचा आवाज सळसळ येत होता....विजांचा लकलकाट.... आणि ढगांचा गडगडाट...... भरीस- भर म्हणून पावसाने लावलेली हजेरी......हे निसर्गाचं तांडव नृत्य ती डोळ्याने टिपत होती..नकळतच तिची नजर खिडकीतून समोर असलेल्या पिंपळाच्या झाडावर गेली. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता म्हणून तिने पुन्हा एकदा पाहिले तर, दीपक..... दीपकच होता तो .काही विचारती करणार त्या अगोदरच खोलीचा दरवाजा आपोआप उघडला आणिि लाईट गेली.....
ती दरवाज्याकडे जात होती इतक्यात दीपक येताना तिला दिसला.तिने त्याला विचारले ," तू ! तू सकाळी ! सकाळी येणार होतास ना ? अरे, आत्ताच तासाभरा पूर्वी आपण बोललो तू पुण्यात होतास लगेच कसा काय आलास?"ती बोलत होती. तो फक्त ऐकत होता उत्तर नाही दिले त्याने एकटक तिच्याकडे तो पाहत होता. विचित्र असे त्याचे वाटणारे डोळे पाहून ती घाबरली.तिने जोरात आईला आवाज दिला.आईला दीपक आल्याचे तिने सांगितले.पण दीपक तिथे नव्हताच......
तिच्या अंगाला दरदरून घाम सुटलेला होता. पाय थरथर कापत होते.काय चाललय हे कळण्याच्या आतच तिची बहीण आणि तिचे भाऊजी दोघे दवाखान्यात आले.
दीपकचा एक्सीडेंट झाला याची कल्पना त्यांनी तिला दिली. तिला घेऊन ते पुण्याला गेले.दीपकचा तिथे तिने मृतदेह पाहिला
तो या जगात नाही हे तिचे मन मानण्यास तयार नव्हते. घरच्यांनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. दीपकच्या अस्तित्वाची जाणीव तिला होत होती त्यामुळे तो आपल्यापासून लांब गेला आहे हे तिला पटत नव्हते.
दुसऱ्याच दिवशी रात्री पुन्हा त्याच पद्धतीचे वारे - वावटळ सुटले . आभाळ गरजत होते ....विजा चमकत होत्या......झाडांची पान सळसळ आवाज करत होती.....घरातील मंडळींची नजर चुकवून ती नकळतच संभाजी तलावाकडे निघाली...अर्थात ही नजर चुकवण्यामध्ये नक्कीच हात होता तो म्हणजे दीपकचा .....
तलावाच्या पायऱ्याजवळ उभा राहून ज्योती बोलू लागली ,"दीपक, येते रे मी !थांब....जाऊ नको ! पाण्यात बुडशील! थांब!"तिचा जोराचा आवाज ऐकून रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या गाडीला करकचून ब्रेक लागला.अमावस्येच्या त्या मिट्ट काळोख असलेल्या रात्रीची शांतता भंग पावली ती ब्रेकच्या आवाजाने.....
गाडीमधून चार-पाच पोलीस खाली उतरले आणि ज्योतीला पाण्यात उडी मारण्यापासून थांबवले. चार-पाच पोलिसांना देखील तिला उडी मारण्यापासून रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागले. तिने चार-पाच पोलिसांना प्रतिकार केला. एका स्त्रीच्या अंगात एवढी ताकद आली कुठून याचे आश्चर्य पोलिसांना देखील वाटत होते. पोलीस घामाने भिजले होते. घामाने भिजलेल्या एका पोलिसांनी खिशातील रुमाल काढून चेहरा पुसला आणि तिला तिथल्याच एका बाकड्यावर बसून तिची चौकशी केली.
तिला दीपक पुढे-पुढे जाताना दिसत होता तिच्या जीवाची घालमेल होत होती.पोलिसांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर देण्याची मानसिकता तिच्यामध्ये दिसत नव्हती ."दीपक थांब! का चाललास रे?"इतकच ती बोलली बऱ्याच प्रयत्नानंतर तिने कसाबसा मोबाईल नंबर सांगितला पोलिसांनी लगेच फोन लावला तिकडून फोन उचलला तो तिच्या डॉक्टर बहिणीने... पोलिसांनी सांगितलेली हकीकत बहिणीने ऐकली आणि लगेचच आपल्या नवऱ्याबरोबर ती त्या तलावाजवळ जाऊन पोहोचली.ज्योती मानसिक दृष्ट्या कमजोर असल्याचे पोलिसांना बहिणीने सांगितले आणि परत अशी चूक होणार नाही याचे आश्वासन दिले तेव्हा कुठे पोलिसांनी तिला घरी घेऊन जाण्याची परवानगी दिली.
इकडे ज्योतीचे आई-वडील तिला गल्लीबोळात घराजवळ शोधत होते. इतक्यात कारमधून त्या दोघी बहिणी उतरल्या.ते कोणीतरी पाहिले आणि पळत जाऊन ज्योतीच्या आई-वडिलांना ते सांगितले.आई-वडिलांनी धावत पळत आधी घर गाठले आणि ज्योतीला डोळे भरून पाहिलेज्योतीला तिच्या डॉक्टर बहिणीने झोपेचे इंजेक्शन दिल्याने तिला झोप लागलेली होती.शांत निवांत झोपलेल्या ज्योतीला पाहून आई ढसाढसा रडत होती.रात्री तिची बहीण घरीच थांबली होती.
दुसऱ्या दिवशी ज्योती खडबडून जागी तिला दीपक खुणावत होता. तिला त्याच्याकडे जायचे होते.ज्योती आंघोळीसाठी म्हणून बाथरूम मध्ये गेली.बराच वेळ झाला पण पाण्याचा आवाज काही येत नव्हता म्हणून बहिणीने बाथरूमच्या खिडकीतून पाहिले.तिने जे दृश्य पाहिले ते खूपच भयानक होते.आंघोळीसाठी म्हणून बाथरूममध्ये गेलेल्या ज्योतीने शाम्पूचे पाऊच कापण्यासाठी ठेवलेल्या ब्लेडने हातावरती बऱ्याच ठिकाणी वार केले होते.तिच्या हाताची नस रक्तबंबाळ झाली होती. तिला ग्लानी येत होती त्याचबरोबर ती जोर जोरात हसत देखील होती तिचा चेहरा क्रूर दिसत होता .केस पिंजारलेले होते.तिथे ते हास्य खूप विचित्र असे वाटत होते.कदाचित तिला कोणीतरी हसण्यासाठी भाग पाडत होते....तो दीपकच असेल का?अशी शंकेची पाल बहिणीच्या मनात चूक चुकली.…..
कृरतेने हसणाऱ्या ज्योतीचा आवाज कानात काणठाळया बसवणाऱ्या होत्या......बाथरूमचा दरवाजा तोडून आत जाईपर्यंत खूप उशीर झाला होता.....तिने तिचा देह सोडला होता. हे दृश्य अतिशय भयानक असे होते.
दीपकने देह जरी सोडला असला तरी , त्याचा आत्मा ज्योती भोवती भटकत होता.
ज्योती शिवाय तो कोणालाही दिसत नव्हता,तो तिला साद घालत होताआणि ती त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत होती.
दीपकच्या अचानक जाण्याने तिला धक्का बसला असेल असा विचार तिचेआई - वडील करत होते. शेवटी दीपक तिला दिसतच होता हे त्यांनी जाणले . हे कळण्यासाठी खूप उशीर झालेला होतात्यांनी त्यांच्या मुलीला गमावले होते कायमचे...... अगदी कायमचे.....
(समाप्त)

