प्रेम फक्त मी केल
प्रेम फक्त मी केल
आज अचानक तो समोर आला आणि माझ्या हृदयाचे ठोकेच चुकले. आजही त्याला पाहून जीव घाबरा होत होता, मन कासावीस होत होते, हात पाय थंड पडले होते. मी त्याच्यावर एक कटाक्ष टाकला तो मला पाहून गोड हसला पण मला मात्र तेही अवघड जात होते. भरलेल्या डोळ्यांनी नजर चोरत मी ट्रेनमध्ये चढली. सीटचा नंबर पहिला तर तो जिथे प्लॅटफॉर्म वर उभा होता ती विंडो सीट माझीच होती. समान नीट लावून मी सीटवर बसली. न राहवून त्याच्यावर एक नजर टाकली. तो मलाच हात हलवून बाय करत होता. नकळत मीही त्याला हात हलवून निरोप घेतला. मी मुंबईला निघाली होती पण तो कुणाची तरी वाट पाहत तिथेच थांबला होता. ट्रेनने हॉर्न दिला आणि चालू झाली. तसे डोळ्यातील अश्रु हवेत तरंगू लागले. ट्रेनचा वेग वाढला तसा तो दिसेनासा होत गेला आणि माझ्या आठवणी परत ताज्या झाल्या. 10 वी च शेवटचं वर्ष होत, शाळेच आणि माझ्या प्रेमाचही. कारण पुढच्या शिक्षणासाठी निनाद मुंबईला जाणार होता. पण माझ मात्र फक्त कॉलेजच बदलणार होत. गेली पाच वर्ष म्हणजे इयत्ता पाचवी पासून मी त्याच्यावर प्रेम करत होती. तशी मी एकदम बिनधास्त मुलगी त्यामुळे मुलांशी बोलण्यात मला काही वावग वाटायचं नाही.. त्यात प्राथमिक इयत्तेत अव्वल आलेली, त्यामुळे जमिनीवर बसून प्रत्येक मुलाला अभ्यासात मदत करण ही आमच्या बाईंची शिकवण, पण बेंचवर बसल्यावर मुली आणि मुलांमध्ये एक मोठी भिंत असते हे मला माध्यमिक मध्ये येवून कळलं. आम्ही कधीच एकमेकाशी शाळेत असताना बोललो नाही कारण एखादा मुलगा चुकून एखादया मुलीशी बोलला की त्यांच्या जोडया लागल्याच म्हणून समजा... त्यात आपली गावची मानसिकता (mentality), अजून भर म्हणजे आमच्या मुख्याध्यापिका, शेळके बाई, त्यांची मुलगी आमच्याच वर्गात शिकायची, म्हणजे जरा कुठे घंटा वाजली की पाटी फुटलीच म्हणून समजायची. त्यामुळे जे काय असायचं ते नजरेतच. त्याने मला पाहणं मी त्याला पाहणं, कधीतरी दोघांचीही नजर मिळण मग एकाने हळूच नजर चोरण, मग स्वतशीच हसणं. समोरच्या बेंचवर बसलेल्या त्याला पाहण्यासाठी पुस्तक उगीचच बेंचवर उघडून डोक हातावर ठेवून बेंचचा टेका घेण. आणि बेंच रोटेशन, त्याची तर मज्जाच वेगळी होती. पहिली बेंच नको पण लास्टची बेंच सर्वात प्रिय. कारण कधी कधी तोही यायचा ना माझ्या अगदी बाजूच्या बेंचला अगदी जवळ, मग उगीचच आवाज वाढवून बोलणं. मैत्रिणीची थट्टा मस्करी करण. वाचणाच्या तासाला अडखळेल्या शब्दाला मागून हळूच उच्चारण. अभ्यास पूर्ण नसल्यास छडी लागणार्या हाताला पाहून डोळ्यात पाणी उभ राहणं. त्याच दमदार क्रिकेट खेळणं आणि माझ कौतुकास्पद पाहणं, खो-खो खेळताना तोंडात रुमाल ठेवून धावणं, परिक्षेत एकमेकाला पुरवणी पास करण. ह्या सर्वात पाच वर्ष केव्हा निघून गेली हे कळलच नाही. तोही माझ्यावर प्रेम करत होता पण तो व्यक्त करणार नाही याची मला पुरेपूर खात्री होती म्हणून मीच तो पुढाकार घ्यायचं ठरवलं आणि आता शाळाही संपणार होती म्हणजे शाळेतून काढण्याच टेंशन नव्हतं. प्रत्यकेच्या तोंडात एकाच वाक्य होत, “बरं झालं सुटलो एकदाचे”.... मी ठरवलं होत निनादला आपल्या मनातलं सर्व सांगून टाकायच न जाणो मुंबईला माझ्यापेक्षा कुणी सरस मुलगी त्याला भेटली तर...? आणि मैत्रीणिंच पण हेच म्हणणं होत की, मनातल्या भावना ओठावर आणून व्यक्त केल्यास शब्दाला शब्द जुळले जातात. माझ ठरलं होत यंदाच्या जत्रेला मी त्याला माझ्या मनातलं सांगणार होती. आणि अखेर तो दिवस आलाच… मी माझ्या बहिणीचा छानसा ड्रेस घालून तयार झाली. किती वेड असत प्रेम नाही? आपल्याला कोणीतरी पाहणार आहे याची किती हाव असते मनाला... आणि मैत्रिणींनी त्या ड्रेसच कौतुक केल म्हणजे मग मन अजूनच झोके घेवू लागत. जत्रेत तशी फारच गर्दी होती त्यामुळे त्याला शोधणं फारच अवघड होत. मी आणि माझ्या मैत्रिणी, आम्ही चौघींनी मिळून पूर्ण मंदिर वरुण खालपर्यन्त तीन वेळा पालथ घातल पण तो कुठेच दिसला नाही मला वाटलं आज बहुतेक तो येणार नाही निराश मनाने थंडीने थरथरणार्या शरीराला थोडीशी ऊब मिळावी म्हणून चहा पिण्यासाठी आम्ही एका दुकानात शिरलो. आत जावून एका बाकावर बसलो आणि पाहतो तर काय आमच्या समोर निनाद आणि त्याचे मित्र बसले होते. गरम चहाचा घोट घेताना जिभेला चटका बसला आणि मला माझ्या आनंदाची सीमा कळली. पण दुसर्याच क्षणी तो मला अजूनही एकटक पाहतो आहे या जाणीवेने काळजात धस्स झाल. त्याची नजर फक्त मला प्रेमाने पाहत होती आणि माझी नजर ते सहन करू शकत नव्हती म्हणून चहाच्या कपावर जावून खिळली होती. त्याच्या त्या नजरेतून मला एक मात्र कळलं होत की मी आज खूपच छान दिसत होती. “माझ्या मनाला आजुबाजुच कोणीही दिसेनास झाल, मी हळूच उठली आणि त्याच्या दिशेने चालू लागली त्याच्या बाजूला जावून बसताच त्याने माझा थंड पडलेला हात हातात घेवून मला जवळ ओढल, दोन्ही हातांनी माझी मान पकडत त्याचे ओठ माझ्या ओठावर टेकवले. थंडीने रुक्ष झालेले माझे ओठ पुर्णपणे भिझुन निघाले होते.” टेबलवरील कप उचलताच माझ मन भानावर आल समोर पहिलं तर तो निघून गेला होता. मग आम्ही ही लगबगीने त्याच्या मागे गेलो. मुश्किलीने एका मित्राकडे निरोप पाठवून त्याला मंदिराच्या सर्वात वरच्या मजल्यावर जिथे जास्त वर्दळ नव्हती अश्या ठिकाणी बोलावलं. आता मात्र माझ्या हृदयाने माझी साथ सोडून दिली होती कारण ते एवढं घाबरल होत की त्याला समजावण मुश्किल झाल होत. तो समोर आला आणि न जाणवणारी थंडीही मला जाणवू लागली हात पाय गार पडले. पोटात थंडीचे कुडकुडे भरले. मैत्रिणी मला all the best बोलून दूर जावून उभ्या राहिल्या. मी अपराध्यासारखी त्याच्या समोर उभी राहिली. कुठून सुरुवात करावी काय बोलावं हे सुचेना...मी -“अ, तु, तूला काहीतरी सांगायचं होत.निनाद – बोल ना,मी – तुला राग नाही ना येणार.निनाद – नाही बोल.मी – मला तू खूप खूप आवडतोस. माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे.निनाद – (हसतो)मी – गेली पाच वर्ष मी तुझ्यावर प्रेम करते.निनाद – माहीत आहे मला. पण एवढी पब्लिसिटी का केलीस..?मी – मी खरच प्रेम करते रे तुझ्यावर... मला भीती नाही कुणाची..?निनाद – अस प्रेम नाही होत ना.मी – माझ चुकल का...?निनाद – नाही, मी विचार करून सांगतो.आता मी पुर्णपणे कोसळली. मी – (रडत) निनाद, प्लीज मला नाही म्हणू नकोस रे... प्लीज, मी मरून जाईन रे, प्लीज मला नाही म्हणू नकोस.निनाद – रडू नकोस. मी सांगतो तुला. कॉल कर मला. माझ्या तोंडात फक्त एकाच वाक्य होत “मला नाही म्हणू नकोस” कारण जेव्हा एखादा व्यक्ती विचार करतो अस बोलतो याचा अर्थ त्याच प्रेम नाही आहे. आणि नंतरही तो नाहीच म्हणणार आहे. तो जत्रेतून लवकर निघाला कारण त्याला मुंबईला जायचं होत. त्याचा उदास चेहर्याने मी निरोप घेतला. एका मित्राच्या मदतीने दुसर्या दिवशी लगेच मी त्याला फोन केला. त्याने मला होय म्हणून सांगितलं, “ हो मी ही तुझ्यावर प्रेम करतो.” आणि माझा आनंद गगनात मावेना. कदाचित सर्वांसमोर त्याला सांगायला भीती वाटत होती असेल. म्हणून त्याने मला फोन करायला सांगितलं असेल. पण त्याने मला “होय” म्हटलं याचाच मला जास्त आनंद होता. मग आमच प्रेम फोनवरच बहरू लागलं. कॉलेज सुटल्यावर कॉइन जमा करून त्याला पी. सी. ओ. ने फोन कराव हेच माझा रोजचं काम झाल होत. सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत काहीही न खाता लेक्चर अटेंड करण फार त्रासदायक असायचं पण पॉकेट मनी म्हणून मिळणारे 10 रुपये जर खाल्ले तर त्याला फोन कसा करू या विचाराने भुकेलाही मी माझी सवय बनवली होती. पण त्याच तुटक आणि मोजकच बोलणं मला फार अस्वस्थ करत होत, मी “होकार” देण्यासाठी जबरदस्ती केली याची सतत जाणीव करून देत होत. मी आत्महत्या वैगरे करेन म्हणून त्याने मला होकार दिला असेल का...? छे...! अस काही नसेल..! त्याच्या आजूबाजूला त्याचे आई वडील किंवा कोणी नातेवाईक असतील, मुंबईच्या छोटयाशा घरांमध्ये लॅंडलाइन वर बोलणं फार मुश्किल होत असेल ना. आणि तस पण तो आपल्या वडिलांना घाबरतो हे ही तेवढच खर होत. पण माझे हे सारे तर्क कुतर्क त्याने समोरून एक फोन करताच दूर होवून जायचे. माझ्या शेजारच्या काकांकडे अधून मधून तो फोन करायचा. मग अस वाटायचं टाळी द्यायला मीच हात पुढे करत नाही आहे पण तोही तेवढाच जोर लावतोय आणि मनात परत एक जोश निर्माण व्हायचा. पाच – सहा महीने झाले असतील आमच्या प्रेमाला, या दरम्यान खूप मुलांनी मला प्रपोज सुद्धा केल होत, पण मला त्याच्याएवढा कधीच कुणी भावला नव्हता. पण मग अचानक बिघडलं कुठे...? तू माझ्याशी लाडणे बोलावं अस नेहमी वाटायचं पण तुझ्या मोजक्या बोलण्यात मी सुखी होती रे. तू बोललेला “कशी आहेस..?” हा शब्दही मला आपलासा वाटायचा. तू दूर होतास पण त्या फोनवर तू मला प्रत्यक्ष समोर आहेस असा भास व्हायचा. काहीच तर अपेक्षा नव्हत्या ना रे माझ्या, मग का...? का अस केलस..? का बदलास तू असा....? का...?एक दिवस अचानक त्याचा एक मित्र माझ्या जवळ आला आणि म्हणाला,मित्र – रचना, निनादला ब्रेकअप हवय तुझ्याकडून... मी – (काळजात धस्स झाल माझ्या) का...?मित्र – माहीत नाही. त्याने तुला फोटो दिलया का..? तो त्याला परत हवाय..मी – (रडत) पण का अरे...?मित्र – माहीत नाही ग मला.मी – तुला एवढं माहीत आहे तर कारणही माहीतच असेलच ना.मित्र – त्याच तिकडे एका दुसर्या मुलीवर प्रेम आहे.आता मी पुरती कोसळली माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी ओस्काबोस्की रडू लागली. ट्रेनचा जोरदार दचका बसला आणि माझे डोळे उघडले. माझ्या आजूबाजूला बसलेली सर्व लोकं मलाच पाहत होती. कारण माझे अश्रु गालावर घळघळा ओघळू लागले होते. त्यानंतर मी त्याला खूप वेळा कॉल केले होते पण त्याने कधीच फोन घेतला नाही. त्याच्या बहिणीनेही मला फोन करू नको अस बजावल. आजही माझ्या मनात फक्त एकच प्रश्न येतो, “का केलस तू अस...?” माझ्या भावनांशी का खेळलास..? खोटी आशा का दिलीस..? काय चुकल रे माझ..? पण या सर्वांची उत्तर कोण देणार मला...?

