ऋणानुबंध
ऋणानुबंध
पंचक्रोशीत नावाजलेला पीळदार मिशाकाकाचा शिस्तबद्ध वाडा. तेथील लग्न म्हणजे भारीच असणार. एकत्र कुटुंब पद्धतीतील मोठ्या घरात नवीन जोडप्याचे होतात तसे लाड कोड शर्मिष्ठा आणि गिरीश यांचेही होत होते. दोघे खुष होते. सगळं कुटुंब कितीतरी वर्षांनी एकत्र आलं होतं या लग्नाच्या निमित्ताने. सगळी मंगलकार्ये विधीवत पार पडली होती. सर्व चोख व्यवस्था होती. पाहुणे मंडळी तृप्त होऊन आशिर्वाद देऊन गेली त्यात भारीs रिटर्न गिफ्ट्स मिळाल्याने सर्वांच्या मुखी लग्नाचीच कायती चर्चा होती.
बहीणींना गिरीशने सहकुटुंब महिनाभर राहायलाच बोलावून घेतलेले होते त्यामुळे गोकुळ भरल होतं. माहेरवाशिणी जाम खुष होत्या. सर्व पारंपारिक विधी आटोपल्याने नववधुवर ही रिलॅक्स होते. इतक्यात लॉकडाऊन पुकारला गेल्यामुळे मधुचंद्राचे प्लानिंग काही अमलात येऊ शकत नव्हते. पण त्याचे विशेष शर्मिष्ठा गिरीशला वाटत नव्हते. उलट सर्व जण त्या निमित्ताने एकत्र राहू शकणार होते हाच आनंद मोठा होता.
मोठ्या वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर गिरीशची सत्ता होती शर्मिष्ठेला इतकं पाहायची सवय नव्हती ती तृप्त होती. किती मोठा वाडा असे तिला वाटे . तिला गुंग पाहून "काय बाईसाहेब कोणत्या विचारात गुंग ? " तो विचारी . पण तिचे समाधानाने डबडबलेले डोळे ओठांना काही बोलूच देत ना. त्याचा कुशीत शिरून ती त्याच्या वक्षस्थळावर कपाळ घासून उत्तर देई "काहीच नाही" त्याला सर्व समजे . मग दोघे अलवार झोपाळ्यावर विसावत व दूरवरचा निसर्ग न्याहाळत एकमेकांचा सहवास नी सोबत अनुभवत . कितीतरी वेळ ,निशब्द , निवांत ....
भितीवरचा इंटरकॉमचा स्पीकर बोले, आईचा प्रेमळ आवाज उमटे , "बाळा शर्मिष्ठा खाली या तुझ्या आवडीची अंगूर रबडी रेडी आहे .आणि त्या गधड्याला म्हणावं त्याचे मालपुवे पण तयार आहेत. सांजावलं आहे चटकन या बाबा येतील इतक्यात. " बस बाबांचं नाव शेवटी आल्याने विजेच्या चपळाईने गिरीशने फ्रेश होऊन तळमजला गाठला नी त्याची धडपड बघून शर्मिष्ठेची हसून हसून पुरेवाट झाली. गोरा चेहेरा लालबुंद, डोळे चकाकते. नेटके कपडे पण हसणे पाहून सर्वच हसू लागली खदखदून ,गदगदा हसू लागली सर्व मुलाबाळांना तेवढंच पाहीजे होतं ना सगळा वाडा दुमदुमत होता. गिरीशला बाबांची काळजी लागून राहीली होती. धाकच होता त्यांचा तसा . चार दिवस टेकडी बंगल्याच्या घरी राहायला गेले होते. त्यांची काळजी घेण्यास बाबाचा जिवलग मित्र उस्मानचाचा सोबत असले की मग कोणालाही कसलीच चिंता नसायची. दोघांची जोडी सोबत आहे म्हटलं की कसलाच घोर नसायचा . बिल्लू, चाचाचा मोठा मुलगा गिरीश सोबतचाच रोज दोघां बाबाचाचाला भेटल्या बोलल्या शिवाय त्याचा दिवस मावळूच शकत नव्हता. हो sss स्वताच्या बापाला चाचा अन मिशा काकाला बाबा म्हणणारा तो आजही मिशाकाकाच्या मांडीवर कधी जाऊन बसेल त्याचा नेम नसायचा . तोच बिल्लू सकाळी वर्दी देऊन गेला त्याच्या अम्मीला "अम्मे शामकु बाबा आरै, तूच इदर सब सबालना ये ग्रीस कू नईच जमींगा. अन आई तोबी कितना करींगी ? "
तो इतकी महत्वाची बातमी देत होता नी इकडे तिघी माहेवाशिणी व त्यांची प्रत्येकी तितकीच लेकरे तर हसून हसून पुरेवाट वाट करत ." ए गप रा गं ऐकू द्याना " आई दरडावत म्हणाली .पण लक्ष कुणाचं जाईल तर शपथ. छोटीचा, जुईचा बारका शंभू दिडेक वर्षाचा तो अम्मीच्याच मांडीवर ठाण मांडून बसलेला . का तर त्याला काष्टी पातळवाल्या पेक्षा त्याच्या मम्मी सारखे ड्रेस घालणारे आवडत नी इकडे ड्रेस घालायची हिम्मत फक्त सईदा करू शकत होती .तो त्याच्या मम्मीलाही विसरला होता . तऱ्हाच होती एकेकाची . त्याने दिलेली वर्दी काही ग्रीस ला माहीत नव्हती हणून तो रिलॅक्स होता दिवसभर...
टेकडी वरून वेशीवर गाडी आली नी मिशाकाका चमकले व उस्मान चाचा पण. वाडा हसत होता . कित्येक वर्षात हे घडले नव्हते. असा गडगडाट भाऊसाहेब असताना होत असे म्हणजे मेहुणे एकदम हसतमुख. एकदम स्टॅच्यू करत व स्वता मातर बांधफुटल्यागत हसत राहत .....कित्येक पिढ्यांचा ऋणानुबंध होता तो.
पण वीस वर्षांपुर्वी आलेल्या पुराने सर्व गिळले होते. शंभरेक माणूस वाचवणारा गडी स्वताच्या बायकोला वाचवताना दोघे वाहून गेले होते. त्यांची एकुलती एक वर्षभराची लेक चिमू मात्र मिशाकाकांनी प्राणपणाला लावून वाचवली होती. तिला नंतर दूरच्या काकांनी बळजबरी इस्टेटीसाठी नेली होती. तेवहा पासून मिशाकाका कोपिष्ट झाले होते. त्या काकाने सर्व बेचिराख करून पोरीला बेवारस करून अनाथाश्रमात सोडून दिली होती. पोरीचे हाल कुत्रा खात नव्हता .
कसल्याशा कामानिमित्त उस्मानचाचा व संस्थेच्या कारकुनाची, गट्टी जमली. मिशाकाकांचेही समाजकार्यानिमित्त तिकडे जाणे होई एक दिवस सर्व बालकांची ओळखपरेड होत असता चिमूची ओळख पटली नी ते ढसाढसा रडले. उस्मान चाचाने सावरले. मुलीची सर्व व्यवस्था लावली . थोडी काळजी कमी झाली होती पण जखमभरत नव्हती मित्र वियोगाची तीव्रता अजून तशीच होती.
विचारात असताना गाडी वाड्यावर पोचली होती. गाडीचा आवाज ऐकून सर्वत्र चिडीचूप शांतता पसरली. दोघे घरात प्रवेश करतात तर शंभू बाबा चाचा करत झेपावला नि मिशा काकाच्या अंगानर झेप घेऊन म्हणाला "बाबाचाचा आई मामा गदधा हा हा हा मामी हा हा हा मामा गद्धा" सर्व गप पण शर्मिष्ठेचा बांध फुटलेलाच होता. किती तग धरणार मुसंडी मारून बेफाम वाहू लागला थांबेचना. शंभूही हसू लागला सर्व मुले हसू लागली मुलींनाही आवरेना मिशा स्मित करू लागल्या तशा आई हसली सईदा हसू लागली बिल्लूनेही दणाणून सोडले उस्मान चाचाने बाबाच्या खांद्यावर हसत हात ठेवला नि आवाज आला "स्टॅच्यू" उजव्या हाताची पिस्तुल ताणून पुढे येणारी बांध फुटल्यागत हसणारी साक्षात भाऊसाहेबांची मूर्त.
सर्व अवाक होऊन पाहू लागले आश्चर्याची मालिका सुरू झाली नि "भाऊसाहेब" असा टाहो फोडून बाबा चाचा एकमेकाची गळाभेट घेऊन हसत होते रडत होते. नी पहिल्यांदा "दादा" अशी आर्त किंकाळी फोडून आई ही धावत पुढे झाली व तिने शर्मिष्ठेला पोटाशी धरले. भावाच्या वियोगाची पोकळी निष्पाप पोरीने भरून काढली होती. आई बाबांकडे पाहात होती. बाबा आईला समाधानाने भरलेल्या चेहेऱ्याने उत्तर देत होते. लेकरे बाळे मध्येच हसू लागत नि चपापून जात व मोठी मात्र घडीत अश्रू ढाळत घडीत हसत होती.
दोन पिढ्याना समजलेलं गूज तिसऱ्या पिढीला बुचकळ्यात टाकून पिळदार मिशाकाकांचा गडगडाटात केव्हाच सामील झालं होतं.
