पळवून लावा कंटाळा
पळवून लावा कंटाळा
एक आटपाट नगर होतं. तिथे माणसे अगदी सुखात राहत होती, हसत होती, नाचत होती, उद्योगात मग्न होती. पण कोण्या पाप्याची नजर लागली होती. एकदा या गावात टीव्ही, मोबाईल नावाचा डिजिटल शत्रू शिरला... कामे ठप्प झाली, मैदाने ओस पडली, पुस्तके दूर झाली. तासनतास माणसे एकाच जागी बसून राहू लागली... शत्रू असलेली ही वस्तू आता मित्र झाली होती. डोळ्यांचे आजार वाढले, मानपाठीचे आजार वाढले, व्यायाम थांबला, भूक संपली, चिडचिड वाढली, मित्र संपले, उत्साह संपला.
नगरातील वृद्ध माणसांना काय करावे या शत्रूचे असा प्रश्न पडला... मग लोक आता जुन्या जाणत्या माणसांकडे गेली. दादा, दादा ही चिंता कशी जाईल? काही तरी यावर उपाय सांगा, वसा सांगा.
मग दादा म्हणाले, तुला रे कश्याला हवा वसा? तू उतशील, मातशील घेतला वसा टाकून देशील. उपाय आहे अवघड, कसा रे तू करशील?
लोक म्हणाले उतणार नाही, मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही.
जाणते म्हणाले ठीक आहे. एकच वसा घे, गावातील वीज बंद करून टाक. मैदानावर दे सर्वांना हाक, पुस्तकांची गोडी तू चाख...
लोकांनी ऎकलं. वीज बंद केली, पुस्तके हाती घेतली, मैदानाशी मैत्री केली. आता शत्रू पळाला... आळस आणि कंटाळा नावाचा विनाशकारी ब्रह्मराक्षस पळाला.. आणि यशाच्या शिखराकडे नेणारा उत्साह नावाचा देवदूत सगळ्यांना मिळाला.
आता सारे नगर आनंदून गेले होते, उत्साहाने गाऊ लागले, नाचू लागले. यांना भेटलेला देवदूत तुम्हा-आम्हाला भेटो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना.
तात्पर्य - आळस हा नेहमीच माणसाचा नाश करतो.