Rajesh Naik

Drama

3  

Rajesh Naik

Drama

पुढची गॅलरी

पुढची गॅलरी

5 mins
195


"अगं झाला का ग डबा? माझी ९.४५ ची लोकल गाठू शकणार आहे ना मी? " रमेशरावांनी नेहमीप्रमाणे कडक इस्त्रीचा शर्ट आणि पॅंट घालत दिवाणखान्यात येरझाऱ्या घालत आरोळी ठोकली.

"अहो, गेल्या पस्तीस वर्षात मी कधी डबा वेळेवर न दिल्याने चुकली आहे का हो तुमची ९.४५" त्यांची अर्धांगिनी सरोज डब्याची पिशवी रमेशरावांच्या हातात देत उत्तरली.

"खरं आहे बाबा, मी लग्न होऊन ह्या घरात आल्यापासून गेली तीन वर्षे बघतेय,बरोबर ९.००ला आईचा डबा तयार म्हणजे तयारच. त्यानुसारच तर मी माझे घड्याळ लावते. आता पुढच्या महिन्यापासून मी हया आयत्या चालत्याबोलत्या, बरोबर ९ ची वेळ दर्शविणाऱ्या घड्याळाला मुकणार! " अवंतिकाने टिप्पणी केली.

"बरं बरं.. सासूची लगेच एवढी बाजू घ्यायला हवीच का सूनबाई..." असे म्हणत जरा फणकाऱ्यातच रमेशराव डबा घेऊन निघाले.

स्टेशन पायी १५ मिनिटांवर असूनही रमेशरावांनी रिक्शाच केली. घर दूर जात होते पण अवंतिकाचे संभाषण मात्र रमेशरावांच्या मनात घर करून राहीले होते.


आता एका महिन्यानंतर घड्याळाचे काटे पुढे सरकणार कसे? ही चिंता रमेशरावांना सतावत होती. गेली ३५ वर्षे तीच ९.४५ लोकल. तोच इंजिनापासून दुसरा डबा . तीच गाडी थांबता थांबता मारलेली उडी आणि तीच खिडकीजवळची जागा मिळवण्याची धडपड. वय वाढले, सहप्रवासी बदलले. पण ही नेहमीची दगदगच रमेशरावांना त्याच्यांतली तरुणाई जिवंत ठेवते आहे असे वाटत असे.


आजही तसेच झाले. खिडकीजवळची जागा मिळवल्यावर जणू भीमपराक्रमच केल्याचे आविर्भाव रमेशरावांच्या चेहऱ्यावर उमटले. नाहीतरी रमेशरावांसारख्या मध्यमवर्गीय चाकरमान्यांना ह्याउपर पराक्रम करण्यास वाव तो कुठे मिळणार! 

तसे म्हणायला एकुलत्या एक मुलाला इंजिनिअर केले. त्याला भरभक्कम पगाराची नोकरी मिळाल्यावर त्याच्या पसंतीच्या मुलीशी , अवंतिकेशी, त्याचे दणक्यात लग्न मात्र ३ वर्षांपूर्वी करून दिले . त्यातच रमेशरावांना कृतार्थता भासत होती. आज अवंतिकेने एका महिन्यानंतर काय होणार असा भविष्याचा जो उल्लेख केला त्यानंतर रमेशराव भूतकाळातच गुंतत जात होते.


"अरे , रमेशभाई किधर खो गये? " आज इथे असूनही नसल्यासारखे का आहात? का एका महिन्यानंतर आम्हाला कसे वाटणार ! याची सवय करून देता आहात की काय? " कपिल भाईंचे 'एक महिना' हे शब्द कानावर पडतात रमेशराव भानावर आले.


कसनुस हसू आणून रमेशरांवानी वेळ मारून नेली खरी पण एका महिन्यानंतर आपली दिनचर्या कशी असेल? हा प्रश्न त्यांना सारखा भेडसावतच होता. 

जसेजसे दिवस सरत होते तसेतसे रमेशरावांच्या चेहऱ्यावर सरसर सुरकुत्या पडल्याची उगीचच जाणीव त्यांना स्वतःला होत होती. ' एक महिना' हे दोन शब्द  त्यांच्या भोवती जणू फेर धरून नाचत होते व त्यामुळे त्यांचे डोके सारखे गरगरत होते .त्यातच ऑफिसमधल्या रमणिकने लंच टाईम मध्ये त्यांच्या सुरकुत्यात अजूनच भर घातली.


"हे बघ रमेश" रमणिक एकदम गंभीर पणे सांगत होता. "तू ३५ वर्षे घरापेक्षा जास्त वेळ ऑफिस मध्ये काढला .तुझ्या वर्षाला जेमतेम १५ सुट्ट्या. तुझी सकाळी यायची ११ ची वेळ कायम पण जायची वेळ ८, ८.३० , ९ कधीही. नुसते ऑफिसचे काम अन् कामच.ना काही छंद. ना काही आवड. आता पुढच्या सोमवार पासून कसं होणार रे तुझे? तुझ्या घरच्यांना पण सवय नसणार तुला इतका वेळ सतत घरी बघायची." 

"नाही रे रमणिक मला पण आवड होती रे चित्रकलेची. काढायचो मी चित्र मस्त. पण नंतर चाकोरीबध्द कौटुंबिक जीवनाच्या कॅनव्हासामध्ये रंग भरता भरता मनातल्या छंदाचे उमटू पहाणारे इंद्रधनुष्य दबलेच गेले रे."


"त्यात तुझी सूनबाई नवीन विचारसरणीची. ती कुठे तुला देणार छंद जोपासायला? तिची मते वेगळी तुझे विचार वेगळे असे तूच सांगत असतोस ना. आता इतके दिवस घरचा कमावता म्हणून तू कर्ता होतास सोमवारी निवृत्त झाल्यावर तुझे कर्म तूच जाणो रे बाबा" रमणिक रमेशला जणू सावधच करत होता.


दिवस सश्याच्या गतीने पुढे सरकत होते ते पण सश्यासारखी उसंत अजिबात न घेता. बघता बघता निवृत्तीचा सोमवारचा दिवस अगदी परवावर येऊन ठेपला. तशी रमेशरावांची घालमेल वाढू लागली .त्यात रमणिकचे शब्द कानात घुमू लागले. रात्री झोप लागेना. रमेशराव दिवाणखान्यात जायला उठले. जाताना मुलाच्या बेडरूम मधून आवाज येत असलेले ऐकून रमेशराव जरा थबकलेच.

"अहो, सोमवारी बाबा निवृत्त होत आहेत. त्यांची निवृत्ती नंतरची व्यवस्था केली पाहिजे."

"अग मी मुलगा असलो तरी तुझ्या कल्पना भारी असतात ग तेव्हा तूच ठरव ना अवंतिका सर्व" संदीप उत्तरला

"पुढच्या गॅलरीत जे जुने अडगळीचे सामान आहे ते काढून बाबांचे ते सर्व सामान तिथे ठेवायचं म्हणतेय मी." 

"हो ग तिकडे एका कोपऱ्यात त्यांना शांत बसता येईल मोकळ्या आकाशाकडे बघत"

"आणि सोमवारी ते निवृत्त होऊन घरी आल्यावर त्यांची काय व्यवस्था करायची ते मी बघते पण ते येण्याचा कानोसा घेऊन मला वर्दी मात्र तुम्ही द्या.".


रमेशरावांना तिथे अजून थांबताच आले नाही. त्यांचे विचारचक्र वेगाने धावू लागले. मूळचे चित्रकार असल्याने ते आता पुढे काय वाढून ठेवले आहे? याचे चित्र चितारू लागले. टाळ्यांच्या कडकडात रमेशरावांनी निवृत्ती समारंभात आपले मनोगत व्यक्त करून भाषण संपवले. सगळ्यांशी हस्तांदोलन करताना ते भावनाविवश झाले होते.पण सरतेशेवटी अक्षरशः पाय ओढतच घराच्या दिशेने निघाले. आता घरी कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार? ह्याचा विचार करीतच ते बिल्डिंगमध्ये शिरले.


त्यांच्या मजल्यावर पोहचताच लिफ्टमधून बाहेर पाऊल टाकताच गुलाबाच्या पाकळ्यांच्या स्पर्शाने त्याच्या सर्वांगाला आश्चर्याची लहर सुखावून गेली. संपूर्ण मजलाच फुलांच्या रांगोळीनी सजला होता. त्यांना कळेना हा काय प्रकार आहे.

 

त्यांनी जरा धडधडतच दरवाज्यावरची बेल वाजवली आणि क्षणार्धात दरवाजा उघडला गेला. सनईचे सुरेल मंगल सूर त्यांच्या कानी पडले व समोर त्यांची पत्नी सरोज औक्षण करायला सज्ज दिसली. औक्षण ह़ोताच अवंतिका व संदीपनी त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. रमेशरांव दिःग्मुढ होऊन भांबावल्या सारखे पाहत राहिले.


"चल संदीप, बाबांना आपण ठरवले तसे पुढच्या गॅलरीत घेऊन जाऊया". हे ऐकताच त्या रात्री चा संवाद रमेशरावांना आठवून त्यांच्या पोटात धस्स झाले. 'जोर का झटका धीरेसे' असा तर हा प्रकार नाही ना असा विचार त्यांच्या मनात चमकला.

"थांब ग अवंतिका ", सरोज म्हणाली. "मला ह्यांचा स्वभाव माहीत आहे. त्यांनी गॅलरीतली त्यांची व्यवस्था एकदम बघितली तर त्यांना धक्का बसेल. अहो मी आहे तुमच्याबरोबर. काळजी करू नका. आपण दोघे मिळून जे आहे त्याला सामोरे जाऊ या."


सरोजच्या साथीने एक एक पाऊल पुढे पडत होते तसे रमेशरावांच्या छातीचे ठोके वाढत होते. लग्नाच्या वेळी सप्तपदीत धरलेला सरोजचा हात अगदी तसाच घट्ट धरून नशिबाच्या फेऱ्यात काय वाढून ठेवले आहे हे उलगडण्यासाठी पुढच्या गॅलरीच्या दिशेने ते पावले टाकू लागले. गॅलरी जवळ येऊ लागली तसे रमेशरावांनी डोळेच गच्च मिटून घेतले. पुढे काय वाढून ठेवले ते बघायची त्यांची हिम्मतच होत नव्हती. ते गॅलरीत पोहचले. व हळूहळू डोळे किलकिले करून उघडू लागले. समोरचे दृष्य बघून ते गारठूनच गेले. 

सुबक रेखीव टेबलावर ठेवलेला ड्रॉइंग बोर्ड ,बाजूला रंगाचा कुंचला, विविध पेन्सिली, ब्रश, ड्रॉइंग पेपरचा गठ्ठा, कॅनव्हास व ह्या सर्वांना प्रकाशमान करणारा वैशिष्ट्यपूर्ण फोकस लाईट बघून रमेशरावांच्या ड़ोळयांतून आनंदाश्रू वाहू लागले.


सरोज व संदीपला त्यांनी आनंदाच्या भरात आलिंगनच दिले आणि पुढे होऊन अवंतिकाचा हात धरून आपल्या कपाळावर टेकवीत उद्गारले, " अवंतिका, मुली तू जिंकलंस, मी काय कयास केलेला पण तू मला अगदी मनाजोगत दिलेस ग .अगदी पोटच्या लेकीसारखे. आता तुमच्या मायेच्या रंगात रंगल्याने माझ्या मनातील इंद्रधनुष्य निवृत्तीनंतरच्या आयुष्यात तुम्हा सर्वांच्या साथीने आगळेच रंग भरायला उमटू पाहतोय." 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama