Sunita madhukar patil

Tragedy

4.0  

Sunita madhukar patil

Tragedy

प्रिझम

प्रिझम

6 mins
278


सूर्य मावळतीकडे झुकला होता. धरतीच्या कुशीत तो विसावण्यासाठी अधीर होता. केशरी, तांबूस, जांभळ्या रंगांच्या छटा तो मावळतीच्या नभावर उधळत होता. चहाचा एक एक घोट हळुहळु रिचवत ती बेडरुमच्या खिडकीतून सुर्यास्ताचा मनमुराद आस्वाद घेत होती. आज बऱ्याच वर्षांनी तिच्या आयुष्याच्या संध्याकाळी ही सुंदर मनोहर संध्याकाळ ती अनुभवत होती. संसाराच्या रामरगाड्यात म्हणा किंवा तप्तपदीच्या सात वाचनात अडकलेल्या तिला त्या मावळतीच्या आकाशाकडे मान वर करुन बघण्याची सवडच कधी मिळाली नाही.  नशिबाने दोन परस्परविरोधी स्वभावांची मोट एकत्र बांधली आणि मग सुरू झाला आयुष्य नावाचा लांब पायवाटेचा प्रवास...!

चंद्रा...! चंद्राच नाव तीच. नावाप्रमाणेच शांत, सुंदर, आकर्षक...! डोळ्यात सुखी संसाराची स्वप्ने रंगवत तिने उंबरठ्यावरच माप ओलांडलं आणि चाळीस वर्षांपूर्वी प्रभाकररावांच्या घरात आणि आयुष्यात प्रवेश केला. घरात प्रवेश करताच दर्शनी भागात ठेवलेली मुसळासारखी मुदगलं पाहिली आणि एक गोष्ट पटकन तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही आणि ती म्हणजे एका राकट, आडदांड, पहिलवानाशी आपली गाठ पडली आहे. प्रभाकरराव देखील नावाप्रमाणेच तापट, शीघ्रकोपी...! त्यामुळे आखाडा असो, तालीम असो, किंवा संसाराच रिंगण असो नेहमी तेच अंपायर आणि तेच विजयी...!

प्रभाकरराव गावातील बडं, तालेवार प्रस्थ. तीन बहिणींमध्ये एकुलते एक घरातील शेंडेफळ. सुरवातीपासूनच शिक्षणात लक्ष कमी होत त्यांच पण तालमीची, कुस्तीची भारी आवड. मातीत मुरलेला माणूस...! कसरती करून कमावलेलं पिळदार शरीर...! बऱ्याच कुस्त्याही गाजवलेल्या...!चंद्राला गाण्याची भारी आवड, तिचा आवाजही चांगला होता. त्याचबरोबर ती चित्रकला, विणकाम, भरतकाम अशा अनेक कलांमध्ये निपुण होती. आईबाबांनी लग्नात रुखवतात तिला पेटी, वेगवेगळ्या आकाराचे कुंचले, रंगांच्या बाटल्या दिल्या होत्या. ज्यांच्या मदतीने ती आयुष्याच्या जोडीदारासोबत मिळून नवीन स्वप्ने रेखाटणार होती. पेटीवर तिची नाजूक बोटं सफाईदारपणे फिरायची पण प्रभाकर राव आणि गाणं यांचा दूरवर कुठेच संबंध नव्हता. त्यामुळे गाण्याचा रियाज, रंगबिरंगी स्वप्नानां कॅनव्हासवर साकारताना पाहणं, एक एक टाका कपड्यांवर टाकत विणकाम करत नात्यांची वीण ती घट्ट करत होती पण हे सगळं प्रभाकरराव घरी नसताना, त्यांच्या अपरोक्ष...! कारण प्रभाकरराव कडकशिस्तीचे असल्यामुळे त्यांना हे सगळं आवडेल की नाही ठाऊक नव्हतं. चंद्राची एक डायरी होती त्या डायरीत ती मोत्यासारख्या टपोऱ्या वळणदार अक्षरात तिला भावणाऱ्या गोष्टी, छान छान भावगीते, भजन, भक्तिगीते लिहून ठेवत असे.

