Rajesh Naik

Others

3  

Rajesh Naik

Others

पहिलं माझं जरा ऐकाल का?

पहिलं माझं जरा ऐकाल का?

6 mins
188


आमच्या शालेय चमूने सहज बोलता बोलता पेरलेल्या कल्पनेच्या बीजांचा बहरलेल्या चिनार वृक्षात झालेला कायापालट म्हणजेच आमची जम्मू , वैष्णोदेवी , पटनीटॅाप सहल.

आमचा शालेय चमू म्हणजे पंचकडीच. पुण्याला राहणारा घाऱ्या डोळयांचा पेशवे , ठाणास्थित डॅाक्टरीणबाई , पेशाने ‘ऑडीटर म्हणून ऑडीटरमॅम ,खोडकर वृत्तीचा अगदी हाडाचा खेडाळू पिंट्या आणि अस्मादिक.

ऑडीटरमॅम दरवर्षी ती करत असलेल्या जम्मू वैष्णोदेवी सहलींचे आपल्या रसाळ वाणीने एवढे रसभरीत वर्णन ऐकवित असे की आम्हालाही त्या सहलीत रस वाटू लागला व सरतेशेवटी तिच्या दुसऱ्या ग्रुपबरोबर आमच्या पंचकडीलाही सहलीवर नेण्यास आम्ही तिला भरीस घातले. ते ही करोना सावटाच्या ओहोटीच्या दिवसात. 

टू बी ॲार नॅाट टू बी च्या धर्तीवर विमानप्रवासा आधी RTPCR टेस्ट करायची का नाही ह्यावर बराच उहापोह झाला. वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी डोंगर चढायला डोली , घोडा करायचे की पायी चालायचे ह्यांवरही चर्चेच्या २०५ पोस्ट ग्रुपवर टाकल्या गेल्या. तेवढ्या वेळात अर्धे अंतर चालून गेलो असतो असे मला वाटून गेले. 

आमच्या ऑडीटरमॅमचा नेतृत्वाचा बाणा फारच दिशादर्शक होता.एक नाही तर दोन ग्रुप्सच्या जबाबदारीचा विडा तिने उचलला होता. त्यातला आमचा ग्रुप अगदीच नवशिका होता . दुसरा ग्रुप मात्र सहलीचा अनुभव असलेले महिलांचे सप्तक होते . हो खरंच ! विमानात बसल्याक्षणी त्या अश्या रितीने मावा केक , वेफर्स यांची रेलचेल करू लागल्या की आमची हवाईसुंदरी चुकून “आपकी रेलयात्रा सुखद हो“ असे म्हणाल्याचे मला भासले. ती हवाईसुंदरी परत परत त्या महिलांच्या कबिल्यातल्या सर्वांना मास्क लावायचे आवाहन करत होती . तिची उगीच खुळी समजूत की मुखपट्टी लावली तर ह्यांची आवाजाची पट्टी खाली येईल. पण त्या सर्व एकापेक्षा एक पट्टीच्या गप्पिष्ट होत्या. 

जम्मूला दुपारी उतरल्यावर ऑडीटरमॅमने फर्मान काढले की प्रथम भोजन . बारा जणांच्या आमच्या ग्रुपमध्ये इन मीन तीन सभ्य गृहस्थ . पण पिंट्याचा खोडकरपणा उफाळून आला होता. आपण जणू ग्रुपचा गोविंदाच आहे ह्या आविर्भावात हिरोसारखा झुलपे उडवीत मला व पेशवेंना काकडी खाण्यासाठी सोडून लेडीज स्पेशलचा गार्ड बनून तंगडी खायला निघून पण गेला.

 महिलांचे बहुमत असल्याने पोहोचलेल्या दिवशी संध्याकाळी शॅापिंगची टूम निघणे अनिवार्यच होते. पेशव्यांनी समस्त महिलावर्गावर काय छाप मारली होती माहीत नाही पण त्यांना दुकानात भाव करायला पेशवेच हवे होते आणि पेशवे ते करायला भाव खात होते. सरते शेवटी पेशव्यांबद्दल त्या महिलांच्या तोंडावर गेला उडत असे भाव तरळल्याचे मला उगीच आपले जाणवले.

खरंतर सांजप्रहाराच्या कडाक्याच्या थंडीमुळे माझ्या जाणिवा तश्या बधीरच झालेल्या . त्यात मी थर्मल वर स्वेटर वर जाडजूड जॅकेट घालूनही कुडकुडत असताना डॅाक्टरीणबाई ठाण्याच्या घंटाळी तलावाभोवती फिरल्यासारख्या कुठल्याही स्वेटरशिवाय वावरत होत्या.मला बसलेली दातखिळी कडाक्याच्या थंडीमुळे होती की थंडीलाही शरणागती पत्करायला लावणाऱ्या तिच्या व्यक्तिमत्वाच्या आदरयुक्त भीतीमुळे होती ते एक कोडेच होते.

रात्री जेवणाच्या टेबलावर असताना डॅाक्टरीणबाईंनी तिच्या नावडत्या खाद्यपदार्थांची सांगितलेली यादी सध्याच्या रटाळवाण्या मालिकेच्या एपिसोडपेक्षाही लांब होती. ते ऐकताना मला आमच्या गणिताच्या दामलेसरांनी शिकवलेले त्रैराशिकच आठवले . जर तिला एवढे कमी पदार्थ खायला आवडत असूनही ती एवढी गोलगरगरीत. तर तिने जे मिळेल त्यावर ताव मारला असता तर तिच्या कपड्यांच्या तंबूसम होणाऱ्या घेराच्या विचारांनेच माझ्या मनाला घोर लागला.

जेवताना ॲाडीटरमॅमची भलतीच तारांबळ उडाली . तिच्या शाळेतले आम्ही ॲाडीटरमॅमना तिच्या माहेरच्या नावाने हाक मारायचो तर दुसरा ग्रुप सासरच्या नावाने. जेवायला आमच्या टेबलावर तिला खेचून आणायची ती माहेरची ओढ. पण ती आमच्या बरोबर बसली रे बसली की दुसरा ग्रुप तिच्या सासरच्या नावाचा पुकारा करायचा व तिला यायचा भलताच ताण. ओढाताण होणे म्हणजे काय ते मला त्याचवेळी नीट उमगले.

दुसऱ्या दिवशी दर्शनाला जाताना हॅलिकॅाप्टरने जायचे म्हणून मी शब्दश: हवेत होतो.हॅलिकॅाप्टर मध्ये जस्ट बसण्या आधी ॲाडीटरमॅमने तुमचे परतीचे दोर कापून टाकले आहेत अश्याच काहीश्या आवेशात तुमचे परतीचे तिकीट राहून गेले काढायचे असे सांगितल्याने कडाक्याच्या थंडीतही मला थोडा घामच फुटला. “काळजी करू नका रे . मी बघते काय करायचे ते” असे ॲाडीटरमॅमने सांगताच आम्ही थोडे आश्वस्त झालो. हॅलिकॅाप्टरमधून विहंगम दृष्य बघताना मला जणू आकाशाला गवसणी घातल्यागतच वाटत होते. तो ढगांसमवेतचा प्रवास एक अतिशय विलक्षण अफलातून अनुभव होता. 

पण डोंगरावर पोहचताच आमच्या ॲाडीटरमॅमने तिच्या अभूतपूर्व वाक् चातुर्याने परतीचे तिकीट मिळवले. ती आणि तिचा तो अनुभवी ग्रुप चालता बोलतां उठता बसतां त्यांच्या अनुभवाचे ठसे पदोपदी उमटवत होता आणि पिंट्या आपल्या वेधक नजरेने ते ठसे तत्परतेने हेरून आमच्या नजरेस आणून देत होता. 

मुख्य मंदिरापर्यंतची पायी वाटचाल पावलोपावली बदलणाऱ्या हवामानाने अगदी अचंबित करणारी ठरली. क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या निसर्गाच्या विलोभनीय रूपाने आम्हाला एवढे भूलवून टाकले की चढउतरणीची ती दगडी वाट कधी पार केली ते आम्हाला कळलेच नाही.त्यात पेशव्यांना उमगले की आमच्या बॅगा वाहून नेणारा त्याच्याच गोत्राचा आहे. मग पेशव्यांनी त्याला शाहरुखने काजोलला चित्रपटात मारलेली तशी करकचून मिठी मारली . तो सामान वाहणारा ओझ्याने हेलपाटला नसेल एवढा पेशव्याच्या मिठीने हेलपाटला. पेशव्यांचे हे मिठी मारायचे व्यसन भलतेच वाढलेले दिसत होते. ड्रायव्हर दिसला मार मिठी, गुलाबजाम विकणारा दिसला मार मिठी , हॅाटेल बॅाय दिसला मार मिठी. पेशवीणबाईंना पेशव्यांना मुठीत ठेवण्याएवजी मिठीत ठेवण्याची गरज आहे हे कोणीतरी पटवून दिले पाहीजे असे मला वाटले.

मंदिरापर्यंत पोहचेपर्यंत दुसऱ्या ग्रुपमधल्या आधी पोहोचलेल्या दोघी त्यांनी ताव मारलेल्या पदार्थांचे वर्णन एवढे चवीने सांगत होत्या की आधी पोटोबा मग विठोबा ही म्हण त्यांनी जणू कोळूनच प्राशन केली आहे. देवीचे दर्शन एवढे निवांतपणे व पुजाऱ्यांनी सांग्रसंगीत कथन केलेली माहिती ऐकत अगदी सुरेख झाले . एवढे सहजसुंदर दर्शन झाले की मला वाटले माझ्या ऐकीवात असलेले दोन मिनिटेही देवीसमोर न थांबू देणारे खूप गर्दी असलेले मुख्य देऊळ अजून पुढे असेल. पण हेच ते दैवी स्थान आहे हे उमजल्यावर मन प्रसन्नतेने खरंच उचंबळून आले. डोंगरामधून अतीव श्रध्देने खडतर वाटचाल करणारी लहाने मुले, तरुण ,वृध्द अश्या सर्व वयाच्या हजारो स्त्री पुरुष भाविकांनी केलेल्या “ जय माता दी” ह्या नामघोषांनी अवघे वातावरणच मंत्रमुग्ध होऊन गेले होते. 

दर्शनानंतर परतीच्या प्रवासात घोड्यावरून कूच करायचे असा ॲाडीटरमॅमने दिलेला आदेश शिरसावंद्य मानून आम्ही एकामागोमाग एक खोगिरावर आरुढ होऊ लागलो. दुसऱ्या ग्रुपमधली एक घोड्यावर बसल्या बसल्या एव्हढ्या जोराने किंचाळू लागली की तिथल्या पंचक्रोशीतल्या लोकांच्या ऐकिवातही असे किंचाळणे आले नसेल असे तिथल्या स्थानिकांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या विस्मयकारक आविर्भावावरून वाटत होते. आपल्या किंकाळण्यापेक्षा हिच्या किंचाळण्याचा पराकोटीचा स्वर ऐकून घोडेसुद्धा लाजेने चूर झाले असावेत. हिला घोडदळात घेतलं तर हिच्या किंचाळण्याने शत्रूची पळताभुई थोडी केली असती असा विचार माझ्या मनांत चमकून गेला.

सहलीच्या तिसऱ्या दिवशी पटनीटॅाप ह्या विहंगम बर्फाळ प्रदेशात पोहचलो. हिमनगाची शिखरे आम्हाला जणू आमंत्रितच करत होती. तिथे गेल्यावर चहूकडे बर्फच बर्फ पाहून आमचे तनच नव्हे तर मनही बर्फाच्छादीत झाले होते. 

हॅाटेलमधल्या रुममध्ये पोहचलो नाही तोच बेंबीच्या टोकापासून आळवलेले तापलेले सूर कानी पडले. रुममध्ये गरम पाणी येत नसल्याने ॲाडीटरमॅम व डॅाक्टरीणबाई रागाने पेटल्या होत्या. आणि पेशवे आगीत तेल ओतण्याचे काम बेमालूमपणे करत होता. समोर काकुळतीला आलेल्या हॅाटेल मॅनेजरच्या मनात ह्यांच्या कडक तापलेल्या डोक्यावरच पाणी गरम करूया का असा विचार नक्की आला असणार. पण त्यांनी बेरकीपणे स्वादिष्ट जेवण देऊन दोघींचा जठाराग्नी शांत केला व तद् नंतर जादू झाल्याप्रमाणे ह्या तणतणणाऱ्या दोघी त्याच मॅनेजरच्या स्तुतीपर तुणतुणे वाजवू लागल्या.

ओव्हरकोट, ढोपरापर्यंतचे बूट , हातमोजे घातल्याने सर्वांना फोटो काढायचा ऊत आला होता.धडाधड फोटो काढत सुटलो पण नंतर फोटोग्राफरने बिलाचा आकडा सांगितला तेव्हा खरंतर माझा तरी चेहरा फोटो काढण्यासारखा झालेला पण नशिबाने कानटोपी व मफलरने तो इतका झाकलेला की फोटोग्राफरच्या लक्षात आला नाही. 

बर्फात डॅाक्टरीणबाईंच्या स्नोमॅन करण्याच्या आंतरीक उर्मीमुळे आम्हाला बाह्या सरसावण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. पेशवे सिव्हिल इंजिनीयरच्या आवेशात मी जणू कंस्ट्रक्शन लेबररच आहे अश्या समजूतीने मला … “हा अजून खोद त्या तिथे. ढीग पसर “अशी फर्माने देत होता. ॲाडीटरमॅम टेहळणी करत होत्या. तर पिंट्या अंगात जणू शाहरुख खानच शिरला अश्या रितीने वेगवेगळ्या पोझेस् देत नुसताच बागडत होता. डॅाक्टरीणबाई तर एवढी तन्मयतेने स्नोमॅन घडवत होती की मला वाटले की येत्या गणपतीच्या मोसमात क्लिनीकमध्ये गणपतीचा कारखाना काढते की काय? 

सहलीच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही राजवाडा दर्शनासाठी गेलो. अतिशय सुरेख होता राजवाडा. तिथली ती कोरीव सिंहासने पाहताना मला त्या राणीच्या सिंहासनावर ॲाडीटरमॅम स्थानापन्न झालेल्या आहेत व समोर आमचा टूर ॲापरेटर राजाजी, वाहन चालक बिट्टू “ कोई दिक्कत नही . कोई दिक्कत नही “ म्हणत ॲाडीटर मॅमला लवून कुर्निसात करत आहेत असा भास झाला. 

निघायची तयारी करताना डॅाक्टरीणबाई नाकापेक्षा मोती जड ह्या उक्तीप्रमाणे ताकदीपेक्षा बॅगेचे वजन जड करून ठेवलेले.एकाच बॅगेत सर्व कोंबणे ही पण एक कला तिला अवगत आहे हे दाखवून दिले.

ह्या सहलीने मला बरेच अनुभव संपन्न केले. पण मोलाची शिकवण दिली ती ॲाडीटरमॅमने. सहलीपूर्वी शंकेखोर पेशव्यांना लीलया गप्प करण्याचे तिचे गमक मला सहलीतल्या विविध प्रसंगांने दर्शवून दिले. ॲाडीटरमॅम अगदी शांतपणे व धीरोदात्तपणे “ पहिलं माझं जरा ऐकाल का ?” हे तिचे ब्रीदवाक्य एवढ्या शिताफीने उच्चारायची की समोरचा अगदी भारावून जायचा व ती सांगेल ते अगदी तन्मयतेने ऐकायचा. 

आयुष्यात ॲाडीटरमॅमसारखे मलादेखील समोरच्यांची मन जिंकण्यात यश येईल ह्या विश्वासाने तिच्या ह्या शिकवणीची मी अजूनही कसोशीने पारायणे करतोय. म्हणूनच पुनःश्च तळमळीने विनवतोय “ पहिलं माझं जरा ऐकाल का ? “



Rate this content
Log in