कडूमेंदीची गोडी
कडूमेंदीची गोडी
शाळेच्या आवारातील पारिजातकाच्या फुलांचा सडा, केसरी देठाची पांढरी फुलं नी मोहक घमघमाट, पण मी मात्र त्यापासून चार हात लांबच असे. मधमाशांची गुं गुं करत भिरभिरती शोधक टोळी, झाडांवरील घरट्यांतून डोकावणारी पिले. वयीला कडू मेंदीची शिस्तबद्ध आवडती रांग. पैकी मेंदीच्या कळ्याफुलांकडे माझे विशेष लक्ष असे. सकाळ अगदी प्रसन्न होती. शाळेची पहिली घंटा पडली . हळूहळू शाळेकडे येणारी वर्दळ सुरू झाली. मी अगोदरच उपस्थित असल्याने मला कसलीच घाई की लगबग नव्हती . सगळीकडे नजर फिरवत मी मेंदीची फुलं फुलं तेवढी वेचण्यात सावधपणे व्यस्त असे . कळ्या उद्या साठी सोडायच्या हा नियम मी पाळत असे. एवढ्या कामात तीन चारदा तरी मधमाशा फेर धरून मला पत्ता विचारून जायच्याच . त्यांना मीच जाब विचारायचो "मी काय थांबवलं होतं तुम्हाला? तुम्हीच उशीर केलात. मग मी वेचली फुलं , काय करता? "
काय करणार त्या ? फेर धरून दुसरीकडे पळायच्या . नाही तर हा तिकडे ही पोचेल . दुसरी घंटा पडे . आता मला थांबावे लागे . शिस्त म्हणजे शिस्त. आणि मी ती पाळत असे. धावत पळत वर्ग गाठायचा नी फुलांची वाटणी करायची की माझी जबाबदारी संपली.....
दिवाळीची सुटी असावी बहुतेक. एके सायंकाळी भटकत भटकत शाळेच्या पटांगणात आलो . तिथे अगोदर पासून दोन मोठ्या मुली शैलाताई नी बैजूताई बस फुगडी खेळत होत्या. दोन मोठे दादा अशोकाच्या सरळ झाडावर कसे चढावे चे प्रात्यक्षिक दाखवत होते. "मन्या ये तुला शिकवतो" वसन म्हणाला. मी ही त्याच्याकडे जाऊ लागलो इतक्यात सुनील धपकन खाली पडला. या गडबडीत झाड हलले नी चारपाच मोठी वटवाघळे भिरभिरत बाहेर पडली. तशी भसकन हसत शैला म्हणाली "आता तुमची दोघांची पाठ धरतील ते,बसा बोंबलत". दोघे धूम पळाले नी तोवर वटवाघळे ही लांबवर गेली. "मन्या इकडे ये, आपण गोड सिगारेट ओढू." "बापरे ! आप्पाला समजले तर पट्याने मारतील". "नाय मारणार ये तुला गंमत दाखवते, ये रे ".
दोघी मैदानाच्या वईच्या झाडाशी गेल्या नी थोड्यावेळाने मला न आलेला पाहून ओरडल्या " येतोस का बेबीला सांगू "बेबी माझी ताई. मी घाबरलो जवळ गेलो . त्या दोघी दोन बोटांच्या चिमटीत मेंदीचे फूल धरून तोंडाने सिगारेट ओढत होत्या. आता मात्र मला भयंकर हसायला आले . राहवेना. खूप हसलो . त्याही हसल्या. मग म्हणाल्या . "घे तू ही ओढ" "नको , मला नको , कडू मेंदीची फुले , कडू असतात". "अरे बावळटा पाने कडू असतात , फुले गोड असतात" असे म्हणत कितीतरी फुले त्यानी उचलून तोंडाला लावली . बघुया म्हणून मी भीतभीत एकच फूल ताईच्या ओंजळीतून घेतले व तोंडाला "हं आता सुर्रकन ओढ " आदेश मानून तोंड वेंगाडत तसेच केले नी काय आश्चर्य ! गोड रस, पुन्हा ओढतो, तो रस संपलेला. मग दुसरे नी तिसरे सपाटा सुरू झाला. आता मात्र बाजी उलटते असे पाहून शैला ताईने मला तिथून गाशा गुंडाळायला लावला. पण मला खजिना सापडला होता. दुसऱ्या दिवसापासून हे कार्य समाजकार्यात बदलले . मित्रांसाठीही गोळा करून न्यावे नी वाटावे. वर्गात गुरूजी येण्या अगोदर सर्वानी रसास्वाद घ्यावा.
तो परिपाठ कित्येक दिवस तसाच सुरू होता. ईतर सर्व फुले ही चाखून पाहिली सर्वच गोड कुठे कमी कुठे अधिक. पण पारिजात मला अजिबात आवडला नाही दुरून ठीक होते. हातात फूल घेतले की त्याचा एक विचित्र वास येई तो मला कधीच सहन झाला नाही .अगदी किळस येई. ईss तशी मी सर्व फुले चाखली टगर, कणेर, सावर, गुलमोहर, पळस सर्वच जी दिसली. पण मेदीचा छंदच लागला होता ना.
आज वर्गात पोचलो तर नवीन गुरूजी दिसले "काय रे काय आणलंस "काय करावे ? सरळ जाऊन टेबलावर खजिना ठेवून दिला "ठीक आहे , वा छान ! जा जागे वर बैस" म्हणाले. नवीन गुरूजी स्वागताला फुले पाहून खुष झाले होते.