मोठा भरलेला वाडा चंद्रा टापटिपीने ठेवीत असे. आल्यागेल्यांची उठबस...! पाहुणचार सगळं अगदी निगुतीने पार पाडत होती. भरलं वांग, घरच्या शेवाळ्याची खीर... हाहाहा ssss कॉपीराइट पेटंटच मिळायला हवं तिला. पण प्रभाकररावांना या सगळ्या गोष्टींशी काहीही घेणं देणं नव्हतं. ही सगळी बायकांची कामं... त्यांचं कर्तव्यच...! त्यांच्या लेखी या गोष्टींची दखल घेणं, त्यांना दाद देणं म्हणजे बायकीपणा होय. त्यांना त्यात अजिबात रस नव्हता. त्यामुळे चंद्राच्या कौतुकाचा प्रश्नच नव्हता. त्यांचा बहुतेक वेळ कसरत, तालीम, आखाडा, गावची खबरबात घेण्यात व्यातीत होई. रात्री थकूनभागून पलंगावर पडल्यावरच नवराबायकोच्या नात्याचं वर्तुळं एकमेकांना थोडासा छेद देत असतील ते ही फक्त शारीरिक गरज म्हणून...! मनाचं मनाशी जुळण कधी झालंच नाही.

लग्नाला तीन चार वर्षे उलटली, चंद्राने अजून गोड बातमी दिली नव्हती. देव देवस्की, अंगारा धुपारा, वेगवेगळ्या देवांना नवस सगळं करून झालं होतं पण सगळं व्यर्थ...! नंतर चंद्रावर वैद्यकीय उपचार करण्याचं प्रभाकररावांनी ठरवलं. तिच्या गावच्या, तालुक्याच्या दवाखान्यात वैद्यकीय तपासण्या झाल्या. जिल्हा पातळीवर जाऊनही तपासण्या केल्या. प्रभाकररावांनी शेवटी वैतागून पुण्यातील डॉक्टरांना गाठलं. आधुनिक वैद्यकीय पद्धतीनं तपासण्या झाल्या. डॉक्टरांना चंद्रामध्ये काही दोष आढळला नाही. 

डॉक्टरांनी प्रभाकररावांनाही त्यांची स्वतःची तपासणी करण्याबाबत सांगितलं असता," अरे...! माझ्यात काय दोष असणार आहे. मी चांगला पैलवान गडी आहे. माझी तपासणी करण्याची काय गरज आहे." म्हणत त्यांनी स्वतःची तपासणी करण्याचं नाकारलं. डॉक्टरांनी त्यांना सर्व नीट समजावून सांगितलं. मुलं न होण्यामागचं कारण पुरूषांमध्ये दोषही असू शकतो पण व्यवस्थित वेळेवर इलाज करून औषध गोळ्या घेतल्या तर दोष निवारण होऊन गोड बातमी मिळू शकते हे त्यांना पटवून सांगितल्यावर ते स्वतःची वैद्यकीय तपासणी करण्यास तयार झाले. कालांतराने प्रभाकररावांचीही वैद्यकीय तपासणी झाली.  प्रभाकररावांमध्ये दोष आढळला होता. शुक्राणूंची संख्या कमी होती. कमी म्हणजे अगदी नगण्यच...! डॉक्टरांनी निदान केलं.

अनेक उपाय करून झाले पण कोणत्याच उपचाराला यश येत नव्हतं. शेवटी निरुपाय होऊन शांत बसून राहणे हाच एक अंतिम इलाज उरला होता. डॉक्टरांच्या रिपोर्टनंतर प्रभाकररावांच अवसानच गळालं होतं. त्यांचा होता नव्हता तो समंजसपणाही आटून गेला होता. उरले होते ते फक्त बोचरे खडक आणि काटेरी वाट...! त्यांचा चिडचिडेपणा वाढला होता. 

चंद्राचा ते राग राग करू लागले. डॉक्टरांनी काढलेल्या शुक्राणूंच्या निष्कर्षाचा रिपोर्ट त्यांनी कुणालाही सांगितला नाही. चंद्रातच दोष असून तिचं बाळ न होण्यासाठी कारणीभूत असल्याचं कारण ते नातेवाईकांना सांगत होते. सगळा दोष चंद्राच्या माथी मारून ते नामानिराळे झाले होते. चंद्राच्या कलागुणांचं, कलाकुसरीचं जे काही थोडंफार कौतुक होत होतं, ते ही आता ओसरू लागलं होतं. तिच्या कलेची कदर आधीच कोणाला नव्हती आणि आता तर प्रभाकररावांना सारंच निरर्थक, निष्फळ वाटू लागलं होतं. चंद्राची कला आता हळूहळू आटत चालली होती. अंगणातली रांगोळी रुसली. रंग आणि कुंचल्यानीं पाठ फिरवली. भजनाची पेटी कधीचीच पोटमाळ्यावर गेली होती. चंद्रा तासनतास शून्यात नजर लावून बसायची. एकटीच विचारात गढलेली असायची. उसनं अवसान आणून ती संसाराचा गाडा रेटत होती. मोठ्या वाड्यारूपी सोनेरी पिंजऱ्यात ती बंदिस्त होऊन गेली.

दिवसेंदिवस प्रभाकररावांचा तिरसटपणा वाढत होता. पैलवानीतही त्यांचं मन लागत नव्हतं. हळुहळु पैलवानी ओसरु लागली. त्यांचं मानसिक आरोग्य ढासळू लागलं. सारा दोष जरी त्यांनी चंद्राच्या माथी मारला असला तरी त्यांच मन त्यांना खात होतं. मनात एक खंत होती. ते वैमनस्क अवस्थेत गावभर फिरत होते. ना पोटापाण्याची शुद्ध ना कपड्यांची...! बोलता बोलता मध्येच रडू लागायचे. एकदा का घराबाहेर पडले की दोन दोन दिवस बाहेर भटकत रहायचे. आठवण आली तर घरी परतायचे नाहीतर त्यांना शोधून आणावं लागायचं. तो मोठा वाडा चंद्राला खायला उठे. प्रभाकरराव कधी घरी असलेच तर ते दिवसभर शिव्यांची लाखोली वाहत. अशीच काही वर्षे गेली असतील. प्रभाकरराव आता आयुष्यावरच रुसले होते. मनात एक सल होती... एक वेदना होती. त्या वेदनेवरही आताशा ते चिडू लागले होते. 

साऱ्या गावात एकच कुजबुज होती. प्रभाकर पैलवान येडा झाला. खुळा झाला...! चंद्राचा हात तर त्यांनी कधी धरलाच नव्हता पण एक दिवस वेडाच्या भरात असचं गावभर फिरत असताना मृत्यूने मात्र त्यांचा हात धरला होता. एक दिवस एका ट्रकची धडक बसून ते जागेवरच ठार झाले. प्रभाकरराव गेल्यानंतर सुरुवातीला काही दिवस चंद्राच्या मनाला एक थिजलेपण, एक पोकळी आली होती. पण ते थिजलेपण लवकरच वितळलं. सांत्वनाला आलेल्या बायकांना चंद्राचं थोपटून शांत करू लागली. आठ दहा दिवसातच तिने स्वतःला सावरलं आणि ती परत जोमाने कामाला लागली.

मेंदूला पडलेलं मोठं विवर चंद्राने आपल्या छंदांनी, कलांनी बुजवून टाकलं. अंगणातली तुळस पुन्हा तरारली. माळ्यावरची पेटी पुन्हा खाली आली. मनपटलावर कुंचले परत रंग भरू लागले. विणकाम, शिवणकामाला परत बहर आला. कंठातून सूर उमठू लागले. सणवाराला, आरतीला त्यांचा सुरेल आवाज देवी देवतांची स्तुती गाऊ लागले. गाण्यांच्या अनेक स्पर्धेत त्यांचे स्वर ऐकू येऊ लागले. सुंदर रेखाटलेली चित्रे प्रदर्शनात जाऊ लागली. नवीन भजनी मंडळ स्थापन करण्यात आलं... एक वठलेलं खोड पुन्हा बहरू लागलं. 

चंद्राच्या जीवनात ह्या साऱ्या घटना इतक्या वेगाने घडल्या की, जणू आयुष्यानं सारी मरगळ झटकून एका क्षणात पुढचा टप्पा गाठला. चंद्राच्या एकसुरीे जीवणाने अचानक एकदम गिरकी घेतली. तिच्या वाटय़ाला आलेला आयुष्य नावाचा चहाचा कप आता गोड झाला होता. तळाशी साठलेली साखर कधी कोणी ढवळलीच नव्हती. ती तळाशी तशीच साठली होती. वेळेतच जर ती ढवळली गेली असती तर तिचं सगळंच आयुष्य मधुर झालं असतं...!आज मात्र तिच्या आयुष्याचा फिकट झालेला रंग छंद आणि कलारूपी प्रिझम मधून आरपार जाऊन तिचं सारं आयुष्य परत सप्तरंगांनी उजळून निघालं होतं. तिनं कपाटातून तिची कित्येक वर्ष धुळ खात पडलेली जुनी डायरी बाहेर काढली आणि बेडरूमच्या खिडकीत बसून ती मावळतीच्या रंगांना शब्दात बांधू लागली. तिच्या चेह-यावर एक स्मित आणि समाधान होतं. 

समाप्त. 


तर माझ्या प्रिय वाचक मित्र आणि मैत्रिणींनो आपल्याला ही कथा कशी वाटली हे सांगायला मला विसरू नका. कंमेंट बॉक्समध्ये आपले अभिप्राय नक्की कळवा.

© copyright

© all rights reserved.

या कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सारे हक्क लेखिकेकडे राखीव. कथेत अथवा कथेच्या नावात किंवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो कॉपी राईट कायद्याचा भंग मानला जाईल. कथा जशीच्या तशी शेअर करण्यास काहीही हरकत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy